“अगं बया ! आता कसं करु ?” असे म्हणून ती मटकन खाली बसली. आता रात्र होणार, अंधार !”
“आमच्या गावात चला.” गुराखी म्हणाला.
“कोणी ओळखीचं नाही रे.”
“तो गणप्या आहे. तो तुमची करील व्यवस्था.”
“तो का गांधीचा मनुष्य आहे ?”
“हो. तो सेवादल चालवतो. सर्वांच्या उपयोगी पडतो. मागं ते वादळ झालं ना ? छपरं उडाली. झाडं पडली. गणप्या व त्याचे मित्र यांनी किती काम केलं ! गरिबांच्या झोपड्या त्यांनी पुन्हा शाकारुन दिल्या. चला, उठा.”
राधी गावात आली. गणप्या भेटला.
“मी आता गाडी जुंपतो. पाखरांसारखे बैल आहेत. तुम्हांला पोचवतो, आई. थोडी भाकरी खाऊन घ्या. चालून दमला असाल. तुम्ही भाकर खा; तोवर गाडी जोडतो.” गणप्या म्हणाला.
राधीने भाकर खाल्ली, आणि गणप्याने गाडी जुंपली. बैल निघाले हरणासारखे.
“तुम्हांला वाचता येत असतं तर अशी फजिती नसती झाली.” गणप्या म्हणाला.
“खरं तुझं म्हणणं. त्या खांबावर पाटी होती, परंतु आमचे डोळे असून फुकट ! केवढा हिसका पडला. तू देवमाणूस भेटलास म्हणून बरं. नाही तर रातची कोठे गेली असते, भाऊ?”
सर्वांनी लिहावाचायला शिकलं पाहिजे. त्याचा फार उपयोग असतो.”
“आम्हा बायांना कोण शिकवणार ?”