मामलेदार अधिक लायक असतील. अधिक शिकलेले असतील. कायद्याचा नीट अभ्यास केलेले असतील, तर त्यांच्या हातात सत्ता अधिक द्या. त्यांच्या लायकीचे  काम द्या. परंतु पगार हा लायकीवर अवलंबून ठेवणे योग्य नाही. लायकीप्रमाणे काम व जरुरीप्रमाणे पगार, हे तत्व अमलात आणले म्हणजे वर्णधर्म पाळला असे होईल. वर्णधर्म म्हणजे लायकीप्रमाणे समाजाचे काम उचलणे व पोटापुरते लागेल ते घेणे.

भारतीय संस्कृतीत जे यज्ञतत्व सांगितले आहे त्यात महान अर्थ आहे. वर्णधर्मात लायकीप्रमाणे कर्म उचला हे तत्व आहे, तर यज्ञधर्म सांगतो की, सर्वाची काळजी घ्या. यज्ञ म्हणजे काय? यज्ञ या शब्दात खोल अर्थ आहे. देवासाठी यज्ञ करावयाचा. देव आपणांस पाऊस देतात, प्रकाश देतात, वारे देतात, देव आपणांसाठी झिजतात. देव झिजतात तर त्यांची झीज आपण भरून काढली पाहिजे. यासाठी आपण देवांना हविर्भाव द्यावयाचा. आपणांजवळची जी तुपाची संपत्ती, तिचा भाग देवांना अर्पण करावयाचा. देव आपणांसाठी झिजले. आपण देवांसाठी झिजू या. म्हणजे परस्परांची झीज भरुन काढणे. तू माझ्यासाठी झीज, मी तुझ्यासाठी झिजतो. मी तुला जीवन देतो. तू मला जीवन दे.

''जीवो जीवस्य जीवनम्''

या वचनाचा एकप्रकारे विशेषही अर्थ आहे. प्रत्येक जीव दुस-या जीवाचे जीवन आहे. प्रत्येक प्राणी दुस-यासाठी झिजत आहे. आपण सारे एकमेकंसाठी झिजून, त्याग करुन, एकमेकांना जीवन देत आहोत.

कारखानदार मजुरासाठी झिजला, मजूर त्याच्यासाठी झिजोत. कुळे खोतासाठी झिजली, खोत कुळांसाठी झिजो शेतकरी सावकारासाठी झिजले. सावकार त्यांच्यासाठी झिजो. प्रजा सरकारसाठी झिजते. सरकार प्रजेसाठी झिजो. परस्परांची झीज भरुन काढू या.

आपण शेती करतो, पृथ्वीची झीज होते. ती झिजून आपणांस धान्य देते. तिचा कस, तिचे सत्व कमी होते. आपण तिची झीज भरून काढली पाहिजे. आपण तिला नांगरून ठेवतो. सूर्याची उष्णता तिच्या आत शिरते. आपण तिच्यात खत घालतो. अशा रीतीने तिचा कस पुन्हा भरून काढतो. आपण पृथ्वीसाठी जी ही झीज सोसली. उन्हात नांगरले, खत ओतून पैसे खर्च केले, ही जी आपण शारीरिक व आर्थिक झीज पृथ्वीसाठी केली, ती झीज उत्कृष्ट पीक देऊन पृथ्वी भरून काढते. ती माझ्यासाठी झिजते, मी तिच्यासाठी झिजतो. गीतेच्या तिस-या अध्यायात हे महान यज्ञतत्त्व सांगितले आहे. परमेश्वराने सृष्टी निर्माण करतानाच यज्ञतत्त्व निर्माण केले आहे.

''सहयज्ञा प्रज्ञा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति:।
अनेन प्रसविष्यध्वम् एष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥


प्रभू म्हणाला, ''लोकहो! हा यज्ञही तुमच्याबरोबर मी निर्माण केला आहे, या यज्ञाने सर्व काही मिळवून घ्या. यज्ञालाच कामधेनू समजा. ''  परमेश्वराने सकलसुखाचे साधन जे यज्ञ, ते आपल्या स्वाधीन केले आहे. परमेश्वराच्या नावाने आता रडण्यात काही अर्थ नाही. त्याच्या नावाने हाका मारू नका. त्याच्या नावाने बोटे मोडू नका. आपणांस जर दु:ख असेल, समाजात जर विषमता असेल, दु:ख; द्ररिद्रय असेल, समाजात जर असमाधान, अशांती असेल, प्रक्षुब्धता असेल, तर आपण यज्ञधर्माची नीट उपासना नाही केली हेच त्याचे कारण. ते दु:ख दूर व्हावे असे वाटत असेल, तर आपण यज्ञाची पूजा केली पाहिजे. यज्ञ म्हणजेच साधन, यज्ञ म्हणजेच धर्म, यज्ञ म्हणजेच ईश्वर. आपण ईश्वराचे वर्णन ''यज्ञस्वरूपी नारायण'' असे केले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel