“पोरानं का चोरानं मला नाही माहीत.”
“तो पूर्वीचा टपालवाला मला ओळखी. तुम्ही नवीन आलात वाटतं !”
“तो गेला बदलून. सही करा.”
“मी कोठून सही करणार? आम्हांला का लिहिता येतं, दादा ?”
“आंगठा घ्या. इथं कोणाची तरी साक्ष हवी. कोणाला बोलवा.” रमीने शेजारी इकडे-तिकडे पाहिले. कोणी चिटपाखरु नाही.
“दादा, सारे कामाला गेलेले. कोणाला आणू ? द्या पैसे. माझेच आहेत. पोर तापानं फणफणली आहे. मोठ्या डॉक्टरला आणीन; त्याला देईन हे पैसे.”
“साक्षीशिवाय कसे देऊ? मी चाललो.’
“उद्या आणाल का भाऊ?”
“या खेड्यात दोनदा येतं टपाल आठवड्यातून. उद्या कसा मी येणार? आता चार दिशी. मी जातो. मला तुझंच एकटीच घर आहे का म्हाता-ये?”
तो टपालवाला निघून गेला. त्याला आणखी गावे घ्यायची असतील. रमी रडू लागली. पोराने पोटाला चिमटे घेऊन पैसे पाठवले. परंतु मिळत नाहीत ! आपले असून मिळत नाहीत. म्हणे सही कर, आम्हांला का लिहावाचायला येते ? असे मनात म्हणत ती पोरीजवळ जाऊन बसली.
तिसरा प्रहर झाला. तो कोण आला मुलगा ? त्याच्या भोवती ती पाहा लहान मुलांची गर्दी. कोणाला चित्रे देत आहे. कोणाला खाटीमिठी लिमलेटची वडी. तो एकाला म्हणाला-
“अरे तुझ्या हातांना ही खरुज आहे. थांब, हे मलम चोळतो. रोज हात धुवून ते लावीत जा.”
“माझे डोळे बघता का?”
“बघू? लाल झाले आहेत. पुढच्या वेळेस औषध आणीन हं.”
“त्या रमीकडे येता ? तिची मुलगी बाबी फार आजारी आहे.”
“दाखवा घर.”
रमेश रमीच्या घरी आला. मुलीजवळ माय बसली होती.