- ४ -
सरोवरवासीयांच्या काळांतच मानवजातीचे चार मुख्य वंश झाले होते : गोरे, पिवळे, आफ्रिकी व आस्ट्रालिया. आफ्रिकी व आस्ट्रालिया हे काळे होते. हे चारी वंश त्याच मूळ पूर्वजांपासून जन्मले. आज आपल्या कातडीचा रंग जरी निराळा असला, तरी आपले पूर्वज एकच होते. एकाच पूर्वजांपासून आपण झालों. परंतु त्या हिमयुगांत आपले पूर्वज सर्वत्र पांगले. तें हिमयुग जवळजवळ एक लक्ष वर्षे होतें. निरनिराळ्या ठिकाणीं पांगल्यामुळें शरीराची वाढ निरनिराळी झाली. त्या त्या ठिकाणचें हवापाणी, त्या त्या ठिकाणचें अन्न, येथील एकंदर निसर्गपरिस्थिति, या सर्वांचा शरीरावर परिणाम होऊन निरनिराळे असे हे नमुने तयार झाले. या सर्वांना भिन्नभिन्न वंशांचे असें वास्तविक म्हणतां येणार नाहीं. एकाच वंशवृक्षाच्या या चार आप्त शाखा आहेत. तसेंच कांही जातींना इतर जातींपेक्षां उच्च मानणें हीहि चूक आहे. संस्कृतीची उच्चता ही कातडीच्या रंगावर किंवा चेहरेपट्टीवर अवलंबून नसते. दुसर्याच गोष्टींवर सांस्कृतिक श्रेष्ठता अवलंबून असते. संस्कृति-सुधारणेच्या प्रगतींत कांहीं जातीजमाती मागें पडल्या याचें कारण ज्या वेळेस तें हिमयुग होतें, त्या वेळेस जी पांगापांग झाली त्या वेळेस या कांही जातीजमाती पृथ्वीच्या अत्यंत दूर अशा टोंकांना गेल्या. त्यांचा इतरांशीं संबंध राहिला नाहीं. ते तसेच तिकडे एकटे पडून राहिले. जगाशीं संबंध न राहिल्यामुळें त्या प्रारंभिक बाल्यावस्थेंतून ते बाहेर पडूं शकले नाहींत.
जेथें निरनिराळे लोक एकत्र येतात, एकमेकांशी दळणवळण ठेवतात, एकमेकात मिसळतात, जेथें विचारांची व अनुभवाची देवाण-घेवाण होत असते, तेथें सुधारणेची शक्यता असते. पृथ्वीच्या कांहीं भागांत प्रगति कां झाली, आणि कांही ठिकाणचे मानवप्राणी अप्रगत कां राहिले याची ही अशी मीमांसा आहे. आस्ट्रालियाच्या आग्नेय दिशेस तासमानिया आहे. भाकरीचा लहानसा तुकडा भाकरीजवळच पडलेला असावा तसा हा तासमानियाचा लहानसा तुकड पडलेला आहे. १६४२ मध्यें डच लोकांना या बेटावर मूळचे रहिवाशी आढळले. पन्नास हजार वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज तेथें प्रथम आले. ते पूर्वज जसे रहात असत तसेच हे रहिवाशी इ.स. १६४२ मध्येंहि रहात होते. दक्षिण अमेरिकेचें अत्यंत दक्षिणेकडचें टोंक जें टायराडेल फ्यूगो, तेथें जे लोक आहेत त्यांना अद्याप अंगावर कपडे घालण्याइतपतहि बुध्दि नाहीं. तासमानियांतील लोकांचा शेवटचा वंशज इ.स. १८८७ मध्यें मेला. हे तासमानियी व टायराडेल फ्यूगी लोक संस्कृतीच्या संग्रामांतील हरलेले लोक आहेत. या परागंदा झालेल्या पलटणी जणुं आहेत. कित्येक हजार वर्षांपूर्वी पृथ्वीच्या एका बाजूस हे बिचारे पडले. आणि पाषाणकाळांतील तो साधा निष्पाप रानवटपणा तसाच त्यांच्यांत राहिला.
परंतु याच्या उलट नील नदीच्या खोर्यांत मानवजातीचे निरनिराळे प्रवाह एकत्र आले. अन्न व निवार्याची जागा शोधणार्या मानवाना या टापूंतून वरचेवर जावें लागे. येथें भेटीगांठी होत. सरमिसळ होई. दुसरा एक टापू म्हणजे पश्चिम आशियांतील युफ्रातीस आणि तैग्रीस या नद्यांचा. तैग्रीस व युफ्रातीस यांचा दुआब फुलला. नील नदीचें खोरें फुललें. या दोन स्थानीं संस्कृतीनें पहिलें मोठें पाऊल टाकलें. बर्फांतून, पर्वतातून, वाळवंटांतून, समुद्रकिनार्यापासून हजारों लोक येथें आले. त्या त्या मानवप्रवाहानें स्वत:च्या विशिष्ट कल्पना बरोबर आणल्या. स्वत:चीं दैवतें, स्वत:च्या चालीरीती, स्वत:चे विचार घेऊनच तो तो मानवी प्रवाह येई. त्या सर्व प्राथमिक संस्कृतींच्या संघर्षातून-संमिश्रणांतून नवीन विचार जन्मले ; कल्पनाशक्ति बहरली; रानटीपणाच्या बाल्यावस्थेंतून संस्कृति-सुधारणेच्या रम्य पाठशाळेंत मानवजात जायला तयार झाली. हें पाऊल टाकायला मानव उभा राहिला.
इजिप्तमधील सुधारणेची आरंभींची स्थिति आपण थोडक्यांत पाहूं या.