( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
भिकूतात्या स्वभावाने गरीब होते.त्यांनी सर्व कांही मुकाटय़ाने सहन केले.
जानकी काकू तशा नव्हत्या.शठं प्रति शाठ्यम्, जशास तसे,अशा वृत्तीच्या त्या होत्या.
त्यांच्यावर अन्याय झाला होता.जर प्रतापरावानी वेळीच सारंगला वैद्यकीय मदत मिळवून दिली असती तर तो कदाचित वाचला असता.
केवळ उद्दामपणाच नव्हे तर प्रतापरावांचा मुर्दाडपणा त्यांना सहन होत नव्हता.
प्रतापरावांचा पत्ता शोधून काढायचा.येनकेनप्रकारे त्यांच्या बंगल्यात प्रवेश मिळवायचा.
प्रतापरावांना जन्माची अद्दल घडेल, पुन्हा त्यांच्या हातून असे अघोरी कृत्य होणार नाही,असा धडा त्यांना शिकवायचा अशी शपथ जानकी काकूंनी घेतली.
प्रथम त्यांना विश्वासरावांकडे एखाद्या स्वयंपाकिणीची तजवीज करणे भाग होते.त्यांच्या आऊट हाऊसमध्ये ते रहात होते.भिकूतात्या माळी म्हणून काम करत होते.एवढी चांगली नोकरी त्या दोघांनाही सोडायची नव्हती.शिवाय भिकूतात्यांना विशेष काही समजल्याशिवाय जानकीकाकूना सर्व कांही करायचे होते.मागे एकदा केव्हांतरी जानकीकाकू आजारी पडल्या होत्या.त्यावेळी त्यांच्या गावच्या एका बाईने येवून काम केले होते.ते काम सर्वांना पसंत पडले होते.तिची मदत यावेळी घेण्याचे त्यांनी ठरवले.जानकीकाकू स्वतः गावाला रमाकाकूंकडे गेल्या.विश्वासरावांकडे कांही महिने काम करण्याची त्यांनी त्यांना विनंती केली.रमाकाकू विश्वासरावांकडे काम करू लागल्या.
आता जानकीकाकू मोकळ्या झाल्या होत्या.ज्यांच्या मोटारीने त्यांच्या मुलाला ठार मारले होते त्यांचे नाव त्यांना आठवत होते.ते नाव त्या या जन्मात विसरणे शक्य नव्हते.प्रतापराव ही मोठी असामी होती.त्यांचे अनेक व्यवसाय होते.एका राजकीय पक्षाचे ते स्थानिक प्रमुखही होते.त्यांचा पत्ता जानकीकाकूना लगेच मिळाला.त्यांच्या बंगल्यात त्यांना कोणत्या ना कोणत्या मिषाने प्रवेश घेणे प्रथम गरजेचे होते.
एक दिवस त्या प्रतापरावांची पत्नी कुंदाताई याच्यापुढे जाऊन उभ्या राहिल्या.प्रतापरावांचा बंगला ऐसपैस होता.प्रवेशद्वारावरील गुरख्याने त्यांना प्रथम अडविले. बाईसाहेबांकडे काम आहे त्यांनी बोलाविले आहे असे सांगून काकूंनी बंगल्यात प्रवेश मिळविला होता.कुंदाताईंनी त्यांना काय पाहिजे म्हणून विचारले.त्यांनी त्या स्वयंपाक उत्तम करतात त्यांना नोकरी पाहिजे असे सांगितले.प्रतापरावांकडे येणेजाणे बर्याच लोकांचे असे.केव्हांही अकस्मात फोन करून ते आज दहाजण जेवायला येणार आहेत असे सांगत असत.अशावेळी कुंदाताईंची खूप गडबड उडत असे.महिन्यातून निदान दहा बारा वेळा तरी अशी अनपेक्षित पाहुणे मंडळी येत असे.शिवाय रोजचा पै पाहुण्यांचा, नातेवाइकांचा, आश्रितांचा, धबडगा चालूच असे.जानकीकाकूंबद्दल कुंदाताईंचे मत चांगले झाले.कुंदाताईंकडे खूप मंडळी कामाला होती.त्यात जानकीकाकू सहज खपून गेल्या असत्या.अशा तऱ्हेने जानकीकाकूंनी प्रतापरावांच्या बंगल्यात शिरकाव करून घेतला.त्यांनी त्यांच्या स्वयंपाक्याला बोलावले.जानकीकाकूंची ओळख करून दिली.या तुझ्या हाताखाली काम करतील म्हणून सांगितले.
एकदा स्वयंपाकघरात प्रवेश मिळविल्यावर पुढच्या सर्व गोष्टी तुलनात्मक सोप्या होत्या.जानकीकाकू स्वयंपाक उत्कृष्ट करीत असत.थोड्याच दिवसांत त्यांनी स्वयंपाकघराचा ताबा मिळविला.निरनिराळे पदार्थ तयार करून त्या सर्वांना खाऊ घालीत असत.स्वतः कुंदाताई व त्यांची मुलगी संगीता जानकी काकूंच्या चाहत्या बनल्या.आपल्या प्रेमळ व गोड स्वभावाने त्यांनी दोघींचीही मने जिंकली.त्या इतका चविष्ट स्वयंपाक बनवीत, नेहमी इतके निरनिराळे पदार्थ बनवीत कि त्या थोड्याच दिवसांत सगळ्यांच्याच आवडत्या झाल्या.
त्यांना प्रतापरावांवर सूड उगवायचा होता.हा सूड कसा उगवावा ते त्यांना कळत नव्हते.त्यांच्या मुलाला ज्या निर्दयपणे प्रतापरावांनी मोटारीखाली ठार मारले.त्याच पध्दतीने प्रतापरावांना मोटारीखाली चिरडून तर त्यांना ठार मारता येणार नव्हते.समजा मारता आले असते तरी काही उपयोग नव्हता.आपण कां मेलो हे त्याना कळलेच नसते.गुन्हेगाराला शिक्षा होणे जसे महत्त्वाचे तसेच शिक्षा कां होत आहे तेही कळणे महत्त्वाचे असते. कोणत्या ना कोणत्या मिषाने प्रतापरावांना अद्दल घडवणे हे त्यांचे उद्दिष्ट होते.नुसती अद्दल नव्हे तर असे कां झाले तेही त्यांना कळणे आवश्यक होते.जशास तसे या न्यायाने जानकी काकूंचा मुलगा मेला तर प्रतापरावांची मुलगी मरणे गरजेचे होते.प्रथम जानकीकाकूंचा तोच विचार होता.संगीताला त्यांच्या मुलीला,कोणत्या ना कोणत्या उपायाने रस्त्यावरील अपघातात ठार मारावे आणि ती गोष्ट प्रतापरावाच्या लक्षात आणून द्यावी.आपल्याला ज्या यातना क्लेश झाले तेच त्यांना व्हावेत असा काकूंचा प्रथम विचार होता.
संगीता एक गोड मुलगी होती.तिच्यात प्रतापरावांच्या उद्दामपणाचा, बेपर्वाईचा लवलेशही नव्हता.काकू प्रेमळ होत्या.त्या दिवशीचा प्रतापरावांचा दृष्टीकोन बघून त्या चवताळलेल्या होत्या.एक मुलगा त्यांच्यासमोर, त्यांच्यामुळे तडफडत असताना, मरणाच्या दारात असताना, त्यांना त्यांच्या मोटारीला उठलेल्या ओरखड्यांची काळजी वाटत होती.त्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी कांहीही प्रयत्न केला नव्हता.वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचा मुलगा वाचू शकला असता. दोघांच्या दु:खावर फुंकर घालणे, त्यांची क्षमा मागणे, हे तर दूरच राहिले उलट भिकूतात्या व जानकीकाकू याना प्रतापराव अद्वातद्वा बोलले होते.मोटर दुरुस्तीचे बिल त्यांनी जानकीकाकूंकडे पाठविले होते.
संगीताचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे अपघात घडवून आणून तिला ठार मारणे जानकी काकूंना शक्यच नव्हते.संगीता गोड मुलगी होती. जानकीकाकू तिच्यावर प्रेम करू लागल्या होत्या. मुलाच्या मृत्युमुळे आपल्याला जशा वेदना झाल्या तशाच वेदना प्रतापरावांना द्यायचा त्यांचा मनसुबा त्यामुळे बारगळला.त्यांनी दुसरा उपाय योजायचे ठरविले.खुद्द प्रतापरावाना मानसिक व शारिरीक क्लेश होतील असे कांहीतरी करावे.ते क्लेश कां भोगत आहेत त्याची जाणीव त्यांना करून द्यावी असे त्यांनी ठरविले.
खूप विचार करून शेवटी त्यांनी प्रतापरावांवर मंद,धीमा,(स्लो) विषप्रयोग करण्याचे ठरविले.जानकी काकू खेडेगावातील होत्या.त्यांचे वडील वैदू होते.विविध प्रकारच्या वनस्पती त्यांना माहिती होत्या.कांही वनस्पती विषारी असतात.त्यांचे सेवन मृत्यूला निमंत्रित करते.जर अत्यल्प प्रमाणात रोज त्याचे सेवन केले गेले तर मृत्यू येत नाही.परंतु शरीर हळूहळू क्षीण होत जाते.दुर्बल झाल्यामुळे अनेक रोग त्यात हळूहळू वस्ती करतात.परिणामी शेवटी असा मनुष्य मृत्यूची शिकार होतो.त्याचा प्रयोग प्रतापरावांवर करण्याचे त्यांनी ठरविले.
प्रतापरावांना रोज जेवण संपल्यावर मठ्ठा लागत असे.त्यांच्या घरात आणखी कुणालाही मठ्ठा (दाट ताक) आवडत नसे.तेव्हां त्या वनस्पतीच्या रसाचे कांही थेंब प्रतापरावांच्या मठ्ठ्यात रोज टाकावे.तो रस रुचीहीन गंधहीन होता.प्रतापरावाना कळण्याचे कांहीच कारण नव्हते.त्या रसाच्या सेवनामुळे महिन्याभरात प्रतापरावांची प्रकृती ढासळू लागेल असा काकूंचा अंदाज होता.
दोन दिवस गावाला जाऊन त्या तो रस घेऊन आल्या.रोज प्रतापरावांच्या मठ्ठ्यात दोन थेंब त्या टाकीत असत.प्रतापरावांची प्रकृती ठणठणीत होती.भरपूर व्यायाम करून, चांगलेचुंगले खाऊनपिऊन, त्यांचे शरीर दगडासारखे टणक झाले होते.त्यांच्या शरीरावर परिणाम होण्यासाठी किती काळ लागेल त्याचा नक्की अंदाज काकूना येत नव्हता.त्या वनस्पतीच्या रसाचे रोज जास्त थेंब देणे धोक्याचे होते.काकूना प्रतापरावांचा मृत्यू नको होता.त्यांना वेदना व यातना व्हाव्यात अशी काकूंची इच्छा होती.योग्यवेळी त्यांची अशी दशा कां झाली ते त्यांना त्या सांगणार होत्या.गुन्हेगार शारीरिक क्लेश भोगत असताना तो ते कां भोगत आहे त्याची त्याला सतत जाणीव असणे गरजेचे असते.
काकूंचा रसप्रयोग सुरू झाल्यावर दीड महिन्यांनी त्याचा परिणाम जाणवू लागला.एक दिवस प्रतापरावांना सडकून ताप भरला. विविध तपासण्या करूनही डॉक्टरांना कसला ताप त्याचा पत्ता न लागल्यामुळे त्यांनी नेहमीप्रमाणे व्हायरल इन्फेक्शन असे निदान केले.अॅण्टीबायोटिक्स सुरू केली.कांही केल्या ताप जात नव्हता.त्यातच त्यांच्या पोटात दुखू लागले.त्यांना व्यवस्थित अन्न जाईना.हॉस्पिटलात दाखल करण्याइतकी त्यांची परिस्थिती गंभीर (सीरियस) नव्हती.घरीच औषधोपचार चालू होते.डॉक्टरांनी त्यांचे ताक बंद केले.काकूनी प्रतापरावांना देण्यात येणार्या अन्नामध्ये रसप्रयोग चालूच ठेवला.
डॉक्टर झाले.वैद्य झाले. होमिओपॅथी झाली. आयुर्वेद झाला.कुणालाच कांहीच निदान होत नव्हते.ताडासारख्या उंचनिंच, दगडासारख्या टणक, प्रतापरावांचे असे कसे झाले,ते कुणाच्याच लक्षात येत नव्हते.प्रतापरावांवर विषप्रयोग झाला असेल अशी एकालाही शंका आली नव्हती.कोणत्याही चाचण्यांमध्ये विष सापडणे शक्य नव्हते.
एक दिवस संधी साधून जानकीकाकू प्रतापरावांच्या खोलीत गेल्या.काकूंनी त्यांना "मला ओळखले का?" असे विचारले.प्रतापरावानी आमच्या स्वयंपाकीण बाई असे उत्तर दिले.आणखी कांही ओळख आहे का असे त्यांनी विचारले.अर्थातच नाही असे उत्तर प्रतापरावानी दिले .काकूंनी कांही महिन्यापूर्वीच्या त्यांच्या किमती मोटारीला झालेल्या अपघाताच्या प्रसंगाचे स्मरण करून दिले.तो प्रसंग त्यांना पक्का आठवत होता.ती मोटार प्रतापरावांची आवडती होती.काकूंनी नंतर स्वतःची ओळख करून दिली.प्रतापरावानी जर अपघातात सापडलेल्या त्या मुलाला त्यांच्या मुलाला, वेळीच वैद्यकीय मदत दिली असती तर तो कदाचित वाचला असता.ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली.निर्जीव मोटारीपेक्षा सजीव वस्तू महत्त्वाची याची जाणीव त्यांना करून दिली.त्याची मग्रुरी उद्दामपणा क्रौर्य अधोरेखित केले.प्रतापरावांच्या मुलीला संगीताला अपघात घडवून आणून जशास तसे असे करण्याचा त्यांचा पहिला विचार होता हेही सांगितले.संगीतासारख्या गोड मुलीवर असा प्रसंग आणणे अयोग्य आहे असे त्यांना वाटले.हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला सुळी दिल्यासारखे होईल.त्यामुळे शेवटी त्यांनी प्रतापरावांना शिक्षा करण्याचे ठरविले.प्रतापरावांची आजची स्थिती हा त्यांच्या शिक्षेचा परिणाम आहे हेही सांगितले.काकू पुढे असेही म्हणाल्या,जर तुमची लाडकी मुलगी संगीता अशा अपघातात सापडली असती आणि तिला न वाचवता मोटारवाला त्याच्या मोटारीचीच काळजी करीत बसला असता तर तुम्हाला काय वाटले असते?
*हे सर्व ऐकून प्रतापराव मुळापासून हादरून गेले.*
*त्याना कांही महिन्यापूर्वीचा तो प्रसंग आठवला.*
*त्यांना त्यांची चूक ध्यानात आली.आपण किती क्रूरपणे वागलो हे त्यांना उमजले.*
*काकू पुढे म्हणाल्या,तुमच्यावर विषप्रयोग झाला हे कुणीही सिद्ध करु शकणार नाही.*
*तुम्ही भले माझ्यावर मारेकरी घालू शकाल.मी मेले तरी कांही बिघडत नाही.*
*एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर मी जिवंत प्रेत झाले आहे.मी आता निघून जात आहे.*
*तुम्ही असेच झिजत झिजत जाल.असेच अंथरुणाला खिळलेले राहाल.*
* दीर्घकाल अशीच आपल्या पापाची आठवण करीत राहाल.*
*मी दिलेले विष जालीम आहे.जरी यातून बरे झालात तरी पूर्वीसारखे जीवन जगू शकणार नाही.*
*क्षणोक्षणी तुमच्या अपराधाची तुम्हाला सतत आठवण येत राहील.हीच तुम्हाला शिक्षा.*
*एवढे बोलून जानकी काकू प्रतापरावांच्या बंगल्यातून निघून गेल्या.*
(समाप्त)
१३/२/२०२२©प्रभाकर पटवर्धन