श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥    
आजिचा सुदिन मंगळ ॥ जे तीर्थासम पर्वकाळ ॥ भक्तकथा वाचितां प्रेमळ ॥ घडती सकळ अनायासें ॥१॥
नातरी तीनशतें साठ व्रतें ॥ विधियुक्त केलीं समस्तें ॥ कीं अश्वमेध घडले शतें ॥ निष्कामबुद्धी निजनिष्ठें ॥२॥
नातरी उग्र तपें बहुत केलीं ॥ कीं सकळ दैवतें आराधिलीं ॥ कीं दुष्काळीं अन्नदानें घडलीं ॥ क्षुधार्थियासी अनायासें ॥३॥
कीं विधियुक्त घडला चतुर्थाश्रम ॥ कीं तृषाक्रांतासी पाजिलें जीवन ॥ कीं मातापितयांची सेवा पूर्ण ॥ केली सकल निजप्रीतीं ॥४॥
इतुकीं पुण्यें भक्तकथेसीं ॥ श्रोतयां लाधती अनायासीं ॥ मग प्रसन्न होऊनि हृषीकेशीं ॥ अक्षय पदासी ठेविले ॥५॥
म्हणऊनियां सर्वज्ञ जनीं ॥ अवधान द्यावें मजलागूनी ॥ जैसी मोहरी वाजतां ऐकूनि कानीं ॥ फणिवर डोलती निजप्रेमें ॥६॥
कीं नादलुब्ध मृग होऊन ॥ जाय विसरूनि देहभान । तेवीं भक्तकथा करितां श्रवण ॥ जगज्जीवन संतोषे ॥७॥
एक कूर्मदास नामें ब्राह्मण ॥ परम भाविक होता जाण ॥ तयासी नव्हते करचरण ॥ प्रतिष्ठानीं राहतसे ॥८॥
तो सूर्यरथींचा अरुण ॥ करावया हरिभजन ॥ ब्राह्मणवंशीं अवतार पूर्ण ॥ त्यानें घेतला यासाठीं ॥९॥
परी उपजत नाहीं चरणकर ॥ दिवसेंदिवस जाहला थोर ॥ तों गांवांत ऐकूनि कीर्तन गजर ॥ गेला सत्वर तया ठाया ॥१०॥
तेथें टाळ विणे मृदंग वाजती ॥ प्रेमभावें वैष्णव गाती ॥ देखोनि हर्ष वाटला चित्तीं ॥ बैसला प्रीतीं श्रवणार्थ ॥११॥
पंढरीमाहात्म्य अति सुरस ॥ सप्रेम वर्णिती हरिदास ॥ श्रवण करितां कूर्मदास ॥ अति उल्हासे निजमनीं ॥१२॥
मग जोडूनियां दोनी कर ॥ तयांसी बोले मधुरोत्तर ॥ म्हणे श्रीपंढरीस गेलों जर ॥ तरी रुक्मिणीवर पाहीन कीं ॥१३॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ हांसों लागले सकळ जन ॥ म्हणती तुज नसती करचरण ॥ कैसा जासील कळेना ॥१४॥
पक्ष नसतां अंडजांस ॥ केवीं आक्रमितील गगनास ॥ कीं नेत्र नसतां मनुष्यास ॥ कैसा चढेल डोंगरीं ॥१५॥
नातरी बधिर असतां श्रवण ॥ कैसें करावें हरिकीर्तंन ॥ कीं कंठ बैसला तरी गायन ॥ कैशा रीतीं करावें ॥१६॥
आपलें पदरीं नसतां धन ॥ सुखी न होती याचकजन ॥ कीं विद्याभ्यास नसतां पूर्ण ॥ कैसा सन्मान होईल त्याचा ॥१७॥
मन नसतां आपलें आधीन ॥ तरी कैसें घडेल योगसाधन ॥ कीं सद्गुरुकृपा नसतां पूर्ण ॥ तरी आत्मज्ञान नव्हे कीं ॥१८॥
तुजला नाहींत करचरण ॥ आणि पंढरीस करूं म्हणसी गमन ॥ हें ऐकूनि आमुचें मन ॥ साशांकित जाहलें ॥१९॥
आम्हांसी सर्व संपत्ती धन ॥ शरीरासही आरोग्य होतें जाण ॥ परीं घडलें नाहीं तीर्थाटन ॥ म्हातारपणपर्यंत ॥२०॥
आणि तुवां वासना धरिली ऐसी ॥ परी भरंवसा न वाटे आम्हांसी ॥ जे करचरण नाहींत तुजसी ॥ कैसा जासी कळेना ॥२१॥
कूर्मदास म्हणे त्यांसी ॥ नरदेह लाधला अनायासीं ॥ येथें न जाता पंढरीसी ॥ तरी पुढें चौर्‍यायसीं चुकेना ॥२२॥
ऐसा अनुताप धरूनि अंतरीं ॥ तेथूनि निघाला झडकरी ॥ गांवापासोनि कोसभरी ॥ खुरडत गेला तेधवां ॥२३॥
मारुतीच्या देवळांत ॥ जाऊनि उतरला गांवांत ॥ क्षुधा तृषा लागली बहुत ॥ चिंताक्रांत जाहला ॥२४॥
म्हणे पंढरीनाथा रुक्मिणीकांता ॥ मज सांभाळीं तूं अनाथा ॥ तुजवांचूनि बंधु चुलता ॥ माय बापा दिसेना ॥२५॥
तूंचि माझा प्राणजीवन ॥ कोण सांभाळी भूक ताहान ॥ ऐसें ऐकूनि करुणावचन ॥ तों जगज्जीवन पातला ॥२६॥
खिस्ती होऊनि पंढरीनाथ ॥ तेथें पातला अकस्मात ॥ कूर्मदासासी वैकुंठनाथ ॥ काय बोलत तेधवां ॥२७॥
तुम्हांसी नाहींत करचरण ॥ कोठें करितां जी प्रयाण ॥ आपुलें सांगा नामाभिधान ॥ मजकारणें ये समयीं ॥२८॥
येरू म्हणे पंढरीस ॥ इच्छा वाटते जावयास ॥ नांव पुसिलें आम्हांस ॥ तरी कूर्मदास जाणिजे ॥२९॥
वचन ऐकूनि श्रीपती ॥ संतोषले परम चित्तीं ॥ म्हणे अनायासें आम्हां संगती ॥ लाधली अवचितीं निजभाग्यें ॥३०॥
कूर्मदास वचन बोलत ॥ मी तंव करचरणरहित ॥ तुम्हांसी आमुची संगत ॥ कोण्या उपयोगी पडेल ॥३१॥
तुम्हीं कोठें करितां गमन ॥ सांगा आपुलें नामाभिधान ॥ ऐसें ऐकूनि मनमोहन ॥ काय वचन बोलिला ॥३२॥
विठोबा खिस्ती मजकारण ॥ अवघे बोलती विश्वजन ॥ पंढरीसी आमुचें दुकान ॥ तेथवर जाणें लागतें ॥३३॥
कूर्मदास म्हणे तयाप्रती ॥ तुम्हीं तों जाल सत्वरगती ॥ आम्हांसी कैसी संगती ॥ लाधेल ऐसें कळेना ॥३४॥
मग म्हणे शारंगधर ॥ आम्हांसी जाणें आहे स्थिर ॥ देणें घेणें व्यवहार ॥ मार्गीं करावा लागतो ॥३५॥
कोश अथवा अर्धकोश ॥ वस्तीस राहतों सावकाश ॥ आतां तुमचे संगतीस ॥ अंतर नेदींच सर्वथा ॥३६॥
ऐसें बोलतां चक्रपाणी ॥ कूर्मदास संतोषला मनीं ॥ मग स्वयंपाक करूनियां ते क्षणीं ॥ भोजन घातलें तयासी ॥३७॥
कूर्मदासासी राजीवनेत्र ॥ पांघरावयासी देत वस्त्र ॥ मग म्हणे पंढरीक्षेत्र ॥ तेथें भक्त पवित्र नांदती ॥३८॥
कूर्मदासासीं जगजेठी ॥ रात्रीं बोले गुजगोष्टी ॥ मार्गीं चालतां जाहलां कष्टी ॥ उठाउठी न चालवे ॥३९॥
उदयीक तुम्ही राहाल जेथ ॥ आम्हीही सत्वर येऊं तेथ ॥ भोजनाविषयीं चिंताक्रांत ॥ कांहीं न व्हावें मानसीं ॥४०॥
आम्हीं हिंडतों याकारण ॥ यात्रेसी जाती अनाथ दीन ॥ त्यांचा हिरोनि घ्यावा शीण ॥ भूक ताहान पुसावी ॥४१॥
ऐसें बोलतां रुक्मिणीपती ॥ तों उदया पातला गभस्ती ॥ मग कूर्मदासासी उठवूनि प्रीतीं ॥ काय बोले तेधवां ॥४२॥
मार्ग दाखवितों तुम्हांसी ॥ गमन करावें वेगेंसीं ॥ सायंकाळीं बिर्‍हाडासी ॥ अगत्य येऊं सत्वर ॥४३॥
ऐसें म्हणोनि रुक्मिणीपती ॥ अदृश्य जाहले सत्वरगती ॥ कूर्मदास मार्गाप्रती ॥ गमन करीतसे तेधवां ॥४४॥
अस्तमानपर्यंत जाण ॥ कूर्मदास करी गमन ॥ ग्रामासमीप येऊन ॥ वात पाहे द्विजाची ॥४५॥
तों सत्वर येऊनि घननीळ ॥ तैसाचि केला प्रतिपाळ ॥ ऐसा नित्य दीनदयाळ ॥ करी सांभाळ तयाचा ॥४६॥
सन्निध ग्राम नसेल जर ॥ तेथें निर्माण करी दुजा सत्वर ॥ परी निजभक्तासी शारंगधर ॥ कष्टों नेदीच सर्वथा ॥४७॥
ऐशा रीतीं चतुर्मास ॥ चालत असतां कूर्मदास ॥ तों अकस्मात लहुळास ॥ कार्तिक मासीं पातले ॥४८॥
कार्तिक शुद्ध दशमीसी ॥ यात्रा चालिली पंढरीसी ॥ कूर्मदास देखोनि मानसीं ॥ चिंतावला तेधवां ॥४९॥
एकादशी पातली जवळ ॥ मज नाटोपे तो सोहळ ॥ करचरणेंविण पांगुळ ॥ दीनदयाळ अंतरला ॥५०॥
म्हणे उदयीक एकादशी ॥ वैष्णव जातील वेगेंसी ॥ मी पांगुळ परदेशी ॥ निढळ पडलों एकला ॥५१॥
मज असते जरी चरण ॥ तरी यांजसवें करितों गमन ॥ ऐसा चिंताक्रांत उद्विग्न ॥ जाहला असे मानसीं ॥५२॥
चपळाचियासवें जाण ॥ पांगुळासी न करवे गमन ॥ उदाराऐसें कृपणासी दान ॥ देतां नयेचि सर्वथा ॥५३॥
कीं क्षुधार्तयाचे बरोबरी ॥ रोगी जेवील कैस्यापरी ॥ कीं भास्करतेजाची सरी ॥ चंद्र कैसी करील ॥५४॥
सुवर्णमोलाचिया समान ॥ अन्य धातू न येती जाण ॥ कीं पक्वान्नस्वादाच्या समान ॥ कदन्नं जैसें नये कीं ॥५५॥
कामधेनूचें ऐश्वर्य पाहें ॥ इतर पशूंसी जैसें नये ॥ कल्पतरूची सरी काये ॥ आणिक तरुवरांसी येईल ॥५६॥
तेवीं यात्रेकरियांबरोबरी ॥ मज चालतां न उरे उरी ॥ म्हणोनि कूर्मदास अंतरीं ॥ चिंताक्रांत जाहला ॥५७॥
मग अंतरी करूनि विचार ॥ निरोप पाठवी सत्वर ॥ म्हणे यात्रेकरू हो माझा नमस्कार ॥ रुक्मिणीवरासी सांगावा ॥५८॥
मी परदेशी अनाथ दीन ॥ करचरण नाहींत मजकारण ॥ एकादशीस तुमचें दर्शन ॥ होतां न दिसे सर्वथा ॥५९॥
लहुलापासून सात कोश ॥ पुढे पंढरी राहिली असे ॥ तरी सात दिवस यावयास ॥ पाहिजेत मजलागीं ॥६०॥
आतां येथवर येऊनि जगजेठी ॥ मज सांभाळीं कृपादृष्टीं ॥ मी तुझे भेटीविण कष्टी ॥ होतसें पोटीं बहुतचि ॥६१॥
चातक इच्छिती जलधर ॥ कीं चंद्र पाहती चकोर ॥ तैसाचि मी निरंतर ॥ तुझी वाट पाहातसें ॥६२॥
कीं वत्सें धुंडिती धेनूसी ॥ कीं अंडज पाहे पक्षिणीसी ॥ तैसा कूर्मदास तुजसी ॥ निजमानसीं चिंतितसे ॥६३॥
गोत वित्त आधार कांहीं ॥ तुजवांचूनि आणिक नाहीं ॥ धनसंपत्ति विठाबाई ॥ तुजविण कांहीं दिसेना ॥६४॥
अनाथनाथ कृपासागर ॥ तूं म्हणविसी शारंगधर ॥ तरी आतां येऊनि येथवर ॥ करीं उद्धार दीनाचा ॥६५॥
ऐसी करुणा सांगूनि ॥ यात्रेकर्‍यांसी करी विनवणी ॥ निरोप सांगोनि चक्रपाणी ॥ सत्वर येथें पाठवा ॥६६॥
अवश्य म्हणून उतावेळ ॥ वारकरी चालिले तत्काळ ॥ विठ्ठलनामघोष सकळ ॥ करिते जाहले तेधवां ॥६७॥
इकडे पंढरपुरीं महाद्वारीं ॥ नामदेव कीर्तन करी ॥ टाळ दिंडी घेऊनि करीं ॥ सप्रेम गजरीं डुल्लत ॥६८॥
रामकृष्ण ऐसीं नामें ॥ आवडीं उच्चारूनियां प्रेमें ॥ विरक्त होऊनि मनोधर्में ॥ श्रीहरिगुण गातसे ॥३९॥
सांडोनि सकळ अभिमान ॥ नाचे धरूनियां कान ॥ विठ्ठलमूर्तीचें ध्यान ॥ हृदयामाजीं आठविलें ॥७०॥
श्रीहरीचे गुण उत्तम ॥ जन्म नाम आणि कर्म ॥ घोळोनियां निजप्रेम ॥ गात असे सुखरूप ॥७१॥
जें निजभक्तां विश्रांति सहज ॥ कीं ज्ञानियांचें निजगुज ॥ नातरी निजमुक्तीचें बीज ॥ मोक्षदायक म्हणती जें ॥७२॥
कृष्णा विष्णु मेघश्यामा ॥ मुकुंदा मुरारि पुरुषोत्तमा ॥ अच्युता नरहरे घनश्यामा ॥ विजयी रामा रघुपते ॥७३॥
जय जय गोवर्धनोद्धारा ॥ जय जय गोपीमनोहरा ॥ जय जय भक्त करुणाकरा ॥ दीनोद्धारा पांडुरंगा ॥७४॥
जय जय सकलमंगलाधीशा ॥ पातकभंजना हृषीकेशा ॥ अमरपाळका सर्वेशा ॥ अक्षयवेषा अभंगा ॥७५॥
परमानंदा श्रीपती ॥ तूंचि आदिमध्यअंतीं ॥ सज्जनांसी सुखसंपत्ती ॥ तुजविण श्रीपती असेना ॥७६॥
दीनबंधो पंढरीनाथा ॥ तूंचि माझा श्रोता वक्ता ॥ तूंचि प्रेमसुखाचा दाता ॥ मज अनाथाकारणें ॥७७॥
ऐसा नामा ते अवसरी ॥ चहूं भूजीं दिधलें आलिंगन ॥ पद्मकरें कुरवाळूनि वदन ॥ जगज्जीवन संबोखी ॥७८॥
मग संतुष्ट होऊनि रुक्मिणीरमण ॥ चहूं भूजीं दिधलें आलिंगन ॥ पद्मकरें कुरवाळूनि वदन ॥ जगज्जीवन संबोखी ॥७९॥
मग संतांसी म्हणे मेघश्याम ॥ नामदेव याचें ठेविलें नाम ॥ तेणें अनुभवोनि माझें प्रेम ॥ मनोधर्में निवाला ॥८०॥
आणखी संत वैष्णवजन ॥ मज आवडती जीवाहून ॥ माझिया रूपीं बुडी देऊन ॥ एकत्र होऊन असती ॥८१॥
परी या सकळांहूनि विशेष जाण ॥ नामया तुझे दिसती सद्गुण ॥ प्रेमामृताचा आनंदघन ॥ अधिकाधिक दिसताहे ॥८२॥
हा ज्ञानदेव माझें जीवन ॥ ज्ञानविज्ञानांचें मंडण ॥ वैराग्याचा मेरु जाण ॥ निवृत्तिदेव निजदास ॥८३॥
स्वात्मबोधाचा पूर्ण सागर ॥ तो हा सोपान भक्त थोर ॥ रोहिदास विसोबा खेचर ॥ गोरा कुंभार निजभक्त ॥८४॥
निजभक्त परमानंद जोगा ॥ आणिक हा जगमित्र नागा ॥ विनटरामा वटेश्वर चांगा । मज श्रीरंगा आवडती ॥८५॥
आसंद सुदामा केशवदास ॥ नरहरी सोनार भानुदास ॥ हे मज आवडती विशेष ॥ परी तुझिया प्रेमास अंत नाहीं ॥८६॥
भीष्म रुक्मांगद अक्रूर ॥ उद्धव अर्जुन प्रल्हाद थोर ॥ ध्रुव नारद आणि तुंबर ॥ माझें अंअर जाणती ॥८७॥
हे सर्वदा विषयीं विरक्त ॥ सहज असती जीवन्मुक्त ॥ परी नामया तुझा अद्भुत ॥ भाग्यमहिमा दिसताहे ॥८८॥
मजवरी बहु या सकळांची प्रीती ॥ हे अनंत जन्मींचें सांगाती ॥ परी तुझा भाव माझे चित्तीं ॥ आगळा ऐसें दिसताहे ॥८९॥
ऐसा संवाद करितां हरी ॥ तों अकस्मात आले वारकरी ॥ दिंड्या पताका घेऊनि करीं ॥ जयजयकारें गर्जती ॥९०॥
सवें गरुडटकियांचा भार ॥ मृदंग वाजती अपार ॥ नामघोषें करितां गजर ॥ भीमातीर दुमदुमलें ॥९१॥
त्या सुखाचे निजसोहळे ॥ पुंडलीक जाणे भक्त प्रेमळ ॥ जेवीं चंद्रामृताचे गळाळ ॥ चकोरचि सेवूं जाणती ॥९२॥
नातरी मातेचे स्तनींचें पयःपान ॥ बाळकचि एक सेवूं जाणे ॥ कीं क्षीरसागरींचें महिमान ॥ उपमन्यूवांछूनि कळेना ॥९३॥
कीं एकवट होता दुग्धपाणी ॥ राजहंसचि घे निवडोनी ॥ कीं प्रमळ भक्तांचे कीर्तनीं ॥ सज्ञान जाणती अनुभवी ॥९४॥
नातरी कमळपुष्पांचा मकरंद ॥ सेवूं जाणे एक मिलिंद ॥ तेवीं पंढरीक्षेत्रींचा परमानंद ॥ भक्त पुंडलीक भोगीतसे ॥९५॥
सप्रेमभावें महाद्वारीं ॥ लोटांगण घालिती वारकरी ॥ एकमेकांसी ते अवसरीं ॥ आलिंगन देती निजप्रेमें ॥९६॥
पुढें विलोकितां सत्वर ॥ तों दृष्टीस देखिला शारंगधर ॥ जवनीं ठेविले दोन्ही कर ॥ कासे पीतांबर वेष्टिला ॥९७॥
ऐसा देखतां जगज्जीवन ॥ आनंदले भक्तजन ॥ सप्रेम देऊनि आलिंगन ॥ मग श्रीचरण वंदिलें ॥९८॥
जेवीं सासुरवासिनी बाळा ॥ माया देखतां हर्ष वाटे तिजला ॥ तेवीं श्रीमुख पाहतां डोळां ॥ आनंद जाहला भक्तासी ॥९९॥
मग विटेसहित दोन्ही चरण ॥ कवळूनि मस्तक ठेविला जाण ॥ शरीरीं नाठवे मीतूंपण ॥ तन्मय होऊनि राहिले ॥१००॥
म्हणती दृषीस पाहतां श्रीमुख ॥ अनंत जन्मींचें विसरलों दुःख ॥ तूंचि सर्व सुखदायक ॥ नाहीं आणिक दुसरें ॥१॥
तंव एक स्मरण धरूनियां ॥ निरोप सांगती देवराया ॥ म्हणती कूर्मदासें भेटावया ॥ लहुळासी बोलाविलें ॥२॥
त्यासी नाहींत चरणकर ॥ सत्वर न चालवे येथवर ॥ भेटीचें आर्त धरून थोर ॥ तुमची वाट पाहातसे ॥३॥
वचन ऐकोनि पंढरीनाथ ॥ उताविळ जाहले त्वरित ॥ म्हणती कूर्मदास निजभक्त ॥ केव्हां भेटेल मजलागीं ॥४॥
अंतरींचे मनोरथ पूर्ण ॥ जे भेटतील संतसज्जन ॥ तयांविण इष्ट मित्र आन ॥ कोणी जिवलग दिसेना ॥५॥
मग नामदेव आणि ज्ञानदेव ॥ निकट बोलावून देवराव ॥ अंतरींचा निजभाव ॥ सांगतसे तयांसी ॥६॥
बहुत आर्त धरूनि पोटीं ॥ कूर्मदास इच्छितो भेटी ॥ तुम्ही आम्ही उठाउठीं ॥ जाऊं सत्वर त्या ठाया ॥७॥
मग दोघां जणांसी दोहों हातीं ॥ धरूनियां सत्वरगती ॥ चरणचालीं वैकुंठपती ॥ निघते जाहले तेधवां ॥८॥
जो क्षीरसागर शेषशयन ॥ जयासी वर्णिती श्रुतिपुराण ॥ तो लक्ष्मीकांत जगज्जीवन ॥ चरणवालीं जातसे ॥९॥
ब्रह्मादिक मुनि सहज ॥ ज्याचे इच्छिती चरणरज ॥ तो रुक्मिणीरमण गरुडध्वज ॥ चरणचालीं जातसे ॥११०॥
योगी बैसले वज्रासनीं ॥ लवकर नये त्यांचें ध्यानीं ॥ कूर्मदासाची भक्ति देखोनी ॥ चरणचालीं निघाला ॥११॥
मार्गीं चालतां जगजेठी ॥ तों आरण्यभेंडी देखिल्या दृष्टीं ॥ मग सांवतामाळियाचे भेटी ॥ उत्कंठित पोटीं जाहले पैं ॥१२॥
त्याचे भेटीस चक्रपाणी । त्वरें चाले तये क्षणीं ॥ म्हणे कौतुक नामयालागूनी ॥ आजिचे दिनीं दाखवावें ॥१३॥
मग तयासी म्हणे केशवराज ॥ बहुत तृषा लागली मज ॥ ऐसें म्हणोनि अधोक्षज ॥ मळियामाजीं प्रवेशले ॥१४॥
दोघांसी ठेवून बाहेरी ॥ म्हणे उदक पिऊनि येतों सत्वरी ॥ ऐसें म्हणूनि श्रीहरी ॥ सांवत्यापासीं पातले ॥१५॥
तंव त्यानें लाऊन नेत्रपातीं ॥ हृदयीं चिंतिली श्रीविठ्ठलमूर्ति ॥ मुखें गात नामकीर्ती ॥ विदेस्थिति जाहलासे ॥१६॥
ऐसें देखोनि शारंगधर ॥ माथां ठेविला अभयकर ॥ सावध करूनि सत्वर ॥ आलिंगन दिधलें ॥१७॥
तेणें देखोनि चक्रपाणी ॥ मिठी घातली दृढ चरणीं ॥ प्रेमाश्रु लोटले नयनीं ॥ आनंद मनीं न समाये ॥१८॥
म्हणे धन्य दिवस आज सुवेळा ॥ माय बाप म्यां देखिला डोळां ॥ सुकुमार धनसांवळा ॥ चरणीं चालत आलासी ॥१९॥
मागुती चरणीं ठेऊनी माथा ॥ विनंति करी भक्त सांवता ॥ बहुत शिणलासी पंढरीनाथा ॥ सांभाळ करितां दीनांचा ॥२०॥
आतां स्वस्थ करूनि मन ॥ बैसें क्षणभरी करितों पूजन ॥ ऐसें ऐकोनि जगज्जीवन ॥ काय बोलत तेधवां ॥२१॥
भय पावूनि रुक्मिणीवर ॥ सांवत्यासी देत प्रतिउत्तर ॥ माझे पाठीसी दोघे तस्कर ॥ येती सत्वर लगबगें ॥२२॥
तयांच्या भेणें तुजपासीं ॥ येथें आलों लपावयासी ॥ तूं पूजा करूं इच्छितोसी ॥ नवल मजसी वाटतें ॥२३॥
वासरमणीसी लागलें ग्रहण ॥ तयांसी न रुचे अर्ध्यदान ॥ कीं परचक्रीं वेढिलें जाण ॥ तया रायासी भद्रासन रुचेना ॥२४॥
कीं चिंता उद्भवली मानसीं ॥ तैं उपचार न रुचे मानवांसी ॥ सन्निध देखतां अगस्तीसी ॥ भरतें सागरासी न ये कीं ॥२५॥
तेवीं तूं करूं म्हणतोसी पूजन ॥ परी स्वस्थ नाहीं माझें मन ॥ आतां कोठें तरी माझे प्राण ॥ करीं जतन भक्तराया ॥२६॥
सांवता म्हणे ते समयीं ॥ तूं सांठवशील कवणे ठायीं ॥ ऐसा ठाव दिसत नाहीं ॥ त्रिभुवनीं पाहीं शोधतां ॥२७॥
वायु न सांठवे पिंजर्‍यांत ॥ कीं आकाश न समाये घागरींत ॥ नातरी वासरमणी अंधारांत ॥ कोंडेल कैसा गोविंदा ॥२८॥
तापसांमाजी कैलासनाथ ॥ कीं पक्षियांमाजी विनतासुत ॥ नातरी देवांमाजी शचीनाथ ॥ न लोपेचि सर्वथा ॥२९॥
मृत्तिकेमाजी कस्तूरी ॥ कीं वृक्षांमाजी मैलागिरी ॥ कीं श्वापदांमाजी गजकेसरी ॥ न झांकेचि सर्वथा ॥१३०॥
अश्वांमाजी उच्चैःश्रवा ॥ कैसा लपेल देवाधिदेवा ॥ लोहसंदुकेंत माधवा ॥ परिस कैसा झांकेल ॥३१॥
तेवीं तूं सर्वांवरिष्ठ श्रीहरी ॥ अनंत ब्रह्मांडें तुझें उदरीं ॥ तुज लपवावया महीवरी ॥ ठाव कोठेंचि दिसेना ॥३२॥
मग म्हणे जगज्जीवन ॥ ब्रह्मज्ञानाचा प्रसंग कोण ॥ कोठें तरी मजकारण ॥ ठेवीं लपवोन ये समयीं ॥३३॥
ऐसें बोलत हृषीकेशी ॥ सांवता विचारी निजमानसीं ॥ हृदयमंदिरीं वैकुंठवासी ॥ निजप्रीतीं राहील ॥३४॥
मग खुरपें घेऊनि सत्वरीं ॥ उदर चिरिलें ते अवसरीं ॥ हृदयसंपुटीं मुरारी ॥ येऊनि झडकरी बैसला ॥३५॥
सांवता विचारी ते वेळां ॥ तस्कर देखतील कीं घननीळा ॥ म्हणोनि लवलाहे चवाळा ॥ उदरावरूनि बांधिला ॥३६॥
हृदयमंदिरीं जगजेठी ॥ सांवत्यासीं बोले गुजगोष्टी ॥ तुझा उपकार फेडावया सृष्टीं ॥ पदार्थ दृष्टीं दिसेना ॥३७॥
तंव श्रोते म्हणती नवलाव ॥ उदरीं कैसा सांठवला देव ॥ हा आशंकेचा आम्हांसी ठाव ॥ प्राप्त झाला ये काळीं ॥३८॥
ऐकूनि श्रोतयांची वाणी ॥ दृष्टांत योजूनि बोले वचनीं ॥ तो लीलाविग्रही चक्रपाणी ॥ अघटित करणी तयाची ॥३९॥
कृष्णावतारीं यशोदा सुंदरी ॥ घुसळीत होती निजमंदिरीं ॥ तेव्हां डेरियांत रिघोनि श्रीहरी ॥ नवनीत झडकरी खादलें ॥१४०॥
कीं एक गोपी प्रेमें भुलोन ॥ म्हणे विकावयासी आणिला कृष्ण ॥ तेंचि सत्य करावया वचन ॥ देव मडक्यांत सांठवला ॥४१॥
सांवत्याची आवड देखोनी ॥ हृदयीं सांठवले चक्रपाणी ॥ म्हणोनि आशंका श्रोतेजनीं ॥ सर्वथा मनीं न धरावी ॥४२॥
असो आतां जगन्नाथ ॥ सांवत्यासी बोले निजगुह्यार्थ ॥ तुझा उपकार फेडावया येथ ॥ न दिसे पदार्थ दृष्टीसी ॥४३॥
आतां माझेंचि स्वरूप होई ॥ नातरी सर्वस्वें मी घेईं ॥ यापरतें आणिक कांहीं ॥ द्यावयास नाहीं सर्वथा ॥४४॥
मग म्हणे भक्त सांवता ॥ अगा ये स्वामी कृपावंता ॥ आतां तुज मी जीवापरता । न करीं सर्वथा ॥ कल्पांतीं ॥४५॥
ऐसें म्हणोनि देवभक्त ॥ समरस जाहले एकचित्त ॥ जेवीं भागीरथी यमुना त्वरित ॥ जाहल्या एकत्र निजप्रीतीं ॥४६॥
कीं दुग्धांत संचरे जीवन ॥ कीं शरीरांत सुरवाडला प्राण ॥ तेवीं निजभक्तउदरीं राजीवनयन ॥ सुखसंतोषें बैसला ॥४७॥
नातरी चंद्रबिंबांत अमृत ॥ सांठवलेंसे अत्यद्भुत ॥ तेवीं निजभक्तउदरीं वैकुंठनाथ ॥ बैसले एकत्र होऊनि ॥४८॥
कीं सुमनकळिकेंत मकरंद प्रीतीं ॥ लपोनि राहिला जैशा रीती ॥ तेवीं निजभक्तउदरीं रुक्मिणीपती ॥ अद्वैतस्थिती बैसले ॥४९॥
इकडे मळियाबाहेर नामा भक्त ॥ मनांत जाहला चिंताक्रांत ॥ म्हणे अजूनि नये पंढरीनाथ ॥ विलंब बहुत कां केला ॥१५०॥
उतावीळ होऊनि मजला ॥ वाट पाहतां विलंब जाहला ॥ कोठें माझा स्वामी गुंतला ॥ मज टाकोनि वनांत ॥५१॥
तो पांडुरंग माझें जीवन ॥ कीं सर्वसुखाचें निधान ॥ तयासी आतां मजलागून ॥ दाखवील कोण कळेना ॥५२॥
कंठ होऊनि सद्गदित ॥ सप्रेम असे स्फुंदत ॥ देह असे चांचरी जात ॥ पाउलें उमगीत विठोबाचीं ॥५३॥
जैसा व्याघ्र होऊनि तृषाक्रांत ॥ जीवन धुंडी वनांत ॥ कीं क्षुधातुर होऊनि अपत्य ॥ वाट पाहत मायेची ॥५४॥
कीं पाडस चुकलें हरिणीसी ॥ तें वनांत पाहे जननीसी ॥ कीं द्रव्य हरपतां कृपणासी ॥ तळमळ चित्तासी बहु वाटे ॥५५॥
कंठ होऊनि सद्गदित ॥ नेत्रीं अश्रुपात वाहत ॥ हृदय दोहीं करीं पिटित ॥ आंग टाकित धरणीये ॥५६॥
म्हणे विठोबा न येसी तत्काळ ॥ माझे प्राण होताती व्याकुळ ॥ मोकलून जाऊं नको ये वेळ ॥ तुजला उचित नव्हे हें ॥५७॥
धरूनि पीतांबराचा सोगा ॥ मी सरसाचि येतों पांडुरंगा ॥ तुझे मनींचा भाव रुक्मिणीरंगा ॥ कळला नाहीं मजलागीं ॥५८॥
ऐसा नामा विलपत ॥ तों दृष्टीं देखिला सांवता भक्त ॥ प्रेमभावें नाम जपत ॥ आनंदयुक्त तेधवां ॥५९॥
त्याचे चरणीं घालोनि मिठी ॥ म्हणे कोठें गेला जगजेठी ॥ मी उतावेळ त्याचे भेटी ॥ जाहलों पोटीं कासाविस ॥१६०॥
तंव सांवता विसरून देहभान ॥ हरिरूपीं जाहला तल्लीन ॥ मी माझें हे आठवण ॥ नाहीं भेदभान उरलें कीं ॥६१॥
हें चिन्ह देखोनि दृष्टीसी ॥ म्हणे विठोबा आहे याजपासीं ॥ स्वरूपानुभव कळला मानसीं ॥ तैसेंचि तयासी देखिलें ॥६२॥
जैसें जार जारिणी दोघें जण ॥ दृष्टीस पडतां जाणती खूण ॥ कीं तस्करं तस्करासी देखोन ॥ जाणती चिन्ह अंतरींचें ॥६३॥
नातरी वक्तयाचें प्रेम अंतर ॥ जाणतसे सज्ञान चतुर ॥ कीं अदृश्य निधान असलें जर ॥ देखती पायाळ निजदृष्टीं ॥६४॥
नातरी योगियांची राहटी ॥ योगीच खूण जाणती दृष्टी ॥ तेवीं सावत्यापासीं जगजेठी ॥ कळलें पोटीं नामयाचे ॥६५॥
म्हणे रे मज दुर्बळाचा ठेवा ॥ सांवत्या कैसा गिळिलां तुवां ॥ जो सर्वसुखाचा विसांवा ॥ आवडतो जीवा माझिया ॥६६॥
एकदां दृष्टीसी मज दाखवीं ॥ तेंचि रूप धरीन जीवीं ॥ प्राण व्याकुळ जाहले पाहीं ॥ तूं वांचवीं दयाळा ॥६७॥
मजवरी करूनि कृपादृष्टी ॥ बोल स्वहितगोष्टी ॥ मज भेटवीं जगजेठी ॥ मग शकुनगांठी बांधीन मी ॥६८॥
ऐसीं नामयाचीं करुनावचनें ॥ ऐकूनियां जगज्जीवनें ॥ सांवत्यासी म्हणे मजकारणें ॥ जिवलग नामा भेटवीं ॥६९॥
मनांत म्हणे रुक्मिणीकांत ॥ अडकलों सांवत्याच्या पोटांत ॥ आतां मज बाहेर त्वरित ॥ निघतां न ये सर्वथा ॥१७०॥
जैसा कोशकीटक जाण ॥ आपुले हातें करी बंधन ॥ मग निघतां न ये त्याकारण ॥ तैसेंचि जाहलें मज आतां ॥७१॥
नातरी शुक बैसला नळिकेवरी ॥ तयासी न उडवे निर्धारीं ॥ तैसीच मजला जाहली परी ॥ अडकलों उदरीं सांवत्याच्या ॥७२॥
कीं कमळिणीची धरूनि प्रीती ॥ भ्रमरें तेथें धरिली वस्ती ॥ मग अस्तमाना गेलिया गभस्ती ॥ जाहली गुंती तयासी ॥७३॥
तेवीं सांवत्याचें हृदयकमळीं । मी अडकलों वनमाळी ॥ बाहेर नामा तळमळी ॥ जेवीं मासोळी उदकाविण ॥७४॥
मग काय बोले हृषीकेशी ॥ नाम दिसतो परदेशी ॥ मजविसीं होतसे कासाविसीं ॥ भेटतील तयासी क्षणमात्र ॥७५॥
मग म्हणे भक्त सांवता ॥ सावध होईं विष्णुभक्ता ॥ कृपा आली पंढरीनाथा ॥ भेटतील आतां तुजलागीं ॥७६॥
उतावेळ झाले कमळापती ॥ भेटोनि देतील विश्रांती ॥ जवळीच देखसील निजप्रीतीं ॥ खेद चित्तीं न धरावा ॥७७॥
तूं काय आचरलासी पुण्यराशी ॥ सर्वां भूतीं भजिन्नलासी ॥ म्हणोनि कृपावंत हृषीकेशी ॥ पावले अनायासीं तुजलागीं ॥७८॥
भक्तिबळें पंढरीनाथ ॥ तुवां केला ऋणाईत ॥ हें नवल देखोनि माझें चित्त ॥ होय विस्मित भक्तराया ॥७९॥
तुवां गरुडटका खांद्यावरी ॥ घेऊनि केलीस पंढरीची वारी ॥ कीं संतचरणरज वंदिले शिरीं ॥ म्हणोनि श्रीहरी तुष्टला ॥१८०॥
कीं दशमीस दिंडी घेऊनि पुढें ॥ गोपाळ खेळले साबडे ॥ हरिनाम घेऊनि चोखडें ॥ वर्णिले पवाडे कीर्तनीं ॥८१॥
तो दृष्टीसी देखोनि आनंदु ॥ प्रसन्न जाहला तुज गोविंदु ॥ मग तो अनंत कृपासिंधु ॥ दीनबंधु तुष्टला ॥८२॥
कीं अनंत जन्मीं अनुताप जाहले ॥ तुवां देह कर्वतीं घातलें ॥ नातरी उग्र तप साधिलें ॥ किंवा देखिलें महातीर्थ ॥८३॥
कीं परकारणीं वेंचिला प्राण ॥ कीं एकादशीस केले कीर्तन ॥ तेथें तिष्ठत होता जगज्जीवन ॥ जाहला प्रसन्न तुजलागीं ॥८४॥
ऐसा भाग्यमहिमा अद्भुत ॥ जाणता एक पंढरीनाथ ॥ ऐसें म्हणोनि सांवता भक्त ॥ चरणीं लोळत नामयाचे ॥८५॥
नामा म्हणे त्या अवसरा ॥ तूं माझे निजसुखाचा सोयरा ॥ मज जीवदानी वैष्णववीरा ॥ तुजविण दुसरा नसे कीं ॥८६॥
शकुन सांगितला जो मजला ॥ तो आतांचि साच करीं वहिला ॥ मज आणि माझ्या विठ्ठला ॥ भेट करीं तत्काळ ॥८७॥
ऐक प्रेमळा भक्तनाथा ॥ मज धीर न धरवे सर्वथा ॥ विपरीत देखोनि माझी अवस्था ॥ करूणा चित्ता कां न ये ॥८८॥
मग खुरपें काढोनि सत्वरी ॥ पोट चिरिलें ते अवसरीं ॥ पांडुरंग निघतांचि बाहेरी ॥ नामा पाय धरी धांवोनी ॥८९॥
सद्गदित होऊनि घननीळ ॥ नामयासी आलिंगिलें ते वेळ ॥ घेऊनि पीतांबराचा अंचळ ॥ पुसिलें कपाळ निजहस्तें ॥१९०॥
मग हांसोनि पंढरीनाथ ॥ नामयासी पुसे वृत्तांत ॥ कां निर्बुज केलें चित्त ॥ सांगें त्वरित मजलागीं ॥९१॥
मग मिठी घालोनि दृढ चरणीं ॥ देवासी बोले मंजुळवाणी ॥ तूंचि माझी जनकजननी ॥ पावसी निर्वाणी अखंड ॥९२॥
तूं परब्रह्म घनसांवळें ॥ कवण्या मोहें पाळिसी लळे ॥ हें मज सर्वथा न कळे ॥ दीनदयाळे पांडुरंगे ॥९३॥
मग ज्ञानदेवासी जगज्जीवन ॥ हांसोनि बोलती मृदु वचन ॥ कूर्मदासाचें दर्शन ॥ घ्यावें जाऊनि सत्वर ॥९४॥
त्याची भेट न होतां जाण ॥ चित्तासी न वाटे समाधान ॥ निजभक्त भेटती तो सुदिन ॥ निवती लोचन तैं माझे ॥९५॥
ज्ञानदेव नामा निजभक्त ॥ सांवता आणि पंढरीनाथ ॥ चवघे धरूनि एकसंगत ॥ आनंदें चालत निजमार्गीं ॥९६॥
ऐकोनि आशंका धराल जीवें ॥ अधिक घेतलीं भक्तांचीं नांवें ॥ तयांसी सांगोनि पंढरीरावें ॥ लिहिलें असें यथार्थ ॥९७॥
तरी हा शब्द मजवरी ॥ न ठेवावा भक्तचतुरीं ॥ पतितपावन भक्तकैवारी ॥ म्हणवितो हरि प्रसिद्ध ॥९८॥
तरी पतित वाचेसी येत आधीं ॥ त्यामागें पावन कृपानिधी ॥ म्हणोनि भक्तनामें आधीं ॥ लिहिलीं पदसंधी यास्तव ॥९९॥
असो निजभक्तांच्या समागमेंकरून ॥ आनंदें चालिले जगज्जीवन ॥ तों कूर्मदासासी उत्तम शकुन ॥ निजअंतरीं होतसे ॥२००॥
जैसा मेघ वर्षतां मेदिनीं ॥ पूर्वेसी चमके सौदामिनी ॥ आणि उत्तरदिशेकडोनी ॥ वायु मंजुळ येतसे ॥१॥
तेवीं भेटीस येतो आनंदघन ॥ म्हणोनि उजवा लवतो लोचन ॥ आणि घडिघडी बाहुस्फुरण ॥ होती शकुन कूर्मदासा ॥२॥
जेवीं वोरसोनि तान्ही गाय ॥ वत्सापासीं धांवूनि जाय ॥ तैसेचि आले पंढरीराय ॥ आनंद समाय अंतरीं ॥३॥
कूर्मदासें देखोनि जगज्जीवन ॥ सद्भावें घातलें लोटांगण ॥ देवोनि क्षेमालिंगन ॥ बहू भुजीं धरियेला ॥४॥
सप्रेम भेटले भक्तजन ॥ कूर्मदासासी म्हणे रुक्मिणीरमण ॥ कांहीं मागें वरदान ॥ तुजकारणें देईन मी ॥५॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ म्हणे हेंच मागणें तुजलागून ॥ तुम्ही न जावें येथून ॥ अभय वरदान देऊनि ॥६॥
अवश्य म्हणोनि घननीळ ॥ तेथेंचि राहिले चिरकाळ ॥ पंढरीऐसें क्षेत्र लहुळ ॥ भक्त प्रेमळ जाणती ॥७॥
आषाढी कार्तिकीस पाहीं ॥ यात्रा भरे तये ठायीं ॥ भाविक भक्त लवलाहीं ॥ जातीं दर्शन घ्यावया ॥८॥
पुढिले अध्यायीं रसाळ कथन ॥ श्रोतीं करावें स्वस्थ मन ॥ जैसा कृपण पाहतां धन ॥ होय तल्लीन निजप्रीतीं ॥९॥
तेवीं कथेसी देऊनि अवधान ॥ सादर परिसा भक्तजन ॥ महीपति तुमचा रजःकण ॥ वंदितो चरण निजप्रीतीं ॥२१०॥
स्वति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ षोडशाध्याय रसाळ हा ॥२११॥
अध्याय ॥१६॥ ओंव्या ॥२११॥    ॥    ॥    ॥    

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel