हिंदू धर्मात ज्ञानाची फार थोरवी आहे. ज्ञानरुपी परमेश्वर असे आम्ही म्हणतो. ब्रह्माची व्याख्याही अशीच. महंमद पैगंबरही म्हणायचेः “जो सृष्टीचे ज्ञान मिळवतो त्याने शंभर वेळा नमाज म्हटला. ज्ञानासाठी हजारो मैल जावे लागले तरी जा.” अशी ज्ञानाची महती आहे. युरोपियन स्त्रिया एकट्या जगभर जातात. त्यांना ना भय ना भिती. कारण त्यांना सारे माहीत असते. परंतु हिंदी स्त्रिया एकट्या कोठे जाणार नाहीत. त्यांना कशाची माहिती नसते, वाचता येत नाही. कोठे चौकशी करावी, कोठे विचारावे, कळत नाही. सारी फजिती ! तुकाराम महाराजांनी म्हटले आहेः
“अवगुणा हाती। आहे अवघीची फजिती।।”
समर्थ सांगतातः
“दिसामाजी काही तरी ते लिहावे।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे।”
परंतु समर्थांची वाणी आपण ऐकली नाही. अज्ञानामुळे गुलाम झालो, आता स्वराज्य आले आहे. जर सारे सुशिक्षीत होतील, तरच ते टिकेल.
ती बघा एक बाई. एकटीच दिसत आहे. कोठे जायचे आहे तिला ? दादर स्टेशनवर ती केव्हाची उभी आहे. पुणे, मद्रास, नागपूर सगळीकडे जाणार्या गाड्या येथून जायच्या. या आजीबाईला कोठे जायचे आहे ? एकापाठोपाठ तर गाड्या येतात.
ती पाहा गाडी आली. बायकांच्या डब्यात आजी घुसली. बाजुला गाठोडे घेऊन बसली. गाडी सुरु झाली. सुशिक्षीत बायका डब्यात होत्या. कोणी पत्ते खेळू लागल्या. कोणी सुया काढून विणू लागल्या. कर्जत स्टेशन आले. दोन मुली आत चढल्या. त्यांना बाकावर जागा मिळाली. आजीबाई खालीच बसलेली होती.
“आजी, इथं वर बसा.” सरला म्हणाली.
“बरी आहे इथं मी.” आजीबाई म्हणाली.