सारे बायकांचे सुखसोहळे चालले होते. वधूवरे अद्याप लहान होती. लहान मुलामुलींच्या लग्नात सारी मोठ्याच माणसांच्या मनाची हौस फे़डून घ्यावयाची असते ! ही दोन सरळ व अल्लड मुले, ती त्या वेळेस निमित्ताला धनी असतात. आता वर मिरवत जावयाचा होता. मंगल वाजंत्री वाजत आहेत. बार उडत आहेत. तो पाहा घोड्यावर नवरदेव बसला. त्याच्या अंगावर ते सुंदर कपडे आहेत. जणू चंद्रकिरणांचीच ती वस्त्रे बनवली आहेत असे दिसत आहे. नवरदेवावर चौर्‍या उडवल्या जात आहेत, मोर्चेले उडवली जात आहेत, अब्दागीर धरलेला आहे. आनंद सर्वत्र पसरून राहिला आहे. मिरवणूक आली. श्वशुर-श्वश्रूंनी नवरदेवाचे, त्या पवित्र अतिथीचे, त्या पवित्र दान मागावयास आलेल्या भिक्षेकर्‍यांचे स्वागत केले. एकच गर्दी- एकच आनंद ! वराचा हात धरून त्याला मंडपात एका बाजूला मांडलेल्या पाटावर बसवण्यात आले. त्या ठिकाणी उपाध्ये मंडळी बसली आहेत. वेदमंत्रपठन सुरू झाले. भटजींच्या मुखांची व हातांची धावपळ सुरू झाली !

मंडप सारा भरून गेला आहे. ते पाहा दूरदूरचे आप्तेष्ट आले आहेत. ते सरकारी अधिकारीही लोडांशी बसले आहेत. सुंदर गालिचा घातलेला आहे. चांदीचे पानसुपारीचे तबक तेथे ठेवलेले आहे. स्वच्छ पिकदाणी आहे. मंडपात गोरगरीब सारे जमले आहेत. नवरदेवाची पूजा सुरू झाली. त्याचे पाय धुण्यात आले. त्याच्या कपाळाला गंध लावले. मंगलाष्टके सुरू झाली. ‘सावधान, सावधान’ शब्द उच्चारले जाऊ लागले. त्या लहान वधूवरांचे लक्ष तिकडे नव्हते. ती भटजींकडे पाहून हसत होती. मध्येच डोक्यावर टाकल्या जाणार्‍या अक्षतांनी संतापत होती. काय सटासट तांदूळ मारतात, असे त्यांना वाटत होते. बसून बसून त्या छोट्या वधूवरांचे पाय दुखून आले. हिंडणारी, खेळणारी, उडणारी लहान चिमणी पाखरे ती. तेथे गप्प बसली होती. ‘सावधान, सावधान’ चालले होते. झटपट अंतरपाट उडवण्यात आला. परस्परांच्या गळ्यात माला घालण्यात आल्या. ‘वाजवा रे वाजवा !’ बाजा सुरू झाला. एकच गर्दी उसळली. पानसुपारी वाटायला सुरूवात झाली. फुलांचे गुच्छ, अत्तर-गुलाब द्यावयास सुरूवात झाली.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel