आपण मंगलमूर्तीची पूजा करतो. गणेशचतुर्थीच्या दिवशी आपण गणरायाची मूर्ती आणतो. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करतो. परंतु दोन दिवस, चार दिवस, दहा दिवस ठेवून मूर्तीचे आपण विसर्जन करीत असतो. त्या मूर्तीतून अव्यक्त, अमर असा भाव कायमचा जीवनाशी जोडून त्या मूर्तीला आपण बुडवितो. मूर्तिपूजा हे कायमचे ध्येय नाही. केव्हा तरी मूर्तिपूजेच्या वर मला गेले पाहिजे, हा यातील अर्थ आहे.

मानवी विकासाला मूर्तिपूजेइतकी मूर्तिभंजकता आवश्यकता आहे. आपण मूर्तिपूजक असतो व मूर्तिभंजकही असतो. काल ज्या मूर्तीची मी पूजा करीत होतो, त्याच मूर्तीची पूजा आज मी करीत असेन असे नाही. माझ्या मूर्तीचा उत्तरोत्तर विकास होत असतो. जुनी मूर्ती जाऊन नवीन मूर्ती येत असते. समजा, लहानपणी मी माझ्या आईबापांची मूर्ती पूजीत होतो; परंतु मोठा झाल्यावर ही मूर्ती दूर करून मी भारतमातेची मूर्ती पुजू लागतो. लहान आईचे मोठ्या आईत पर्यवसान झाले. लहान मातेची मूर्ती सोडून मी महान मातेची मूर्ती बनवितो. मी आणखीही पुढे जातो. भारतमातेची मूर्तीही मला मग आवडत नाही. मी विश्वंभराची मूर्ती बनवून तिची पूजा करतो. सर्व मानवजातीची मूर्ती करून तिची मी उपासना करतो. जन्मदात्री माता जाऊन भारतमाता आली; भारतमाता जाऊन मानवजातीची माता आली. अशा प्रकारे उत्तरोत्तर आपण आपली मूर्तिपूजा विशाल करीत असतो.

रामाची मूर्ती मग केवळ रामाची राहात नाही. वालीला मारणारा, शंबुकाला मारणारा, असा राम डोळ्यांसमोर नसतो. रामाची मूर्ती वाढत वाढत ती जगदीश्वराची मूर्ती होते. अयोध्यापती राम मग विश्वव्यापी राम होतो. रामाची मानुष कल्पना नाहीशी होऊन अतिमानुष कल्पना उभी राहते.

अशा रीतीने मूर्तिपूजा ही विश्वपूजा होते. ती लहानशी मूर्ती म्हणजे अनंताची मूर्ती होते. परंतु मूर्तिपूजेतील हा विकास आपणांपैकी पुष्कळांजवळ नसतो. त्या मूर्तीतील अनंतता आपल्या अनुभवास येत नाही. देवळातून बाहेर पडल्यावर त्या मूर्तीचे भानच आपणांस राहात नाही. त्या पाषाणमयी मूर्तीची पूजा करता करता सर्वत्र प्रभूच्या मूर्ती दिसू लागण्याचा योग कधी येत नाही. देवाची मूर्ती त्या मूर्तीच्या पलीकडे जात नाही. परंतु मूर्तातून अमूर्ताकडे गेल्याशिवाय तर समाधान नाही.

लहान मुलाला आई सारखी जवळ हवी असते; ती जरा दृष्टीआड होताच मूल रडते. परंतु त्या मुलाला आईपासून दूर राहण्याची सवय करावी लागेल. आईची भावना मनात ठेवून जगात वावरावे लागेल. मूर्तातून अमूर्ताकडे जावे लागेल. त्या आकारात कोंडलेली आई त्याला विशाल करावी लागेल. आईची प्रेममयी, स्नेहमयी, ज्ञानमयी मूर्ती हृदयांत निर्मावी लागेल. मग तो जेथे जाईल तेथे आई आहे.

तेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।
आपण सारे ज्या वेळेस देवळात जातो, त्या वेळेस भक्तिभाव हृदयात असतो. परमेश्वरासमोर उभे राहून आपण आपले कान उपटतो. हळूच थोबाडीत मारून घेतो, साष्टांग लोटांगण घालतो. प्रदक्षिणा घालून देवाची मूर्ती हृदयात ठसावी म्हणून प्रयत्न करतो. परंतु देवळाच्या बाहेर येताच आपला व्यवहार पूर्ववत् सुरू होतो ! देवळाच्या बाहेरही जेव्हा देव आपल्याबरोबर येऊ लागेल तेव्हाच मूर्तिपूजेचे सार्थक होईल. आजकाल देवळातील देव देवळातच राहतो. तो आपण बाहेर आणीत नाही. आणि यामुळेच समाजात अपार दु:ख व विषमता आहे.

घरच्या आईचे स्मरण मला सदैव हवे, त्याप्रमाणे मंदिरातील मूर्तीचे स्मरण मला सर्वत्र हवे. ती मूर्ती त्रैलोक्यी संचरणारी झाली पाहिजे. मला सर्वत्र तिचे दर्शन झाले पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel