(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

त्या गोष्टीला दहा बारा दिवस झाले होते .गेले दहा बारा दिवस तो अस्वस्थ होता .त्याला नीट झोप लागत नव्हती.झालेल्या गोष्टीला इलाज नव्हता असे तो मनाला पटवीत होता .अापण दगा दिला. आपण मैत्रीला जागलो नाही. हे त्याला अंतर्यामी कुठेतरी खात होते.त्यामुळेच शांतपणे गेले दहा दिवस तो झोपू शकला नव्हता .कुठून तरी आपल्यावर संकट कोसळणार आहे असेही त्याला वाटत होते .साजनरुपी संकट आपल्यावर कोसळेल असा विचारही त्याच्या मनात आला नव्हता.कुठे ना कुठे आपण चूक केली असेल.पोलीस आपल्याला शोधून काढतील .या भीतीखाली तो होता .जसे दिवस जात होते तशी त्याची भीती कमी होत होती.पोलिस आपल्यापर्यंत  पोचणार नाहीत याची खात्री त्याला वाटू लागली होती.अाज कितीतरी दिवसांनी त्याला शांत झोप लागली होती.आपल्याला कुणीतरी गदागदा हालवीत आहे, आपल्या कॉटजवळ कुणीतरी बसले आहे, असा त्याला भास झाला होता.

राजन झोपेतून दचकून जागा झाला .शेजारी खुर्चीवर साजन बसला होता.बंद खोलीमध्ये कॉट शेजारच्या खुर्चीवर साजनला बसलेला पाहून राजन भयंकर घाबरला .डोळे विस्फारून राजन साजनकडे पाहात राहिला. काळोखातही साजन आपल्याला कसा दिसतो, हा विचार त्याच्या मनात आला नाही. साजन त्याच्याकडे रागाने डोळे वटारून पहात होता. राजन गादीवर चटकन उठून बसला. कडी कुलूप बंद खोलीत साजन आला कसा याचे त्याला आश्चर्य वाटत होते . तू जिवंत आहेस ?तू इथे कसा आलास?  राजनने त्याला विचारले.बोलता बोलता त्याने उशीखालील पिस्तूल काढले व साजनवर गोळी चालविली.गोळी साजनच्या तथाकथित देहातून आरपार गेली.ते पाहून राजन, साजन कोण आहे ते समजून चुकला.त्याला आपला शेवट जवळ दिसू लागला. 

मी देहमुक्त झालो आहे. त्या दिवशी तू पैशांच्या लोभाने माझा काटा काढलास. तुला धडा शिकविल्याशिवाय मी राहणार नाही.तुझे आता थोडेच दिवस उरले आहेत .अजून माझ्या अंगात पुरेशी शक्ती आली नाही .हळूहळू मानवी आकारात मी जास्त जास्त राहू शकेन. माझ्या शक्ती वाढत जातील. नंतर तुझे काही खरे नाही. तुला सावध करण्यासाठी मी आलो आहे .तुझ्या सारखा मी भेकड नाही.तुला जे कांही करायचे असेल ते कर .तुला माझ्यापासून वाचविण्याचा प्रयत्न कर .मी तुझा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही .

एवढे साजन बोलत आहे तो त्याचे रूपांतर धुरात होऊ लागले होते.एकाएकी तो अदृश्य झाला होता .गादीवर बसल्या बसल्या साजन हिंव भरल्यासारखा थरथर  कापत होता.त्याला दहा दिवसांपूर्वीच्या सर्व घटना आठवत होत्या.    

राजन व साजन यांची ओळख गेली पाच वर्षे होती.दोघेही एकमेकांना मित्र समजत होते .मैत्री कमी परंतु मौजमजा करण्यात, गुन्हे करण्यात, दोघे एकमेकांबरोबर असत.दोघांनाही जुगाराचा नाद होता .दोघेही बदनाम गल्लीमध्ये बरोबरच जात असत .छोटे छोटे गुन्हे दोघेही परस्परांच्या सहाय्याने करीत असत .

उदाहरणार्थ एखाद्याचे पाकीट मारले तर ते लगेच एकजण दुसऱ्याकडे फेकीत असे . पाकीट घेतलेला गर्दीत गायब होत असे .नंतर दोघेही पैसे वाटून घेत असत .

एक जण एखाद्या मालदार व्यक्तीला, त्याच्या हातात पैशाने भरलेली सुटकेस आहे याची खात्री झाल्यानंतर,त्याच्या अंगावर घाण पडली आहे असे सांगत असे .सांगणाऱ्यानेच ती घाण

टाकलेली असे .तो त्या व्यक्तीला घाण साफ करण्यासाठी मदत करण्याचे नाटक हुबेहूब वठवीत असे. दुसरा ब्रीफकेस घेऊन पलायन करीत असे .

जुगारात एकदा राजनला खूप मोठा फटका बसला.सावकाराने त्याला वेळोवेळी काही लाख रुपये कर्ज म्हणून जुगारासाठी दिले होते .जुगार्‍याना कर्ज देणे व ते वसूल करणे हा त्या सावकाराचा धंदाच होता. ते कर्ज राजन फेडू शकत नव्हता. एवढा मोठा डल्ला त्याला मारता येत नव्हता.जुगारात झालेले कर्ज जुगाराच्या साह्याने फेडावे तर त्याला दैव साथ देत नव्हते.जुगार खेळण्यासाठी त्याला कुणी पैसेही देत नव्हते. कर्ज देणाऱ्याने  अंतिम चेतावणी दिली होती .जर आठ दिवसांत पैसे फेडले नाहीस तर तू संपलास म्हणून त्याला धमकी दिली होती.राजनला बिकट प्रसंगाला तोंड द्यावे लागले असते .सावकाराने त्याच्या गुंडांमार्फत राजनची  हड्डी पसली एक केली असती.त्याला ठार मारले नसते .पैसे वसूल करण्यासाठी जिवंत ठेवले असते .पैसे वसूल व्हायचे असतील तर राजन जिवंत असणे आवश्यक होते .

राजनने त्याची समस्या साजनला सांगितली.नेहमीच्या हातचलाखीमधून एवढे पैसे आपण गोळा करू शकणार नाही.त्यासाठी आपण मोठा हात मारला पाहिजे अशा निर्णयावर दोघेही आले.हात कुठे मारावा अशी चर्चा त्यांच्यात चालली होती.एखाद्या बँकेवर डल्ला मारावा असा विचार प्रथम त्यांनी केला होता.हल्ली कोरोना संकट असल्यामुळे सर्वजण मास्क लावून फिरतात.आपण खास काळा चष्मा लावावा. बाहेरून काहीही दिसणार नाही परंतु आपण मात्र सर्व काही स्वच्छ बघू शकू .डोक्यावर हॅटवजा टोपी घालावी.अशी हलकी टोपी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बरेच जण घालतात . सीसीटीव्हीमध्ये आपली ओळख निर्माण होणार नाही.लहान बँकेत डल्ला सहज मारता येईल परंतु कॅशियरजवळ कॅश फार असणार नाही. मुख्य तिजोरीला दोन किल्ल्या लागतात .जरी बँक बंद झाल्यावर कस्टमर्स नसतील तेव्हा  लूट करायची ठरविली तरीही ती कितपत सफल होईल याची खात्री देता येत नाही.

त्यांच्याजवळ खरे पिस्तुल होते .परंतु ते चालवणे धोक्याचे होते .खून खराबा झाला तर गंभीर परिणाम होणार होते.

धोक्याचे बटण कुणीतरी दाबील भोंगा वाजू लागेल. कदाचित पोलिसांतही संदेश जाईल. लोक धावून येतील. सगळेच अवघड होऊन बसेल.बऱ्याच चर्चेअंती शेवटी बँकेला लुटण्याची योजना रद्द करण्यात आली.

त्यापेक्षा एटीएम मशिनच पळवावे अशी योजना आखण्यात आली.जिथे रखवालदार नसेल, जिथे भरपूर पैसा असेल, शक्यतो  गर्दीपासून दूर  एका बाजूला असेल,असे एटीएम निवडण्यात  आले. हल्ली करोनामुळे रात्री रस्त्यावर विशेष गर्दी नसते.जवळपास कुठेतरी खरीखोटी आग लावावी .पोलीस वगैरे तिकडे गुंतलेले असतील. एखादी रुग्णवाहिका चोरावी.रुग्णवाहिका पाहिल्यावर तिकडे कुणी विशेष लक्ष देणार नाही .पीपीई किट घालावा. करोनाचा रुग्ण रुग्णवाहिकेत आहे असे समजून आपल्याला कुणी अडवणार नाही .जेसीबी मशीन चोरून त्याने एटीएम उखडून रुग्णवाहिकेमध्ये ठेवावे .जंगलात निघून जावे .तिथे शांतपणे एटीएम फोडावे.कॅश दोघांमध्ये वाटून घ्यावी.रुग्णवाहिकेमधून, आपली मोटारसायकल जेथे उभी केलेली असेल तेथपर्यंत यावे. रुग्णवाहिका  रस्त्यावर सोडून मोटरसायकलवरून पलायन करावे .अशी योजना आखण्यात आली.

योजना यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी अनुकूल असण्याची गरज होती .सर्व योजनेची एक रंगीत तालीम करण्यात आली .शेवटी एका रात्री एटीएम पळविण्यात आले.एटीएम यशस्वीरित्या फोडल्यावर त्यात भरपूर गल्ला मिळाला. भरपूर पैसे मिळाले.एवढी मोठी रक्कम बघून राजनच्या तोंडाला पाणी सुटले.सर्व पैसे आपल्यालाच मिळावेत, साजनला आपल्या मार्गातून दूर करावा, असा विचार राजनच्या मनात आला.

दोघेही रुग्णवाहिकेमधून बरोबर कॅश घेऊन निघाले. राजन रुग्णवाहिका चालवित होता .तो मुद्दामच ड्रायव्हिंग सीटवर बसला होता .रुग्णवाहिकेमध्ये काहीतरी दोष निर्माण झाल्याचे नाटक राजनने केले.दोष पाहण्यासाठी ,दोष दूर करण्यासाठी, साजन खाली उतरला.बॉनेट उघडून साजन दोष शोधत असताना, संभाव्य दोष दूर करण्याचा प्रयत्न करीत असतांना, राजनने अकस्मात रुग्णवाहिका सुरु केली .साजनला दूर उडी मारण्याला संधी मिळाली नाही.राजनने निर्दयपणे साजनला गाडी खाली चिरडले.जवळच असलेल्या एका खड्ड्यामध्ये त्याला टाकून दिले .योजनेप्रमाणे मोटरसायकलवरून राजन आपल्या घरी आला.फक्त त्याच्याबरोबर साजन नव्हता.

दुसऱ्या दिवशी त्याने सावकाराचे कर्ज फेडले . एवढा पैसा एकदम राजनजवळ कुठून आला अशी शंका सावकाराला  आली होती.एटीएम पळविल्याची बातमी त्याने वाचली होती. सावकाराला पैसा कुठून आला त्याच्याशी काही देणे घेणे नव्हते.तो आपले पैसे घेऊन मोकळा झाला होता. राजनने उरलेला पैसा दोन तीन ठिकाणी लपवून ठेवला.आपण पैशाच्या लोभापायी आपल्या मित्राला दगा दिला .त्याचा खून केला .ही गोष्ट राजनला खात होती.त्यामुळे गेले दहा दिवस तो अस्वस्थ होता .पोलिस आपल्यापर्यंत पोचतील याचीही त्याला भीती होती. दोन्ही  कारणांनी  त्याला रात्री नीट झोप लागत नव्हती .काहीतरी अशुभ घडणार असे त्याला वाटत होते.त्याला कसली तरी भीती वाटत होती.त्यामुळेच कडी कुलपात मोठ्या बंदोबस्तात तो राहात होता . बाहेर जातानाही भरलेले पिस्तूल खिशात ठेवीत होता.धोका कुठून आहे ते त्याला कळत नव्हते.

दहा दिवस गेल्यावर त्याला आपल्यावरील संकट टळले असे वाटत होते.त्यामुळे संकट टळले असे वाटून तो आजच जरा शांत निवांत झोपला होता .झोपेतून कुणीतरी हलवून आपल्याला जागे केले असे त्याला वाटले होते .जागा होतो तो त्याच्या शेजारी खुर्चीवर साजन बसला होता .ज्याला रुग्णवाहिकेखाली आपण चिरडला, ज्याला आपण खड्ड्यात फेकून दिला,तो कडेकोट बंदोबस्तात मी असताना आपल्या शेजारी खुर्चीवर कसा असा प्रश्न त्याच्या मनात आला होता . मी सूड उगवणार. मी तुलाही घेऊन जाणार अशी धमकी देऊन,साजन अदृश्य झाला होता.

माझ्या शक्ती दिवसेंदिवस  वाढत जातील.तू मला दगा दिलास .आपली पाच वर्षांची मैत्री विसरलास.तुझ्या अपराधाला क्षमा नाही.असे सांगून साजन अदृश्य  झाला होता .

*साजन भूत झाला होता.*

* असे काही होईल, असे संकट आपल्यावर कोसळेल, अशी कल्पनाही राजनने केली नव्हती.*

*या संकटातून बाहेर कसे पडावे .साजनला अटकाव कसा करावा याचा विचार राजन करीत होता.*

*रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. * 

(क्रमशः)               

१४/६/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel