दिगंबर रायांची पत्नी- स्नेहमयी- तिच्या मनाची काय स्थिती झाली असेल ? मोठा मुलगा निरुपयोगी होता. लहान मुलगा- ज्याचे लग्न लागले होते, त्याला सासुरवाडीला पाठवले. ती मोकळी झाली. ती एकटी पायांनी कलकत्त्याला गेली. तिच्या पतीचे काही बडे मित्र होते. त्यांची घरे धुंडाळीत ती गेली. दिगंबर रायांची पत्नी आपल्याकडे आल्याची कुणकुण जर पोलिसांनास, सरकारच्या पित्यांना कळली तर आपलाही सत्यानाश व्हावयाचा- म्हणून ते कोणी स्नेहमयीस दारात उभे करीतनासे झाले. गरीब स्नेहमयी ! जिने खेड्यापाड्यांतून गोरगरिबांना अपार मातृवत् स्नेहरस दिला, तिला त्या बड्या धेंडांकडून इवलीही करुणा दाखवण्यात येऊ नये काय ? ती वणवण करीत हिंडे. कोठे रस्त्याच्या कडेला झोपे. ना खायला, ना प्यायला. गरीब बिचारी स्नेहमयी ! थकून भागून गंगेच्या किनार्‍यावर जाऊन बसली होती. घाटावर बसून गंगेमध्ये नेत्रगंगा सोडीत होती.

तो कोण बरे पोक्त वयाचा पुरुष ? चेहरा मोठा रुबाबदार, गंभीर आहे. परंतु त्या डोळ्यांत वात्सल्यही आहे का ? रडणार्‍या केविलवाण्या स्नेहमयीला पाहून तो पुढे आला व म्हणाला, “आपण का रडता ? काय दुःख आहे ? माझ्या घरी चला.”

ते प्रेमळ शब्द स्नेहमयीने ऐकले, “आपण स्वप्नात तर नाही ना, हे शब्द ऐकत ? या जगात असे शब्द ऐकायला मिळतील का ? हो, आपणच असे शब्द नव्हतो का बोलत ? आपल्यासारखा दुसरा कोणीच का नसेल !”

“उठा, माई उठा- चला, पलिकडे माझी गाडी उभी आहे. आपण गाडीत बसून जाऊ.” तो गृहस्थ म्हणाला.

स्नेहमयी त्या गाडीत बसली. तो पोक्त धर्मात्मा बसला. घोड्याची गाडी जाऊ लागली. सायंकाळ होत आली होती. भागीरथीवरचे शीतल भक्तिमय वारे येत होते. स्नेहमयीचे अश्रू सुकवू पाहत होते.

स्नेहमयीने रडत रडत सारी हकीकत सांगितली ! “बिचारा राखाल तो तर फासावर दिला गेला. कोल्ह्या-कुत्र्यांकडून त्याचे प्रेम खाववण्यात आले. त्याला धर्मसंस्कारही करू दिला नाही मांगांनी ! पण मी कशाला त्यांना नावे ठेवू. आपले दुर्दैव, राखालचे दुर्दैव ! राखालची पत्नी व मुलगाही म्हणे भोलापुष्कर तलावात मेलेली सापडली ! कोणी राहीले नाही. ते तुरुंगात आहेत. सात वर्षे ! श्रमाची सवय नाही हो. मागे एकदा जरा उन्हातून शेतावर गेले, तर घेरी येऊन पडले होते ! त्यांना कसे हो हाल सहन होतील ! त्यांचे फुलासारखे प्राण ते तेथे कोमेजून जातील ! पाय दुखायचे अलीकडे त्यांचे. मी रात्री चेपायची. उशाला दोन मऊ मऊ उशा त्यांना लागायच्या ! तेथे कोण पाय चेपील, डोक्याला तेल कोण चोळील !”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel