“आई, डोळे जळले गं, भाजले. अयाई, आग-आग ! आई, तू आयोडिन घातलसं डोळ्यांत !” मंदी रडत ओरडत म्हणाली,
आई घाबरली. ती धावत धावत डॉक्टरांकडे गेली.
“काय हो, काय झालं ?” डॉक्टरांनी विचारले.
“डॉक्टर लवकर चला. पोरीच्या डोळ्यांत आयोडीन पडलं ! भाजले डोळे. चला...”
“असं कसं केलंत ? बाटल्यांवर लिहून ठेवलेलं होतं- हे डोळ्यांचं औषध, हे आयोडीन- तुम्ही बघायला नको ?”
“डॉक्टर, आईबापांनी लिहिवाचायला शिकवलं नाही. काय करायचं ? अशी अडाणी राहिले. चला आधी.”
“तुमच्या घरात साबुदाणा आहे का ?”
“आणीण नसला तर.”
“त्याची पातळ लापशी करा. चमचा चमचा डोळ्यांत घालायची, पुन्हा काढायची. डोळे त्या लापशीनं धूत रहायचं. शेवटी निर्मळ लापशी डोळ्यांतून बाहेर येईपर्यंत असं करायचं. जा, मी येतोच.” आई लगबगीने घरी गेली. थोड्याच वेळाने डॉक्टरही तेथे गेले. लापशी तयार झाली. ते डोळ्यांत घालीत होते. डोळ्यांना बरे वाटले.
“होय डॉक्टर, नीट होईल ना डोळा ?”
“होईल हो; घाबरु नको. आणि डोळे बरे झाले म्हणजे आईला आधी लिहायला शिकव. तू शाळेत जातेस, परंतु तुझ्या आईला कोण शिकवणार ? आईला लिहितावाचता येत असतं तर तुझे डोळे जायची आज पाळी आली नसती. खरं ना ?”
“आई शिकेल का डॉक्टर ?”
“तुझ्या डोळ्यांची गोष्ट त्यांच्यासमोर आहे. शिकतील. शिकाल ना, मंदाच्या आई ?”
“मंदाने शिकवले तर शिकेन.”
“मी आईची मास्तरीण !”
“परंतु आईला छडी नको हो मारु.” डॉक्टर म्हणाले.