“मला लांबकान्याला जायचं.”
“मग शिंदखेडचं देऊ तिकीट, का दोंडाईच्याचं देऊ ?”
“कोणतं बी द्या.”
तिकीट घेऊन फलाटवर राधी आली. भगभग करीत गाडी आली. आज नरढाण्याचा बाजार होता. गाडीत गर्दी. राधी कशीबशी आत घुसली.
“तिकडे दूर हो.” कोणी म्हणाले.
“पोरीकडे चालले रे भाऊ. ती आजारी आहे. बसू नको माझ्या गाठोड्यावर. आत पापड आहेत; मोडतील.”
“डोकीवर घे तुझं गाठोडं.”
राधी गाठीडे डोक्यावर घेऊन उभी राहिली. आणि शिंदखेडे स्टेशन आले.
“लांबकान्याला जायचं. इथंच उतरु का रे भाऊ ?”
“नरढाण्याला का नाही उतरलीस ? उतर; इथं उतरलीस तरी चालेल.”
राधी उतरली. पडली स्टेशनाबाहेर. रस्ता विचारुन निघाली. तिसरा प्रहार टळला होता. झपझप ती जात होती. तो पुढे दोन रस्ते आले. तेथे एक खांब होता. रस्ते कोठे जातात ते त्याला लावलेल्या पाटीवर लिहिलेले होते. परंतु राधीला का वाचता येत होते ? आजूबाजूला कोणी माणूस दिसेना. ती निघाली एक रस्ता घेऊन. देव मावळला. कोठे आहे गाव ? गुराखी जात होते. गाई घरी जात होत्या.
“का रे पोरांनो, लांबकाने गाव इकडेच आहे ना ?”
“इकडे तर दळवाडे. लांबकाने तिकडे राहिलं. ते रस्ते फुटले ना तिथला दुसरा रस्ता.”