( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

दोघांनीही विचार करून एखाद्या जबरदस्त मांत्रिकाला बोलवायचे असे ठरविले.त्याच्याकडून नर्मदेचा कायमचा बंदोबस्त करायचा असा विचार त्यांनी केला.

नर्मदेला एखाद्या बाटलीत भरून ती बाटली खोल पुरून टाकावी म्हणजे तिचा त्रास आपल्याला होणार नाही असा त्यांचा विचार होता.

धुंडिराज नावांचे महामांत्रिक त्याकाळी त्या प्रदेशात होते.त्यांना सन्मानपूर्वक पाचारण करण्यात आले.

अाता नर्मदेच्या शक्ती व धुंडिराज यांच्या शक्ती पणाला लागणार होत्या.त्यांची टक्कर होणार होती.त्यातून शेवटी काय होणार होते ते भगवंतालाच माहीत. 

महा मांत्रिक धुंडिराजाना खास खलिता देवून एक दूत  पाठविण्यात आला.त्यांना लगेच येण्याची विनंती केली होती.त्यासाठी त्यांना पालखी पाठविली होती.त्यामध्ये बसून धुंडिराज  वाड्यावर हजर झाले.

त्यांना नर्मदेबद्दल सर्व माहिती देण्यात आली.ती प्रतिशोध कां घेत आहे तेही अर्थातच धुंडिराजांना सांगावे लागले.तिने दोन दिवस  दिलेला त्रास त्यांना सांगण्यात आला.धुंडिराजाना आपल्या शक्तीबद्दल गर्व होता.आतापर्यंत अशा कित्येक भुतांचा बंदोबस्त त्यांनी केला होता.

स्नान करून धुंडिराज शुचिर्भूत झाले.आपल्या पोतडीतून त्यांनी विविध प्रकारचे सामान काढले.जमिनीवर विविध आकृत्या काढल्या.त्यामध्ये विविध वस्तू ठेवल्या.स्वतःभोवती त्यांनी एक मंडल काढले.आता नर्मदा त्यांना कांहीही करू शकणार नव्हती.त्यांनी नर्मदा कुठे आहे ते शोधण्यासाठी ध्यान लावले.तिचे वास्तव्य दयेच्या  खोलीत एका बाहुल्यामध्ये आहे हे त्यांना समजले.तो बाहुला आणण्यास त्यांनी सांगितले.

नर्मदेला बापलेक काय करीत आहेत त्याचा सुगावा लागला होता.धुंडिराजाचे येणे ती थांबवू शकत नव्हती.तशी तिची इच्छाही नव्हती.तिला धुंडिराजांबरोबर दोन हात करणे आवडले असते.महामांत्रिक वाडय़ाच्या आवारात येताच त्याचा सुगावा तिला लगेच लागला होता.ती तयारीतच होती.बाहुला येथे घेऊन या म्हणून सांगताच ती बाहुल्यासह  तेथे हजर झाली.धुंडिराजाना हे प्रकरण वेगळे आहे, खास आहे, असे लक्षात आले.त्यांनी एक चौकोन काढून त्यात तिला येण्याचे फर्मान सोडले.

नर्मदा साक्षात तिच्या मूळ रूपात धुंडिराजांसमोर प्रकट झाली.नर्मदेने धुंडिराजाना साष्टांग नमस्कार घातला.तुमच्या विद्येचा मी आदर करते असे सांगितले.माझे आणि तुमचे वैर नाही तरी तुम्ही येथून निघून जा अशी त्यांना विनंती केली. तिने त्यांच्यासमोर हरिनारायण व शंकर यांच्या पापांचा पाढा वाचला.माझ्यावर वेताळ राजाचे कृपाछत्र आहे.मी उगीचच कुणालाही त्रास देत नाही.माझ्यावर जो घोर अन्याय झाला त्याचा प्रतिशोध मी घेत आहे.आणि तो प्रतिशोध पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे नम्रपणे पण ठणकावून सांगितले.तुमचे मंत्र तंत्र इथे सफल होणार नाहीत.तुम्ही मुकाट्याने निघून जाणे इष्ट असा सल्ला दिला.हा त्या महामांत्रिकाचा घोर अपमान होता.नर्मदेला कह्यात आणण्यासाठी त्याने मंत्र साधना सुरू केली.नर्मदा तरीही शांत होती.जसे धुंडिराजाने स्वतःभोवती कवच निर्माण केले होते.तसेच कवच वेताळ राजाच्या आशीर्वादाने नर्मदेने स्वतःभोवती निर्माण केले होते.

थोड्याच वेळात धुंडिराजाला आपण नर्मदेचे कांहीही करू शकत नाही याचा अंदाज आला.जर नर्मदेच्या मनात येते तर ती धुंडिराजाच्या सर्व आकृत्या पट उधळून लावू शकली असती.वेळप्रसंगी ती धुंडिराजाला वाड्याबाहेर फेकूही शकली असती.तिला तसे कांहीही करायचे नव्हते.आपल्याजवळ शक्ती आहेत म्हणून त्यांचे अवास्तव प्रदर्शन आणि वापर करावा असे तिला वाटत नव्हते.त्यांच्याबद्दल तिला एक मांत्रिक म्हणून आदर होता.त्यांनी त्यांचे चंबूगबाळे आवरून वाड्यातून निघून जावे असे तिने त्यांना सांगितले.तुम्ही माझ्या फंदात पडू नका.मला माझा सूड घेऊ द्या असेही पुन्हा सांगितले.

वेताळ राजाच्या आशीर्वादाने तिच्या शक्ती अफाट आहेत हे त्यांच्या लक्षात आले होते.आपण तिचे कांहीही करू शकत नाही हेही त्यांना समजले होते.त्यांनी मुकाट्याने सर्व सामान आवरले.पडशीत टाकले. पडशी खांद्यावर टाकली आणि मला या बाबतीत कांहीही करता येणार नाही असे सांगून ते तडक वाड्याबाहेर पडले. 

धुंडिराजासारखा महामांत्रिक कांहीही करू शकत नाही हे पाहताच हरिनारायण व शंकर यांचे अवसान पूर्णपणे  गळले.आता आपले जे जे हाल होतील ते भोगण्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यांच्या लक्षात आले.आपण सर्व समर्थ आहोत असा दोघानाही   जन्मजात गर्व होता.आपल्या शक्तीपुढे कुणाचे कांहीही चालत नाही असा त्यांचा अनुभव होता.आतापर्यंत त्यांनी रयतेचा अनन्वित छळ केला होता.मनात येईल त्या स्त्रीला मुलीला उचलून   तिचा उपभोग घेतला होता.त्यांचा महामांत्रिकावर विश्वास होता.ते आपल्याला यातून बाहेर काढतील असे त्यांना वाटत होते.त्यानीच हातपाय गाळल्यावर दोघांच्याही अंगातील सर्व अवसान निघून गेले.नर्मदा आपले जे जे काही करील ते ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यांच्या लक्षात आले.

चार दिवस झाले होते.आज त्यांना नवीन शिक्षा होणार होती.पाठीवर मिठाचे पाणी लावून त्यावर चाबकाचे फटकारे ओढावेत असा विचार नर्मदेने केला होता.चाबकाला चामड्याची वादी असते.फटका मारल्याबरोबर पाठीवर जखम होते.त्या जखमेत मिठाचे पाणी शिरल्यामुळे प्राणांतिक वेदना होतात.त्यावर पुन्हा फटका मारल्यामुळे कातडी सोलली जाते.  त्यामुळे ज्यावेळी फटक्यांची शिक्षा दिली जाते तेव्हा पाठीला मिठाचे पाणी लावण्यात येत असते.यामध्ये पाठीचे धिरडे होऊन जाते.जखमा भरून बर्‍या होण्यास कित्येक दिवस जावे लागतात.  

यावेळी दोघांनाही शिक्षा एकाच वेळी एकाच खोलीत करण्यात येणार होती.त्यांचे शर्ट  काढण्यात आले.मोकळ्या पाठीवर मिठाचे पाणी लावण्यात आले.त्यांनी गडबड करू नये म्हणून त्यांचे हात पाय बांधण्यात आले होते.त्याशिवाय त्यांना खोडा (ज्यामुळे कोणतीही हालचाल अशक्य होते असा विशिष्ट प्रकारचा सापळा)  घालण्यात आला होता.त्यामुळे त्यांना कांहीही हालचाल करणे अशक्य होते.हे सर्व आपोआप होत होते.नर्मदेजवळ ज्या शक्ती होत्या त्या हे सर्व करीत होत्या. 

दोघांच्या पाठीवर चाबकाचे दहा दहा फटके मारण्यात आले.मरणप्राय वेदनानी कळवळून दोघेही बेशुद्ध झाले होते.त्यांच्या पाठीची कातडी सोलून निघाली होती.शुद्धीवर आणण्यासाठी त्यांच्या तोंडावर पाणी मारण्यात आले.दोघेही शुद्धीवर येऊन होणाऱ्या वेदनेने कळवळत होते.त्यांचे बांधलेले  हातपाय सोडण्यात आले.खोलीत विव्हळत असलेल्या त्यांना तसेच सोडून नर्मदा आपल्या आवडत्या बाहुलीमध्ये येऊन स्थिरावली.आता लक्ष्मीबाई खोलीत आल्या होत्या.त्यांनी चंदन उगाळून त्याचा लेप केला.तो लेप दोघांच्याही पाठीला लावला. त्यामुळे त्यांच्या वेदना काही प्रमाणात कमी झाल्या. त्यांची मुलगी दया, त्यांना लक्ष्मीबाईंना आईला, मदत करीत होती.  त्या लेपामुळे दोघांनाही बरेच बरे वाटले. 

त्या रात्री दोघांनाही झोप लागली नव्हती.त्यांना गादीवर नीट झोपता येत नव्हते.

नर्मदेबद्दल दयाला सर्व माहिती झाली होती.नर्मदेला ज्या अत्याचारांना तोंड द्यावे लागले त्याची तिला कल्पना होती.आपला बाप आणि भाऊ किती उलटय़ा काळजाचे आहेत, किती नालायक आहेत, रयतेशी ते कसे वागतात,त्यांनी वेळोवेळी कसे आणि कोणते अत्याचार केले,या सर्व गोष्टी दोघीनाही माहीत होत्या. त्यांना थांबवण्यासाठी,ते करीत असलेल्या पापापासून परावृत्त करण्यासाठी,इच्छा असूनही त्या कांहीही करू शकत नव्हत्या.त्या काळात जमीनदाराचे अत्याचार जसे रयतेला सहन करावे लागत, त्यांना कुणी वाली नसे, त्याप्रमाणेच ते घरातील बायकांनाही सहन करावे लागत.त्यांना कस्पटासमान वागवले जाई.इथे मात्र जमीनदार हरिनारायण व त्यांचा मुलगा शंकर लक्ष्मीबाई व दया त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने वागत होते.शंकरचे आपल्या बहिणीवर व आईवर प्रेम होते.तर हरिनारायणचे यांचे पत्नीवर व मुलीवर प्रेम होते.असे असले तरी त्या दोघींनी आम्ही काय करतो त्याची चौकशी करू नये आमच्या फंदात पडू नये असे त्यांचे सांगणे होते.

दोघींनीही त्यांचे वर्तन चांगले नाही याची जाणीव त्यांना वेळोवेळी करून दिली होती.परंतु पालथ्या घड्यावर पाणी याप्रमाणे दोघांनीही तिकडे दुर्लक्ष केले होते.आपल्याच मग्रुरीत ते आकंठ बुडालेले होते.  

नर्मदेला सुरवातीला हरिनारायण यांची मुलगी दया व पत्नी लक्ष्मीबाई या दोघांनाही काहीतरी शिक्षा करावी असे वाटत होते.त्या दोघी हरिनारायण व शंकर    यांच्या  पापात कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभागी आहेत असा तिचा समज होता.दयाने गोळा केलेल्या बाहुल्यामधील एका बाहुलीत वस्ती करून ती दयाला रोज पाहत होती.नर्मदा मुक्तपणे वाड्यात फिरत होती.

लक्ष्मीबाई व दया यांचा त्या दोघांच्या पापामध्ये कोणताही सहभाग नाही हे तिच्या लक्षात आले होते.त्यांना शिक्षा करणे अन्याय होईल हेही तिच्या लक्षात आले.तिच्या प्रतिशोधाच्या यादीतून त्या दोघींची नावे तिने काढून टाकली.

ती हरिनारायण व शंकर यांच्या पुढ्यात पुन्हा प्रगट झाली.तुम्ही केलेल्या पापाची तुम्हाला आठवण होत आहे की नाही असे तिने विचारले.

त्या दोघांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता.तुम्ही रयतेवर जुलूम केला.त्यांना वाटेल त्या शिक्षा केल्या.त्यावेळी तुम्हाला कसे वाटले?खूप खूप आनंद झाला की नाही?तुमच्या जखमा भरून येईपर्यंत तुम्हाला आणखी शिक्षा करण्यात अर्थ नाही.पुढचे आठ दिवस आता सुटी आहे.

तुम्ही शिक्षा सहन करण्याइतपत बरे झालात कि मी येतेच आहे.तुमचा निकाल लागेपर्यंत मी येथेच आहे.

*तुम्हाला पुन्हा कोणत्या ना कोणत्या शिक्षेस तोंड द्यावे लागेलच.म्हटलेच आहे करावे तसे भरावे.मी तुम्हाला तशी सोडणार नाही.*

*दोघेही काकुळतीला आले होते.आमच्या हातून खूप मोठी चूक झाली.आम्हाला क्षमा कर .असे ते विनवून सांगत होते.*

*त्यांच्याकडे एक जबरी कटाक्ष टाकून नर्मदा अंतर्धान पावली.*   

*आता पुढची शिक्षा कोणती करावी असा विचार करीत असताना तिच्या मनात एक वेगळाच विचार आला.*

*जो जो ती त्यावर विचार करू लागली तो तो तिला तो विचार ती कल्पना तिला आवडू लागली.*

(क्रमशः)

२९/१/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel