(ही गोष्ट काल्पनिक आहे जिवंत किंवा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते .चारी बाजूंनी पत्रे लावून आडोसा निर्माण केलेला होता .असा आडोसा नेहमीच निर्माण केला जातो .बांधकामाचे साहित्य सुरक्षित राहावे. चोरीला जाऊ नये हा एक उद्देश त्यामागे असतो.त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती किंवा वाहन यांचा चुकून अपघात होऊ नये हाही उद्देश त्यामागे असतो .बांधकामाचा डबर व धुरळा रस्त्यावर येऊन त्यामुळे त्रास होऊ नये हाही उद्देश असतो .रखवालदाराची नेमणूक अर्थातच झालेली होती .त्याला झोपडी दिलेली होती.प्रवेशद्वाराजवळ एका कोपऱ्यात त्याची झोपडी होती .सर्वत्र प्रकाश झोत सोडलेले होते .रखवालदार सुभान्या सर्वजण कामावरून निघून गेल्यावर पत्र्याचा दरवाजा पक्का लावून घेत असे .त्यामुळे सामान चोरीला जाण्याचा संभव कमी होई.मधून मधून तो बांधकाम चाललेल्या संपूर्ण जागेला चक्कर मारीत असे .इमारतीचे चार मजले बांधून झाले होते .अजून सहा मजले बांधणे शिल्लक होते.
पहाटे चार वाजता इमारतीला चक्कर मारीत असताना त्याला एक मनुष्य इमारतीजवळ अस्ताव्यस्त पडलेला आढळून आला .त्याने दरवाज्याकडे बघितले तर पत्र्याचा दरवाजा उघडा होता .दारूच्या धुंदीमध्ये कदाचित हा मनुष्य आत आला असेल व नंतर त्याची शुद्ध हरपली असेल असे सुभान्याला वाटले.त्याने हलवून त्याला जागा करण्याचा प्रयत्न केला .त्याचे अंग बर्फासारखे थंडगार लागत होते .तो बहुधा मेला असावा असा सुभान्याला संशय आला.हे बेण येथे कुठे तडफडले असे स्वतःशीच म्हणत त्याने मॅनेजरला फोन लावला.
इमारतीजवळ प्रेत म्हणताच मॅनेजरची झोप उडाली.कशालाही हात लावू नकोस, मी पोलिसांना घेऊन तेथे येत आहे,असे मॅनेजरने सुभान्याला सांगितले.व लगेच पोलिसांना फोन लावला .पोलिसांची गाडी व मॅनेजर जवळजवळ एकाच वेळी तेथे पोहोचले .
पोलीस तपास सुरू झाला .प्रेताच्या अंगावर त्याची खूण पटवणारी कोणतीही गोष्ट मिळाली नाही . रुमाल मोबाइल पाकीट कागदपत्र इत्यादी सर्व कुणीतरी प्रेताची ओळख पटू नये म्हणून जाणीवपूर्वक काढून घेतलेले असावेत.चारी बाजूनी फोटो घेतल्यावर, तो जिथे पडला होता तिथे मार्किंग केल्यावर, रीतसर पंचनामा करून प्रेत पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले.बहुधा अती दारू प्राशनाने उंचावरून पडल्यामुळे मृत्यू असा रिपोर्ट येईल असा पोलिसांचा अंदाज होता.
सकाळी आठ वाजता सर्व सव्य अपसव्य करून पोलिस व शामराव एकाच वेळी पोलीसस्टेशनमध्ये पोहोचले.इन्स्पेक्टरने शामरावांना सर्व घटनेचा अहवाल दिला .मृत्यू पावलेल्या इसमाचे फोटो सर्व पोलिस स्टेशनला पाठविण्यात आले .संगणकावरही मिसिंग कम्प्लेंटमध्ये त्याचा फोटो आहे का हे पाहण्यात आले.अजून तरी कुणी मिसिंग कम्प्लेंट केली नव्हती .अपघाती मृत्यू झालेला किंवा खून झालेला मनुष्य कोण आहे हे शोधून काढणे अत्यावश्यक होते एरवी पुढील कोणतीच हालचाल करता येत नव्हती.
शवविच्छेदनाचा अहवाल आला .अती दारू सेवन व त्याच बरोबर विषप्राशन यामुळे मृत्यू असे अहवालात म्हटले होते. अपघाताचा, उंचावरून पडल्यामुळे मेंदूतील रक्तस्रावाचा,कुठेही उल्लेख नव्हता .साध्या मृत्यूची केस आता खुनाची ,अपघाताची किंवा आत्महत्येची केस झाली.खून झालेला मनुष्य कोण हे शोधून काढणे प्रथम आवश्यक होते .त्याशिवाय खून कोणी केला ते शोधून काढणे शक्य नव्हते .
शामरावांनी प्रथम दोन गोष्टी इन्स्पेक्टरला करण्यास सांगितले.एक_ वर्तमानपत्रात त्याचा फोटो देऊन त्याला कुणी ओळखत असल्यास त्याला पोलिसांना येऊन भेटण्यास सांगणे .दोन_लाँड्री मार्कवरून त्याचा तपास लागतो का ते पहाणे.शर्टावर व पॅन्टवर jkl मृत व्यक्तीचा व adk लाँड्रीचा असे मार्क होते .त्या परिसरात बर्याच लाँड्री होत्या .दोन पोलिस लाँड्री शोधून काढण्याच्या कामावर लावण्यात आले .तिसऱ्या दिवशी लॉन्ड्री मिळाली.लाँड्री मधील रेकॉर्डवरून मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव व पत्ता कळला .
मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव होते जयराम काशीनाथ लहाने . लाँड्रीचे नाव होते अक्षय धुलाई केंद्र .धुलाई केंद्रातच जयरामचा पूर्ण पत्ता सुदैवाने मिळाला .पत्यावर जाऊन पोलिस चौकशी करणार होते तेवढ्यात एक वयस्कर जोडपे पोलिस स्टेशनमध्ये आले.घरी परत न आलेल्या मुलाची मिसिंग म्हणून तक्रार नोंदविण्यासाठी ते आले होते.
हे जोडपे काशीनाथ व त्याची बायको अशी दोघे होती . जयरामचे ते आई वडील असावेत.ते कुठे राहतात अशी चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलेला पत्ता व लाँड्री मधून मिळालेला पत्ता दोन्ही एकच होते . शामरावानी त्यांना जयरामच्या मृत्यूची बातमी सांगितली नाही .त्यांनी त्या दोघांची तक्रार प्रथम ऐकून घेतली.त्या दोघांचा मुलगा जयराम दोन दिवसांपूर्वी बाहेर गेला तो परत आला नाही.त्याला फोन करता फोन स्वीच अॉफ आहे असा मेसेज येत होता.त्याना माहीत असलेल्या त्याच्या मित्रांकडे त्यांनी चौकशी केली होती.परंतु कुणाकडेच त्याची माहिती नव्हती .त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडेही फोन करून बघितला होता.तिथेही कुठे त्याचा पत्ता नव्हता .शेवटी हरवल्याची तक्रार नोंदविण्यासाठी ती दोघे पोलिस स्टेशनमध्ये आली होती .शामरावांनी त्यांच्याकडे जयरामचा फोटो मागितला . सुदैवाने त्यांनी फोटो आणला होता.फोटो बघितल्यावर मृत जयराम व यांचा हरवलेला मुलगा जयराम हे एकच आहेत अशी शामरावांची खात्री पटली .
त्या जोडप्याला कटू बातमी सांगण्याचे काम शामरावांवर आले होते .शामरावानी त्या दोघांना जयरामला भाऊ किंवा बहिण आहे का असे विचारले .त्याचा भाऊ व बहीण दोघेही मुंबईत नव्हते . दोघेही दुसऱ्या गावी रहात होते .जवळचे कुणी मुंबईत असल्यास त्यांना प्रथम जयरामच्या मृत्यूची बातमी सांगण्याचे शामरावांच्या मनात होते . शेवटी नाईलाजाने शामराव त्यांना घेऊन शवागारात आले . शवागार बघितल्या बरोबरच त्या दोघांनी हंबरडा फोडला .त्या दोघांना सावरत आत नेऊन शामरावांनी जयरामचा चेहरा त्यांना दाखविला.जयरामचा चेहरा बघितल्यावर त्या दोघांना सावरणे शामरावांना अशक्य झाले .
नवी इमारत बांधत असलेल्या जागी सापडलेल्या प्रेताची ओळख पटली होती .आता त्याचा खून कोणी केला ते शोधून काढायचे होते .त्याने बहुधा आत्महत्या केली नसावी.अपघाती मृत्यू किंवा त्याचा खून झाला होता असे साधे सरळ अनुमान निघत होते.बऱ्याच खुनामागे बाई किंवा पैसा हे प्रमुख कारण असते.त्यादृष्टीने संपूर्ण तपास करणे आवश्यक होते .
जयरामच्या कंबरेला व डोक्याला चांगलाच मार पडला होता .उंचावरून पडल्यामुळे हा मार लागला की त्याला कुणी मारले होते ते नक्की सांगता येत नव्हते. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये मृत्यूचे कारण मेंदूतील रक्तस्राव हे नव्हते.त्यामध्ये दारू व विष या दोघांचा उल्लेख होता .
बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या एखाद्या मजल्यावर दारू पार्टी झाली नसेलच असे सांगता येत नव्हते.
दारू पार्टीनंतर जयराम मजल्यावरून खाली पडला व त्याचा मृत्यू झाला असेही घडले असण्याची शक्यता होती.
कदाचित त्याला कुणी वरून ढकलून दिले असण्याचीही शक्यता होती.
दारू पार्टी मध्ये त्याला मुद्दाम कुणीतरी विष दिले किंवा अनवधानाने विष पोटात गेले अशीही शक्यता होती .
विषारी दारू होती का? व तसे असल्यास आणखीही काही मृत्यू झाले होते का ?परंतु ते उघड झाले नाहीत. त्यांचीही चौकशी होणे आवश्यक होते .
कदाचित दुसरीकडे कुठे तरी मृत्यू झाला व नंतर प्रेत येथे आणून टाकले गेले.अपघाती मृत्यू झाला असे दाखवण्याची इच्छा असावी अशीही एक शक्यता होती .
शक्यता अनेक होत्या सर्व दृष्टिकोनातून तपास होणे आवश्यक होते .
त्याच वेळी विरोधी पक्षांची एक संयुक्त रॅली विधानभवनावर जाणार होती .विधानसभेचे अधिवेशन चालू होते.शामरावाना बंदोबस्ताचे काम दिलेले होते.शामरावांना या केससाठी पुरेसा वेळ देणे शक्य नव्हते.अपुरा स्टाफ व कामाचा ताण यामुळे हे काम आणखी कुणाकडे सोपवणेही शामरावांना शक्य दिसत नव्हते . त्यांनी याची चौकशी युवराज व संदेश यांच्याकडे सोपविण्याचे ठरविले .नाहीतरी खासगी क्षेत्राकडे सार्वजनिक क्षेत्रातील शक्य असलेली कामे सोपविण्याचा ट्रेंड हल्ली होताच .युवराजांनी आतापर्यंत कित्येक केसेस यशस्वीरित्या सोडविलेल्या असल्यामुळे युवराजांकडे केस सोपवण्याला किंवा त्यांची मदत घेण्याला वरिष्ठांची संमती होतीच.
शामरावांनी युवराजांना फोन केला व तिथेच संदेशला बोलवून घेण्यास सांगितले.लगेच ते युवराजांकडे युवराजांच्या ऑफिसवर गेले .युवराज व संदेश या दोघांनाही त्यांनी केस संपूर्णपणे समजून सांगितली .आतापर्यंत चौकशीतून उपलब्ध झालेली सर्व माहितीही त्यांना दिली .युवराज व शामराव या दोघांनीही एकमेकांना मिळालेली माहिती परस्परांना देऊन ही केस पुढे नेण्याचे निश्चित केले .
युवराजांनी संदेशला जयरामच्या शेजारी व नातेवाईकांकडे जावून जयरामबद्दल जास्त माहिती गोळा करण्यास सांगितले .जयरामचे लग्न झालेले नाही हे शामरावांनी युवराजांना सांगितले होतेच .जयरामचे एखाद्या अविवाहित किंवा विवाहित बाईबरोबर काही प्रेमाचे संबंध आहेत का याचा प्रथम तपास करावा त्यातून आपल्याला खुनाचा धागादोरा मिळू शकेल असे युवराजांनी संदेशला सुचविले.त्याचबरोबर जयरामच्या मित्रांचीही चौकशी करण्यास सांगितले.जयरामचे कुणाबरोबर वैर होते का? किंवा त्यांचे भांडण झाले होते का? याचीही चौकशी करण्यास सांगितले. बांधकामांवरील दारू पार्टी व त्यामध्ये रखवालदारही सामील होता का तेही पाहणे गरजेचे होते .
खुनाबरोबरच ही कदाचित अपघाती मृत्यू किंवा आत्महत्या अशीही केस असू शकेल तेव्हा त्या दृष्टीनेही तपास करावा असे सुचविले .
जयरामच्या पोटातील व्हिसेरामध्ये विष सापडले होते.त्याचबरोबर तो भरपूर प्रमाणात दारुही प्यायला होता .त्याचा मृत्यू दारूमुळे झाला की विषामुळे झाला?की दोन्हीही गोष्टीमुळे झाला?त्याने विष अपघाताने घेतले? मुद्दाम घेतले?की त्याला कुणी जाणून बुजून दिले?उंचावरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला की मृत्यूनंतर कुणीतरी त्याला उंचावरून ढकलून दिले होते ?रखवालदाराचा या मृत्यूमागे काही हात होता का? या सर्व गोष्टींचा तपास होणे गरजेचे होते.
मृत्यू झाला त्या दिवशीच्या रात्री जयराम कुठे कुठे होता याची माहिती गोळा करणे अत्यंत आवश्यक होते .त्यातून त्याचा मृत्यू कसा झाला ते समजू शकले असते .
(क्रमशः)
२७/८/२०१९©प्रभाकर पटवर्धन