काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
संतोष चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झाला.त्याचे वडील अण्णासाहेब खेडेगावात रहात होते. तेथे दहावीनंतर शिक्षणाची सोय नव्हती.त्यांची मुलगी नर्मदा शहरात रहात होती.मुलीचे यजमान भाऊसाहेब यांचे व अण्णासाहेबांचे मुलगा व वडील यांच्यासारखे सख्य होते.संतोष व त्याची ताई नर्मदा, भाऊसाहेबांची पत्नी यांच्या वयात बराच फरक होता.नर्मदा पहिले अपत्य होते.तर संतोष शेवटचे अपत्य होते.शेंडेफळ होते. जवळजवळ चौदा वर्षांचा फरक दोघांमध्ये होता.भाऊसाहेब संतोषपेक्षा जवळजवळ अठरा वर्षांनी मोठे होते.संतोष भाऊसाहेबांना व नर्मदेला मुलासारखाच होता.गावात किंवा गावाच्या जवळपास पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे उच्च शिक्षणासाठी तो शहरात भाऊसाहेबांकडे आला.
भाऊसाहेबांकडे तो घरच्यासारखाच राहात होता. ताईकडे त्याला कधीही परकेपणा वाटत नसे.भाऊसाहेबांची बहीण श्रद्धा गावातच रहात होती.तिचे व भाऊसाहेबांचे बहीण भावाचे मेतकूट होते.वारंवार ती भाऊंकडे येत असे.श्रद्धाचे यजमान बऱ्याचवेळा फिरतीवर असत.श्रद्धाच्या घरी तिची भावजय, तिची मुले,इतर कांही नातेवाईक असा मोठा पसारा होता.श्रद्धा तिथे घोळात राहण्यापेक्षा सर्वांच्या संमतीने भाऊंकडे राहण्यासाठी दोन तीन आठवडे सहज येत असे.श्रद्धा घरात नसली तर तिच्या भावजयीला जास्त मोकळे वाटत असे.त्यामुळे श्रद्धा व तिची भावजय दोघीही श्रद्धा माहेरी आली की खुशीत असत.दोघांनाही मनमोकळे वाटत असे. घर गावातच असल्यामुळे मुलांची शाळेत जाण्याची गैरसोय होत नसे.मुले शाळेत तिकडून घरून जाण्याऐवजी इकडून आजोळहून भाऊसाहेबांकडून जात असत.
श्रद्धा अशीच एकदा आपल्या मुलांना घेऊन भाऊंकडे राहण्यासाठी आली होती.त्यावेळी संतोष नुकताच भाऊंकडे आला होता.आत्याबरोबर अर्थात तिची मुलगी मेघनाही आली होती.त्यावेळी मेघनाचे वय जेमतेम आठ वर्षे असावे.भाऊंची मुले संतोषला मामा म्हणत.त्यामुळे श्रद्धेची मुलेही संतोषला मामा म्हणत असत.त्यावेळी एक लहान मुलगी म्हणून ती संतोषच्या खिजगणतीतही नव्हती.संतोष बारावी झाला.मेघना आता दहा वर्षांची झाली होती.मुली लवकर मोठय़ा होतात.शहाण्याही होतात.कांही मुली उफाडय़ाच्या असतात.मेघना त्यातील होती.ती दहा वर्षांची असली तरी बारा तेरा वर्षांची दिसत असे.ती आता कुणाच्याही डोळ्यांत भरू लागली होती.संतोषला तिचे अस्तित्व जाणवू लागले होते.गावातच असल्यामुळे अधूनमधून ती कधी आईबरोबर तर कधी एकटीच भाऊसाहेबांकडे येतअसे.तसे दोघांच्या वयात आठ नऊ वर्षांचे अंतर होते.
संतोष दिसायला चारचौघांसारखाच होता.तो तैलबुद्धीचा होता. त्याच्या चेहऱ्यावर बुद्धीचे तेज दिसत असे.संतोष जरा जास्तच उंच होता.पाच फूट दहा इंच त्याची उंची असावी.मेघना शिडशिडीत बारकुंडी होती.दोघांमध्ये तसे मॅचिंग कांहीही नव्हते.संतोष चांगला गोरा होता.मेघना नावाप्रमाणे सावळी होती.रंग,उंची,जाडी,वय,कुठेही जोडा मॅचिंग वाटत नव्हता.उंच लोकांना पाठीत किंचित पोक काढून चालायची बऱ्याच वेळा सवय असते.संतोष त्याला अपवाद नव्हता.तरीही मेघना आपल्या परीने आकर्षक होती.तिचे केस दाट काळेभोर व लांबसडक होते.नाक धारदार ,डोळे पाणीदार,दात पांढरेशुभ्र, एकसारखे एक,त्वचा मुलायम व तजेलदार होती.ज्यांची त्वचा मुलायम असते अशा मुली(मुलेसुद्धा) सावळ्या असल्या तरी बऱ्याच उजळ वाटतात.मेघना त्यातीलच एक होती.
मेघनाच्या मानाने संतोष जरी गोरा उंच असला तरी त्याच्या चेहऱ्यावर किंचित बावळटपणाची झांक होती.तो विलक्षण बुद्धिमान होता.कोणताही विषय समजण्याची त्याची शक्ती दांडगी होती.आकलनशक्ती तीव्र होती. एवढेच नव्हे तर कोणतीही गोष्ट समजून सांगण्याची कला त्याला अवगत होती.दुसऱ्याच्या बौद्धिक पातळीवर जात, योग्य शब्दरचना करीत, तो एखादा मुद्दा समजावून सांगत असे.त्याला असे करताना पाहून गंमत वाटे. कौतुक वाटे.त्याच्या तीव्र बुद्धीची व वाक्चातुर्याची कल्पना येई. मेघनाला एखादा विषय अडला, मुद्दा कळत नाहीसा झाला,कि ती संतोषकडे तिच्या घरुन मुद्दाम येत असे.संतोषही उत्साहाने तिला अडलेला मुद्दा, सिद्धांत, गणित, विषय,समजावून देत असे.संतोष एखादा मुद्दा समजावून सांगत असताना ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहात बसे.अशावेळी तिला खरेच एखादी गोष्ट अडली आहे की ती त्या निमित्ताने संतोषला भेटायला आली आहे असा संभ्रम पडे. संशय निर्माण होई.मुद्दा समजावून सांगताना त्यालाही जास्त हुरूप व उत्साह वाटत असे.मेघना बद्दल संतोषला एक आंतरिक आकर्षण वाटत असे.
संतोष व मेघना बोलत असत त्या वेळी दोघांकडे पाहात असताना, यांची जोडी किती खुलून दिसेल असा विचार श्रद्धाच्या मनात अपरिहार्यपणे येई. भाऊसाहेबांचा मेहुणा संतोष (बायकोचा भाऊ) व भाऊसाहेबांची भाची मेघना(बहिणीची मुलगी) यांच्यात तसे कांहीच नाते नव्हते.मेघना व संतोष यांच्याकडे पाहात असताना,केवळ श्रद्धाच्याच नव्हे तर नर्मदा,भाऊसाहेब, अण्णासाहेब, सर्वांच्याच मनात जोडा किती छान दिसेल असा विचार येत असे.
भाऊसाहेबांची बहीण श्रद्धा म्हणजे एक देवमाणूस होती.तिचा स्वभाव अत्यंत शांत होता.ती समंजस होती.मनाविरुद्ध कितीही गोष्टी घडल्या तरी तिच्या सहनशीलतेला अंत नव्हता.ती कधीही मोठ्या आवाजात बोलत नसे.आपण रागावलो कि आवाज स्वाभाविक आपोआप मोठा.होतो. हळू आवाजात रागावता येत नाही.रागाच्या तीव्रतेबरोबरच आवाजाची पट्टी उंच होत जाते. पटत नसेल तर प्रयत्न करून पाहा.एखाद्यावर पोटतिडकीने परंतु हळू आवाजात रागावता येते का ते पाहा.तुम्ही रागावता त्या वेळी तुमचा आवाज किती मोठा असतो ते पाहा. श्रद्धा अत्यंत समंजस शांत दुसऱ्याला समजून घेणारी सहनशील होती.तिचे हे गुण संतोषला अतिशय आवडत असत.सहनशीलतेची, सौजन्याची,प्रेमाची, ती मूर्तिमंत मूर्ती होती.जवळच्या व्यक्तींवर ती आपल्या प्रेमाचा वर्षाव करीत असे.एवढेच नव्हे तर तिच्या सहवासात येणार्या सर्वांवर ती प्रेमाचा वर्षाव करीत असे. आईजवळ एवढे गुण आहेत तर मुलगीही तशीच गुणसंपन्न असणार असा संतोषचा कयास होता.तो तिच्याकडे आकर्षित होण्याचे हे आणखी एक कारण होते.
प्रत्यक्षात मेघना चिडकी, चिडचिडी, रागीट,हट्टी, स्वभावाची मुलगी होती. तिची आई अन्याय निमूटपणे सहन करीत असे तर मेघना अन्यायाविरूध्द दंड थोपटून लहानपणापासून उभी राहात असे.
एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित कां होते त्याचे विश्लेषण करणे कठीण आहे.आपल्या सहवासात अनेक समवयस्क येतात.त्यातील कांही जणांशीच आपली मैत्री जमते.तरुण तरुणी यांच्या बाबतीतही तसेच आहे.कोण कुणाकडे कां आकर्षित होते ते सांगणे मोठे कठीण आहे.सहवासाचा भाग किती? सौंदर्याचा वाटा किती? आंतरिक ओढीचे प्रमाण किती?दैवाचा परिस्थितीचा वाटा किती?पूर्वजन्मीचे कांही लागेबांधे असतात का? सांगणे मोठे कठीण आहे.
संतोष व मेघना एकमेकांकडे लहानपणापासून हळूहळू आकर्षित होत होती.ही वस्तुस्थिती होती.संतोषचे पदव्युत्तर शिक्षण पुरे झाले.तो आता चौवीस वर्षांचा तगडा तरुण झाला होता. मेघना सोळा वर्षांची होती.मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे ती थोराड होती.पूर्ण उमललेले नाही तरी अर्ध उमलते फूल ती निश्चित होती.
दहावीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन ती आता अकरावीला ज्युनिअर कॉलेजमध्ये आली होती.दोघांच्याही सहवासाला, एकत्र फिरण्याला, घरच्यांची मूकसंमती होती. मेघनाचे शिक्षण पुरे झाले की दोघांचे लग्न लावून द्यायचे हे दोन्ही कुटूंबानी,श्रद्धाचे यजमान आप्पासाहेब व संतोषचे वडील अण्णासाहेब यांनी जवळजवळ निश्चित केले होते.
संतोष एका मोठय़ा कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीवर त्याच शहरात रुजू झाला होता.दोघांच्या गाठीभेटी निमित्ता निमित्ताने वारंवार होत असत.सर्व कांही छानपैकी चालले होते.जीवन म्हणजे एक रमणीय, प्रेक्षणीय, आनंद उपभोगत फिरण्याचे, पर्यटनस्थळ आहे असे दोघांनाही वाटत होते.जीवनात सुख आनंद याबरोबरच दु:खालाही तोंड द्यावे लागते याची त्यांना कदाचित कल्पना असली तरी अनुभव नव्हता.
भवितव्यतेच्या दैवाच्या मनात तो अनुभव त्यांना द्यावा असे असावे.मैत्रिणीबरोबर मेघना स्कूटरवरून घरी येत असताना स्कूटरला अपघात झाला.एका बसने वळण घेताना बसच्या पाठीमागच्या बाजूने त्याना कट मारला.दोघीही वेडय़ावाकडय़ा फुटपाथवर फेकल्या गेल्या.त्यांची स्कूटर बसच्या मागच्या चाकाखाली आली.केवळ दैव चांगले म्हणूनच त्या वाचल्या.अन्यथा त्या दोघीही बसच्या मागच्या चाकाखाली आल्या असत्या.दैव वाईट म्हणून त्यांना बसने उडविले.दैव चांगले म्हणून त्या बस खाली आल्या नाहीत.असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.परंतु बऱ्याचवेळा आपण असे बोलतो आपले दैव वाईट म्हणून अपघात झाला.परमेश्वरी कृपा म्हणून त्यातून आपण वाचलो.वाईट झाले तर आपल्या दैवाला दोष.चांगले झाले तर परमेश्वराची कृपा.दोन्ही गोष्टी दैवाला तरी द्या किंवा परमेश्वराच्या नावावर तरी लिहा!
मेघना व तिची मैत्रीण दोघांनाही तातडीने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले.आसपासच्या लोकांनी चटकन अॅम्ब्युलन्स बोलवून त्यांची हॉस्पीटलमध्ये भरती केली.नाहीतर बऱ्याच वेळा अपघात झाल्यावर लोक सेल्फी काढतात.मोबाइलवर
फोटो काढतात.मदतीला धावत नाहीत.असे बऱ्याच वेळा आढळते.आपल्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत हे पाहून वाईट वाटते.दोघींवरही ऑपरेशन्स करावी लागली.दोघी हाती पायी नीट होऊन वन पीस हॉस्पिटलमधून परतल्या.दुर्दैवाने एकच गोष्ट वाईट झाली.
अपघातात मेघनाच्या गर्भाशयाला धक्का बसला होता.तशी ती पूर्ण बरी झाली होती.डॉक्टरानी एकच शंका प्रकट केली होती.
*जर तिला दिवस राहिले तर तिच्या जिवाला कदाचित धोका होता.त्या बाबतीतही डॉक्टरांना निश्चितपणे कांही सांगता येत नव्हते.*
*एखादवेळी सर्वकांही व्यवस्थित निभावेलही.एखादवेळी दोघांनाही गर्भाला व मेघनाला धोका संभवतो.तीच शक्यता त्यांना जास्त वाटत होती.*
*मेघना गर्भधारणेपासून दूर राहिली तर उत्तम.डॉक्टर पुढे असेही म्हणाले,अर्थात हे तुम्हीच ठरवायचे आहे परंतु विवाहाच्या अगोदरच तिच्या भावी पतीला हे समजावून सांगावे असे माझे मत आहे.*
*त्यामुळे पुढे होणारी गुंतागुंत होणार नाही.उगीचच निरनिराळ्या समस्या निर्माण होणार नाहीत.
(क्रमशः)
८/११/२०२१©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com