सम्राट् अ‍ॅन्टोनिनस व मार्कसची आई या दोघांनींहि त्याला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठीं उत्तेजन दिलें व त्या काळांतले अत्यंत नामांकित आचार्य त्याला शिकविण्यासाठीं ठेवले.  त्यांच्या योग्य देखरेखीखालीं व मार्गदर्शनाखालीं त्यानें केवळ तत्त्वज्ञानांतच प्रगति केली असें नव्हे तर काव्य, इतिहास व ललितकला यांचाहि चांगला अभ्यास केला.

तो स्वभावत:च विद्याप्रिय होता.  मनाचा विकास होत असता तो अत्यंत सुखी होता.  पुढारीपणा त्याच्या ठायीं नव्हता.  एक अज्ञात तत्त्वज्ञानी म्हणून राहावें अशीच त्याची इच्छा होती.  पण दैवाची इच्छा त्यानें सम्राट्, वैभवशाली राजाधिराज व्हावें अशी होती.

तो आपल्या वयाच्या तिसाव्या वर्षी (इ.स. १६१ मध्यें) सम्राट् झाला.  प्लेटो ज्याची वाट पाहत होता, तो राजर्षि शेवटीं सिंहासनावर आला.  पण प्लेटोचें स्वप्न प्रत्यक्षांत येणें अद्यापि फार दूर होतें.  प्लेटोच्या रिपब्लिकमधील तत्वज्ञानी राजाला सज्जन व सुसंस्कृत लोकांच्या राष्ट्रावर राज्य करावयाचें असे ; पण मार्कस ऑरेलियसला मूर्ख व गुंड बहुजनसमाज असलेल्या राष्ट्रावर राज्य करावयाचें होतें.

इतिहासाच्या चलचित्रपटांत मार्कस आपल्या डोळ्यांपुढून जातो तेव्हा त्याच्या ठिकाणीं आपणांस दोन व्यक्ति दिसतात.  तो म्हणजे प्राचीन काळचा डॉ० जेकिल वा मि० हाइड होय.  रात्रीच्या प्रशांत वेळीं तो स्वत:चें हृदयसंधोधन करणारा भावनाप्रधान कवि व ज्ञानोपासक दिसतो.  हें जग अधिक चांगलें कसें होईल, येथें सुखी लोक कसे नांदूं लागतील याविषयींचे आपले विचार तो मांडी व त्यांतून योजना निर्मी ; पण दिवसां मात्र तो शस्त्रास्त्रांच्या खणखणाटांत रोमन विजयासाठीं बाहेर पडे.  शरण जावयाचें नाहीं व दया दाखवावयाची नाहीं या रोमन तत्त्वांप्रमाणें विजयी सेनानी म्हणून धांवपळ करतांना व दौडा मारतांना तो दिसतो.  मार्कस ऑरेलियस याच्या या द्विविध स्वरूपाचें—त्याच्यांतील सौम्य कवि व कठोर योध्दा या दोघांचेहि—थोडें दर्शन आपण घेऊं या.

- ३ -

मार्कस ऑरेलियस हा भला माणूस होता.  पण त्याला संगत मात्र भली मिळाली नाही.  तो दुष्ट संगतींत सांपडलेला सुष्ट होता.  त्यानें आपली डायरी लिहिली आहे.  ती त्याची चिंतनिका होती.  प्राचीन काळांतील तें एक उत्कृष्ट पुस्तक आहे.  आपण कसें व्हावें, कोणतीं तत्त्वें आचरणांत आणावीं या बाबतचे आपले सर्व विचार त्यानें या चिंतनिकेंत लिहिले आहेत.  पण काय करावें हें कळलें तरी तसें करणें मात्र तितकेंसें सोपें नसतें.  प्रत्यक्ष प्रसंग येतांच त्याला तत्त्वांचा विसर पडतो, तत्त्वांप्रमाणें वागण्याची हिंमत होत नाहीं.  त्याला पुरेसें नीतिधैर्यच नसतें.  ''मार्कस ऑरेलियस या नात्यानें रोमच माझें शहर व माझा देश असलें तरी मानव या दृष्टीनें सारें जगच माझा देश आहे'' असें त्यानें चिंतनिकेंत लिहिलें असलें तरी प्रत्यक्ष व्यवहारांत मात्र आपण जगाचे नागरिक आहों याचें स्मरण त्याला राहत नाहीं, आपल्या रोमनपणाचीच जाणीव त्याच्या ठायीं बलवत्तर होते.  वास्तविक तो युध्दाचा द्वेष्टा आहे.  तो लिहितो, ''माशी पकडतां आली कीं कोळी नाचूं लागतो, ससा सांपडला कीं माणसाला आनंद होतो, थोडे मासे जाळ्यांत अडकले कीं कोळ्याला हर्ष होतो, डुक्कर किंवा अस्वल मारतां आलें कीं शिकार्‍याला आनंद होतो, तर युध्दांत कैदी पकडले कीं लढवय्यास आनंद होतो (Sarmatian Prisoners).  पण या सार्‍यांच्या मनांतलें तत्त्वज्ञान पाहिलें तर सारे एकजात डाकूच नाहींत का ठरत ?'' पण असें लिहिणार्‍या मार्कसच्याच कारकीर्दीचा बराचसा भाग मात्र युध्दें लढण्यांतच गेला, शत्रूंना पकडण्यांत व ठार मारण्यांतच खर्ची पडला ! न्यायापेक्षां रणकीर्तीचीच चाड आपणास अधिक असल्याबद्दल वाईट वाटून तो आपल्या चिंतनिकेंत आपल्या दुबळेपणाबद्दल स्वत:वर कोरडे उडवितो : ''सम्राट् म्हणून जर जीवनांतील उदात्तता तुला दाखवितां येत नसेल तर जा, कोंपर्‍यांत जाऊन बस व तेथें निर्दोष व निर्मळ जीवन जग व तेथेंहि जीवनाची उदारता वा उदात्तता तुला दाखवितां येत नसेल तर या जगांतून चालता हो. .... असें निघून जाणें देखील तुझ्या हातून घडलें तर तें एक अत्यंत स्तुत्य असें सत्कृत्यच होईल.'' त्यानें असें लिहिण्याचें धैर्य दाखविलें तरी, सम्राट् झाल्यामुळें उदात्तता दाखवितां येत नव्हती तरी त्याला सत्ता-त्याग वा प्राण-त्याग करण्याचें धैर्य मात्र दाखवितां आलें नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel