( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
तुमच्या जखमा भरून आल्या.तुम्ही शिक्षा सहन करण्याइतपत बरे झालात कि मी येतेच आहे.तुमचा निकाल लागेपर्यंत मी येथेच आहे.असा त्यांना दम देऊन नर्मदा गुप्त झाली.तिच्या बोलण्यावरून ती त्या दोघांना त्यांचे हाल हाल करून मारणार आहे असे वाटत होते.त्या दोघा पापकर्मीयांना तशीच शिक्षा योग्य होती असे कुणीही म्हणाला असता.
तुम्ही शिक्षा सहन करण्याइतपत बरे झालात कि तुम्हाला पुन्हा कोणत्या ना कोणत्या शिक्षेस तोंड द्यावे लागेलच. म्हटलेच आहे करावे तसे भरावे.मी तुम्हाला तशी सोडणार नाही.हे तिचे बोल त्यांना आठवत होते.आपण केलेले अत्याचार,केलेल्या निर्घृण हत्या,उपभोग घेतलेल्या स्त्रियांचा आक्रोश त्यांना आठवत होता.
दोघेही काकुळतीला आले होते.आमच्या हातून खूप मोठी चूक झाली.आम्हाला क्षमा कर .असे ते विनवून सांगत होते.ते खरेच पश्चात्तापदग्ध झाले होते कि शिक्षेच्या भीतीमुळे तसे बोलत होते ते सांगणे मोठे कठीण होते.परंतु बहुधा त्यांच्यात चांगल्या दिशेने परिवर्तन होत असावे.त्यांच्या आयुष्यात आत्तापर्यंत ते बहिर्मुख होते.शिक्षेमुळे त्यांना एका जागी पडून राहावे लागले.त्यामधून अंतर्मुखता आली असावी.आपले वर्तन अयोग्य होते याची जाण त्यांना आली असावी.
त्यांच्याकडे एक जबरी,धडकी भरविणारा कटाक्ष टाकून नर्मदा अंतर्धान पावली होती.
आता पुढची शिक्षा कोणती करावी असा विचार करीत असताना तिच्या मनात एक वेगळाच विचार आला.नर्मदा मुळात एक सज्जन मुलगी होती.तिच्या कुटुंबावरील अत्याचारांमुळे तिचे परिवर्तन एका क्रूर सूडकन्येमध्ये झाले होते.प्रत्येक व्यक्तीत तो कितीही वाईट असला तरी त्याच्यात चांगुलपणाचा अंश असतो.केव्हां ना केव्हां तो अंश विस्तारतो आणि मनुष्याचा उद्धार करतो.नर्मदा तर मुळातच चांगली होती. त्या दोघांना अशीच शिक्षा करीत राहण्यापेक्षा यातून कांहीतरी चांगले निर्माण व्हावे असे तिला कुठेतरी अंतर्यामी वाटत असावे.
जो जो ती त्या कल्पनेवर विचार करू लागली तो तो तिला तो विचार ती कल्पना आवडू लागली.या सर्वातून कांहीतरी चांगले निर्माण होईल असा विश्वास तिला वाटू लागला
नर्मदा त्या दोघांना कोणतीही शिक्षा करू शकली असती.ती त्या दोघांना ठार मारू शकली असती परंतु तिला त्यांना ठार मारायचे नव्हते.त्यांच्या मृत्यू बरोबर सर्व विषय संपत होता.त्यांना जिवंत तर ठेवायचे होते आणि क्लेश तर द्यायचे होते.त्यांनी केलेल्या अपराधाबद्दल त्यांना जाणीव होत रहाणे आणि शिक्षा भोगत राहणे असाच तिचा कार्यक्रम होता.असाच तिचा उद्देश होता.
असे जे क्रूर व खुनशी लोक असतात ते शिक्षेने सुधारतात का याबाबत दुमत आहे.तशी शिक्षा बघून दुसरे वाईट प्रवृत्तीचे लोक अपराध न करण्यास प्रवृत्त होतील का याबाबतही शंका आहे.खून कां होतात,स्त्रियांवर अत्याचार कां होतात?याची अनेक सामाजिक, वैयक्तिक व मानसशास्त्रीय कारणे आहेत.नर्मदेला जरी या गोष्टी समजत नसल्या तरी तिला आतून कुठेतरी त्या विषयांची जाण असावी.तिला लक्ष्मीबाई व दया या दोघींची कीव वाटत होती.त्या दोघांना शिक्षा म्हणजे अप्रत्यक्षरीत्या त्या दोघींना शिक्षा होत होत्या.दोघींच्या चेहऱ्यांवर बोलण्यातून,वर्तनातून, ते व्यक्त होत होते.
समजा दोघेही मेले असते तरी लोकांचे हित काय होणार होते?त्यांच्याकडून भविष्यकाळात होणार्या अत्याचारांपासून लोक वाचले असते ही गोष्ट खरी.परंतु त्यांच्या जागी आणखी दुसरे कुणी आले असते. मागील पानावरून पुढील पानावर कथा चालूच राहिली असती.दोघे शिक्षा भोगत राहिले असते तरीही त्यातून लोकांचे कांही हित साधणार नव्हते.
जमीनदाराजवळ पैसा भरपूर होता. सत्ताही होती. त्याच्या हातून असे कांही काम करून घ्यावे कि त्यामुळे जमीनदारीच्या सर्व गावांतील लोकांचे कांहीतरी कल्याण होईल असा विचार तिच्या मनात आला होता.अशा गोष्टींमुळे लोकांचे हित झाले असतेच त्याचबरोबर कदाचित चांगल्या वर्तनाचा परिणाम काय होतो हे लक्षात आल्यामुळे हरिनारायण व शंकर यांच्यामध्ये सुधारणा होण्याचा संभव होता.लक्ष्मीबाई व दया या दोघीनाही ते सुधारल्यामुळे आणि त्यांच्या शिक्षा बंद झाल्यामुळे आनंद झाला असता.
त्या प्रदेशामध्ये पाऊस अनियमित पडत असे.पावसाचे प्रमाण कमी होते.कधी कधी अवर्षणाला सामोरे जावे लागे.विहिरी खूप खोल असत.विहिरींना पाणी लागले तर लागे नाहीतर कोरडय़ा राहात.उन्हाळ्यात पाऊस पुढे गेला तर विहिरी कोरड्या पडत.दूरवरून मिळेल तेथून पाणी आणावे लागे.या सर्वांचा शेतीच्या पिकांवर वाईट परिणाम होत असे.
जर प्रत्येक गावात तलाव खोदला.त्याला झरे लागले तर उत्तमच.काहींना झरे लागतील काहींना लागणार नाहीत.पावसाचे पाणी तर आंत साठेल.त्याचा उपयोग कांही ना कांही प्रमाणात गावकऱ्यांना करता येईल.
गावांना जोडणारे चांगले रस्ते नाहीत.आहेत त्या पायवाटा.त्यावरून बैलगाडी नेताना आत बसणाऱ्यांचे अपरिमित हाल होतात.जर बैलगाडी जाईल अशा रस्त्यांनी गाव जोडले गेले तर सर्वांचाच फायदा होईल.
त्या दोघा क्रूरकर्म्यांना सांगून हे काम करून घेतले पाहिजे.लोक त्यांना दुवा देतील.शेती सुधारेल.शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल.त्याचबरोबर सर्व जमीन प्रत्येकाच्या मालकीची कायमची करून टाकावी.रयतेला स्थैर्य येईल.अशा प्रकारचे विचार तिच्या मनात आले.
जमीनदार व त्यांचा मुलगा यांना कोणत्या भयानक शिक्षाना तोंड द्यावे लागत आहे ही गोष्ट त्यांच्या सामर्थ्यशाली गुंड सैन्याला माहीत नव्हती.हे सर्व त्या दोघांनी जाणीवपूर्वक गुप्त ठेवले होते.अर्थात कांही प्रमाणात या गोष्टी पाझरत होत्या आणि रयतेपर्यंतही पोहचत होत्या तो भाग वेगळा.फक्त स्पष्टपणे कुणी बोलत नव्हते.लोकांमध्ये कुजबूज चालली होतीच.नर्मदा त्यांना शिक्षा देत आहे हे लपून राहिले नव्हते.
नर्मदा त्या दोघांच्या पुढ्यात पुन्हा प्रगट झाली.दोघेही झालेल्या जखमांनी विव्हळत होते बेजार झाले होते.नर्मदेला पुन्हा पाहताच त्यांच्या शरीराला कंप सुटला.आता ही आपले काय करणार अशी भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.नर्मदेने त्यांना ही नवीन योजना सांगितली.तुमच्या जवळचा सर्व पैसा मोकळा करा. तुमच्या साहाय्यकांच्या साहाय्याने व प्रत्येक गावातील लोकांच्या सहकार्याने प्रत्येक गावात एक मोठा तलाव खणण्यात यावा.त्याचप्रमाणे सर्व गाव गाडी रस्त्यांनी जोडले जावेत.हे काम एका वर्षभरात झालेच पाहिजे.तुम्ही प्रामाणिकपणे लक्ष ठेवून पैसा खर्च करून लोकांच्या सहकार्याने हे काम जर कराल तर तुमच्या शिक्षा कायमच्या माफ होतील.सर्व लोक तुम्हाला दुवा देतील.चांगला जमीनदार कसा असावा याचे उदाहरण इतर जमीनदारांपुढे ठेवले जाईल. तुम्ही करीत असलेल्या कामावर माझे लक्ष राहील.तुम्ही खरेच सुधारले आहात ना याचीही मी परीक्षा घेईन.जमिनी कायमच्या शेतकर्यांच्या मालकीच्या करण्यात याव्यात.प्रत्येक जण तुम्हाला त्यांच्या उत्पादनातील एक चतुर्थांश वाटा देईल अशी योजना करावी.यातूनही तुम्हाला गडगंज उत्पन्न मिळेल.तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही रयतेसाठी खर्च करु शकाल.तुमचे व लोकांचे सर्वांचे भले होईल कल्याण होईल.आदर्श जमीनदार कसा असावा याचे उदाहरण तुम्ही सर्वांपुढे ठेवावे अशी माझी इच्छा आहे.
हरिनारायण व शंकर या दोघांना योजना मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.नर्मदेने तिच्या शक्तीच्या साहाय्याने त्यांच्या जखमा बऱ्या केल्या.ते पूर्ववत झाले. नर्मदेच्या भयाने असो,त्यांना भोगाव्या लागलेल्या शिक्षेमुळे व योग्य वर्तन न केल्यास पुन्हा शिक्षाना तोंड द्यावे लागेल या कल्पनेने असो,किंवा त्यांच्यामध्ये खरीच सुधारणा झाली त्यामुळे असो,दोघेही मनःपूर्वक कामाला लागले.संचित धन त्यांनी या कामासाठी मोकळे केले.प्रत्येक गावात भव्य तलाव खणण्यात आला.तलावाचे चिर्यांनी (ताशीव दगडांनी) बांधकामही करण्यात आले.कांही तलावांना झरे लागले.त्यामुळे तलाव पाण्याने भरून गेले.कांही ठिकाणी केवळ पावसाचे पाणी साठून त्याचाच उपयोग करावा लागला.रामनगरमध्ये तर दोन तलाव झाले एक नैसर्गिक तलाव अगोदरच होता. सर्व गावे गाडी रस्त्यांनी जोडली गेली.लोकांना रोजगार मिळाला.लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली.पाणीपुरवठा बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित झाल्यामुळे शेती उत्पन्नातही वाढ झाली.परिणामी जमीनदाराचेही उत्पन्न वाढले
दोघांमध्ये सुधारणा झाली.पुढील पाच वर्षे नर्मदा अधूनमधून त्यांना दर्शन देत होती.सूचना करीत होती.
सूडाने धगधगत असल्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अवमूल्यन झाले हाेते.
तिच्यातील चांगुलपणा हरवला होता.तो चांगुलपणा पुन्हा प्रस्थापित झाला.
ती नंतर पुढच्या गतीला गेली.या सर्व सुधारणा नर्मदेमुळे झाल्या हे अर्थातच सर्व गावांना कळले.
सर्व गावे सुजलाम् सुफलाम् झाले.जमीनदारीच्या पन्नास गावातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन कृष्णनगर येथे एक मंदिर बांधले आहे.
*त्यात नर्मदा देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.माघ पौर्णिमेला देवीचा मोठा उत्सवही करण्यात येतो.*
* माघ पौर्णिमेची उत्सवासाठी निवड करण्याचे कारण म्हणजे माघ पौर्णिमेला नर्मदेचा जन्म झाला होता.*
*मध्य प्रदेशात चंबळच्या खोऱ्यात कृष्ण नगर येथे हे मंदिर आहे.*
*कुणालाही नर्मदा मंदिराबाबत विचारा.तो वरील कहाणी तुम्हाला सांगेल.*
*तो प्रदेश हरिनारायण तालुका म्हणून हल्ली ओळखला जातो.*
*हरिनारायण व शंकर यांच्या अत्याचारामुळे क्रौर्यामुळे सुरू झालेली सूडकथा शेवटी असे सुंदर वळण घेऊन संपली.*
(समाप्त)
३०/१/२०२२©प्रभाकर पटवर्धन