( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

गंगेकाठी आमचा जुना वाडा होता.वेळोवेळी त्या वाड्याचे नूतनीकरण करण्यात आले होते.गॅस,वीज, नळाचे पाणी, उभ्याने स्वयंपाक करण्याचा ओटा, आधुनिक टॉयलेट,इत्यादी  आधुनिक सुविधा गरजेनुसार तयार करून घेतल्या होत्या.असे असले तरी जुना वाडा तो शेवटी जुनाच वाडा.आजूबाजूला जुनाट, कळकट, मळकट, पडायला आलेले,पडलेले, वाडे होते.नवीन वस्तीत राहायला जावे असे बाबांना खूप दिवस वाटत होते.बाबांनी एक प्लॉट घेऊन ठेवला होता.मुख्य वस्तीपासून दूर जंगलाजवळ तो प्लॉट होता.जवळ मुख्य वस्तीत प्लॉट उपलब्ध होते परंतु त्यांच्या किमती अफाट होत्या.तसा सोयीस्कर बाजाराजवळचा मुख्य वस्तीतील प्लॉट घेऊन त्यावर बंगला बांधणे आमच्या आवाक्याबाहेरचे होते.ही जागा स्वस्तात मिळाली होती.त्यावर बंगल्याचे बांधकाम सुरू झाले आणि थोड्याच दिवसांत बंगला तयार झाला.वास्तुशांत होऊन आम्ही त्या बंगल्यात राहायला गेलो.

आम्ही बंगला बांधायला घेतल्यावर बाबांच्या मित्रांनी त्यांना बंगल्यात,आणि तेही असे दूर जंगलाजवळच्या बंगल्यात    राहण्याचे धोके सांगायला सुरुवात केली. त्यावर बाबानी आम्ही सर्व व्यवहार ऑनलाईन करतो जवळ कॅश नसते.दागिने लॉकरमध्ये बँकेत असतात.कुणी आला तरी त्याला विशेष कांही मिळणार नाही.जे कांही असेल ते त्याला देऊन आम्ही लगेच  मोकळे होऊ असे सांगितले.ते पुढे म्हणाले, श्रीमंतांना धोका असतो. ज्यांच्याजवळ काही लुटण्यासारखे आहे त्यांना धोका असतो.आम्हाला नाही.त्यावर बाबांचे एक मित्र म्हणाले,माणसांपासूनही अनेक प्रकारचे धोके असतात.केवळ माणसांपासून धोका असतो असे नाही तर जंगली श्वापदांपासूनही धोका असतो.वस्तीपासून दूर एकांतात अनेक धोक्याना तोंड द्यावे लागू शकते.त्यापेक्षा चार माणसांत एखाद्या सदनिकेत,संकुलात, फ्लॅटमध्ये,राहिलेले चांगले.येथून जंगल अगदी जवळच आहे.तुम्ही कुठे तरी गावात प्लॉट घ्यायला हवा होता.किंवा फ्लॅट घ्यायला हवा होता.त्यावर बाबानी चोर्‍या व्हायच्या झाल्या तर त्या फ्लॅटमध्येही होतात. खून खराबा तिथेही होतो.आम्ही पूर्ण काळजी घेऊ. गावाचा विस्तार होतच आहे.हळूहळू वस्ती आमच्या पलीकडेही वाढत जाईल.आणि आम्ही गावात येऊ.जे दैवात असेल ते होईल असे म्हणून विषयाला पूर्णविराम दिला होता.गावाबाहेर जंगलाजवळ असूनही आम्हाला कधी भीती वाटली नाही.नाटक सिनेमाला जावून रात्री बिनधास्त आम्ही घरी येत असू.     

जुना वाडा एका बिल्डरला विकला. आजूबाजूचे कांही वाडे विकत घेऊन तेथे बहुमजली इमारतींचे संकुल बांधण्याचा त्याचा विचार असावा.

माझे शिक्षण पुरे झाले होते.सुदैवाने गावातच मला नोकरी मिळाली होती.नवीन बंगल्यात येवून पाच सहा महिने झाले होते.बाबा निवृत्त झाले होते.आईबाबांना छोटा चारीधाम (यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ )यात्रा करायची होती.सेप्टेंबरमध्ये ते यात्रेला निघून गेले.बंगल्यात मी एकटाच राहिलो.माझा अजून विवाह झाला नव्हता हे आपण ओळखले असेलच.एकटे राहण्यापेक्षा कुणीतरी सोबतीला असावे म्हणून माझी मावशी येवून राहणार होती.परंतु तिचे यजमान आजारी पडल्यामुळे ती येऊ शकली नाही.मी कधी या मित्राकडे तर कधी त्या मित्राकडे जेवत असे.झोपायला मात्र कटाक्षाने बंगल्यात येत असे.बंगल्यात कुणी नाही असे म्हटल्यावर चोराची दृष्टी तिकडे नक्कीच जाते.जेवायला कधी हॉटेलात जात असे. स्वयंपाकाची सर्व सोय घरी होती.आईने जाण्यापूर्वी सर्व वस्तू आणून ठेवल्या होत्या.मला चारी ठाव साग्रसंगीत नाही तरी गरजेपुरता स्वयंपाक करता येतो.कधी कधी मी घरी स्वयंपाक करून जेवत असे.कधी आम्लेट पाव, कधी भूर्जी पाव, कधी दहीभात, कधी खिचडी, असा एखादा मेनू असे.

त्या दिवशी मी घरीच कांहीतरी बेत केला होता.जेवण करून मी आराम करीत होतो.टीव्ही चालू होता. सर्वत्र एकामागून एक कंटाळवाण्या  सिरियल्स चालू होत्या.त्यात रस न वाटल्यामुळे मी बातम्या लावल्या.त्यातही कांही विशेष नव्हते.नेहमीच्याच बातम्या होत्या.कुणाची जीभ घसरली,कुणाचा पाय घसरला,कुणी कुणावर कुरघोडी केली,कुणी कुणाचे पाय ओढले,कुणी कुणाचा निषेध केला,असे सर्व चालू होते.सर्व नकारात्मक बातम्या होत्या.जगात जसे कांही चांगले घडतच नसावे असे वाटत होते.शेवटी मी एक जुना सिनेमा लावला.तो पाहलेला असला तरीही पुन्हा पाहताना मजा येत होती.सिनेमा रंगात आला होता.रात्र बरीच झाली होती.

एवढ्यात दरवाजावरील बेल वाजली. कुणीतरी पुन्हा पुन्हा घंटी वाजवीत होते.दरवाजावर थापा मारल्याचाही आवाज ऐकू येऊ लागला .बाहेर जो कुणी आला होता तो उतावीळ झाला असावा. घाबरलेला असावा.त्याला घाई झाली असावी त्याच्या पाठीमागे कुणीतरी लागले असावे.असे वाटत होते.

बंगल्याच्या बाहेरच्या दरवाजाला आम्ही सिक्युरिटी दरवाजा करून घेतला होता.दरवाजा उघडल्यावर आणखी एक जाळीचा दरवाजा होता.कोण आहे ते पाहून नंतर तो दरवाजा उघडता येत असे. सिनेमा पाहत असताना रसभंग झाल्यामुळे थोडा चिडूनच मी दरवाजा उघडला.बाहेर एक तरुणी उभी होती.तिने जीन्स आणि टी शर्ट असा सुटसुटीत पोशाख घातला होता.दोन्ही तंग होते.त्यातून तिच्या शरीरावरच्या रेषा,एखाद्या चित्रकाराने काळजीपूर्वक रेखाटाव्या त्याप्रमाणे दिसत होत्या.तिच्या शरीराला जिथे वक्रता पाहिजे तिथे कमी नाही आणि जास्त नाही अशी वक्रता होती.हल्ली मुलींचा पोषाख सर्व अंग झाकूनही कांही झाकले नाही असा वाटतो तसाच होता.

थोडाबहुत मंत्रमुग्ध होऊन मी तिच्याकडे पाहत राहिलो.सुरक्षा दरवाजा न उघडता जाळीतून मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.ती तिथे आल्याचे कारण सांगू लागली.ती तिच्या मोटारीने तिच्या काकांकडे जायला निघाली होती.ती प्रथमच त्यांच्याकडे जात होती.या बाजूला ते नवीनच राहायला आले होते. तिच्याजवळ त्यांचा पत्ताही होता. गुगलवर लोकेशन टाकून ती त्यांचे घर हुडकत होती.तिला नेट मिळत नव्हते.महाजालाशी ती कनेक्ट होत नव्हती.आपण सहज पोचू अशा हिशेबाने तिने पेट्रोल टाकले नव्हते.उलट सुलट रस्त्यावरून फिरताना पेट्रोल बरेच संपून गेले.जवळ कुठे पेट्रोलपंपही मिळाला नाही.शेवटी नाईलाजाने तिला मोटार थांबवून बाहेर पडावे लागले.ती दुसऱ्या गावाहून आली होती.घाई गर्दीत चुकून तिची पर्स मोटारीत राहिली.मोटार लॉक झाली.किल्ल्या मोटारीतच राहिल्या.पैसे पर्समध्ये राहिल्यामुळे रिक्षा पकडून ती एखाद्या हॉटेलमध्येही जाऊ शकत नव्हती. आता रात्रीचे जवळजवळ बारा वाजत आले होते.जवळच्या एखाद्या घरात रात्रीपुरता आसरा घ्यावा म्हणून तिने दरवाजा ठोठावला होता.

तिची सगळीच हकिगत  मला फसवी वाटत होती.मी घरात एकटा आहे याची तिने माहिती काढली असली पाहिजे.घरात शिरून मला फसविण्याचा तिचा उद्देश असावा.माझ्यावर नसते आरोप करून पैसे उकळण्याचा तिचा डाव असावा.हिला घरात घेणे धोक्याचे आहे अशी मला माझ्या स्वभावानुसार शंका आली.

मी दरवाजा न उघडता तिला विचारले,

"तुम्ही माझ्या जागी असता.रात्री बारा वाजता कुणीतरी बेल वाजविते.आणि तुम्ही सांगितली ती स्टोरी ती व्यक्ती सांगते तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला असता का?"

माझ्या प्रश्नावर ती उत्स्फूर्तपणे कांहीही विचार न करता म्हणाली,

"अजिबात ठेवला नसता.हा मला काहीतरी फसविण्याचा डाव असावा. दरवाजा केव्हां उघडला जातो याची  बाहेर साथीदार वाट पाहात असावेत.असे समजून मी दरवाजा उघडला नसता.आलेल्या व्यक्तिची बाहेरच्या बाहेर बोळवण केली असती.परंतु सत्य हे कल्पनेपेक्षा बऱ्याच वेळा आश्चर्यकारक असते."

तिच्या त्या उत्स्फूर्त उत्तरावर मी विचार करीत राहिलो.कदाचित ती खरे बोलत असावी.तिला आसरा न देता अशीच रस्त्यावर सोडून देणे तिच्या दृष्टीने धोक्याचे आहे असे मला वाटू लागले.हल्ली शहरात रात्री उशिरापर्यंत निरनिराळ्या प्रकारचे  लोक फिरत असतात.हिच्यासारख्या नाजूक सुंदर मुलीवर कोणताही प्रसंग ओढवू शकतो याची मला कल्पना होती.तिला दरवाज्यातून परत फिरविण्याचा माझा विचार बदलावा असे मला वाटू लागले.

मी तीक्ष्ण नजरेने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले.तिचे डोळे  मोठे होते.त्यात किंचित निळसर झाक होती.कपाळपट्टी रुंद होती.हनुवटी निमुळती होती.नाक अपरे होते.वरचे पुढचे दात किंचित पुढे आले होते.तिने बॉबकट केला होता.केस तिच्या खांद्यावर रुळत होते.तिची कांती मुलायम होती.मान हिशेबापेक्षा किंचित उंच वाटत होती.तिची उंची मध्यम होती. जीन्स व टीशर्टमुळे ती होती त्यापेक्षा जरा जास्त उंच वाटत होती.माझी नजर जशी तिचे सौंदर्य न्याहाळत होती तसेच तिच्या बोलण्यात सत्यता किती आहे.त्याचाही अंदाज घेत होती. 

मी तिला तिची मोटार कुठे आहे असे विचारले.तिने उजवा हात लांब करून 

"इथेच जवळ आहे तुम्ही येत असाल तर दाखवते.गाडी उघडता आली. तुम्ही थोडे पेट्रोल दिले,तर मी जवळच्या एखाद्या हॉटेलात जाईन" असेही सांगितले.

"मी किल्लीवाल्याचा धंदा करणारा नाही.माझा चोरीचाही व्यवसाय नाही.त्यामुळे किल्ली नसताना बंद कुलुपे मी उघडू शकत नाही.ती कला माझ्याजवळ नाही.मी एक सामान्य नागरिक आहे.मी तुम्हाला पेट्रोलही देऊ शकत नाही."

असे थोडे  व्याज्योक्तिने तिरकस उत्तर दिले. 

एकाएकी मला काय वाटले कोण जाणे.मी तिला म्हटले,  

"तुम्हाला निराश करावे असे वाटत नाही.तुमच्या बोलण्यात मला सत्यता जाणवते.तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला रात्रीपुरता आसरा देतो.उद्या सकाळी तुमची मोटार उघडण्याचा प्रयत्न एखादा किल्लीवाला आणून करता येईल."

मी एवढे बोललो तरीही दरवाजा उघडला नव्हता.ती मला म्हणाली,

"दरवाजा उघडल्याशिवाय तुम्ही मला आसरा कसा देणार?"

खरेच की असे म्हणत मी सुरक्षा दरवाजा उघडला.दरवाजा उघडूनही ती आंत शिरली नाही.माझ्या चेहऱ्याचे निरीक्षण करण्याची आता तिची पाळी होती.माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत तिने विचारले, "घरात दुसरे कुणी नाही का?"

घरात मी एकटा असल्याचे तिला सांगितले.त्यावर तिने 

"मला एखाद्या कुटुंबवत्सल घरात आसरा घ्यायचा आहे.तुमची आई,बहीण,पत्नी,कुणी घरात असते तर गोष्ट वेगळी होती.तुम्ही घरात एकटे असताना मला इथे आसरा घ्यावा असे वाटत नाही.माफ करा रागवू नका परंतु मनात नाना शंका येतात त्याला मी काय करणार?"

असे उत्तर दिले.

ती दुसरे एखादे घर ठोठावण्यासाठी जाऊ लागली.

*मी तिला विचारले,

"रात्री बारा वाजता तुम्ही एखादे कुटुंब वत्सल घर शोधत फिरणार आहात का?तथाकथित कुटुंबवत्सल घरात तुम्हाला धोका पोहोचणार नाही याची गॅरंटी काय?असे घर शोधीत असतानाच तुम्हाला धोक्याला तोंड द्यावे लागणार नाही कशावरून?माझ्या इथे तीन शयनगृहे आहेत.एकामध्ये तुम्ही आसरा घेऊ शकता.तुम्ही शयनगृह आतून लॉक करून घेऊ शकता.विचार करा नाहीतर मी दरवाजे बंद करून आता झोपायला जाणार आहे."*

*असे बोलून मी दरवाजा बंद करू लागलो.तिने जरा थांबा असे म्हणत दरवाजातून आंत प्रवेश केला.*

(क्रमशः)

२४/१/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel