हे अनुभव दोन रीतींनी अमर होतील. काही वस्तूंचा त्याग व काही वस्तूंचा स्वीकार. जे अमंगल आहे त्याचा त्याग करू, जे मंगल आहे ते घेऊ. विदेशी टाकू व खादीचे व्रत घेऊ. खादीच्यामुळे ते महात्माजींचे दर्शन कायमचे राहील, तो प्रसंग आठवेल. त्या वेळच्या भावना आठवतील. ते वातावरण आठवेल. आपले असे अनुभव अडून जाऊ देऊ नयेत. हे मोलवान अनुभव, पवित्र प्रसंग म्हणजे तर जीवनातील खरी मिळकत. परंतु तीच आपण विसरत असतो, फेकून देत असतो.

आपण घरून कोठे दूर जाऊ लागलो म्हणजे आपल्या हातावर दही देतात. ते दही खावयाचे, परंतु हात धुवावयाचे नाहीत. हात तसेच चाटून ठेवावयाचे. आरोग्याच्या दृष्टीने पाहणा-यास ह्यात बावळटपणा वाटेल; परंतु भावनांच्या दृष्टीने पाहणा-यास त्यात सहृदयता दिसेल. दही स्निग्ध वस्तू आहे. स्निग्धता विसरू नकोस. स्निग्धता धुऊन टाकू नकोस. जातानाही तुझ्या हातावर मी स्नेहाची स्निग्धता ओतीत आहे. ते चिकट ओशट हात, म्हणजे प्रेमाने हृदये चिकटविण्याची साधने आहेत. ओला हात घेऊन जा, येथून कोरडा जाऊ नकोस, असा त्यात भाव आहे. आणि तो हात तसाच राहू दे, म्हणजे ते प्रेम, ती आर्द्रता कधी विसरू नकोस.

जावयाच्या हातात वर लग्नाच्या भोजनाच्या वेळेस तुपाची आपोष्णी वाढतात. त्यातही हाच भाव आहे. मुलीची माता म्हणते, 'हे प्रेम घ्या. तुमच्या हाती मुलगी सोपविली. तो तुमचा हात कठोर नका करू. तो तुमचा हात स्नेहार्द्र असू दे. प्रेमाने भारलेल्या हाताने माझ्या कन्येचा हात धरा.' ती तुपाची आपोष्णी घेणारे जावई आपला हात सदैव प्रेमळ राखतात का ? ती तुपाची आपोष्णी पाहताच माझे हृदय भरून येते. जावयाचे हृदय भरून येते की नाही, मला माहीत नाही. परंतु त्या प्रतीकात मला सहृदयतेचा सागर दिसून येतो.

वधूवरांच्या अंगाला हळद लावितात. वस्त्रेही हळदीत रंगवितात. पिवळ्या रंगाचा काय अर्थ ? हळद आरोग्यदृष्टया चांगली म्हणून ती वापरतात असे कोणी म्हणतील; परंतु ते आरोग्याच्या प्रतीकापेक्षा निराळेच काही आहे असे मला वाटते. तुमचे सारे सोने होवो, असा त्यात भाव आहे. सुखाचा संसार सोन्यासारखा होवो. अंगावर पिवळ्या सोन्याचे दागिने नसतील ! ते जड दागिने नसले तरी चालतील. आपल्या संसारात त्यामुळे व्यत्यय नाही येणार. कोठेही कसल्याही परिस्थितीत आपण आनंदाने राहू, असा त्यात भाव असावा असे वाटते. हृदयाची संपत्ती त्यामुळे दिसते. भावनांच्या संपत्तीची, सहानुभूतीच्या सोन्याची वाण न पडो, असे ती हळद सुचवते. जीवनाचेच सोने करू असा त्यात भाव आहे.

संक्रान्तीस आपण तिळगूळ देतो. तीळ म्हणजे स्नेह. त्या स्नेहात गूळ मिसळावयाचा. म्हणजे कृत्रिम, वरपांगी, अंतर्विष असे प्रेम अत:पर नाही देणार. तर त्या स्नेहात खरोखरच सद्भाव असेल. ते मधुर प्रेम असेल. ते मागचे सारे विसरू. आपल्या जीवनाचे संक्रमण होऊ दे. जीवनात क्रांती होऊ दे. पूर्वीचे द्वेषमत्सर जाऊन प्रेमाचे-सत्प्रेमाचे संबंध आता जोडू देत.

हुताशनीस होळी करून बोंब मारावयाची. हुताशनीच्या आधी महिनाभर शिमगा चालतो. मनुष्याच्या मनातील दबलेल्या वैषयिक वृत्तींस बाहेर काढून त्यांना जाळावयाचे असा त्यात हेतू आहे. आणखी काय आहे मनात, ओक. आणखी काय आहे मनात, बोल. मनातील सारी घाण बाहेर काढावयाची. दहा दिवस लहान होळ्या; परंतु शेवटी प्रचंड होळी पेटवावयाची. जीवनातील सारी घाण जळली हे जगाला जाहीर करावयाचे. 'ही पहा घाण जाळली सारी.' बोंब मारून जगाला घाण दाखवून, ती त्याच्यादेखत जाळावयाची आणि मग ती राख अंगारा म्हणून लावावयाची. कारण त्या राखेतून नवजन्म होणार. जीवनाला खरा विशुध्द रंग चढणार ! होळीशिवाय रंगपंचमी नाही. जीवनातील घाण जाळा व मग रंगपंचमी खेळा. मग खरा आनंद ! शंकराच्याच देवळात बू बू करतात. कारण शंकराने मदनाची होळी पेटविली होती ! देवालयात कासव असते. कासवाप्रमाणे इंद्रियांवर संयम मिळवा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel