अहिंसा म्हणजे नेभळेपणा व दुबळेपणा नाही. पळून जाणे म्हणजे अहिंसा नव्हे. शत्रूसमोर नि:शस्त्र उभे राहता येत नसेल, तर त्याच्यावर घाव घालण्याच्या तयारीने उभे राहा; परंतु पळून जाणे हे सर्वस्वी त्याज्य व निंद्य होय, ही गोष्ट महात्माजींनी शंभरदा सांगितली आहे. “शस्त्रांनी स्वराज्य घेता येत असेल तर घ्या. मी दूर उभा राहीन. परंतु गुलाम राहू नका. शस्त्रांनी लढता येत नसेल, तर माझ्या नि:शस्त्र लढ्यात या. स्वातंत्र्याचा लढा चालविलाच पाहिजे. दास्यात तसेच खितपत पडणे मानवाला शोभत नाही” असे ते म्हणतात.

उद्या जगातील सारी लष्करे चुटकीसरशी नाहीशी होतील, असे महात्माजी म्हणत नाहीत. हिंदुस्थानातही लष्कर, आरमार सारे लागेल. शस्त्रास्त्रांची बंदी उठवावी, अशी दहा मागण्यांतील त्यांची एक मागणी होती. जगाचे आजचे स्वरूप ते ओळखतात. परंतु जगात नवीन आरंभ कोणी तरी केला पाहिजे. संतांचे काम वाढीस लावले पाहिजे, अहिंसेचे प्रयोग पुढे नेले पाहिजेत. भारतीय पूर्वजांचे हे थोर प्रयोग महात्माजी पुढे चालवीत आहेत. त्यांची केवळ थट्टा करणे हे हृदय व बुद्धी असलेल्या माणसास शोभत नाही.

भक्षणातील हिंसा व रक्षणातील हिंसा दोन्हीमध्ये महात्माजी आपल्या पू्र्वजांचे अहिंसेचे प्रयोग पुढे नेत आहेत. दूध पिणे म्हणजेही एक प्रकारे मांसाशनच आहे. दूध हा वनस्पत्याहार नाही. दूध ही प्राणिज वस्तू आहे. अहिंसेचे-मांसाशनवर्जनाचे व्रत चालविणा-यास पुढे-मागे दूधही व करावे लागेल, असे विचार आज प्रकट होत आहेत. आपण देवीची लस टोचून घेतो यात हिंसा तर आहेच; गायींना अपार त्रास असतो हे तर खरेच; परंतु लस टोचणे म्हणजे काय? गायीच्या अंगातील लस आपल्या भरून घेणे याचा अर्थ काय? आपण जिभेने गोमांस खाल्ले नाही, परंतु आपल्या शरिरातील रक्तात तर ते क्षणात गेले ! विचार करून आचाराकडे पाहू लागले म्हणजे अंगावर शहारेच येतील !

याचा अर्थ असा नाही की दूध पिऊ नका, टोचून घेऊ नका. दुधाची जागा भरून काढणारा दुसरा पदार्थ मिळेपर्यंत दूध प्या, असेच अहिंसेचा उपासक म्हणेल. परंतु स्वत:च्या जीवनात तो प्रयोग करीत राहील. खाण्यापिण्याचे प्रयोग करील आणि दुधासारखी वनस्पती शोधील. देवी न टोचता देवी येणार नाही, असा एखादा उपाय शोधील.

अहिंसा अनंत आहे. महात्मे आपल्या जीवनात जेव्हा ती इतकी आणतात तेव्हा कोठे आपल्या जीवनात ती अल्पशी येते. आकाशात लाखो मेणबत्त्यांच्या शक्तीचा सूर्य जेव्हा सारखा जळत असतो, तेव्हा कोठे आपल्या अंगात ९८ अंश उष्णता जगण्यापुरती राहते.

महात्माजींसारखा अहिंसेचा उपासक आज कोण आहे? परंतु त्यांनाही आश्रमात वानर मारावे लागले. पिसाळलेली कुत्री मारावी लागली. बोरसद तालुक्यात प्लेग आला असता उंदीर मारण्याचा उपदेश कष्टाने त्यांना करावा लागला. त्या वेळेस त्यांनी जे लिहिलेले होते, ते किती हृदय पिळवटून लिहिले होते ! “माझ्याइतकाच पिसवा-डासांना, उंदीर-घुशींना जगण्याचा अधिकार आहे. माझ्या मरणाने त्यांना जगू द्यावे असे मला वाटते. माझ्या हृदयात अनंत वेदना होत आहेत” अशा अर्थाचे ते करूण उद्गार होते !

गांधीनी पिसाळलेले कुत्रे मारले. प्लेग आणणारे उंदीर मारले, त्याच न्यायाने जी माणसे आम्हाला पिसाळलेली वाटतात, जी माणसे प्लेग आणणारी वाटतात त्यांना का मारू नये? असे कोणी प्रश्न करीत असतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel