आपल्याला किती मुलाबाळांची जोपासना करता येईल, कितींचा विकास करता येईल हे आईबापांनी पाहिले पाहिजे. कारण पुढे वानप्रस्थाश्रम व संन्यास आहेतच. मरेपावेतो काही पाळणा खेळवावयाचा नाही आणि वानप्रस्थाश्रमात शिरताना मुले संसार स्वत: अंगावर घेण्यास योग्य झाली असली पाहिजेत. समाजा, साठाव्या वर्षी वानप्रस्थाश्रम घ्यावयाचा तर त्याचा अर्थ काय?  साठाव्या वर्षी माझे सर्वांत लहान मूल वीस-पंचवीस वर्षाचे असेल. त्याचे शिक्षण झालेले असेल. त्याची संपूर्ण वाढ झालेली असेल. आईबापांच्या छत्राची त्याला आता जरूर नाही. असे सर्व पाहिजे. म्हणजे चाळिसाव्या वर्षापासून पतिपत्नींनी निवृत्तकाम झाले पाहिजे. चाळीस वर्षापर्यतही आठ-दहा मुले व्हायला काय हरकत?  परंतु नुसती मुले उत्पन्न करणे हे काम नाही. त्या मुलांची आपणांस व्यवस्था लावता आली पाहिजे. त्यांचे सर्वांचे संगोपन, सरंक्षण व शिक्षण करता आले पाहिजे.

आपणांस संयम न साधला, तर संततिनियमनाचे उपाय योजण्यास हरकत नसावी;  परंतु माणसास संयमच साजून दिसतो.

गृहस्थाश्रमात संयम, त्याग, वासनाविकारांना आळा घालणे, प्रेम, सहकार्य इत्यादी गुणांचे शिक्षण मिळते. आपण जरा पिकत जात असतो. उच्छृंखलपणा कमी होतो. पोक्तपणा येतो. जीवनाचा नानाविध अनुभव येतो. आंबटपणा जाऊन जीवनात मधुरता येते.

मर्यादीत कुटुंबाची आपण सेवा केली. त्या मर्यादित कुटुंबात जे सेवेचे गुण आपण शिकलो, ते आता समाजात द्यावयाचे. आपण आपल्या कुटुंबाच्या बाहेर येऊन समाज हेच कुटुंब मानावयाचे. अधिक अनासक्त व्हावयाचे, अधिक व्यापक व्हावयाचये. अधिक वाढावयाचेय. आत्म्याचे राज्य वृध्दिंगत करावयाचे.

वानप्रस्थ म्हणजे वनास निघालेला. भवन सोडून वनात जावयास निघालेला हे वानप्रस्थ वनात राहात. तेथे आश्रम चालवीत. तेथे शाळा चालवीत. शिकविणारा असाच शिक्षक नाही. अनुभवी, पोक्त, शांतकाम, हसतखेळत शिकविणारा असाच शिक्षक हवा. आणि वानप्रस्थाला काही फार लागतही नाही. त्याच्या पोटाला दिले म्हणजे झाले.

आज हजारो पेन्शनर आहेत. त्यांनी खरे म्हटले तर जिकडे तिकडे शाळा काढल्या पाहिजेत. शिक्षण दहा वर्षात सर्वत्र फैलावेल. परंतु भारतीय संस्कृतीचे गोडवे गात पुण्याला बंगले बांधून नातवास खेळवीत ते बसतात! आता त्यांनी सर्वांचे नातू खेळविले पाहिजेत. त्यांना शिकविले पाहिजे. त्यासाठी सुंदर आश्रम काढून राहिले पाहिजे. आज समाजात वानप्रस्थ कोणीही नाही. कुटुबांची मर्यादीत आसक्ती सोडून समाजाची सेवा जो नि:स्वार्थपणे करू लागला तो वानप्रस्थ.

आणि मग संन्यास! संन्यासात अमक्याच समाजाची सेवा हीही आसक्ती नाही! संन्याशाला हिंदू नाही, मुसलमान नाही. तो सेवाच करीत राहील. भेदातीत प्रेम देईल. जो पशुपक्षी, किडामुंगी वृक्षवनस्पती यांचाही मित्र होणार, तो का मानवांत खंड पाडीत बसेल? संन्याशी न ओळखील महाराष्ट्रीय, न पाहिल गुजराती, तो सर्वांच्या वर जाईल. या भेदांच्या चिखलातून अतीत होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel