“अग, त्यांना इकडे होईल विटाळ. बसू दे त्यांना तिकडे संडासाजवळ सोवळ्यात.” एक प्रतिष्ठीत बाई म्हणाली.
“या आजी, आमच्याजवळ बसा. खाली घाण असते.” विजया म्हणाली. इतक्यात बोगदा आला. मोठा बोगदा.
“ही गाडी कुठं जाते ?” आजीबाईने विचारले.
“पुण्याला.” सरला म्हणाली.
“पुण्याला ?”
“हो. का ? घाबरु नका.”
“मला जायचं येवल्याला. ही नाशिकची गाडी नव्हे का ?”
“ती हिच्या आधी होती आजी.”
“म्हातारीला काय कळे; आता कसं होईल माझं ?”
“घाबरु नका. पुण्याला चला आमच्याकडे. आम्ही तुम्हांला दौंड-मनमाडच्या गाडीत बसवून देऊ. सरळ येवल्याला जाल. उशीर होईल इतकंच.”
“बरोबर कोणी नसंल म्हणजे अशी फजिती होते.”
“आजी, तुम्हांला वाचायला येत असतं तर अशी नसती फजिती झाली. गाडीवर लिहिलेलं असतं. शिवाय कोणती गाडी केव्हा येईल ते वेळापत्रकात असतं. तुम्हांला वाचता येत नाही. घड्याळ समजत नाही. म्हणून ही अशी फजिती !”
“खरं आहे मुलींनो.”
“आता शिका लिहावाचायला. आम्ही सेवादलातील मुली, आम्ही वर्ग चालवतो. त्या कर्जतला लहान मुलींबरोबर चार चार मुलांच्या आया, अशा शेतक-यांच्या बायाही शिकायला येतात. गंमत होते. लहान मुली मोठ्या बायकांच्या चुका दुरुस्त करतात.”
“मी का आता शिकू ?”