राखाल सहकुटुंब देवाघरी देवपूजा करावयास गेला. दिगंबर राय तुरुंगात होते. त्यांना त्या दुष्टांनी तेलाच्या जड घाण्याला बैलाप्रमाणे जुंपले. इतरही अभागी कैदी होते. ते असेच कोणी कलावान होते. कंपनी ज्या किंमतीत मागेल त्या किंमतीत फक्त कंपनीचाच माल विकावयाचा ; दुसर्‍याचा खाजगी माल विणून विकावयाचा नाही. कंपनी विकत घेऊन वाटेल त्या किंमतीस जगाला विकील. विणकराजवळून चार आण्याला घेऊन गिर्‍हाइकास दहा रुपयांस विकील, असा जो कंपनीने अत्यंत नीच कायदा पैसे उकळवण्यासाठी सुरू केला होता- त्या कायद्याला न मानल्यामुळे ते कैदी आले होते. त्या वेळच्या तुरुंगात कलापूजक पवित्र आत्मेच भरलेले होते ! त्यांना फटके मारून त्यांची गाढवावरून धिंड गावोगांव काढीत, गावोगांव त्याला फटके मारीत. शेवटी तुरुंगात लोटीत ! केवढा अन्याय ! कंपनीलाच माल फक्त विकावयाचा व ते देतील ती किंमत ! माल उत्कृष्ट पाहिजे. गाई-गरीब हिंदुस्थानच्या गाई ! पिळून पिळून घेतले गोर्‍या राक्षसाने. दिगंबर रायांना त्या अभागी, परंतु स्वाभिमानी दिलदार कारागिरांबरोबर काम करावयास लाज वाटत नसे. ते आपली सारी शक्ती लावीत. ते वृद्ध झाले होते. तरी आपला प्राण कोल्हू ओढण्यात ओतीत. इतरांना त्रास होऊ नये म्हणून ते जपत. आपली शिकस्त करीत. तरी त्यांच्यावरचे पोलीस  “अच्छा तर्‍हेसे जोर लगाव” असे म्हणून दिगंबर रायांच्या पाठीत मारीत ! अरेरे – ज्याने हजारांना आधार दिला, त्याच्या अंगावर दंडे मारले जात होते!

दिगंबर रायांच्या हाताला फोड आले. ते मृदू- मऊ हात... ते सुखी शरीर... त्यांनी दोन दिवसांत माती झाली- तरी  दिगंबर राय एक शब्द बोलत नसत. ते जणू सुखदुःखातील योगी झाले होते. दुःखातही जगन्माउलीचाच जणू हात त्यांना दिसे. ते मनात म्हणत, “आई, तू मज मार मार ! आई, मज मार, मार !”

दिगंबर रायांच्या अंगात ताप भरला होता तरी ते निजले नाहीत. त्यांनी कोणाला सांगितले नाही. ताप आल्यामुळे ते त्यांचे एकेकाळी सुंदर असणारे क्षीण झालेले डोळे लाल झाले आहेत. त्यांच्या नाकातून भराभरा कढत श्वास निघत आहेत, अंग थरथरत आहे, घशाला कोरड पडली आहे. डोके भ्रमत आहे. पडू असे त्यांना वाटत आहे. तरी ते घाण्याला लागले. पडले ! दिगंबर राय पडले ! ! पोलिसांनी वॉर्डरांनी दंड मारले. “ढोंग करता है साला, पेट देखो कैसा हत्तीके माफक है. उठो, खडे रहो. ढोंगबाजी नही चलेगी इधर, बाबू !” असे म्हणून दंडे मारले. दिगंबर राय- साधुचरित दिगंबर राय- ते ध़डपडत आहेत. पुन्हा उठत आहेत. पुन्हा कोलमडत आहेत. पुन्हा मार बसत आहे.

ते राक्षसी दृश्य पाहून त्या इतर कैद्यांना काहीच वाटले नाही ? तो पाहा एक रागाने थरथरत आहे. त्याचे डोळे पाहा, तो पाहा ओठ चावीत आहे. मुठी वळीत आहे. एकदम त्याने उडी घेतली. तो दंडा हिसकावून घेतला व त्या वॉर्डरला तो बडवू लागला. दुसरेही कैदी शिपायांचा दंडा घेऊन हाणू लागले. शिट्ट्या झाल्या. मग त्या कैद्यांनी खूप सूड उगवला ! तेथे वॉर्डर, शिपाई व दिगंबर राय तिघे बेशुद्ध पडले होते !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel