( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

कपडे गरिबांना वाटून टाकावेत .कपडे जाळून टाकावेत.यातील कोणताच पर्याय योग्य दिसत नव्हता .शेवटी तिच्या अवयवांप्रमाणे सुटकेसही साखळदंडाला बांधून पाण्यात बुडवाव्यात असे त्याने ठरविले .त्याप्रमाणे त्याने विल्हेवाट लावली.एकूण आठ दहा दिवस या उस्तवारीत गेले होते.आणि आज दहा दिवसांनंतर तो मोकळा श्वास घेत आहे तोच संजीवनीचा संदेश लॅपटॉपवर झळकला होता .

तिने लॅपटॉपवर संदेश कसा पाठविला ते कळत नव्हते .त्याने तो संदेश पुन्हा एकदा नीट पाहिला .तो संदेश अन्य ठिकाणाहून आला नसून तिथेच टाइप केला गेला होता.हे लक्षात आल्याबरोबर सदाशिवच्या अंगावर काटा उभा राहिला.तो लॅपटॉपवर काम करीत असताना त्याच्याजवळ संजीवनी होती.ती सफाईने टाइपही करू शकत होती .दिसत असलेल्या शत्रूला काहीतरी तोंड देता येईल.परंतु अदृश्य शत्रूला तोंड देणे मुश्कील आहे.काय करावे ते त्याला सुचत नव्हते .अशा परिस्थितीत इथे रहाणे, रात्री झोप येणे, शक्य नव्हते. 

कांही दिवस कुठे तरी जाऊन राहावे. फिरून यावे.तोपर्यंत तिचा ससेमिरा सुटेल. आपण काय करावे याबद्दल काही कल्पना सुचू शकेल. त्याने रजेचा अर्ज टाकला.तो आठ दिवस महाबळेश्वरला जाऊन रहाला .

ती आपल्या बरोबर महाबळेश्वरला येईल अशी एक भीती त्याला वाटत होती .परंतु महाबळेश्वरमधील आठ दिवसांत तिने त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दर्शन दिले नव्हते .ते आठ दिवस शांततेत गेले होते.ताजातवाना होऊन तो परतला होता . 

येथे आल्यावर त्याच्या मोबाइलमध्ये पुन्हा मेसेज आला ."तू बाहेरगावी गेलास म्हणून सुटणार नाहीस.तुझा भयानक अंत अपरिहार्य आहे.तू मला अत्यंत निर्घृणपणे एखाद्या खाटकासारखे मारलेस.मी एखादे मांजर उंदराला  खेळवते त्याप्रमाणे तुला खेळवत आहे ." ~संजीवनी~    

गावातच परंतु दुसरीकडे काही दिवस राहावे असा एक विचार त्याच्या मनात आला .तसे केल्याने अाजचे मरण उद्यावर ढकलले गेले असते.गावातच ती दुसरीकडे आली नसती असेही सांगता येत नव्हते .तरीही त्याने प्रयोग करून पाहण्याचे ठरविले .एका हॉटेलात चार दिवस जाऊन तो राहला.पहिल्याच रात्री ती त्याच्या स्वप्नात आली .तिच्या हातात चॉपर होता .मी तुझी खांडोळी खांडोळी करीन असे ती त्याला सांगत होती .तो जागा झाला तेव्हा घामाने निथळत होता. एसी असूनही त्याला घाम फुटला होता. तो जागा झाला तेव्हा एक धूसर आकृती खोलीच्या खिडकीतून बाहेर जाताना त्याने पाहिली. आपण पाहिले ते स्वप्न की सत्य याचाच त्याला उलगडा होत नव्हता . दुसऱ्याच दिवशी हॉटेल सोडून तो आपल्या घरी परत आला .गावात कुठेही ती येऊ शकत होती .तो नोकरी सोडू शकत नव्हता. दुसरीकडे जावून तो खाणार काय होता .एवढी लठ्ठ पगाराची कायम नोकरी सोडणे म्हणजे  मूर्खपणाचा कळस होता.बदली होण्यासारखी त्याची नोकरी नव्हती .त्याला इथेच राहणे भाग होते .तो परगावी गेला असता तर ती तिथे आली नसतीच असे खात्रीलायकरित्या सांगता येत नव्हते.तिने कुठेही येऊन त्याचा सूड घेतला असता . 

एखादा  स्वामी भगत बुवा पहावा आणि समस्या सुटते का ते पाहावे असा एक विचार त्याच्या मनात पुन्हा आला .जो त्याला या संकटातून सोडवेल अशा एखाद्या माणसाची तो त्याच्या मित्रमंडळीत चौकशी करणार होता .परंतु त्याला त्यासाठी वेळच मिळाला नाही .

बाहेर पोलिसांच्या सायरनचा आवाज आला.तो गॅलरीत येऊन पाहतो तो सोसायटीच्या समोर पोलीसांची जीप येऊन उभी राहिली होती.थोड्याच वेळात त्याच्या दरवाजावरील घंटी वाजली.दरवाजा उघडतो तो पोलीस बाहेर उभे होते .तो आठ दिवस येथे नव्हता तेवढ्यात बऱ्याच  गोष्टी घडल्या होत्या.

त्याने पाण्यात सोडलेल्या संजीवनीच्या तुकड्यांपैकी एक तुकडा  कोळ्याच्या जाळ्यात सापडला होता.तो तुकडा पोलिसांपर्यंत गेला होता .त्यावरून पोलिसांना कुणातरी बाईचा खून झाल्याची, तिचे तुकडे करून नदीमध्ये सोडल्याची, खात्री झाली होती.पाणबुड्यांमार्फत नदीमध्ये शोध घेण्यात आला होता.उरलेले तुकडे सापडले होते .शवविच्छेदन करण्यात आले होते .अज्ञात इसमावर खुनाची केस लावण्यात आली होती .पोलीस तपास सुरू झाला होता.

संजीवनीने तिच्या बाबांना फोन करून मी येत आहे असे कळविले होते .तिने मी माहेरी कायमची येत आहे असे सांगितले होते.सदाशिवशी वारंवार  होणारे भांडण तंटे सर्व कांही तिच्या बाबांना सांगितले होते.सदाशिवच्या सासर्‍यानी त्याला फोन केला होता.त्याने ती केव्हाच तुमच्याकडे मला सोडून गेली म्हणून रागारागातच सांगितले होते.सदाशिवच्या नादी लागण्यात अर्थ नाही असे लक्षात येऊन त्यांनी सरळ  पोलिसांत हरवल्याची तक्रार  दिली होती. त्यासंदर्भात पोलिस चौकशी करायला आले होते .ही वेळ केव्हा ना केव्हा येणार हे सदाशिव जाणून होता.पोलिसांना तोंड द्यायला तो तयार होता.

सदाशिवने संजीवनीने लिहिलेली चिठी दाखविली. पोलीसानी सर्व घरात तपास केला .त्याना स्वच्छतागृहाच्या बाहेरील भिंती व जमीन संशयास्पद वाटली.चॉपर व संशयास्पद जागेवरील अवशेष खरवडून काढून ते त्यांच्याबरोबर घेऊन गेले .सदाशिवची कस्सून चौकशी करण्यात आली.पोलिसांच्या परवानगीशिवाय शहर सोडून बाहेर जायचे नाही असेही त्याला बजावण्यात आले .चॉपर ,जमीन,भिंती, यावर रक्ताचे अवशेष सापडतात का याची पोलिस कसून चौकशी करणार होते .फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर त्यांची खात्री पटली असती . त्यानंतर खुनाच्या आरोपावरुन त्याला अटक होण्याचा दाट संभव होता . 

सदाशिवने वकिलाकडे धाव घेतली. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले .ही वेळ आज ना उद्या येणार याची त्याला कल्पना होती.त्याने पोलिसांना त्याच्याविरुद्ध कोणता पुरावा मिळाला आहे याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला.वकिलामार्फत कायदेशीर प्रक्रियेने व गुप्तहेरामार्फत त्याने प्रयत्न केला .

पोलिसांना संजीवनीच्या पाण्यात बुडवलेल्या सुटकेसेस सापडल्या होत्या .त्यांनी नेलेल्या चॉपरवर, भिंत, जमीन, यावरील खरवडून नेलेल्या अवशेषात, मानवी रक्त असल्याचे पुरावे मिळाले होते.

आठ दिवस रोज सदाशिव  बोटिंगला नदीवर येत असे याचाही  पुरावा त्यांना मिळाला होता .

सदाशिवच्या मोटारीच्या टायरमध्ये नदीकाठच्या मातीचे अवशेष मिळाले होते .  

सदाशिवच्या मोटारीची डिकी  तपासण्यात आली. त्यातही मानवी रक्ताचे अवशेष मिळाले .

सदाशिवने ज्या प्लॅस्टिकमध्ये  संजीवनीचे अवयव बांधले होते .ते प्लॅस्टिक सदाशिवने खरेदी केल्याचा पुरावाही त्यांना मिळाला होता .

सदाशिवने साखळदंड, कुलुपे, लोखंडाचे तुकडे, कुठून विकत घेतले ती माहितीही पोलिसांनी गोळा केली होती.  

पोलिसांनी एवढी सर्व चौकशी केवळ संजीवनीच्या बाबांनी केलेल्या तक्रारीवरून केली नव्हती .पोलिस इन्स्पेक्टर शिवाजीराव, निरनिराळया पोलिस स्टेशनवर नोंद झालेल्या गुन्ह्यांच्या तक्रारी पाहात असताना त्यांच्या कॉम्प्युटरवर एक संदेश झळकला होता .तो संदेश पुढीलप्रमाणे होता ."सदाशिव म्हापसेकर (पुढे त्याचा पत्ता दिला होता) यांनी त्यांची पत्नी संजीवनी हिचा चॉपरने खून केला आहे.खुनाचे पुरावे त्यांच्या घरी व नदीवर मिळतील."संदेश कुठून आला ते पाहता तो सदाशिवच्या लॅपटॉपवरून आला होता .याचाच अर्थ संजीवनी मेल्यानंतरही , अमानवी अस्तित्वात, संगणक मोबाइल सफाईने हाताळू शकत होती .

ही सर्व माहिती मिळाल्यावर तर सदाशिव हादरून गेला होता.पोलिसांनी त्याच्या भोवतीचा फास आवळत आणला होता .त्याला कोणत्याही क्षणी अटक झाली असती .संजीवनीचा अत्यंत निर्दयपणे निर्घृणपणे मानवाला काळिमा लागेल अशा प्रकारे खून केल्याप्रकरणी त्याच्यावर खटला चालविण्यात आला असता .

पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी वॉरंट मिळविले .शिवाजीराव इन्स्पेक्टर कांही पोलिसांबरोबर सदाशिवच्या ब्लॉकवर आले. पुन्हा पुन्हा बेल वाजवून, दरवाजा ठोठावूनही, कुणीही दरवाजा उघडला नाही.शेवटी दरवाजा फोडण्यात आला .

बाहेरच्या खोलीतील हादरवणारे विदारक दृश्य पाहून कोणत्याही माणसाला भोवळ आली असती .अनेक खून अपघात पाहिलेले पोलिस इन्स्पेक्टर शिवाजीरावही चक्रावून गेले होते.कुणालाही हॉलमधील भयानक दृश्य बघवत नव्हते.

सदाशिवचे एकूण सहा तुकडे झाले होते.

डोके, दोन हात, दोन पाय, धड इतस्ततः पडले होते.

बाहेरची खोली रक्ताने भरली होती .

अजूनही सदाशिवचे अवयव तडफडत होते .

रक्त उष्ण होते.

त्या रक्ताच्या थारोळ्यात चॉपर पडला होता .

*पोलीस दरवाजा फोडत असताना कुणीतरी सदाशिवला पकडून  चॉपरने त्याचे सहा तुकडे केले होते.*

*ज्या पद्धतीने सदाशिवने संजीवनीचे तुकडे केले  होते त्याच पद्धतीने संजीवनीने सदाशिवचे तुकडे केले होते .* 

*पोलिसांच्या ताब्यात असलेला चॉपर इथे कसा आला हे एक गूढ होते.* 

*संजीवनीने सूड उगविला होता.*  

*सदाशिवच्या लॅपटॉपवर टाइप केलेली ती धमकी प्रत्यक्षात उतरवली होती.*  

(समाप्त)

३०/९/२०२०©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel