लोकांच्या मनावर हे दोन गुण ठसविण्यासाठी या भारतवर्षात अपरंपार त्याग ओतलेला आहे. पावित्र्याची शंका येताच राम सीतेचा त्याग करतो. आपल्या पावित्र्याचा भंग होईल या भीतीने रजपूत रमणी जीवनाच्या होळ्या पेटविते. पतिमरणानंतर आपल्याला तनमनाने पवित्र राहता येईल की नाही, या शंकेने स्त्रिया पतीबरोबर हसत हसत चितेवर चढत व ज्वाळांना मिठी मारीत ! ती ज्वाळांना मिठी नसून पावित्र्याला मिठी होती ! सूरदासांचे कमळासारखे कमनीय व रमणीय डोळे पाहून एका स्त्रीच्या मनात कामवासना उत्पन्न झाली. हे सूरदासांना कळताच त्यांनी आपले डोळे कापून काढले ! त्या प्रेमविव्हल रमणीने विचारले, 'देवाने दिलेले डोळे असे का काढले ?' सूरदास म्हणाले, 'या सुंदर डोळ्यांपुढे सुंदरतम परमेश्वराचे स्मरण तुम्हांला झाले असते, तर या डोळ्यांना मी धन्यवाद दिले असते. हे सुंदर डोळे देणारा देव किती बरे सुंदर असेल, असा विचार तुमच्या मनात येता तर किती गोड झाले असते ! माझे डोळे कृतार्थ झाले असते. परंतु माझ्या या गोड डोळ्यांनी तुमच्या हृदयात आगडोंब पेटविला. क्षुद्र कामभोगाची लालसा उत्पन्न केली. या डोळयांनी तुम्हाला चिखलात ओढले. जे विषारी डोळे लोकांचा असा अध:पात करतात ते कशाला ठेवू ? त्यांना दूर करणे हेच योग्य होते.'
राम राजा होता. त्याचे उदाहरण जनता डोळ्यांसमोर ठेवणार. 'यथा राजा तथा प्रजा' ही म्हणच आहे. म्हणूनच राजावर अपार जबाबदारी आहे. भारतवर्षातील पुढा-यांनी हे रामाचे उदाहरण कधी विसरता कामा नये. रामाने ध्येयाची पराकाष्ठा गाठली. पावित्र्यासाठी, लोकांची पावित्र्यावरची श्रध्दा अविचल राहावी म्हणून. असा त्याग जेव्हा जनता पाहील, तेव्हाच त्या पावित्र्याची महती थोडी थोडी बहुजनसमाजाला कळेल; एरव्ही नाही.
रामाची हिमालयाच्या धवल शिखरासारखी ही उदात्तता जशी दिसते तितकीच सीतेची सहनशीलता दिसते. पतीला बोल लागलेला तिला कसा खपेल ? स्वत:ची निंदा झाली ह्या दु:खापेक्षा रामाच्या चारित्र्याची निंदा तिला अधिक झोंबली असेल. आणि राम-सीता निरनिराळी थोडीच होती ? ती एकरूपच होती ! सीता कोठेही गेली तरी तिच्या जीवनात रामच ओतप्रोत भरलेला होता, आणि सीता कोठेही असली तरी ती रामाच्या जीवनात मिसळलेली होती.
सीता दुबळी स्त्री नव्हती. पावित्र्याची सामर्थ्य तिच्याजवळ होते. पतिप्रेमाचे कवच ती ल्यायली होती. पतीची इच्छा तीच तिची इच्छा. स्वत:ला स्वतंत्र इच्छाच तिने ठेविली नाही. ती प्रेमात मिळून गेली होती. सीता केव्हाच मरून गेली होती. रामरूप झाली होती. रामाने सीतेला नाही वनात टाकले, स्वत:चेच अर्धे अंग जणू कापून त्याने फेकून दिले होते ! प्रेम म्हणजे प्रिय वस्तूत बुडून जाणे. प्रेम म्हणजे 'आपुले मरण पाहिले म्या डोळा.' सीतेचे प्रेम पराकोटीला पोचले होते. प्रेमाची परम सीमा ती होती. म्हणून सीता भारतीय स्त्रियांचा महान धर्म झाला आहे. स्त्रियांचा धर्म म्हणजे सीता. बायकांच्या शेकडो ओव्यांत सीतेचा हा महिमा आहे :
सीता वनवासी । दगडाची केली बाज
घोर अरण्यांत । अंकुशबाळा नीज
आणि भरताचे ते बंधुप्रेम ! माझा राम वनात जातो, आणि मी का गादीवर बसू ? राम कंदमुळे खाणार आणि मी का लाडू-जिलबी खाऊ ? भरतही नंदिग्रामी बारा वर्षे रामाचे स्मरण करीत राहिला. त्यानेही वल्कले धारण केली. त्यानेही जटा धारण केल्या. तोही कंदमुळांवर राहिला.