( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

संपूर्ण गाव मनापासून हळहळला.गावच काय पंचक्रोशीत ही गोष्ट सर्वत्र झाली होती.त्या कुटुंबाबद्दल सगळ्यांच्याच मनात प्रेम व आदरभाव होता.सर्व पंचक्रोशी हळहळत होती.

जुलमाची सर्वांना इतकी सवय झाली होती त्यामुळे इतका मुर्दाडपणा आला होता की याचा प्रतिशोध घ्यावा असा विचारही कोणाच्या मनात आला नाही.   

त्यांच्यावर जमीनदारामुळे ओढवलेला प्रसंग आणि त्याची सर्वांच्या आत्महत्येत झालेली परिणिती सर्व गाव पाहत होता आणि हळहळत होता.

विठोबा व रकमा पुढील गतीला गेले.परंतु नर्मदा सूडाच्या भावनेने जळत होती.

जमीनदाराला व त्याच्या कुटुंबीयांना धडा शिकविल्याशिवाय तिला मुक्ती मिळणार नव्हती.

थोडक्यात ती भूत झाली होती.भुतांचा राजा वेताळ याच्यापुढे तिला हजर करण्यात आले.वेताळाला तिच्याबद्दल सर्व माहिती होती.तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल त्याला अनुकंपा वाटत होती.वेताळाने तिला तुझी इच्छा काय म्हणून विचारले.तिने हरिनारायण व शंकर यांचा व कुटुंबीयांचा सूड असे उत्तर दिले.

अजून तू लहान आहेस.तुला अजून विविध शक्ती प्राप्त झालेल्या नाहीत.माणसांना मोठे होण्यासाठी वर्षे जावी लागतात.इथे थोड्या दिवसातच तुला विविध शक्ति प्राप्त होतील.तुझे ईप्सित साध्य होण्यासाठी मी तुला कांही शक्ती प्रदान करीन.नंतर खुशाल तू हरिनारायण व शंकर यांच्या वाड्यावर जा आणि तुला जो कांही सूड घ्यावा, त्याना धडा शिकवावा, असे वाटत आहे तसे कर असे वेताळ राजाने  सांगितले.

साधारण महिन्याभराच्या काळात तिच्या विविध शक्तीमध्ये भरपूर वाढ झाली. वेताळ राजाने कांही खास शक्ती तिला प्रदान केल्या.त्या शक्तीमुळे ती कोणत्याही मांत्रिकाच्या तडाख्यात सापडणार नव्हती.मांत्रिक तिला पकडू शकणार नव्हता.एखाद्या मांत्रिकाच्या शक्ती कमी पडल्या तर तीच त्याला धडा शिकवू शकणार होती.मांत्रिक कोणत्याही मार्गाने तिला आपल्या कह्यात आणू शकणार नव्हता.भुते साधारण रात्री, विशेषत: मध्यरात्री कार्यरत असतात.दिवसा सूर्यप्रकाशात त्यांच्या शक्ती कमी पडतात.दिवसा तू कांहीही करू शकशील, तुझ्या शक्ती क्षीण होणार नाहीत,अशीही शक्ती वेताळाने तिला दिली होती.     तुला तुझे ईप्सित साध्य होईल असा वेताळ राजाने आशीर्वाद दिला आणि सूड घेण्याच्या विचाराने धगधगत असलेली नर्मदा त्या राक्षसांच्या वाड्याकडे निघाली.आता त्या दोघांना ती कोण कोणती शिक्षा करणार होती, कोणकोणते भोग त्यांच्या वाट्याला येणार होते,ते कुणालाच माहीत नव्हते.नर्मदेने स्वतःसुद्धा त्याचा आराखडा निश्चित केला नव्हता.परिस्थितीनुसार ती शिक्षा करणार होती. 

नर्मदेला वाडय़ात कुठेतरी स्थिर स्वरूपात वस्ती करायची होती.तिथून ती तिचे सूड कारस्थान राबवणार होती.हरिनारायणची मुलगी दया नाजूक होती. सुंदर होती स्वभावाने चांगली होती.हे मी अगोदरच सांगितले आहे.नर्मदा जरी आता भूत होती तरी मुळात तिचा स्वभाव प्रेमळ होता.तिच्यावर विशेषतः तिच्या कुटुंबावर आईवडिलांवर झालेल्या अन्यायामुळे ती सूडाने पेटली होती.मनुष्याचा मुळात जो स्वभाव असतो तो भूतयोनीतदेखील विशेष बदलत नाही.जसे मनुष्य निरनिराळ्या स्वभावाचे असतात त्याप्रमाणेच भुतेही विविध स्वभावाची असतात.नर्मदेला दयाच्या खोलीत कायमची वस्ती करणे आवडले असते.  

दयाला लहानपणापासून बाहुल्या फार आवडत असत.तिच्या कपाटात विविध आकाराच्या विविध प्रकारच्या अनेक बाहुल्या व्यवस्थित ठेवल्या होत्या. नर्मदेलाही लहानपणी बाहुल्या खूप आवडत असत.गरिबीमुळे तिला बाहुल्या मिळाल्या नव्हत्या. दयाच्या कपाटात कितीतरी बाहुल्या बघून तिचा हर्ष गगनात मावेना.त्या कपाटातच सूड पुरा होईपर्यंत मुक्काम करण्याचे तिने निश्चित केले.त्यातील एक आवडलेली  बाहुली नर्मदेने वस्ती करण्यासाठी निवडली.दुसऱ्या दिवसापासून ती शंकर व हरिनारायण या दोघांनाही सळो की पळो करून सोडणारी होती.त्यांना हे हाल कां भोगावे लागत आहे त्याची जाणीवही त्यांना करून देणार होती.ज्याला शिक्षा भोगावी लागते त्याला तो कां शिक्षा भोगत आहे   त्याची सतत जाणीव असणे आवश्यक असते.शिक्षेची तीन उद्दिष्टे असतात.एक: ज्याच्यावर अन्याय झाला त्याला, गुन्हेगाराला शिक्षा होताना पाहून समाधान वाटते.दोन: गुन्हेगाराला त्याच्या अयोग्य वर्तनाबद्दल दंड होतो.तीन:गुन्हेगार पुन्हा तसा गुन्हा करण्यास प्रवृत्त होऊ नये अशी दंड करणार्‍याची इच्छा कदाचित फलद्रूप होते.   

नर्मदेने प्रतिशोधाला सुरुवात केली त्या दिवशी हरिनारायण आपल्या वाड्यात  त्यांची पत्नी लक्ष्मी बरोबर होते.पहाटे त्यांना प्रचंड थंडी वाजू लागली.त्यामुळेच त्यांना जाग आली.दिवस उन्हाळ्याचे होते.तरीही त्यांना प्रचंड थंडी वाजत होती.त्यांनी कपाटातून शोधून एकावर एक स्वेटर घातले.अंगावर रग घेतले.तरीही त्यांची थंडी थांबत नव्हती.थंडी त्यांच्या शरीरातील प्रत्येक हाड  फोडून काढीत होती. होणार्‍या प्रचंड वेदनेने ते गुरासारखे ओरडू लागले.लक्ष्मीबाईना त्यांच्या नवऱ्याला बहुधा ताप भरत असावा असे वाटत होते. परंतु तापाचा लवलेशही नव्हता.थंडीमुळे त्यांचे शरीर सारखे पिळवटून निघत होते.थंडीमुळे त्यांच्या वेदना इतक्या असह्य झाल्या की ते गुरासारखे ओरडू लागले.लक्ष्मीबाईना काय करावे हेच कळत नव्हते.एक मोठी शेकोटी पेटवण्यात आली.त्याच्या पुढ्यात हरिनारायण बसले.तरीही त्यांची थंडी कमी होत नव्हती.   

गुन्हेगाराला नुसती शिक्षा देऊन भागत नाही.ही शिक्षा तो कां भोगत आहे तेही त्याला माहीत असणे जरूर असते.नर्मदेच्या स्वतःच्या शक्ती वृद्धिंगत झाल्या होत्याच.त्याचबरोबर वेताळ राजाने कृपावंत होऊन तिला कांही शक्ती तात्पुरत्या प्रदान केल्या होत्या.नर्मदा तिच्या मूळ स्वरुपात हरिनारायण यांच्या पुढ्यात प्रगट झाली.लक्ष्मीबाईनाही ती दिसत होती.तिच्या पतीचे अपराध तिला माहीत होतेच.आता त्यांना भोगावे लागणारे हाल कशामुळे आहेत ते लक्ष्मीबाईंच्याही लक्षात येणार होते. त्यामुळे नर्मदा लक्ष्मीबाईनाही दिसत होती.  तिला बघून हरिनारायण चकित झाले.ती त्याना उद्देशून म्हणाली.  तुमच्या व तुमच्या मुलाच्या वासनेला बळी पडून माझा व माझ्या कुटुंबाचा सर्वनाश झाला.माझे वडील व आई देवाघरची लेकरे होती.सूड प्रतिशोध या कल्पना त्यांच्या मनात येणेही शक्य नव्हते.एखाद्याने तसा प्रयत्न केला असता तरी त्यांनी त्याला त्यापासून परावृत्त केला असता.शिक्षा देणे हे ईश्वराचे काम आहे तो त्याना शिक्षा देईल किंवा सद्बुद्धी देईल.असे त्यांचे मत होते. त्यांनी आत्महत्या केली.त्यांच्या मनात मरताना कोणताही हेतू नसल्यामुळे ते पुढील गतीला निघून गेले.मी मात्र सूडाने प्रतिशोधाच्या भावनेने धगधगत होते.तुम्ही आता जे कांही भोगत आहात आणि भविष्यकाळात जे कांही भोगणार आहात ती सर्व तुमच्या कर्माची फळे आहेत.तुमच्याप्रमाणेच तुमच्या मुलालाही अशाच मरणप्राय यातना भोगाव्या लागणार आहेत.एवढे बोलून ती अदृश्य झाली.

प्रचंड गारठय़ाने थंडीने त्यांच्या नसा आखडून गेल्या होत्या. त्यांना मरणप्राय वेदना होत होत्या.त्यात आता नर्मदेच्या दर्शनाने त्याचे कारण त्यांना कळले होते.असेच हाल तिची मर्जी असेल तोपर्यंत भोगत रहावे लागणार हेही कळले होते.शारीरिक यातनांबरोबर मानसिक यातनाही सुरू झाल्या होत्या.असेच कांही काळ सुरू राहिले असते तर त्यांचा त्यात वेळप्रसंगी मृत्यूही झाला असता.नर्मदेने त्यांच्यावरील गारूड काढून घेतले.थंडीमुळे त्यांचा इतका शक्तिपात झाला होता कि थंडी वाजण्याचे थांबले तरीही ते शक्तिपात झाल्यामुळे प्रेतवत पडून होते.हे सगळे पाहून व ऐकून लक्ष्मीबाई अवाक् झाल्या होत्या.

नर्मदा आता त्यांचा मुलगा शंकर याच्या खोलीत गेली.शंकरला अकस्मात उकडू लागले.त्याने अंगातील शर्ट काढून टाकला.त्याच्या अंगाची आग होतच राहिली.क्षणोक्षणी आगीचे उकाड्याचे प्रमाण वाढत होते.एखाद्याला विषुववृत्तावर भरदुपारी उन्हात उभा केला तर त्याची जी अवस्था होईल तशी अवस्था शंकरची झाली होती.तो पाण्याच्या पिंपात जाऊन बसला.तरीही त्याची आग होतच राहिली.पाण्याबाहेर काढलेली एखादी मासळी ज्याप्रमाणे तडफडावी त्याप्रमाणे तो पाण्यात उकाड्याने  तडफडत होता.त्याच्या अंगाची होणारी असह्य आग कांही केल्या थांबत नव्हती.वेदना सहन न झाल्यामुळे तो ओरडू लागला.त्याच्या पुढ्यात आता नर्मदा प्रकट झाली.जमीनदार हरिनारायण याला तिने ज्याप्रमाणे तो भोगत असलेल्या क्लेशांचे कारण सांगितले तसेच ते शंकरलाही सांगितले.

दु:खाची,भोगाव्या लागणाऱ्या क्लेशांची परिसीमा झाल्यानंतर तिने त्याच्यावरील गारूड काढून घेतले.शंकरच्या अंगावर ठिकठिकाणी भाजल्यासारखे फोड आले होते.त्याचा प्रचंड दाह होत होता.त्याला तसेच सोडून देऊन नर्मदा तिच्या आवडत्या बाहुल्यात येऊन स्थिर झाली.

उद्या त्या दोघांना कोणती शिक्षा करावी याचा विचार  तिच्या मनात चालू होता.दुसर्‍या  दिवशी तीच शिक्षा परंतु हरिनारायण यांना दिलेली शिक्षा शंकरला व शंकरची शिक्षा हरिनारायण यांना द्यायचे तिने निश्चित केले.

दुसऱ्या दिवशी हरिनारायण यांना थंडीऐवजी प्रचंड उकाडा होवू लागला.अंगाची आग लाहीलाही सुरू झाली.तर तिकडे शंकरला हुडहुडी भरली. थंडी वाजू लागली. थंडीची परिसीमा झाली. थंडीने हाडे फुटतात की काय असे वाटू लागले.  

पहिल्या दिवशी भोगलेल्या क्लेशामुळे दुसर्‍या  दिवशी त्यांना क्लेश सहन करायची ताकदच शिल्लक राहिली नव्हती.

दुसर्‍या  दिवशी दिवसभर भोगलेल्या क्लेशामुळे संध्याकाळी दोघेही शुद्ध व बेशुध्द याच्या सीमारेषेवर होते.

नर्मदेला त्यांना शिक्षा तर करायची होती परंतु शिक्षेमुळे त्यांचा मृत्यू तर होऊ द्यायचा नव्हता.

लगेच त्यांना एखादी कडक शिक्षा केली असती तर त्यांचा मृत्यू होण्याचा संभव होता.

शिक्षा भोगण्यासाठी समर्थ होण्यासाठी त्यांना कांही दिवस देणे गरजेचे होते.

नर्मदेने त्यांना पुन्हा दर्शन दिले.उद्या पुन्हा तुम्हाला शिक्षा सुरू केली तर कदाचित तुमचा मृत्यू होईल.

*तुम्ही क्लेश तर भोगत रहावेत आणि तुमचा मृत्यू तर होऊ नये अशी माझी इच्छा आहे.तेव्हा चार दिवस मी तुम्हाला शिक्षेतून सूट देत आहे.पाचव्या दिवशी आपण पुन्हा भेटू असे म्हणून ती अदृश्य झाली.*

*हरिनारायण व शंकर यांचा पीळ गेला नव्हता.सुंभ जळले तरी पीळ जात नाही तो असा.*

*दोघांनीही विचार करून एखाद्या जबरदस्त मांत्रिकाला बोलवायचे असे ठरविले.त्याच्याकडून नर्मदेचा कायमचा बंदोबस्त करायचा असा विचार त्यांनी केला.*

*नर्मदेला एखाद्या बाटलीत भरून ती बाटली खोल पुरून टाकावी म्हणजे तिचा त्रास आपल्याला होणार नाही असा त्यांचा विचार होता.*

*धुंडिराज नावांचे महामांत्रिक त्याकाळी त्या प्रदेशात होते.त्यांना सन्मानपूर्वक पाचारण करण्यात आले.*

*अाता नर्मदेच्या शक्ती व धुंडिराज यांच्या शक्ती पणाला लागणार होत्या.त्यांची टक्कर होणार होती.त्यातून शेवटी काय होणार होते ते भगवंतालाच माहीत. *   

(क्रमशः)

२९/१/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel