सत्याची तहान या सत्यकामाच्या भूमीत आज उत्पन्न झाली आहे की नाही? मानवजातीने जे जे उद्योग सुरू केले आहेत, जे जे विचारप्रांत उत्पन्न केले आहेत, त्या सर्व ठिकाणी आपण गेले पाहिजे. यंत्रशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, कला, रसायन, व्यायाम, क्रीडांगण, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र या सर्व सत्याच्या साक्षात्कारांच्या क्षेत्रांत न थकता, न दमता पुढे घुसणारे लोक भारतीय संस्कृतीच्या उपासकांत निर्माण झाले पाहिजेत. सहकारी चळवळी असोत, मजुरांची संघटना असो, शेती सुधारणा असो, नवीन उद्योगधंदे सुरू करणे असो, सर्वत्र आपण गेले पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. प्रयोग केले पाहिजेत. हीच परमेश्वराची पूजा. देवाने दिलेले वाढविणे म्हणजेच त्याची पूजा. परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा विकास करणे म्हणजेच खरा धर्म.

त्या त्या काळातील प्रश्न त्या त्या विचारवंतांना सोडवावयाचे असतात. अर्वाचीन बुद्धीसमोर अर्वाचीन प्रश्न आहेत. भारतीय संस्कृतीत ही हिम्मत नाही का? जगातील राष्ट्रांच्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा हक्क वेद घोकून मिळणार नाही, पूर्वजांची स्तुतिस्तोत्रे गाऊन मिळणार नाही. नवीन प्रश्नांस आपण हात घातला पाहिजे. प्रयोगालये म्हणजे होमशाळा काढल्या पाहिजेत. होऊ देत सुरू प्रयोग-सत्यदेवाचे सर्वांगीण स्वरूप समजून घेण्याचे प्रयोग!

आता कोठेही अडता कामा नये. आपले घोडे सर्वत्र दौडत जाऊ देत. ग्रामसंघटन, खादीशास्त्र, समाजशास्त्र, नवनीतिवाद, कोणतेही क्षेत्र असो; त्या त्या विषयात घुसू व नवीन ज्ञान निर्मू. ठिकठिकाणी संग्रहालये, प्रयोगालये, ग्रंथालये स्थापू. बौद्धिक व वैचारिक सहकार्य मिळवू. ज्ञान ही सहकार्याची वस्तू आहे. प्रत्येक विचार हा सहकार्यातून निर्माण झाला आहे. पूर्वीच्या शेकडो विचारांच्या खांद्यावर नवीन विचार उभा राहात असतो. गांधी टिळकांच्या कल्पनांचा विकास करतील. जवाहरलाल गांधींना पुढे नेतील. ज्ञानाच्या प्रत्येक प्रांतात अशी स्थिती आहे. तेथे अहंकार नाही, नम्र व निष्ठापूर्वक ज्ञानेश्वराची पूजा आहे.

भारतीय संस्कृती सांगत आहे, “माझ्या मुलांनो! जगात ज्ञानासाठी जीवनेच्या जीवने देणारे शेकडो लोक निर्माण होतात. येथेही विचारपूजा सुरू होऊ देत.”

विचार तलवारीपेक्षा प्रखर आहे. विचार नवजीवन देतो. “वन्हि तो पेटवावा रे।” विचारांचा वन्ही पुन्हा प्रखरतेने पेटविल्याशिवाय कश्मले जळून जाणार नाहीत.

भारतात आज क्रान्तीचा समय आलेला आहे. ही क्रांती केवळ राजकीय नाही. ही शतमुखी क्रांती आहे. सारा संसार धांडुळावयाचा आहे. सा-या कल्पना पारखून घ्यावयाच्या आहेत. नवीन काळ, नवीन दृष्टी! मजुराला पोटभर घास कसा मिळेल हे पाहणे म्हणजे आज महान धर्म आहे. राष्ट्राच्या एखाद्या नवीन उद्योगात रात्रंदिवस गढून जाणे म्हणजे संन्यासी होणे आहे.

निर्मळ विचार व शुद्ध दृष्टी यांची आज नितान्त आवश्यकता आहे. येथे अधीरता नको, उताविळी नको, स्वार्थ नको, आळस नको. निर्मळता हवी असेल तर खोल अभ्यासाची आवश्यकता आहे. प्रयत्न व कष्ट यांची जरूर आहे. समाजाबद्दल प्रेम व कळकळ यांची जरूर आहे. समाजाला सुखी कसे करता येईल, ही तळमळ लागली म्हणजे मग तुम्ही विचार करू लागल. मग जो विचार स्फुरेल त्याचा आचार सुरू होईल; आणि या विचाराला व आचाराला ‘युगधर्म’ असे नाव दिले जाईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel