( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
सदाशिव लॅपटॉपवर काहीतरी बघत होता .तेवढ्यात लॅपटॉपवर एक मेसेज धडकला .मेसेज पुढीलप्रमाणे होता ."माझा शेवट झाला असे तुला वाटत असेल तर ती तुझी समजूत चुकीची आहे . मी अजून येथे आहे .तुझा सूड घेतल्याशिवाय मी जाणार नाही.तुझ्या सारखा पाठीमागून मी घाव घालणार नाही.मी तुला आव्हान देत आहे .स्वतःचा बचाव करायचा असल्यास कर ."~संजीवनी~
संदेश वाचल्याबरोबर सदाशिव थरथर कापू लागला .त्याच्यासमोरच तिने तो संदेश टाइप केला होता. ती अजून येथे आहे म्हणजे ती संपलेली नाही .ती आपल्याला आता कधीही व कशीही संपवू शकते.ती अदृश्य आहे. ती अमानवी आहे.ती कुठून केव्हा कसा घाव घालील सांगता येत नाही.आपण आता वाचत नाही.आपण तिला भयानक पद्धतीने संपविले. ती कोणती पद्धती वापरते कोण जाणे .तिच्यापासून आपल्याला आता बचाव करायचा असेल तर एखादा जबरदस्त स्वामी बुवा भगतच वाचवू शकतो.कोण बरे आपल्याला वाचवू शकेल असा त्याचा विचार सुरू झाला.
त्याच्या डोळ्यासमोर त्या दिवसाची घटना उभी राहिली .संजीवनी व तो यांच्यामध्ये लग्न झाल्यापासून कधीच प्रेमाचे आपुलकीचे आनंदाचे वातावरण राहिले नव्हते.तिच्यापासून त्याला कोणत्याच दृष्टीने समाधान सुख मिळत नव्हते.संजीवनीही तिच्या बाजूने तसेच म्हणू शकली असती.रोजच्या भांडणांना,रोजच्या कटकटींना, रोजच्या वादाला, दोघेही कंटाळून गेली होती.संजीवनीही कांही कमी नव्हती . दोघांमध्ये भांडणांमध्ये कांकणभर सरस कोण होते त्याचा अंदाज लावणे मोठे कठीण काम होते .रोजच्या भांडणांना रोजच्या कटकटीला कंटाळून शेवटी संजीवनीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.तिने माहेरी कायमचे राहायला जायचे ठरविले.कपडे व सामान यानी दोन बॅगा गच्च भरल्या होत्या.
सदाशिवला संजीवनी माहेरी जाते,घटस्फोट घेते, याचे सोयरसुतक नव्हते.उलट या गोष्टींचा त्याला आनंदच झाला असता .परंतु तिला जबरदस्त पोटगी द्यावी लागली असती .त्याला संजीवनीला एक पैही स्वतःच्या उत्पन्नातून मालमत्तेतून द्यावी असे वाटत नव्हते.दोन व्यक्ती एकमेकांचा तिरस्कार करू लागल्या की त्या कोणत्या टोकापर्यंत जातात त्याचे संजीवनी व सदाशिव हे एक उत्तम उदाहरण होते .संजीवनीचा त्याला इतका उबग आला होता, इतका राग आला होता,की शेवटी तिला या जगातून नाहीसे करण्याचा त्याने निश्चय केला.
संजीवनीने जरी बॅगा भरून तयार ठेवल्या होत्या तरीही तिचा निघण्याचा दिवस निश्चित होत नव्हता .कदाचित सदाशिवला पश्चात्ताप होऊन तो तिला राहण्याचा आग्रह करील असे तिला कुठेतरी वाटत असावे .त्या आशेने कदाचित ती काही काळ वाट पाहात असावी.शेवटी निराश होवून तिने माहेरी जायचे निश्चित केले. सदाशिवला संजीवनीला अशाप्रकारे संपवायचे होते की ती ठार तर व्हावी परंतु तो कुठेही त्यात सापडू नये.शेवटी तशी संधी त्याला सापडली .त्या दिवशी ऑफिसमधून सदाशिव लवकर घरी आला होता .संजीवनी त्याला इतकी विटली होती की त्याचा निरोप घेण्याचा प्रसंगसुद्धा तिला डोळ्यासमोर नको होता.त्या दिवशी तो येण्याच्या अगोदरच तिने प्रस्थान करण्याचे ठरविले होते .त्याच्याशी फोनवर मी जाते एवढे बोलावे असेसुद्धा तिला वाटत नव्हते .तिने त्याला एक चिठ्ठी लिहून त्याला सहज दिसेल अशी टीपॉयवर ठेवली.
"मी माझ्या सामानासकट माझे कपडे घेऊन कायमची माहेरी निघून जात आहे . लग्न झाल्यावर मी ज्या सुटकेसमधून माझ्या वस्तू आणल्या होत्या त्याच सुटकेस मी बरोबर नेत आहे. जाताना तुझे तोंडसुद्धा पहाण्याची माझी इच्छा नाही ." ~संजीवनी ~
चिठ्ठी लिहून ठेवून संजीवनी प्रसाधनगृहात गेली .तिने टॅक्सी बोलावली होती .दरवाजा ओढून घेऊन ती निघून जाणार होती.तिच्या दुर्दैवाने सदाशिव आज तीन चार तास लवकर घरी आला होता .त्याने टीपॉयवर ठेवलेली चिठ्ठी वाचली .शेजारी ठेवलेल्या दोन बॅगाही पाहिल्या . तो सरळ स्वयंपाकघरात गेला.स्वयंपाकघरातील धारदार चॉपर त्याने घेतला .गुपचूप तो स्वच्छतागृहाच्या बाहेर येऊन उभा राहिला.ती बाहेर येताच त्याने तिच्या मानेवर चॉपरचा एकच जबरदस्त घाव घातला .तिला ओरडता सुद्धा आले नाही .तिची मान तुटून शीर जमिनीवर पडले होते .तिचे धड जमिनीवर पडण्याच्या अगोदर सदाशिवने ते धरले .त्या छोट्या कुऱ्हाडीच्या चार घावांमध्ये त्याने तिचे दोन हात व दोन पाय छाटून टाकले .एकूण सहा भाग झालेली संजीवनी जमिनीवर पडली होती .जिकडे तिकडे रक्ताचे थारोळे जमा झाले होते .
आता मात्र सदाशिव घाबरला होता .रागाच्या भरात त्याने संजीवनीची खांडोळी तर केली .परंतु आता त्यांचे काय करायचे असा यक्ष प्रश्न त्याच्या पुढ्यात उभा राहिला.प्रथम त्याने सर्व खिडक्या लावून घेतल्या .सर्व पडदे सरकवून टाकले .बेल बंद करून टाकली .कुणीही बाहेर आले तर घरात कुणीही नाही असे त्याला वाटावे,अशी व्यवस्था त्याने केली .रक्ताचे थारोळे व सहा तुकडे बघून त्याला चक्कर येऊ लागली होती. संजीवनीचे जमिनीवर पडलेले शीर आपल्याकडे डोळे वटारून पाहात आहे असा त्याला भास होत होता .त्याने प्रथम डोके व इतर भाग मोठ्या प्लॅस्टिक पिशव्यात बंद केले.डझनभर मोठ्या जाड प्लॅस्टिक पिशव्या त्याने अगोदरच आणून ठेवल्या होत्या .नंतर त्याने ते सर्व तुकडे त्याच्याकडे असलेल्या मोठ्या फ्रिजरमध्ये ठेवून दिले .त्यानंतर तो साफसफाईच्या कामाला लागला .भिंतींवर व त्याच्या कपडय़ांवर उडालेले रक्ताचे शिंतोडे आणि जमिनीवरील रक्त पुसून साफ करीपर्यंत त्याला जवळ जवळ चार तास लागले.त्याच्या मताने आता सर्व काही स्वच्छ झाले होते .
या सर्व साफसफाईमध्ये त्याला झालेले शारीरिक श्रम व मानसिक थकवा आणि ताण यामुळे क्लांत होऊन तो सोफ्यावर लवंडला.
रागाच्या भरात संधी सापडताच त्याने संजीवनीचा काटा तर काढला होता.सर्व काही तसे अकस्मात झाले होते.संजीवनीला ठार मारावे एवढे त्याने ठरविले होते .कसे केव्हा त्याचे नियोजन केले नव्हते.ऑफिसातून लवकर आल्यावर चिठ्ठी पाहताच त्याला कल्पना सुचली होती . ती माहेरी गेली हा तिच्या हस्ताक्षरातील मोठा पुरावा त्याच्याजवळ होता .ती एकदा घरातून निघून गेली असती म्हणजे त्याला तिचा खून करणे अशक्य निदान कठीण तरी झाले असते .त्यामुळे क्षणार्धात विचार करून त्याने तिला ठार मारले होते .आता प्रेताची विल्हेवाट कशी लावावी, तिच्या कपड्यांचे इतर बरोबर घेतलेल्या वस्तूंचे सुटकेसचे काय करावे, असाही प्रश्न होता.थंड डोक्याने सर्व काही करणे आवश्यक होते .
संजीवनीच्या प्रेताचे एकूण सहा तुकडे झाले होते.दीर्घ काळ फ्रिझरमध्ये ते ठेवणे धोक्याचे होते.कुणीही फ्रिजर उघडला असता, पोलीस चौकशीला आले असते, तर मुद्देमाल सापडला असता. फ्रिजरमधून काढून त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक होते.स्मशानात नेऊन ते जाळणे तर अशक्य होते .तो सोसायटीच्या ब्लॉकमध्ये राहत होता .बागेत ते तुकडे पुरणे शक्य नव्हते .गावाबाहेर नदी वाहत होती .दगड बांधून जर ते तुकडे नदीत मध्यभागी सोडले तर तळाला पडून राहिले असते .माशांनी खाल्ले असते.मांसाचे हळूहळू विघटीकरण झाले असते.कांही दिवसांत तिच्या अवयवांचा मागमूसही राहिला नसता .सर्व तुकडे एकदम नेणे धोक्याचे होते .प्रत्येक वेळी मोटारीच्या डिकीतून एकेक तुकडा न्यावा. नदीच्या मध्यभागी जाऊन तो पाण्यात सोडून द्यावा. असे त्याने ठरविले .मासे दोरी कुरतडतील.आयत्या वेळी दगड कुठून आणणार ?त्याने एक किलो वजनाचे लोखंडाचे सहा तुकडे आणले.तीन फूट लांबीचे सहा साखळदंड आणले .सहा कुलुपे आणली.लोखंडाच्या तुकडय़ांना अर्थातच एक मोठे छिद्र होते . साखळदंडाच्या साह्य़ाने त्याने ते सहा अवयव कुलूपबंद केले . तो रोज ऑफिसला जात होता .संध्याकाळी बोटिंगला जाई.प्रत्येक वेळी एकेक तुकडा नदीच्या मध्यभागी नेऊन सोडीत असे .अशाप्रकारे सहा दिवसांत त्याने त्या सहा तुकडय़ांची विल्हेवाट लावली .
आता त्याच्यासमोर त्या दोन सुटकेसचे काय करावे असा प्रश्न होता.जर तिने चिठ्ठीत सामानाचा कपड्यांचा सुटकेसचा उल्लेख केला नसता तर सर्वच सोपे झाले असते .सामान काढून जागच्या जागी ठेवता आले असते .परंतु आता कपडे सामान सुटकेस यांची विल्हेवाट लावणे अपरिहार्य होते .
कपडे गरिबांना वाटून टाकावेत .कपडे जाळून टाकावेत.यातील कोणताच पर्याय योग्य दिसत नव्हता .
*शेवटी तिच्या अवयवांप्रमाणे सुटकेसही साखळदंडाला बांधून पाण्यात बुडवाव्यात असे त्याने ठरविले .*
*त्याप्रमाणे त्याने विल्हेवाट लावली.*
*एकूण आठ दहा दिवस या उस्तवारीत गेले होते.*
*आणि आज दहा दिवसांनंतर तो मोकळा श्वास घेत आहे तोच संजीवनीचा संदेश लॅपटॉपवर झळकला होता .*
(क्रमशः)
३०/९/२०२०©प्रभाकर पटवर्धन