प्रकरण १ लें
आरंभींच्या इतिहासाचें संक्षिप्त अवलोकन
- १ -


माकडांतून उत्क्रात होत होत प्राणी जन्माला यायला जवळजवळ चार कोटी वर्षे लागलीं.  त्याला ताठ उभें राहतां यायला व दगडधोंड्यांनी आपलें भक्ष्य मारून खातां यायला आणखी तीन लक्ष वर्षे लागलीं.  पुढें आणखी पन्नास हजार वर्षे गेलीं आणि त्याला तांब्याचा शोध लागला.  मारण्याचीं, संहाराचीं अधिक प्रभावी हत्यारें तो बनवूं लागला.  त्यानंतर दोन हजार वर्षांनीं त्याला लोखंड सांपडलें.  हिंसेचीं साधनें अधिकच प्रखर अशीं तयार झालीं.  मारण्याच्या पध्दतींत अधिक कौशल्य आलें.  लोखंडाच्या शोधानंतर पांच हजार वर्षांनी डायनामिटचा शोध लागला.  त्यानंतर कित्येक शतकांनीं त्यानें पाणबुड्या बांधल्या व विमानें बांधलीं, आणि दुसर्‍या प्राण्यांचा संहार करण्याची त्याची संशोधक बुध्दि पूर्णतेस पोंचली.  मानवाच्या मत्थड मेंदूला 'हिंसा म्हणजे मूर्खपणा आहे' ही गोष्ट कळायला आणखी पन्नास हजार वर्षे लागतील.  संहार करण्यापेक्षां हितकर व उपयोगी अशा दुसर्‍या उद्योगांत वेळ दवडणें अधिक चांगलें ही गोष्ट तेव्हां त्याच्या लक्षांत येईल.

मनुष्य अगदीं मत्थड प्राणी आहे.  फारच हळूहळू त्याची प्रगति होत आली आहे.  आणि जी कांहीं थोडीफार प्रगति झाली तीहि सारखी अखंड होत आली असेंहि नाहीं.  कधीं प्रगति तर कधीं अधोगति, असें सारखें चाललें आहे.  उंचावरून कितीदां तरी हा प्राणी खालीं घसरला आहे ; वर चढून पुन्हा कितीदां तो खालीं पडला आहे.  आजच्या बहुजनसमाजापेक्षां २४०० वर्षांपूर्वीचे ग्रीक अधिक सुधारलेले होतें, अधिक सुसंस्कृत व प्रगत होते.  १९०० वर्षांपूर्वीच्या रोम शहरांत कचरा व घाण वाहून नेण्याची आजच्यापेक्षा अधिक उत्कृष्ट पध्दति होती.  याच्या उलट तीनशें वर्षांपूर्वीच्या बर्लिन शहरामधील पीटरच्या चर्चसमोर कचर्‍याच्या व घाणीच्या राशी पडलेल्या असत व नाकालां रुमाल लावाला लागे.  इ. स. १६५० पर्यंत पॅरिस शहरांतील लोक रस्त्यावर मलमूत्रांचीं भांडी खुशाल फेंकीत.  १८४९ मध्यें इमर्सन हा बोस्टन शहरांत रहात होता.  तेथील नागरिकांनीं जरा नीट वागावें म्हणून तो किती खटपट करायचा.  १९२९ मध्यें या बोस्टन शहरांतच सरकारी निरीक्षकांना ''स्ट्रेंज इन्टरल्यूड'' या बोलपटाला बंदी करावी लागली.

मानवी प्रगतीचा प्रवाह फार आस्ते आस्ते चालला आहे.  एवढेंच नव्हे, तर मनुष्याच्या आडमूठेपणामुळें व मूर्खपणामुळें हा प्रवाह पुन्हा पुन्हा मागें सारण्यांतहि आला आहे.  इतिहासाचें सम्यक् आकलन होण्यासाठीं या दोन गोष्टी सदैव ध्यानांत ठेविल्या पाहिजेत.  तिसरीहि एक महत्त्वाची गोष्ट आपणास सांगतों.  आणि ती म्हणजे मनुष्य हा फार आळशी प्राणी आहे.  तो आपण होऊन कधींहिं प्रगती करणार नाहीं.  प्रगतीचा त्याला तिटकारा आहे.  ही नसती उठाठेव कशाला ?  कां ही डोकेफोड ?  असें त्याला वाटतें.  कधीं मोठें संकट, फार मोठी आपत्तीच आली तर तो पाऊल पुढें टाकूं पाहतो.  शत्रूचा हल्ला आला, नैसर्गिक उत्पात झाले तरच तो हातपाय हालवतो, डोकें चालवतो.  प्रगति करायची कीं अजि नष्ट होऊन जायचें, असाच प्रश्न जेव्हां समोर उभां राहातो तेव्हांच हा मनुष्य प्राणी जरा निराळें वळण घेतो, थोडी प्रगति करतो.

ह्या नैसर्गिक आपत्ती म्हणजे प्रगतीची प्रेरणा.  अशीच एक पहिली प्रेरणा त्या मोठ्या हिमयुगांत आली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel