“सेवादलातील मुलंमुली शिकवतील. तुमच्या गावी नाही का सेवादल ? कोणतं तुमचं गाव?”
“टाकरखेडे.”
“अंमळनेरच्या मुलांना मी लिहीन. ते तुमच्या गावात सेवादल काढतील. रात्री शिकवतील. सकाळी सफाई करतील.”
“तुम्हाला असं करायला कोण सांगतो ?”
“गांधीबाप्पा.”
“ते तर गेले ना रे भाऊ ? सारं जग हळहळलं.”
“ते गेले तरी त्यांची शिकवण आहे. ते बघा लांबकाने आलं. ते दिवे दिसताहेत.”
आणि गाव आला. गणप्याने राधीला तिच्या मुलीच्या घरी थेट नेले. गाडी कोणाची
म्हणून मुलगी बाहेर आली, तो तिचीच माय समोर उभी.
“माय वो, कोठून आलीस ?”
“तुला बघायला, भेटायला आले. रस्ता चुकले. या दादानं गाडी जोडून आणलं. देवमाणूस. तू बरी आहेस ?”
“आता बरं वाटतं.”
गणप्यानं तेथे भाकरी खाल्ली. तेथील मुले त्याच्या ओळखीची होती. तेथे सेवादल होते. तेथे साक्षरतेचा वर्ग चालू होता. तो त्या वर्गाला गेला आणि त्याने राधीची गोष्ट सांगितली. शेवटी म्हणाला, “ज्ञान हा खरा दिवा. ज्ञान हा खरा प्रकाश. हातात कंदील आहे; परंतु पाटी वाचता येत नाही; तर रस्ता चुकायचा. भलतीकडे माणूस जायचा. ज्ञान सर्वांना डोळस करते. म्हणून शिका नि सर्वांना शिकवा. भारतात आता कुणाला अडाणी नका ठेवू.”