परंतु मिलमध्येही जितके सूत निघत नाही, तितके बारीक सूत हिंदुस्थानातील बायका काढीत. २०० नंबरपर्यंत, त्याहून जास्त बारीक सूत येथील भगिनी काढील. हिंदुस्थानातील राजेराजवाडे, श्रीमंत-जहागीरदार, धनिक लोक यांना या तलम सुताचे कपडे वापरण्याची सवय झालेली. त्यांना इंग्लंडमधल्या मिलच्या कपडा आवडेना. विणकर महाग पडणारे-करामुळे जास्तच महाग पडणारे- हे तलम सूत खरेदी करीत. कारण देशात त्याला श्रीमंत गिर्हाईकी होती. तेव्हा इंग्रज याच्याही पुढे गेले. या विणकरांना आता नऊ नंबरापर्यंतच सूत विणण्याची परवानगी द्यावयाची, असे सरकारने मनात ठरवले. या कायद्याने, या एका दगडाने दोन पक्षी मारले गेले. तलम सूतही खप नसल्यामुळे कोणी काढीना ; ते खपेना, विणकर विकत घेईना ; विणकरालाही तलम कापड विणून जो जास्त पैसा मिळे तोही बंद झाला. सूत कातणारे भिकारी झाले, विणणारेही भिकारी झाले.
विणकरांना आता देशातील एक तर जाडेभरडे सूतच विणण्याची पाळी आली, नाही तर विलायती सूत वापरण्याची पाळी आली. विणकरांना वाईट वाटू लागले. कलावानांना वाईट वाटू लागले.
त्या एका कलावानाचे नाव राखाल होते. राखाल उत्कृष्ट विणकर होता. अत्यंत तलम सूत कसे हळूवार विणावे, हे त्याच्याच त्या सुकुमार बोटांना माहीत ! एकेक पान विणायला त्याला महिना महिना लागे, दोन दोन महिने लागत ! काय घाई आहे ? उत्कृष्ट कला ही घाईने थोडीच निर्माण होत असते ! एका वर्षात दोनचार पातळे तो विणी व वर्षाची पुंजी मिळवी ; वर्षाची जीविका मिळवी.
परंतु आता त्याला जाडेभरडे सूत विणायची पाळी आली. त्याला वाईट वाटले. त्याच्या गावात विलायती सुताचे गठ्ठे येऊ लागले. ते पाहून त्याच्या डोळ्यांत अश्रू येत. कोठले हे सूत ? साता समुद्रांपलीकडचे अमंगल सूत ! कशाला येते हे आमच्या गावात ? या हातांनी हे विणायचे का ? ज्या हातांनी अत्यंत तलम कपडा विणला, त्याच हातांनी हे विणायचे का ? या हातांचा हा अपमान आहे. माझ्यामधील कलेचा हा अपमान आहे. ज्या पूर्वजांनी मला ही दिव्य विणकला दिली, त्यांचा हा अपमान आहे. तो आपला माग पाही व रडे ! मी विणले नाही तर ही विद्या मरुन जाईल, सूत काढणा-यांची विद्या जाईल, कलेची हानी होईल ! छेः, त्याला ते सहन होईना.
बाजारात विदेशी कपडा सर्वत्र दिसू लागला. हिंदुस्थानातील तलम कपड्यांची सर त्याला येत नव्हती. हिंदुस्थानातील विणकर जोड कपडा विणीत त्यात कलावानांचा आनंद असे, ते त्याचे अपत्य असे. त्यात त्याचे हृदय असे. त्याच्या हृदयाची सौम्यता, स्निग्धता, मातांच्या हृदयाची प्रेमळता त्या कप़ड्यात असे. यंत्रांनी निर्माण केलेल्या कपड्यात लवलवीतपणा दिसे. परंतु तो सुकुमारता नसे. आणि तितकी तलमता तर नव्हतीच. परंतु यंत्रांनी जरी कदाचित अत्यंत बारीक सूत कातले व विणले तरी हाताची सुभगता त्यात येत नसे. इतकी सुभगता हिंदी विणकराच्या हातात होती.