( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
१
कित्येक एकरामध्ये देसाई शिक्षण संस्थेचा पसारा पसरलेला होता.सर्व प्रकारच्या विद्याशाखा तिथे होत्या.एखाद्या विश्वविद्यालयाच्या पसार्यासारखेच ते आवार आणि तो एकूण पसारा होता.मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह, प्राध्यापकांसाठी छोटेखानी बंगले, शिवाय प्राध्यापकांसाठी फ्लॅटस,प्राचार्यांचा बंगला, नोकरांची वसतिस्थाने,अशी निवास व्यवस्था होती.जे प्राध्यापक आठवड्यातून काही दिवस शिकवण्यासाठी येत असत त्यांच्यासाठी स्वतंत्र निवास व्यवस्था होती.अनेक विद्याशाखा प्रत्येक विद्याशाखेची पदव्युत्तरपर्यंत शिक्षण देणारी महाविद्यालये,वाचनालये, ऑफिस,असा पसारा पसरलेला होता.परिसरात नामांकित बँकेची शाखा होती. देसाई शिक्षण संस्थेच्या इंग्लिश व मराठी माध्यमाच्या बालवाडीपासून ते दहावीपर्यंत शाळा त्याच परिसरात होत्या. एकदा बालवाडीत विद्यार्थी दाखल झाला की तोएमए, एमएस्सी, एमकॉम, एमबीए, एमडी,किंवा त्याला आर्किटेक्चर,लॉ, इत्यादी जे काही करायचे असेल ते करून नंतर या परिसरातून बाहेर पडू शकत असे.शिक्षण क्षेत्रात देसाई शिक्षण संस्थेचा दर्जा ए प्लस समजला जात असे.
अशा नामांकित शिक्षण संस्थेत जशी त्याच शहरातून मुलेमुली येत त्याच प्रमाणे बाहेरगावाहूनही मुलेमुली येत असत. परगावाहून येणारी मुले मुली शक्य झाले तर कॉलेजच्या वसतिगृहात रहात असत.वसतिगृहात जागा मिळविण्यासाठी स्पर्धा असे.शक्यतो गुणवत्तेनुसार वसतिगृहात जागा दिली जात असे.ज्यांना वसतिगृहात जागा मिळत नसे त्यांच्यासाठी जवळपास राहण्याच्या सोयी होत्या. शहर मोठे होते. क्लबस्, रेस्टॉरंटस्, जिमस्, अनेक शिक्षण संस्था व त्यांची कॉलेजेस,सिनेमागृहे, नाट्यगृहे, अशी शहरात रेलचेल होती.
तर अशा या नामांकित शहरात व नामांकित शिक्षणसंस्थेमध्ये सुनीता बाहेरगावाहून शिक्षणासाठी आली होती.ती मेडिकलला पहिल्या वर्षाला होती. तिला चांगले मार्क्स असल्यामुळे मुलींच्या वसतिगृहात जागा मिळाली होती.मुलींच्या वसतिगृहाचा बंदोबस्त वाखाणण्यासारखा होता.रात्री दहाला मुलींचे वसतिगृह बंद केले जात असे.प्रत्येक मजल्याला सरकते लोखंडी दरवाजे होते.ते कुलूप लावून बंद केले जात असत.मुख्य प्रवेशद्वारही असेच सरकत्या लोखंडी दरवाजाचे होते.तेही बंद केले जात असे.सकाळी सहालाच सर्व दरवाजे उघडले जात असत.शिवाय सुरक्षारक्षक सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी व्यवस्था होतीच.दुसर्या शहरातील राज्यातील पालक त्यांच्या मुली संस्थेच्या भरवश्यावर आपल्या स्वाधीन करतात.इथे शिकायला पाठवितात.तेव्हा त्यांच्याकडून किंवा त्यांच्याशी गैरवर्तन होऊ नये याची काळजी संस्था घेत असे.संस्थेचा नोकर वर्ग सोडला, तर दिवसासुद्धा पुरुष, अगदी वडील सुद्धा आपल्या मुलीला भेटायला हॉस्टेलवर येवू शकत नसत.वडिलांना भेटायलासुद्धा संस्थेच्या कुंपणाबाहेर जाऊन मुलीना भेट घ्यावी लागे.
जर एखाद्या मुलीला रात्री वसतिगृहाबाहेर राहायचे असेल तर तिला योग्य कारण देऊन परवानगी घ्यावी लागे.कारण पटले तरच परवानगी दिली जाई.मुलींना रात्री सिनेमा नाटक रेस्टॉरंट मनोरंजनाचे अन्य कार्यक्रम यासाठी जाता येत नसे.त्यांना जणू काही आपण तुरुंगात आहोत असे वाटत असे.अर्थात रविवारी सुटीच्या दिवशी सिनेमा, दिवसा होणारी नाटके यांना जाता येत असे.गावात नातेवाईक असल्यास तशी प्रमुखांची खात्री पटवून दिल्यास,त्यांच्याकडे राहण्यासाठी जाता येत असे.
२
सुनीता मोकळ्या वातावरणात राहिलेली होती.तिला नाटक सिनेमा याची आवड होती.तिच्या घरी नाटक सिनेमाला साधारणपणे रात्रीच जात असत.मधूनमधून रात्रीच्या पार्ट्या होत असत. हॉटेलिंगही होत असे.इथे आल्यावर तिला तुरुंगात पडल्यासारखे वाटत होते.कॅन्टीनचे जेवण तिच्या हिशेबी बेचव होते .जेवून एकदा खोलीवर आल्यावर तिला करमत नसे.बाहेर कुठे फेरफटका मारायला जावे तर तेही जाता येत नसे.काहीतरी जुगाड करुन जर आपल्याला रात्रीचे बाहेर फिरता आले तर किती छान होईल असा विचार नेहमी तिच्या मनात येत असे.
ती अभ्यासात, मोबाईलमध्ये ,मन रमवत असे.नाईलाज होता. तेथे राहणे भाग होते.तिची खोली दुसर्या मजल्यावर होती.गॅलरीत उभे राहिल्यावर परिसरातील दाट झाडी त्यात अधून मधून असलेले बंगले,कर्मचार्यांची घरे,वसतीगृहे,अंतर्गत रस्ते, दिसत असत.मेनरोड परिसरापासून बराच लांब होता.तेथील वाहनांचे आवाज ऐकू येत.थोडाबहुत प्रकाशही दिसत असे. तिच्या खोलीत एक अनिता नावाची मुलगी नुकतीच आली होती.ती कॉमर्सला होती.ती जवळजवळ तिच्याच वयाची होती. दोघांची गट्टी बऱ्यापैकी जमली होती .
एक दिवस ती अशीच मेनरोडवर फिरत होती.एके ठिकाणी जुन्या पुस्तकांचा ढीग लावून एकजण पुस्तके विकत होता.कोणतेही लहान मोठे पुस्तक पांच रुपयांत घ्या असे तो ओरडत होता.सुनीताला वाचनाची आवड होती.तिने जुनी पुस्तके चाळून दोन लघुकथा संग्रह, एक कादंबरी,दोन तीन दिवाळी अंक व एक बंगाली जादूवरील पुस्तक विकत घेतले.आता निदान चार आठ दिवस तरी तिचे बरे जाणार होते.तिला रात्री बारापर्यंत जागायची सवय होती.तिला अजून विशेष अभ्यासही नव्हता.तिची रूम पार्टनर अनिता हिला लवकर झोपायची सवय होती.ती दहालाच गाढ झोपी जात असे.
जादूच्या पुस्तकामध्ये बरेच तंत्र मंत्र जारण तारण मारण इत्यादी आश्चर्यकारक गोष्टी लिहिलेल्या होत्या.त्यातील एका मंत्र वाचनाने ती भयंकर प्रभावित झाली.तो मंत्र जर सत्य असेल आणि तो तिला सिद्ध करता आला तर तिची या तुरुंगातून सुटका होणार होती. आठ दिवस पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अखेर तो मंत्र सिद्ध झाला.तिने शास्त्रोक्तरित्या त्या मंत्राचे उच्चारण केले आणि आश्चर्य तो मंत्र पूर्णपणे सिद्ध झाला होता.आता ती या कैदखान्यातून मुक्त झाली होती.
३
अनिता, सुनिताची पार्टनर एकदा झोपली की बऱ्याच वेळा सकाळपर्यंत गाढ झोपत असे.केव्हा केव्हा तिला मध्यरात्री जाग येत असे.जेव्हा जेव्हा तिला जाग येई तेव्हा तेव्हा बहुतेक वेळा सुनीता पुस्तक वाचत असे किंवा मोबाईलमध्ये गुंतलेली,गुंग झालेली असे.
अशाच एका रात्री अनिता जागी झाली.खोलीतील दिवा मालवलेला होता.पॅसेजमधील व बाहेरील दिव्यांचा प्रकाश खोली बऱ्यापैकी उजळवून टाकीत असे.तिने सुनीताच्य़ा कॉटकडे पाहिले .सुनीता कॉटवर नव्हती.कदाचित स्वच्छतागृहात गेली असेल असे समजून अनिता झोपी गेली.दोन चार दिवसांनी केव्हातरी रात्री तिला अशीच जाग आली.सवईने तिने उशाजवळ ठेवलेल्या मोबाईलमध्ये वाजले किती ते बघितले.रात्रीचे साडेबारा वाजले होते.अनिताने सुनीताच्या कॉटकडे बघितले .सुनीता गादीवर नव्हती.
अनिताला झोप येईना. स्वच्छतागृहात गेलेल्या सुनीताची ती वाट पाहत होती.वाट पाहता पाहता तिला केव्हा तरी झोप लागली.दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीता गादीवर होती. दोन रात्रीचा अनुभव तिच्या मनात खोलवर रुजला होता.तरीही ती त्याबद्दल सुनीताजवळ कांहीही बोलली नाही.
कांही दिवसानंतर अशीच एका रात्री अनिताला जाग आली.सुनिता गादीवर नव्हती.रात्रीचे बारा वाजले होते .थोडा वेळ वाट पाहून नंतर अनिता ताडकन उठली.तिने जाऊन स्वच्छतागृह पाहिले.स्वच्छतागृह रिकामे होते.तिने बाहेर जाणारा दरवाजा पाहिला.त्याच्या दोन्ही कड्या जागच्या जागी होत्या.याचाच अर्थ सुनिता दरवाजातून बाहेर गेली नव्हती.खिडक्यांना रेजे होते .रेज्यातून बाहेर जाणे अशक्य होते.मग सुनिता कुठे गेली होती. बहुधा तासभर गेलेला असावा.लांबवर दोनचे टोल पडल्याचा आवाज ऐकू आला.अजूनही सुनीता परत आली नव्हती. आता मात्र अनिताला काळजी वाटू लागली होती.डोक्यावर पांघरूण घेऊन,चेहरा उघडा ठेवून,ती टक लावून,धडधडत्या हृदयाने सुनीताच्या गादीकडे पाहात होती.ती सुनीताची वाट पाहात होती.
बंगाली जादूचे पुस्तक मन लावून पुन्हा पुन्हा अनेकदा वाचताना अनिताने सुनीताला पाहिले होते.काहीतरी गडबड निश्चित होती.आता अनिताला भीती वाटू लागली होती.धडधडत्या अंत:करणाने कॉटवर पडून ती सुनीताची वाट पाहत होती.
इतक्यात खिडकीजवळ सुनिता एकाएकी प्रकट झालेली अनिताला दिसली.एकाएकी ती हवेतून कशी निर्माण झाली त्याचे गूढ तिला कळत नव्हते.
अनिताने सुनीताला हाक मारली.अनिता जागी असेल असे सुनीताला वाटले नव्हते.तिने मारलेल्या हाकेने सुनिता दचकली.अनिताला थोडी भीती वाटत होती.ही सुनीता धोकादायक मुलगी आहे असे तिला वाटू लागले होते.ती चेटकीण आहे की काय असाही तिला एकदा संशय आला.वसतिगृह प्रमुखाला भेटून शक्य असेल तर आपली खोली बदलून घ्यावी असे तिला वाटू लागले होते.
अनिताने या गोष्टीचा एकदस सोक्षमोक्ष लावण्याचे ठरविले.
*खोलीचा दरवाजा बंद असताना,वसतिगृहात प्रत्येक मजल्यावर व तळमजल्यावर बाहेर जाण्याच्या रस्त्यावर, सरकते दरवाजे व त्याला दोन दोन कुलूपे असताना, खिडक्यांना गज असताना ,रात्री सुनिता कुठे जाते? कशी जाते?कां जाते?सुनिता खरेच माणूस आहे का ? असे अनेक प्रश्न अनिताला पडले होते.
*कदाचित कुठे जाते? कां जाते?याचा अंदाज लावणे ,तर्क करणे, शक्य होते.कदाचित त्याचा शोधही लावता आला असता.परंतु या सर्व कडेकोट बंदोबस्तातून ती बाहेर कशी जाते?याचा उलगडा होणे अशक्य होते.*
*सुनीताला अनिताच्या मनातील वादळाची चांगलीच कल्पना आली होती.*
*तिची अस्वस्थता तिला स्पष्टपणे जाणवत होती.*
*अनिताच्या जागी सुनीता असती तर तीही अशा विचारचक्रात सापडली असती.*
*सुनीताने दुसर्या दिवशी अनिताजवळ सर्व रहस्य सविस्तर उलगडून सांगितले.*
*तिलाही आपल्या रहस्यात सामील करून घेतले.*
(क्रमशः)
२४/११/२०२०©प्रभाकर पटवर्धन