- ३ -
रोम व कार्थेज यांमधील पहिलें युध्द तेवीस वर्षे (ख्रि.पू. २६४ ते ख्रि.पू. २४१) टिकलें. 'पहिलें प्यूनिक (फोनिशियन) युध्द' या नांवानें तें प्रसिध्द आहे. तें मुख्यत: आरमारी युध्द होतें. सुरूवातीला कार्थेजियन अधिक हुषार खलाशी ठरले. पण युध्दाच्या हालचाली करण्यांत रोमन लोक फार पटाईत होते. युध्दांतील गोष्टी ते झट्कन् शिकत. प्रथम प्रथम त्यांचे आरमारी पराजय झाले, पण त्या पराजयांतूनच ते विजयाचे पेंचप्रसंग शिकले. आरमारी लढाया कशा जिंकाव्या हें शिकून शेवटीं आरमारी लढायांत त्यांनीं आपल्या गुरुंचा पराजय केला. रोमनांनीं सिसिली जिंकली. तह होऊन एकमेकांच्या वर्चस्वाखालचे प्रदेश नक्की झाले व परस्परांचा अडथळा न होतां दोघांनाहि खुशाल लुटालूट करण्यास भरपूर वाव मिळावा अशी व्यवस्था त्यांनीं करून टाकली.
पहिल्या प्यूनिक युध्दांतील कार्थेजियनांचा पुढारी हमिल्कर बार्का हा होता. रोमनांनीं पराजय केल्यावर पांच वर्षांनंतरची गोष्ट. हमिल्कर आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन एके दिवशीं रात्रीं बालच्या मन्दिरांत गेला व मोलोक्कोच्या मूर्तीपुढें त्यानें त्याला ''मी मरेपर्यंत रोमनांचा द्वेष करीन'' अशी शपथ घ्यावयास लावलें. मानवी यज्ञाहुति मिळण्यांत मोलोक्को देवाला फार आनंद वाटत असे.
हॅनिबॉल ही शपथ कधींहि विसरला नाहीं. स्वत:च्या पित्यासमोर, स्वत:च्या देशाच्या देवासमोर केलेल्या प्रतिज्ञेचें विस्मरण होणें कसें शक्य आहे ?
- ४ -
जवळजवळ पंचवीस वर्षे रोमन व कार्थेजियन यांच्यात शांतता नांदली ; पण ख्रि.पू. २१८ मध्यें दोघांच्याहि सहनशीलतेला जणूं तडेच पडले ! दोघेहि केलेल्या कराराला कागदाच्या कपट्याप्रमाणें मानूं लागले. प्रत्येक जण दुसर्याच्या वर्चस्वाखालील प्रदेशावर आक्रमण करण्याची तयारी गुप्तपणें करूं लागला. रोमन लोकांनीं साम्राज्याची उभारणी सुरूच ठेवली होती. कोणता नवीन प्रदेश घेतां येईल, नवीन वसाहती कोठें वसवितां येतील, इकडे त्यांचे सारखें लक्ष असे. त्यांनीं तांब्याच्या खाणींनीं समृध्द असा सार्डिनिया आपल्या राज्याला जोडला. त्यांची सुसंघटित लुटारूपणाची आंतरराष्ट्रीय गुंडगिरी सारखी सुरूच होती. रोमनांनीं सार्डिनिया घेतांच कार्थेजियनांनीं दक्षिण स्पेन बळकावून त्याचा वचपा काढला. दक्षिण स्पेनमध्यें चांदीच्या खाणी होत्या. कार्थेजियनांची ही धडाडी व त्यांचें हें साहस पाहून रोमन लोक चकित झाले ! कार्थेजियनांना धडा शिकविला पाहिजे असें त्यांनीं ठरविलें.
पण जर्मन ज्याप्रमाणें १९१४ सालीं शत्रूला तोडीस तोड होते येवढेंच नव्हे पण कांकणभर सरसच होते तद्वतच कार्थेजियनहि होते. रोमन सैन्य गलबतांत बसून निघणार तोंच हॅनिबॉलच्या नेतृत्वाखालीं कार्थेजियन फौजा आल्प्स पर्वत ओलांडून उत्तर इटालीमधून प्रचंड लोंढ्याप्रमाणें रोमवर चालून येत आहेत अशी बातमी आली. रोमन सीनेटरांनीं ती बातमी शक्य तितकी गुप्त ठेवून हॅनिबॉलशीं मुकाबला करण्यासाठीं फौजा पाठविल्या. हें दुसरें प्यूनिक युध्द. रोमनांनीं हें युध्द विजयाच्या आक्रमक इच्छेनें सुरू केलें होतें. त्यांनीं चढाईला सुरूवात केली खरी ; पण चढाई तर दूरच राहिली आणि त्यांच्यावरच उलट मातृभूमीच्या रक्षणार्थ बचावाची पवित्र लढाई करण्याची वेळ आली. 'रोमन रिपब्लिकची सत्ता जगभर पसरवा, रोमन सत्तेचा धोका नष्ट व्हावा म्हणून प्राणार्पण करण्यास पुढें या,' अशी घोषण केली गेली. रोमन सेना देशभक्तिनें प्रेरित होऊन वेगानें निघाल्या. इटलीच्या उंबरठ्यापाशीं हॅनिबॉलला थांबवावें म्हणून त्यांनीं जोरानें कूच केले. पण हॅनिबॉलनें त्या सैन्याला ट्रॅसिमेनस सरावराजवळ कोंडून नष्ट केलें.