( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
मी दरवाजा उघडत नाही. मी बहुधा आंत आहे. कदाचित माझे बरे वाईट झाले असेल. अशा कल्पनेने पोलिसांनी दरवाजा तोडल्यास दरवाजा आंतून बंद होता हे अर्थातच लक्षात आले असते.
दरवाजा आंतून बंद आणि मी मात्र फ्लॅटमध्ये नाही हे पाहून सर्व जण चक्रावले असते.
मी घरात नाही.मी घरातून दरवाजा उघडल्याशिवाय नाहीसा झालो आहे.
मी सापडत नाही असे झाल्यावर काय काय होईल याचा विचार करीत असतानाच मला झोप लागली.
सकाळी मला सातच्या सुमारास जाग आली.रात्रभर गाढ झोप लागली होती.प्रथम मला मी माझ्याच शयनगृहात आहे असे वाटले.डोळे उघडून आसपास पाहता ओळखीचे कांहीच दिसत नव्हते.मी गोंधळून गेलो.थोड्याच वेळात मला मी या बंगल्यात कैद आहे. मला जादूगार भीमसेनने कैद केले आहे.जर माझी सुटका झाली नाही तर प्राणांशी गाठ आहे.कलिका आणि मी कदाचित एकमेकांना कायमचे अंतरणार आहोत वगैरे गोष्टी आठवल्या.
मी ताडदिशी उठलो.आज मला शक्य झाले तर उरलेल्या सर्व खोल्या तपासायच्या होत्या.तसे माझ्याजवळ योजनेप्रमाणे अजून तीन दिवस होते.तेवढ्यात माझी सुटका अपेक्षित होती.एक दिवस संपला होता.मी माझ्या योजनेत थोडा बदल केला.प्रथम बाथरूम्स बघावीत.नंतर शयनगृहात तपास करावा.शेवटी स्वयंपाकघर पाहावे.असे मी ठरविले.
बाथरूम्स लहान असल्यामुळे पटकन पाहून होतील अशी कल्पना होती.पहिल्यांदा दिवाणखान्याला लागून असलेल्या बाथरूममध्ये गेलो.फरशांमधून गुप्त वाट असणे कठीण होते.तिथे पाणी लगेच मुरले असते.तरीही मी कमोड हलतो का पाहिला. फरशा ठोकून पाहिल्या.भिंतीला कुठेच खिडकी नव्हती.जी खिडकी होती ती रंगवलेली चित्रमय होती.
त्याप्रमाणेच मी दोन्ही शयनगृहांच्या बाथरूम्स काळजीपूर्वक पाहिल्या.भिंतीत, छतावर,तथाकथित खिडकीत,कुठेही चोरदरवाजा आढळला नाही.तोपर्यंत दुपार झाली होती.रेशनिंग प्रमाणे मी थोडे खाऊन घेतले.लगेच शयनगृह तपासणीला सुरूवात केली.दोन बाजू पूर्ण काळजीपूर्वक तपाशीपर्यंत संध्याकाळ झाली होती. मी दमून गेलो होतो.उरलेले काम दुसर्या दिवशी म्हणजे तिसर्या दिवशी करायचे मी ठरवले.थोडं खाऊन, कॉफी पिऊन,मी झोपण्यासाठी अंथरुणावर पडलो.एका ठिकाणी मला नेस्कॅफेची तीनचार पाकिटे सापडली होती.त्यामुळे मला कॉफी घेता आली होती.
शयनगृहात गादीवर आडवा झाल्यावर,जिच्यामुळे मी या बंगल्यात कैद झालो होतो ती आता काय करीत असेल असा प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहिला.तिचे व माझे प्रेम पाहता मी सापडत नाही असे लक्षात आल्यावर तिचा जीव काकुळतीला आला असला पाहिजे.माझा तपास लावण्यासाठी ती आकाशपातळ एक केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री होती.
तिची पहिली भेट मला आठवत होती.
के. लाल सारख्या मोठय़ा जादूगारांचे स्टेज शोज मी पाहिले होते.लहान मोठे हातचलाखीचे प्रयोग अनेकदा अनेक ठिकाणी पाहिले होते.शहरात प्रोफेसर भीमसेन नावाचा एक अजब जादूगार आलेला आहे असे माझे मित्र बोलताना ऐकले.त्यातील प्रत्येकाने भीमसेन यांचा कार्यक्रम पाहिला होता.मीच अजून मित्रानी आग्रह करूनही त्या बाजूला फिरकलो नव्हतो.त्या दिवशी माझे मित्र पुन्हा कार्यक्रम बघण्यासाठी जाणार होते.त्यानी मला येण्याचा आग्रह केला.मित्र एवढा आग्रह करीत आहेत तर प्रत्यक्ष जाऊन पाहूयाच असे म्हणत मी त्यांच्याबरोबर गेलो.एकूणच कार्यक्रमानेआणि त्यापेक्षाही भीमसेनची मुलगी कलिका हिने मी एवढा प्रभावित झालो की त्यानंतर अनेकदा केवळ कलिकेला पाहण्यासाठी मी प्रोफेसर भीमसेन यांच्या कार्यक्रमांना गेलो.कलिका नावाप्रमाणे कळी होती.सुकुमार होती.तिचे शरीर लवचिक होते.पेटीमध्ये सुरे खुपसताना ती आपले अंग आक्रसून घेत असणार. तसा तो कार्यक्रम म्हणजे जिवाशी खेळच होता.शरीर वाकवण्यास आंतील मुलगी चुकली तर सुर्याने तिचा सरळ छेद घेतला असता. इतरही कार्यक्रमात तिचे बुद्धिचातुर्य, लवचिकपणा,धाडस, हातचलाखी, दिसत असे.ती इतक्या बेमालूमपणे काम करीत असे कि ती हातचलाखी करीत आहे असे केवळ अनुमान काढावे लागे.सावळी होती.तिची कांती मुलायम व तजेलदार होती.तिचे डोळे पाणीदार होते.ती तिच्या दृष्टिक्षेपात दुसऱ्याच्या भावनांना हात घालत असे.थोडक्यात मी तिच्यावर आशिक झालो होतो.ती पाहताच बाला कलिजा खलास झाला अशी माझी अवस्था झाली होती. कुणालाही आपली प्रेयसी किंवा प्रियकर चांगलाच वाटतो!एकमेवाद्वितीयम् वाटतो.
भीमसेन यांची असिस्टंट म्हणून कलिका काम करीत होती.ती स्वतः अनेक जादूचे प्रयोग करीत असे.भीमसेन ज्यावेळी विश्रांती घेत असत त्यावेळी ती स्टेजवर त्यांची जागा सांभाळत असे.केवळ सहाय्यक म्हणूनच नव्हे तर ती ज्यामध्ये जिवाशी खेळ होता अशा प्रयोगातसुद्धा त्यांना साहाय्य करीत असे.त्यांचे दोनच अद्भुत प्रयोग सांगतो.
एका पेटीत ते कलिकेला बंद करीत असत.नंतर पेटीला कुलुप लावण्यात येई.त्यानंतर त्यामध्ये अनेक सुरे खुपसले जात.सुरे कसले छोट्याशा तलवारी होत्या त्या. पेटीमध्ये तशा खाचा ठेवलेल्या होत्या.त्यातून आरपार सुरे जात असत.पाच पंचवीस सुरे खुपसून झाल्यावर,पेटी फिरवून पलीकडच्या बाजूला आलेली सुर्यांची टोके दाखविली जात.नंतर ती पेटी पडद्याआड धरली जाई.दुसऱ्याच क्षणी ते पेटी उघडून दाखवत.खुपसलेले सुरे तसेच असत.आंतील कलिका मात्र गायब असे.ते प्रेक्षागृहाकडे बघून कलिकेला हांक मारीत.प्रेक्षागृहातून हसतमुखाने दुसऱ्याच पोषाखात कलिका स्टेजवर येत असे.सुरे खुपसताना तिने अंग चोरून घेतले कसे?कि पेटी बंद करीत असतानाच ती त्यातून गायब झाली होती.एक पेटी दाखवली आणि त्यात तिला बसविले दुसर्याच पेटीत सुरे खुपसले अशी हातचलाखी तर केली नसेल?तिने आपले कपडे बदलले केव्हां?एवढ्या वेळात ती कुणाच्याही दृष्टीस न पडता प्रेक्षागृहात मागच्या बाजूला गेली कशी?सर्वच गोष्टी आश्चर्यचकित करणार्या होत्या.
दुसऱ्या प्रयोगात तिला संमोहित केले जाई.ती हवेत हळूहळू तरंगू लागे.संमोहित अवस्थेमध्ये बाकावर झोपलेली ती खरेच हवेत तरंगत आहे हे सिद्ध करण्यासाठी एक तलवार तिच्या सभोवती फिरवण्यात येई.तिला कुठेही आधार दिलेला नाही हे त्यामुळे प्रेक्षकांच्या लक्षात येई.संमोहित अवस्थेतील तिला पुन्हा हळूहळू बाकावर झोपवण्यात येई.नंतर तिला हळूहळू शुद्धीवर आणले जाई.ती सावकाश डोळे उघडी.नंतर उभी राहून कलिका व प्रोफेसर भीमसेन प्रेक्षकांना नमस्कार करीत असत.
दोन्ही प्रयोगांच्या वेळी टाळ्यांचा कडकडाट होत असे.हवेत तरंगण्यामध्ये कांहीही गडबड नाही हे सिद्ध करण्यासाठी ते कुणाही एका प्रेक्षकाला स्टेजवर बोलावीत असत.मात्र त्या प्रेक्षकाची संमोहित होण्याची तयारी असली पाहिजे.असेच एकदा आवाहन केलेले असताना मी स्टेजवर गेलो.त्याचवेळी माझी व तिची जवळून दृष्टीभेट झाली.
तिला पहिल्यांदा बघितल्यानंतरच मी संमोहित झालो होतो.मला बघितल्यानंतर, माझ्या दृष्टीत दृष्टी मिळविल्यानंतर, तीही संमोहित झाली.मला भीमसेननी संमोहित केले.कोणत्याही आधाराशिवाय हवेत वर उचलला गेलो.हवेत स्थिर झालो.नंतर त्यांनी मला पुन्हा खाली बाकावर उतरवले.संमोहनातून बाहेर काढले.तो एक वेगळाच अनुभव होता.झोपेतून उठल्यासारखे मला वाटत होते.संमोहित झाल्यावर माझे काय झाले हे मला आठवत नव्हते. त्यांनी मला हात धरून उठविले तरी माझा तोल जात होता.माझा दुसरा हात कलिकेने धरला.तिच्या स्पर्शाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.एका बाजूने भीमसेन व दुसऱ्या बाजूने कलिका यांनी माझे दोन्ही हात वर केले.टाळ्यांचा कडकडाट झाला.त्याचवेळी एक चिठी भीमसेनच्या नकळत कलिकेने माझ्या खिशात टाकली.
कशी कोण जाणे परंतु त्याचवेळी माझी नजर विंगमध्ये गेली.विंगमध्ये भीमसेनची पत्नी अवंतिका बसली होती.कलिकेने चिठी माझ्या खिशात टाकल्याचे कलिकेच्या आईने पाहिले असे मला वाटले.त्याची खात्री दुसर्या दिवशी झाली.अवंतिका व भीमसेन यांचा प्रेमविवाह होता.त्या काळात ते प्रकरण चांगलेच गाजले होते.अवंतिका भीमसेनच्या कार्यक्रमात भाग घेत असे.हल्ली कलिका त्यांची मुलगी जे काम करते तेच ती करीत असे.काम करता करता दोघांचे भावबंध जुळले नंतर त्यांनी विवाह केला.विवाहानंतरही अवंतिका कार्यक्रमात काम करीत असे.कलिका पोटात असताना तिने कार्यक्रमात भाग घेण्याचे थांबविले.लेकीच्या जन्मानंतर वर्षभराने ती पुन्हा कार्यक्रमात भाग घेऊ लागली.तिच्या अंगाची लवचिकता कमी झाली आणि तिने काम सोडले. तरीही अधूनमधून ती कार्यक्रम बघण्यासाठी येत असे.विंगेत बसून ती कार्यक्रम पाहत असे.
भीमसेनने शिकवून एक मुलगी तयार केली होती.ती ते काम करीत असे.कलिका लहानपणापासूनच भीमसेनच्या कार्यक्रमात भाग घेत असे.सोळा वर्षांची झाल्यापासून ती या जिवावरच्या धोक्याच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागली.
कार्यक्रम संपला मी मित्रांसह बाहेर आलो.खिशातील चिठीवर एक मोबाईल नंबर होता. त्याचा अर्थ मला लगेच कळला.दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मी त्या नंबरवर फोन केला.कलिका माझ्या फोनची वाटच पाहत होती.बहुधा झडप घालून तिने फोन लगेच उचलला असला पाहिजे. फोनवर काय बोललो ते आठवत नाही.ते एवढे महत्त्वाचे नाही. संध्याकाळी सहा वाजता नदीकिनारी भेटण्याचे आम्ही ठरविले तेवढे मात्र आठवते.
एवढ्यात तिच्या हातातून तिच्या आईने फोन सफाईने काढून घेतला असला पाहिजे.एका बाईचा आवाज ऐकू आला.ती कलिकेची आई अवंतिका हाेती.ती म्हणाली मांजर जरी डोळे मिटून दूध पीत असले तरी इतरांचे डोळे उघडे असतात.कलिका तुमच्या खिशात चिठी टाकताना मी तिला पाहिले. तिने तिचा फोन नंबर दिला असावा हे मी ओळखले.आज तुमचा फोन येईल याची मला खात्री होती.मी कलिकेवर लक्ष ठेवून होते.माझी तुम्ही एकत्र येण्याला आडकाठी नाही.कलिका सज्ञान आहे. सूज्ञ आहे. तिची निवड चूक असणार नाही.तुम्ही एकमेकांना भेटा नंतर योग्य निर्णय घ्या.भीमसेन रागीट आहेत.तसेच ते समंजसही आहेत.त्यांचे मुलीवर अतिशय प्रेम आहे.ते कदाचित तुमची कठीण परीक्षा घेतील.एवढे बोलून तिने फोन पुन्हा कलिकेच्या हातात दिला.त्या दिवशी संध्याकाळी नदीकाठी ठरल्याप्रमाणे आमची भेट झाली.
*त्यानंतर आमच्या रोज भेटीगाठी होऊ लागल्या.दोघांनाही वेळ मिळेल तेव्हा फोनवर गप्पा, व्हिडिओकॉल, प्रत्यक्ष भेटी, सुरू झाल्या.*
*एकमेकांच्या प्रेमात आम्ही आकंठ बुडालो. सिनेमागृहांत,नदीकाठी, तलावाच्या काठी, रेस्टॉरंटमध्ये,अनेक ठिकाणी आम्ही भेटू लागलो.*
*असे फार काळ चालणे शक्य नव्हते.आमच्या भेटी जादूगार भीमसेनच्या लक्षात आल्या.*
*कदाचित त्यांचे कांही बोलणे त्यांची पत्नी अवंतिका हिच्याबरोबर झाले असावे.*
*आणि त्या दिवशी रात्री मी गाढ निद्रेत असताना एखाद्या मांजराच्या पिल्लाला उचलावे गोणत्यात घालून कुठेतरी नेऊन सोडावे त्याप्रमाणे त्यांनी मला या बंगल्यात आणून सोडले होते.*
*पुढची सर्व हकिगत तुम्हाला माहीत आहेच.*
(क्रमशः)
२८/१२/२०२१©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com