माणूस घडवण्याआधी : खंड ६

शिक्षणाचे बामणीकरण छेदताना....

Author:अभिषेक ठमके

शाळा सुरु होण्यापूर्वी मी आणि माझे सहकारी, आम्ही शाळेत पोहचलो.... राष्ट्रगीत झाले.... महिना जुलै चा होता... प्रार्थना झाली आणि पर्जन्यसूक्त म्हंटल गेल मग अग्निहोत्र झालं... थोडा वेळ मला कोणत्यातरी वैदिक शिक्षण देणाऱ्या शाळेत तर आपण आलो नाही ना असे वाटायला लागले... हा "मुल्याशिक्षणाचा" तास झाल्यावर मी मुख्याध्यापकांना विचारलं "हे पर्जन्यसुक्त आणि अग्निहोत्र कशासाठी?" त्या म्हणाल्या "अग्निहोत्राने वातावरण शुद्ध होत आणि पर्जन्यासुक्तात पावसाचे आवाहन  आहे त्यामुळे पाऊस पडतो" यावर मी पुन्हा विचारलं " याला पुरावा काय?" तर त्याचं उत्तर "आपल्या वेदांमध्ये सर्व लिहिलं आहे आणि ही आपली संस्कृती आहे... आमच्या सर्व शाळांमध्ये हा नित्याचा क्रम आहे.." त्याचं हे उत्तर धक्का देणार आणि काहीसं भानावर आणणार होत... आपण तर या मुलांना अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय सांगायला आलोत पण इथे तर अखंडपणे "बामणीकरणाची" प्रक्रिया चालू... आपण करीत असलेले काम म्हणजे " वणवा विझवण्यासाठी फुंकर मारायचा" प्रकार आहे असल्याच जाणवलं आणि किती तरी पिढ्या काळाच्या खूप मागे निघून गेल्या सारख वाटल....

असे अनेक अनुभव ग्रामीण-शहरी भागातील शाळात कार्यक्रमाला जाताना, तेथील शिक्षक, विद्यार्थी यांना भेटून मला आले... मला खूप साधे प्रश्न पडले आहेत- "आजचे शिक्षण नेमकं कोणती प्रक्रिया रुजवतय , कोणाला कसं घडवतंय? आणि मग असे असेल तर शिक्षण हे सामाजिक परिवर्तन घडवण्याचं माध्यम  असू शकत का? आणि कसं? या विषयावर अनेक शिक्षण तज्ञांनी काम केलंय त्याचं मी नेहमी वाचत ही आलोय त्यात किशोर दरक आणि हेरंभ कुलकर्णी याचं निरीक्षण आणि विश्लेषण खास लक्षात घेण्याजोग मला वाटलं....

एकूणच शिक्षण काय रुजवतय त्याचा विचार करू. अंगणवाडी-बालवाडीत शिकणारी लहान मुल-मुली यांना संवेदनशील होण्याच्या काळात चिऊताई- काऊदादा, द्रोण-एकलव्य, चतुर बिरबल, पंचतंत्र सारख्या अनेक गोष्टी आणि गाणी चित्रांच्या साह्याने मुलांना अधिक रंजक पद्धतीने शिकवल्या जातात,  या गोष्टी त्यांच्या जीवनाचा भाग असतात, मुलांचा जसा बौद्धिक आणि शारीरिक विकास होतो तसे या गोष्टींमधील कल्पकता ते सोडून देतात मात्र या कल्पकतेच्या माध्यमातून जी जाणीव त्यांच्यात रुजवली जाते ती मात्र तशीच राहते. काळाच्या ओघात ती अधिक पक्की रुजते. ही जाणीव कशी रुजते ते समजून घेण्यासाठी उदाहरणादाखल  चिऊताई- काऊदादाची  गोष्ट घेऊ. या गोष्टीत पावसात भिजणारा कावळा चिऊताईला "दार उघड दार उघड" अशी विनवणी करतो मात्र चिऊताई मात्र  "थांब माझ्या बाळाला पावडर लाऊ दे, गंध लाऊ दे...." अशी उत्तरांची रांगच लावते.... या गोष्टीत चिऊ आणि काऊ हे काल्पनिक पात्र  "ताई आणि दादाची" भूमिका करत असतात आणि त्यातून "लिंगभाव संवेदना" घडवत असतात. ताईने कसं घरात राहावं, बाळाला सांभाळावं याची सामाजिक जडण-घडण या गोष्टीतून रुजवली जाते. दादाने का बाळाला सांभाळू नये? असा विचार देखील आपण करत नाही कारण लहानपणी आपण ही ते अजाणतेपणी स्वीकारलेल असतं.... "लहान मुलांना अश्या गोष्टी कळत नाही" असे अज्ञानी गृहीतक देखील आपण मनोमन स्वीकारलेले असते, त्यांची संवेदनशीलता ही अनुकरण आणि नेणीवेतून समोर येत असताना देखील आपण डोळे झाक करतो... मुला-मुलींच्या खेळातूनच ते अधिक स्पष्टपणे जाणवत "मुली" बाहुल्यांना बाळ समजून त्याची काळजी घेतात... भांडी-कुंडी त्यांना अधिक जवळची वाटत तशी मुलांची खेळणी ही साधारण मुलींच्या विरुद्ध किंवा भिन्न असतात. शिक्षणातून अश्या गोष्टी त्यांच्या जीवनाचा भाग बनतात आणि त्यातून जाणीव आकार घेते .काळानुसार कल्पकता मागे राहते आणि त्यातून निर्माण झालेली जाणीव पुढे तशीच चालत राहते... मुला-मुलींमधील भिन्नत्व "प्रतीकांच्या" माध्यमातून "मुलीने असे राहावे" "मुलाने असे  राहावे" यासर्व जाणीवा कुटुंब, समाज आणि शिक्षण यातून रुजवल्या जातात .यात शिक्षणाचा मोठा वाटा आहे हे मात्र निर्विवाद सत्य....

जरा बाराखडीच उदाहरण घेऊ, "ग" रे गणपतीचा, "भ" रे भटजीचा, "ज्ञ" यज्ञाचा, "क्ष" रे क्षत्रियाचा, "ण" रे बाणाचा, "त" रे तलवारीचा ही सर्व चित्रमय अक्षरे तर मध्ययुगीन विचार आणि बामणीकरणाची प्रतीके आहेत, ही तर अक्षरश लादली जातात, ज्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीत वरील प्रतीके नाहीत अश्या बामनेतर जाती, मुस्लिम,बौद्ध, जैन, आदिवासी आणि इतर धर्मीय मुला-मुलींनी याचा काय अर्थ लावायचा? कसा अर्थ लावायचा? आणि का स्वीकारायचा? त्यात पुन्हा पुणेकेंद्री बामणी शुद्ध-अशुद्ध भाषा आणि तिचे नियम. व्याकरणात तर गोंधळच आहे, जरा खालील दोन्ही वाक्यांवर विचार करा :

१) अभय अभ्यास कर.
२) कमल चहा कर.

वाक्य दिसायला एकदम लयबद्ध पण त्यातील भानगड मोठी अजब आहे. तुमच्या व्याकरणात सगळ्या मुली ( कमल सहित) काम करतात आणि मुल अभ्यास... मुलांनी काम केली तर त्यांचे हात झिजतील का? पण हे येत कुठून? जहाल स्त्रीवाद्यांनी भाषेतील संरचनेला आव्हान दिले त्यात त्यांनी हे दाखवून दिले कि भाषा ही कशी लिंगभावाची विषम जाणीव रुजवत असते...पुरुषतत्व म्हणजे बुद्धी आणि स्त्रीतत्व म्हणजे श्रम हे जगभर रुजलेल्या विषमतावादी आणि खास भारतात बामणी विचारधारेचा गाभा आहे. सर्व भाषा आणि विषयातून हीच विषम प्रवृत्ती घडवली जातेय. स्त्री समाजात दुय्यम आहे हे सर्व मान्य करतील पण तीच हे दुय्यमत्व संरचनात्मक पद्धतीने घडवले आहे त्याचा हा नमुना आहे. इतिहास या विषयात देखील तसेच बामणी संस्कृतीची अधिसत्ता आहे... सगळा इतिहास सांगायचा आणि शेवट मात्र सर्व बामणी निष्कर्षाने करायचा उदाहरण म्हणजे बौद्ध, जैन धर्म शिकवायचा आणि शेवटी सांगायचं कि "हे धर्म हिंदू धर्माचा भाग आहे"  हे सगळ अनैतिहासिक आणि सावरकर प्रेम कशासाठी आणि कुणाच? "दादोजी शिवरायांचे गुरु" हे भटप्रेम कुणाचे? इतिहास, भाषा सारखे जाणीव घडवणारे सर्व विषय भटाललेले आहेत. सगळे नियम बनवणार बामन, शिकणार बहुजन... नियम स्वीकारून "बामन" बना नाही तर उपाशी मरा असाच हा शिक्षणाचा संकेत आहे. मेकोलेप्रणीत शिक्षण व्यवस्थेने भारतीयांना जाणीवेने ब्रिटीश बनवून वसाहतीक अधिसत्ता टिकवली, आता शिक्षणातली आधुनिकता पचवून बामणी शिक्षण व्यवस्थेने दलित-बहुजन स्त्री-पुरुषांना बामन बनवून जाती-पितृसत्तेची अधिसत्ता टिकवण्याचा "बामणी कावा" चालवला आहे. एकूणच जातीय-शक्तींचे शिक्षण पद्धती आणि शिक्षण व्यवस्थेच्या प्रकीयांवरील नियंत्रण आणि त्याच्या वितरणातील विषमता वेगाने होताना दिसतंय... खासगी संस्थांमधील कमी होत जाणारे आरक्षण हे परिघावरील जाती-वर्गांना शिक्षण नाकारत आहे तर दुसर्या बाजूला त्यांना स्वतंत्र राजकीय जाणीव निर्माण होऊ नये यासाठी शिक्षणाचे बामणीकरण होत आहे.

डिसेंबर २०१२ मध्ये दलित स्टडीज ऑफ इंडिया ने भारतातील मिड-डे-मिल योजनेत होणारे दलित मुला-मुलींच्या बाबतीतील भेदभाव उत्तर भारतातील सर्वेक्षणातून समोर आले, अनुप कुमार सारख्या अभ्यासकाने आय.आय.टी. मध्ये दलित मुला-मुलींबाबत होणार्या शोषण आणि भेदभावाचा अभ्यास देशासमोर ठेवला आहे, विद्या भूषण रावत यांच्या" debrahmanise education " या लेखात असे अनेक दाहक अनुभव मांडण्यात आले. सन १९६४-६८ मध्ये शिक्षण क्षेत्रावर कोठारी कमिशन ने एक रिपोर्ट दिला त्यात नमूद होत :

   ".......existing system of Education promote divisive tendencies;
 caste loyalties are encouraged in number of private educational
institutions; rich and poor are segregated...."

सहा दशकानंतर परिस्थिती बदलेली दिसत नाही. बहुजन-दलित स्त्री-पुरुषांची राजकीय जाणीव, आत्मभान निर्माण करणाऱ्या क्रांतिसूर्य जोतीबा फुले, सावित्रीमाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी समाज परिवर्तनात योगदान देणारी होती.पण आज हे काम मागे पडले आहे शिक्षणातून असामाजिक तत्व रुजत आहे, माणूस समाजात असूनही त्याची बांधिलकी नष्ट झाली आहे..... ज्यांची आहे ती मात्र कोणतही परिवर्तन घडवू  शकणार नाही. शिक्षणातून समाज परिवर्तन घडवायचे असेल तर अगोदर शिक्षणात परिवर्तन घडवावे लागेल. पुढील मुद्द्यामधून मला शिक्षणातील परिवर्तनाची शक्यता दिसते:

शिक्षणातील बामणीकरण छेदताना बामणी विचार प्रवाह, त्यांची प्रतीके यांना नकार देणे त्याजागी समतावादी, परिवर्तनवादी विचार आणि प्रतीके रुजवणे. शिक्षणात लिंगभाव संवेदनशीलता आणि जाती निर्मूलनाचा विचार मूल्यशिक्षण म्हणून अंतर्भूत करणे, परिवर्तनवादी बालसाहित्याची निर्मिती करणे, त्याचे प्रशिक्षण देणे,समाजातील चालू विचार आणि ज्ञान व्यवहारातील नवीन परिवर्तनाचा बदलत्या अभ्यास विषयात समावेश करणे, परिवर्तनवादी शिक्षणशास्त्र  मांडणे, अभ्यास पद्धतीतील साचेबद्धता आणि अचीकीत्साकता नष्ट करणे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे, परीक्षापद्धतीचे महत्व कमी करणे समाजाभिमुख,उपक्रमशील शिक्षणला प्रोत्साहन द्यायला हवे, सामाजिक न्याय आणि संधी यासाठी शिक्षण क्षेत्रातील आरक्षणाच्या अंमलबजावणीवर सरकारने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.  

लेखं - कुणाल शिरसाठे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to माणूस घडवण्याआधी : खंड ६