“पायी कशी जाणार ? माझी गाडी घेऊन घरी जा. मग पाठवा परत. बरोबर फराळचे न्या. वाटेत दोन घास तरी खा.” दिनेशचंद्र म्हणाले.
त्यांनी गाडी व गाडीवान दिला. स्नेहमयीला ते अंतर किती लांब वाटले ! पंख असते तर, अप्सरांना पंख असतात ते मला अर्धी घटका मिळते तर- मला पाखराचे रुप घेता आले असते तर... त्यांच्या तुरुंगातील गजांतून आत पाहिले असते. त्यांना कोणी पाणी न देता तर मी चोचीने त्यांच्या तोंडात पाणी घातले असते !
त्या रात्री दिगंबर राय पाणी पाणी करीत होते. स्नेहमयी मनात म्हणत होती, “मी त्यांना पाणी चोचीने दिले असते. माझ्या पंखांनी त्यांच्यावर नाचून फिरून त्यांना वारा घातला असता. त्यांची तलखी दूर केली असती. मी गाणी गाऊन त्यांना रिझवले असते. मी त्यांना मनमुराद पाहिले असते. त्यांच्याभोवती हिंडले असते. त्यांच्याकडे वाकडे पाहणार्यांच्या डोळ्यांना चोच मारली असती ! देवा- दे रे मला पंख- दे रे थोडा वेळ ! उद्या भेटतील मला. अंगाला मग तेल लावीत. चोळीन. अंग दुखू लागले असेल. तेथे नसेल अंथरावयास. नसेल पांघरावयास, तर गादीगिर्दी कोठली ? रात्रभर पाय चेपीत बशीन. गाणी म्हणीन व झोपवीन. कपाळाला उद्या रात्री तेल चोळीन. कढत कडकडीत साखर घातलेले दूध देईन. पुन्हा हिंदू-फिरू लागतील. शेतकरी चौकशीला येतील. बारा तास- व माझे हात त्यांच्या पायाजवळ असतील !
स्नेहमयी घरी आली. ती दिनेशचंद्रांची गाडी गेली. मुलगा घरी ऐषआरामात दंग होता. घरदार सारे मोडून, शेतीभाती खंडाने लावून मोठा मुलगा कलकत्त्याला जाऊन राहण्याची तयारी करीत होता. तो स्नेहमयी आली. “सुटणार हो, ते आज सुटणार आहेत. मी गाडी घेऊन जाते, तू चल, माझ्याबरोबर चल !” स्नेहमयी मुलाला म्हणाली.
“मा, मी येथे तयारी करुन ठेवतो. आथंरुण घालून ठेवतो. आंघोळीला पाणी तापवून ठेवतो. तूच घेऊन ये बाबांना. माझ्यावर ते रागावतात !” मुलगा म्हणाला.
“त्यांचा राग ! कसला रे तो राग ? त्यांना का राग असतो तरी ? बरे, तू येथेच राहा. सारी तयारी करुन ठेव. येताच विश्रांती घेतील. आता भरपूर विश्रांती हवी. मी जाते.” असे म्हणून स्नेहमयी निघाली. घरची गाडी घेतली. गाडीत गादी घेतली. लोड ठेवला. “अरे गादी घालू नकोस. घेऊन ठेव. लोड घेऊन ठेव. ते त्यावर बसतील, पडतील. मी नाही त्या गादीवर बसणार. ती गुंडाळून बरोबर घे. ते भेटले म्हणजे त्यांचे डोके मांडीवर घेऊन मी बसेन गादीवर, गाडीत हो. गुंडाळ ती. मला तो झोर्या आंथर.” स्नेहमयीने गाडीवानाला सांगितले.