( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
विश्वासराव मोठे उद्योगपती होते.त्यांचा प्रशस्त ऐसपैस बंगला होता.बंगल्याच्या आवारातच आऊट हाऊस होते.बंगल्यात काम करणारे कर्मचारी सहकुटुंब तिथे राहत असत.भिकूतात्या, जानकी आणि सारंग हे त्यातीलच एक छोटे कुटुंब.भिकूतात्या माळीकाम बघत.जानकीकाकू स्वयंपाकपाणी पाहत असत.जानकीकाकू सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाश्ता, दुपारचे जेवण,दुपारचा चहा रात्रीचे जेवण,यात गुंतलेल्या असत.कामातून वेळ मिळेल तेव्हां मध्ये तासभर घरी येऊन त्या घरचा स्वयंपाक करीत असत.या छोट्या कुटुंबांचा संसार तसा छान चालला होता.सारंग त्यांचा एकुलता एक मुलगा होता.तो आठवीत शिकत होता.त्याने नुकतीच चौदा वर्षे पूर्ण केली होती.त्याची शाळा,चालत जायचे तर जवळजवळ अर्धा पाऊण तासाच्या अंतरावर होती.शाळेची बस होती परंतु त्यासाठीही कोपर्यापर्यंत चालत जावे लागे.त्याला बस लावली होती त्याने तो जात असे.मला सायकल पाहिजे म्हणून बरेच दिवस तो हट्ट करीत होता.रस्त्यावर निरनिराळ्या वाहनांची गर्दी खूप असते.बहुतेक वाहने स्वयंचलित असतात.त्यातून जपून सायकल चालवणे त्रासाचे व धोक्याचे काम आहे असे त्याच्या आईवडिलांचे मत होते.तू जरा मोठा झालास की तुला सायकल घेऊन देऊ असे त्याला बरीच वर्षे दोघे सांगत असत.
त्याला शिकवणी (ट्यूशन)लावली होती.दोन्ही ठिकाणी शाळेत आणि शिकवणीला जाण्या येण्यात सारंगचा बराचवेळ जात असे.परिणामी त्याला अभ्यासाला आणि खेळण्याला कमी वेळ मिळत असे.त्याच्या अनेक मित्रांच्या सायकली होत्या.शेवटी त्याचा हट्ट आणि सोय या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन त्याला सायकल घेऊन देण्यात आली.सायकल घेऊन देताना जपून चालव.रस्ता क्रॉस करताना दोन्ही बाजूला नीट पाहा. वाटले तर हातात सायकल घेऊन रस्ता ओलांडावा इत्यादी असंख्य सूचना त्याला आई वडिलांनी दोघांनीही केल्या होत्या.
सायकल घेऊन जवळजवळ वर्ष झाले होते.सारंग सायकल अतिशय काळजीपूर्वक व जबाबदारीने चालवत असे.त्याने कधीही कुणाशीही रेस लावण्याचा प्रयत्न केला नाही.कधीही सिग्नल तोडून सायकल दामटली नाही.स्वतःच्या जिवाला जपत, सायकलला जपत, तो काळजीपूर्वक सायकल चालवत असे.त्याच्या या अति काळजी घेण्याच्या स्वभावाला त्याचे वर्गमित्र हसत असत.
विश्वासरावांचा बंगला विशेष रहदारी नसलेल्या रस्त्यावर होता.शाळेत जाताना त्याचप्रमाणे शिकवणीला जाताना सारंगला फाटकातून बाहेर पडल्यावर रस्ता ओलांडून उजव्या हाताला जावे लागे.रस्त्यावर रहदारी विशेष नसली तरीही तो रस्ता काळजीपूर्वक ओलांडत असे.कित्येकवेळा सायकलवरून न जाता तो पायी रस्ता ओलांडत असे आणि नंतर सायकलवर बसून जात असे.
त्या दिवशी सकाळचे आठ वाजले होते.भिकूतात्या बागकामात व जानकीकाकू नाश्ता तयार करण्यात गुंतलेल्या होत्या.नेहमीप्रमाणे सारंग शिकवणीला जाण्यासाठी निघाला होता.शिकवणीची वेळ साडेआठ ते साडेनऊ होती. नंतर घरी येऊन जेवून तो शाळेत जात असे.त्या दिवशी रस्ता ओलांडताना एक कार भरधाव वेगाने आली.सायकल हातात धरून जपून तो रस्ता ओलांडत होता.सारंगच्या कल्पनेपेक्षा वेगाने गाडी आली.आपल्याला पाहून गाडीची गती स्लो केली जाईल असा त्याचा अंदाज होता तसे झाले नाही. गाडीखाली मुलगा सायकलसह सापडेल असे लक्षात आल्यावर चालकाने जोरात ब्रेक दाबले.सारंग व गाडीचा चालक दोघांचाही अंदाज चुकला होता.गाडी सारंगवर येऊन जोरात आदळली.सायकल गाडीखाली आली. सारंग फुटपाथवर फेकला गेला.रस्त्यावरून जाणार्या कुणीतरी मुलगा मेला मुलगा मेला म्हणून आरडाओरड केली.
ती गाडी प्रतापरावांची होती.प्रतापराव श्रीमंत राजकारणी बडी असामी होते.ते सकाळी क्लबमध्ये बॅडमिंटन कोर्टवर बॅडमिंटन खेळण्यासाठी जात असत.आज जरा त्यांना उशीर झाल्यामुळे ते जोरात होते.सारंग व प्रतापराव दोघांचाही अंदाज चुकला होता. परिणामी भीषण अपघात झाला होता.फुटपाथवर सारंग वर्मी मार लागल्यामुळे तडफडत होता.विव्हळत होता.प्रतापराव त्याला ताबडतोब आपल्या गाडीत घेतील आणि जवळच्या हॉस्पीटलमध्ये नेतील अशी कोणाचीही अपेक्षा असेल.असा अंदाज असेल. परंतु त्यांनी तसे केले नाही.ते तसे करते तर कदाचित सारंगचा प्राण वाचला असता.अपघातामध्ये एक एक मिनिट अपघातात सापडलेल्या व्यक्तीच्या दृष्टीने मौल्यवान असते.जितकी लवकर वैद्यकीय सुविधा मिळेल तितका प्राण वाचण्याचा संभव जास्त असतो. हल्ली बऱ्याच वेळा अपघात झाल्यावर वाहनचालक वाहनासकट किंवा वाहन सोडून देउन पळून जातो.चालक वाहनासकट पळून जाईल असाही एक अंदाज एखाद्याने केला असेल.वाहनचालक वाहनासकट किंवा नुसताच पळून गेला नाही.
यापैकी प्रतापरावानी कांहीही केले नाही.त्यांची गाडी रोल्स रॉइस होती.गाडीची किंमत कित्येक कोटी रुपये होती. गाडी सायकलवर जोरात आपटल्यामुळे गाडीला ओरखडे उठले होते थोडा रंग उडाला होता किंचित पोचा आला होता.अपघातात सापडलेल्या मुलाकडे लक्ष देण्याऐवजी, त्याला हाॅस्पिटलमध्ये नेण्याऐवजी,अॅम्ब्युलन्स बोलवण्याऐवजी,ते आपल्या गाडीकडेच पाहात होते.जानकी काकू व भिकू तात्या यांना त्यांच्या मुलाला अपघात झाल्याचे कुणीतरी सांगितले.हातातील काम अर्धवट टाकून दोघेही रस्त्यावर धावत आले.त्यांचा मुलगा सारंग फुटपाथवर तडफडत होता.त्याच्या डोक्याला मार लागला होता.त्याच्या शरीरातून रक्तस्राव चालू होता.
प्रतापराव जातिवंत उर्मट,ऐय्याशी,बेजबाबदार, व्यक्ती होती.सारंगची अवस्था बघून जानकीकाकू रडू लागल्या.सारंगचे वडील भिकूतात्या काय करावे अशा विचारात होते.तेवढ्यात रस्त्यावरील कुणीतरी अॅम्ब्युलन्सला फोन केला.भिकूतात्यांचा सारंग मुलगा आहे.त्याच्यामुळे आपल्या गाडीला दुखापत झाली हे पाहून प्रतापरावांचा पारा चांगलाच चढला होता.गाडीवरील खरोच, ओरखडे, उडालेला रंग, इत्यादी दुरूस्त करण्यासाठी गाडी पहिल्यासारखी करण्यासाठी ,हजारो रुपये खर्च येईल आणि तो मी तुमच्याकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशी मुक्ताफळे ते उधळत होते.मुलाला लागले तो तडफडत आहे कदाचित तो मरेल याचे त्यांना कांहीही नव्हते.त्यांची ही उद्दाम वृत्ती राग येण्याजोगी किळसवाणी होती.
जानकीकाकू आधीच दु:खात होत्या.त्यात प्रतापराव त्यांना गाडीला झालेल्या दुखापतीबद्दल बोलत होते. रागावत होते. तुमच्याकडून मी पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगत होते. हा सगळाच प्रकार राग आणणारा तिटकारा आणणारा होता .तेवढ्यात कुणीतरी बोलावलेली अॅम्ब्युलन्स आली.
अॅम्ब्युलन्स आली तोपर्यंत सर्व कारभार संपला होता.पोलीस आले पंचनामा झाला.पोलीस प्रतापरावांवर केस करतील असे वाटत होते.त्यांनी पंचनामा करून प्रतापरावांवर केस दाखल केली. कायद्याप्रमाणे पोलिसांना कांही गोष्टी कराव्या लागल्या.प्रतापरावानी त्यांच्या राजकीय वजनाचा उपयोग केला.खोटे साक्षी पुरावे दिले.आर्थिक दाबादाबी केली.सर्वस्वी मुलाची चूक होती असे कोर्टापुढे सिध्द केले.आणि सर्वकांही शांत शांत झाले.तुमच्यामुळे माझ्या गाडीची नुकसानी झाली.दुरुस्तीसाठी मला दहा हजार रुपये खर्च आला.तेवढे पैसे तुम्ही ताबडतोब भरा अशी त्यांना नोटीस मिळाली.हा सर्वच प्रकार उबग आणणारा, किळसवाणा,राग येईल असा होता.
पोस्टमार्टेम झाल्यावर सारंगचे प्रेत ताब्यात मिळाले.जानकी काकू,सारंग गेल्यामुळे खचल्या होत्या.त्यांचा भविष्यकालीन आधारवडच गेला होता.सारंग मोठा होईल, शिकेल, नोकरीला लागेल,आपल्याला चांगले दिवस येतील,अशा आशेवर स्वाभाविकपणे जानकी काकू व भिकू तात्या होते.त्यांची सर्व स्वप्ने सारंगवर आधारलेली होती.त्यांच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर झाला.
मुलगा अपघातात गेल्यामुळे जानकीकाकू दु:खी झाल्या होत्याच.कांही दु:खे ज्याची त्यालाच सहन करावी लागतात.जवळच्या व्यक्तीचा मृत्यू त्यापैकी एक आहे.प्रतापरावानी सारंगला अपघात झाल्याबरोबर हॉस्पीटलमध्ये नेले असते.त्याची चांगली देखभाल केली असती.आईवडिलांना सहानुभूती दाखविली असती.त्यांची क्षमा मागितली असती तर जानकीकाकूना त्यांचा राग आला नसता.प्रतापरावांचा अॅटिट्यूड, त्यांचा दृष्टिकोन,त्यांची गुर्मी, त्यांचा उद्दामपणा,मृत मुलाला, त्याच्या आईवडिलांना, कस्पटासमान लेखण्याची प्रवृत्ती,अपघातात सापडलेल्याला कोणतीही मदत न करण्याची वृत्ती,त्यांच्या गाडीवर एवढासा कुठे ओरखडा निघाला तर त्याचा केवढा थोरला बाऊ करण्याचा दृष्टिकोन,पुन्हा वरती हे हजारो रुपये मी तुमच्याकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशी दु्रुत्तरे,या सगळ्या गोष्टींमुळे प्रतापराव जानकीकाकूंच्या डोक्यात गेले होते.
तुमच्यामुळे माझ्या गाडीची नुकसानी झाली. दुरुस्तीसाठी मला दहा हजार रुपये खर्च आला.तेवढे पैसे तुम्ही ताबडतोब भरा अशी त्यांना नोटीस मिळाली.हा सर्वच प्रकार उबग आणणारा, किळसवाणा,राग येईल असा होता.
या इसमाला धडा शिकविल्याशिवाय राहायचे नाही असा पण त्यांनी उचलला.तशी शपथच त्यांनी घेतली.प्रतापरावाना अद्दल घडवलीच पाहिजे.आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलाच्या खुनाचा सूड उगवलाच पाहिजे या भावनेने जानकीकाकू अंतर्यामी जळत होत्या.हे कसे साध्य करावे तेच त्यांना कळत नव्हते.प्रतापराव कुठे राहतात इथपासून सुरुवात होती.अर्थात प्रतापराव बडी असामी असल्यामुळे त्यांचा पत्ता सहज सापडला असता.जानकीकाकू आर्थिकदृष्टय़ा आणि इतरही दृष्टीने दुर्बल होत्या.प्रतापराव सर्व साधनसंपत्तीने समृद्ध होते.त्यांचे राजकीय वजन होते.त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि सूड उगवणे मोठे कठीण काम होते.
*भिकूतात्या स्वभावाने गरीब होते.त्यांनी सर्वकांही मुकाटय़ाने सहन केले.*
*जानकी काकू तशा नव्हत्या.शठं प्रति शाठ्यम्, जशास तसे,अशा वृत्तीच्या त्या होत्या.*
*त्यांच्यावर अन्याय झाला होता.जर प्रतापरावानी वेळीच सारंगला वैद्यकीय मदत मिळवून दिली असती तर तो कदाचित वाचला असता *
*केवळ उद्दामपणाच नव्हे तर प्रतापरावांचा मुर्दाडपणा त्यांना सहन होत नव्हता.*
* प्रतापरावांचा पत्ता शोधून काढायचा.येनकेनप्रकारे त्यांच्या बंगल्यात प्रवेश मिळवायचा.*
*प्रतापरावांना जन्माची अद्दल घडेल, पुन्हा त्यांच्या हातून असे अघोरी कृत्य होणार नाही,असा धडा त्यांना शिकवायचा अशी शपथ जानकी काकूंनी घेतली.*
(क्रमशः)