( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
मी आणि माझी मुलगी कालिंदी दोघेच घरात असतो. कालिंदी आता बारा वर्षांची झाली आहे.हल्ली ती सातवीत आहे.तिच्या शाळेची स्कूलबस सहा वाजता तिला कोपऱ्यावर सोडून निघून जाते.आम्ही संवाद निवासी संकुलात (रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स) राहतो.बिल्डरने नाव तर मोठे छान ठेवले आहे.अशा संकुलात असतात त्या सर्व सोयी येथे आहेत.संकुलाचे नाव संवाद असे असले तरी प्रत्यक्षात येथे राहणार्या लोकांमध्ये संवाद कमीच आहे. प्रत्येक जण आपल्याला हायब्रो(अति शहाणा) समजतो.
आम्ही बिल्डरला सुरक्षा दरवाजा(सेफ्टीडोअर) करून दे म्हणून सांगितले होते.खर्च वाढतो म्हणून बऱ्याच जणांनी सुरक्षा दरवाजा घेतला नाही.नुसता सुरक्षा दरवाजा असून सुरक्षा मिळतेच असे नाही.पोस्टमन,पार्सल,बिल,दूध,
वर्तमानपत्र,अशा अनेक कारणांनी लोक येत जात असतात.सुरक्षा दरवाजा उघडला आणि चोर,लुटारू,आंत घुसला तर आपण कांहीच करू शकत नाही.
सुरक्षा दरवाजामध्ये मी दोन बाय दोन फूट चा एक दरवाजा जमिनीपासून चार फूट अंतरावर करून घेतला आहे.त्यातून आपण पत्र,बिल,पार्सल,दूध पिशवी, वगैरे सर्व गोष्टी घेऊ शकतो.जर बाहेरील व्यक्ती आपल्या ओळखीची असेल आणि गरज असेल तरच सुरक्षा दरवाजा उघडून त्या व्यक्तीला आत घेता येते.एका कारणासाठी दरवाजा उघडला आणि त्यातून कुणीतरी घुसून अव्यवहार केला असे होऊ शकत नाही.
मी ए तीन शे सहा मध्ये राहतो. संकुलात एकूण पांच(ए बी सी डी इ) बिल्डिंग्ज आहेत.कालिंदी जवळ किल्ली आहे.ओळखीची व्यक्ती असल्याशिवाय आणि तेवढीच गरज असल्याशिवाय सुरक्षा दरवाजा उघडायचा नाही अशी सक्त ताकीद मी कालिंदीला दिली आहे.एखादा आंत घुसला तर काय काय होऊ शकेल याचीही कल्पना तिला दिली आहे.कालिंदी पूर्ण जबाबदारीने फ्लॅटमध्ये एकटी राहू शकते.एक वर्षापूर्वीपर्यंत हा कांहीच प्रश्न नव्हता.सौभाग्यवती बहुशः घरातच असे.ती कालिंदीची काळजी घेत असे. सौभाग्यवती नोकरी करीत नसल्यामुळे घरातच असे. स्कूलबसच्या वेळेला कालिंदीला सोडायला आणि आणायला ती कोपऱ्यावर जात असे.वर्षभरापूर्वी करोनाने तिचे निधन झाले. तेव्हांपासून आम्ही दोघेच घरात असतो.मला कामावरून यायला संध्याकाळचे निदान सात साडेसात होतात.बऱ्याच वेळा मी आठ वाजता घरी येतो.कालिंदी घरी आल्यावर फ्रेश होऊन थोडे खावून खेळायला ती सोसायटीच्या ग्राउंडवर जाते.तिथे ती व तिच्या मैत्रिणी अंधार होईपर्यंत खेळतात आणि मग ती घरी येते.कालिंदी रोज खेळायला जातेच असे नाही.तरीही साधारणपणे ती संध्याकाळी सात ते आठ घरात एकटीच असते.
मी लग्न करावे असे बरेच जण आडूनआडून सुचवतात.कांहीजण तर स्थळेही सुचवतात.कालिंदी माझ्या गळ्यातील ताईत आहे.सावत्र आई व ती यांचे संबंध कसे असतील मला शंका आहे.मला कोणताही धोका स्वीकारायचा नाही.अजून तरी मी लग्नाचा विचार केलेला नाही.
स्वयंपाकीण काकू सकाळीच स्वयंपाक करून जातात.संध्याकाळी आम्ही अन्न गरम करून जेवतो.
त्या दिवशी रात्री मला घरी यायला साडेआठ वाजले.मी उशिरा येणार आहे म्हणून फोन करीत होतो परंतु कालिंदीने फोन घेतला नाही.कालिंदीला मोबाईल घेऊन दिला आहे.मोबाईल सायलेंटवर असेल,डिस्चार्ज झाला असेल, कुठेतरी दुसर्या खोलीत ठेवला असेल,असे समजून मी विशेष काळजी केली नाही.साडे आठ वाजता घरी आल्यावर बेल वाजवल्यावर कालिंदी आंतील दरवाजा उघडून बाहेर कोण आहे ते व्यवस्थित पाहील आणि नंतरच सुरक्षा दरवाजा उघडेल असे समजून मी चाललो होतो.नेहमी ती याच पध्दतीने दरवाजा उघडत असे.बाहेर कोण आहे याची खात्री केल्याशिवाय मी घरात असो किंवा नसो सुरक्षा दरवाजा ती कधीही उघडत नसे.कालिंदी विश्वासू व्यवस्थित मुलगी होती.
त्या दिवशी रात्री साडेआठ वाजता मी घरी आलो.बेल वाजवली कालिंदीने दरवाजा उघडला नाही.नेहमी कालिंदी आतुरतेने माझी वाट पाहत असे.बेल वाजल्याबरोबर पावलांचा धावण्याचा आवाज बाहेर ऐकू येत असे.आंतला दरवाजा कालिंदी खाडकन उघडी.मीच आहे ना याची खात्री करून घेई.आणि लगेच दरवाजा उघडत असे.आज तसे कांहीच झाले नाही.मी पुन्हा पुन्हा बेल वाजवली.आंत सामसूम होती.कदाचित कालिंदी बाथरूमला, टॉयलेटला,गेली असेल असे मी समजलो.कदाचित झोपी गेली असेल,अशी समजूत करून घेतली.
माझ्याजवळील किल्लीने मी दोन्ही दरवाजे उघडले.आणि आंत पाऊल टाकले.बाहेरच्या खोलीतील दृश्य बघून मी मटकन खालीच बसलो.सतरंजीवर कालिंदीचा अचेतन मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडला होता.खरे म्हणजे ती नग्न अवस्थेतच होती.कुणीतरी तिच्या अंगावर एक टॉवेल टाकला होता.तिच्यावर अत्याचार झाल्याचे लगेच लक्षात येत होते.कुणीतरी तिचा गळा चिरला होता.बाहेरच्या खोलीत गालिच्यावर रक्ताचा ओघळ स्पष्ट दिसत होता.रक्त गालिचात मुरल्यामुळे मोठा लाल डाग पडला होता. तिला ठार मानण्याचे कारण उघड होते.बलात्कार्याला ती ओळखत होती.
समोरच्याच बिल्डिंगमध्ये माझ्याच वयाचे अरविंदराव नावाचे एक गृहस्थ राहतात.माझी त्यांच्याशी बऱ्यापैकी ओळख होती.मी सकाळी जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी जात असे.तिथे तेही येत असत.आमची प्रथम ओळख तिथे झाली होती.नंतर ते आमच्यात संकुलात समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतात हे माहीत झाले होते.मी त्यांना फोन करून बोलवून घेतले.आमच्या मजल्यावर इंटरकॉम मार्फत दोन ओळखीच्या लोकांना बोलावून घेतले.
पोलिसांना फोन करणे. आल्यावर त्यांना माहिती देणे वगैरे गोष्टी त्या लोकांनीच केल्या.मी इतका खचून गेलो होतो कि कांही करण्याचे मला भान नव्हते. पोलीस मला संशय कुणावर आहे का असे विचारत होते.मी नाही म्हणून सांगितले.कालिंदी कुणाकुणाच्या संपर्कात येत होती. कुणाशी बोलत होती मला कांहीच कल्पना नव्हती.आमच्या संकुलाच्या व्यवस्थापकाला सीसीटीव्ही कुठेकुठे बसवले आहेत वगैरे गोष्टी पोलीस विचारत होते.त्याचे फुटेज पाहून आमच्या ब्लॉकमध्ये कोण आले कोण गेले हे जाणून घेणे शक्य आहे का हे ते पाहणार होते.
पंचनामा करून, दिवाणखान्यातील सर्व उपलब्ध ठसे घेऊन,कालिंदीचे शव घेऊन पोलीस निघून गेले.शव पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले.रिपोर्टमध्ये अत्याचार झाल्याचा व पुढे गळा चिरल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता.
जड अंत:करणाने कालिंदीचे और्ध्वदेहिक मी केले.आता मी विनापाश राहिलो होतो.माझे आईवडील अगोदरच स्वर्गवासी झाले हाेते.मला काका आत्या वगैरे कुणीही नव्हते.मी एकुलता एक होतो.त्यामुळे भाऊ बहीण हाही कांही संबंध नव्हता.पत्नी वर्षभरापूर्वीच निवर्तली होती.माझी लाडकी मुलगी कालिंदी जिच्यावर मी शब्दांत वर्णन करता येणार नाही इतके प्रेम करीत होतो तीही आता मला सोडून गेली होती.
पाेलिस अत्याचार्यांचा शोध घेत होते.संकुलात लावलेले सीसीटीव्ही पाहून त्यांना कांही अंदाज येत नव्हता.आमच्या मजल्यावर आमच्या फ्लॅटमध्ये कोण आले गेले त्याचा कांहीच पत्ता लागत नव्हता.तुम्हाला कांही आठवत असेल तर पाहा.तुम्ही एखादा धागादोरा दिला तरी त्यावरून बरेच कांही आम्ही करू शकतो.पोलीस खोदून खोदून मला पुन्हा पुन्हा विचारीत होते.मी नन्नाचा पाढा वाचत होतो.पोलिसांनी तिच्या मैत्रिणींकडून कांही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.कालिंदी कुणा मुलांशी,प्रौढांशी,गप्पा मारीत होती.बोलत होती.तिची ओळख होती.अशा प्रकारची माहिती ते विचारत होते.त्यातूनही त्यांना कांहीही सापडले नाही.गुन्हेगारांचे जग असते.त्यामध्ये पोलिसांचे खबरे असतात.त्यांच्यामार्फत संशयित आणि त्यांची अन्यत्र उपस्थिती अनुपस्थिती (अॅलिबी) वगैरे पोलिस पाहात होते.पोलीस शेवटी डेड एण्डपर्यंत येऊन पोहोचत होते.शेवटी पोलिसांनी कालिंदीची फाइल गुन्हेगार सापडत नाही म्हणून बंद केली.
पोलिस पुन्हा पुन्हा मला विचारीत असताना मी एक माहिती त्यांना मुद्दामच दिली नव्हती.मी जरा जास्तच काळजी करणारा आणि घेणारा मनुष्य आहे.कालिंदी घरी एकटीच असते.वेळ कधी सांगून येत नसते.ती दरवाजा उघडा टाकून आंत जाईल किंवा बाहेर जाईल.कुलूप नीट लावणार नाही.चोर येईल.कालिंदी शेवटी पोर आहे.ती, तिच्या मैत्रिणी, पुढे मागे तिचे मित्र, घरी येतील. स्वयंपाकीण काकू, झाडूपोचा करणारी बाई, भांडी घासणारी बाई, घरात सर्वत्र फिरत असतात. आपल्याला घरामध्ये काय होत आहे ते कळले पाहिजे म्हणून मी गुप्तपणे सर्व खोल्यांत सीसीटीव्ही लावले होते.त्यामध्ये अत्याचारी निश्चित आलेले असणार.त्याचे फुटेज पाहायचे, अत्याचारी ओळखून काढायचे, आणि त्यांना शिक्षा द्यायची,असे मी मनाशी ठरविले होते.
सर्व खोल्यांत सीसीटीव्ही लावले आहेत ही माहिती मी मुद्दामच पोलिसांना दिली नव्हती.त्याचा उपयोग करून त्यांनी अत्याचारी शोधून काढले असते. त्यांना कदाचित दोन चार वर्षे शिक्षा झाली असती.कदाचित ते सुटून गेले असते.कदाचित त्यांना जामीन मिळाल्यावर फरारी झाले असते.पॅरोलवर येऊन फरारी झाले असते.
त्यांचा गुन्हा इतका संगीन होता की,मृत्युदंडाची शिक्षाही कमीच पडली असती.तिथे पाच दहा वर्षे म्हणजे कांहीच नाही.सर्व कांही स्थिरस्थावर झाल्यावर,पोलिसांनी कालिंदीची फाईल बंद केल्यावर, आपण फाईल उघडायची आणि गुन्हेगारांना शिक्षा द्यायची असे मी मनाशी ठरविले होते.
*सीसीटीव्ही फुटेज मी पाहिले होते.*
*त्याचा अभ्यास केला होता.*
*मला गुन्हेगार माहीतही झाले हाेते.*
*त्यांना पाहिल्यावर माझ्या अंगाची लाहीलाही होत होती.*
*तिथेच त्यांचा गळा दाबून त्याना ठार मारावे,असे मला वाटत होते.*
* गुन्हेगारांना मी ओळखले आहे हे मला त्यांना जाणवू द्यायचे नव्हते.त्यांना ते बेसावध असताना पकडून शिक्षा करायची होती.*
*माझ्यासमोर दोन पर्याय होते.*
*पहिला त्यांना त्यांच्या अपराधाची जाणीव करून देऊन, त्यांना त्यासाठी पुरेशी शिक्षा करून, नंतर त्यांना ठार मारणे.*
*दुसरा त्यांना शिक्षा करून जिवंत मरण यातना जन्मभर भोगायला लावून सोडून देणे.*
*यातील कोणता मार्ग स्वीकारावा त्यावर माझा निश्चय होत नव्हता.*
*गुन्हेगार बेसावध झाल्यावर,निवांत झाल्यावर,त्यांना पकडून आश्चर्यचकित करायचे आणि शिक्षा करायची अशी माझी योजना होती.*
(क्रमशः)
१४/५/२०२२©प्रभाकर पटवर्धन