श्रीगणेशाय नमः ॥    ॥ श्रीजगदीश्वराय नमः ॥
जयजय अचळा अव्यया अविनाशा ॥ अनामा अरूपा परमपुरुषा ॥ ब्रह्मांडनायका जगन्निवासा ॥ स्वानंदाधीशा श्रीहरि ॥१॥
निजभक्त करिती तुझें स्मरण ॥ तुजलागीं त्यांचें निदिध्यासन ॥ जैसे चातक आणि मेघ जाण ॥ मित्रपणें नांदती ॥२॥
कीं बाळ मातेची करी खंती ॥ तिजलागीं लोभ तैशाच रीती ॥ तेविं प्रेमळ भक्तांची जैसी वृत्ति ॥ होसी रुक्मिणीपति त्यांसारिखा ॥३॥
कीं पौर्णिमेचा चंद्रप्रकाश घन ॥ मनीं उल्लासे सागर देखोन ॥ तेविं निजभक्तांची कीर्ति ऐकोन ॥ तूं जगज्जीवन संतोषसी ॥४॥
भक्तिं वर्णिली तुझी स्तुति ॥ तुजही आवडे त्यांची कीर्ति ॥ म्हणोनि चरित्रें मजहातीं ॥ भक्तविजय ग्रंथीं लिहविलीं ॥५॥
मागील अध्यायाचे अंतीं निश्चित ॥ बोधराजें अविंधास दाविली प्रचीत ॥ मग टाकूनियां धनसंपत ॥ हरिभजनीं प्रीत लाविली ॥६॥
आतां सज्ञान विवेकी अति विरक्त ॥ सद्गुरुउपासक गणेशनाथ ॥ त्याचें चरित्र अति अद्भुत ॥ ऐका निजभक्त भाविक हो ॥७॥
बालेघांटप्रांतीं जाण ॥ सारसी उज्जनीं नगरें दोन ॥ तेथें जयाचें अधिष्ठान ॥ सप्रेम कीर्तन करीतसे ॥८॥
सैली मुद्रा कानीं असती ॥ वस्त्र कौपीन नेसे प्रीतीं ॥ याविरहित कांहीं उपाधि निश्चिती ॥ नावडे चित्तीं तयाचें ॥९॥
दिवसा राहून अरण्यांत ॥ एकांतीं श्रीहरीचें भजन करित ॥ रात्रीं नगरांत प्रेमभरित ॥ गुणानुवाद वर्णीतसे ॥१०॥
नावडे कवणाचा सन्मान ॥ लौकिक पूजा दांभिक भजन ॥ नावडे वस्त्र संपत्ति धन ॥ मिष्टान्नभोजन नावडे ॥११॥
तंव शिवाजी पंढरीसी ॥ यात्रेस आला एके दिवसीं ॥ ऐकूनि गणेशनाथाचे कीर्तिसी ॥ आला भेटीसी नृपवर ॥१२॥
करूनियां साष्टांग नमन ॥ श्रवण करीत बैसला कीर्तन ॥ गणेशनाथाचें विशाल ज्ञान ॥ कवित्व बोलणें प्रासादिक ॥१३॥
नानापरेंचे दृष्टांत देऊन ॥ अभंग रची जैसे बाण ॥ तेणें श्रोतयांचे श्रवण ॥ सुख पावती अपार ॥१४॥
तंव शयन करावया आपणातें ॥ पलंग करविला नृपनाथें ॥ म्हणे प्रथम दिवसीं गणेशनाथ ॥ निजवावा निश्चित यावरी ॥१५॥
मग कर जोडोनि म्हणे स्वामी ॥ एक रात्र क्रमावी आमुचे आश्रमीं ॥ तल्पक करविला नूतन आम्हीं ॥ म्हणोनि चरणीं लागला ॥१६॥
पाहूनि नृपवराचा आदर ॥ नाथासी संकट पडिलें थोर ॥ जैसा कां हरिणीसी नेऊं म्हणतां व्याघ्र ॥ भयें अंतर कांपे तिचें ॥१७॥
संकट जाणोनि ते वेळ ॥ अवश्य म्हणे वैराग्यशीळ ॥ मग खडे वेंचोनि एक ओंजळ ॥ पदरीं बांधिले तेधवां ॥१८॥
देखोनि नृपवर पुसे तया ॥ कंकर वेंचोनि घेतले कासया ॥ येरू उत्तर देत तया ॥ गणती घ्यावया नामांची ॥१९॥
शिबिकेंत बैसवोन ते आसरीं ॥ राजा घेऊन गेला बिढारीं ॥ सुमनशेज रचोनि वरी ॥ गणेशनाथासी निजविलें ॥२०॥
त्रयोदशगुणी करून विडे ॥ तबकीं ठेविले तया पुढें ॥ समया लावूनि अतिनिवाडें ॥ टाकिले पडदे चहूंकडे ॥२१॥
नानापरींचे परिमळ निश्चिती ॥ उपचार विलासभोग संपत्ति ॥ ठेवूनियां तेथें नृपति ॥ बाहेर आला सत्वर ॥२२॥
तों स्पर्शविषय देखोनि नेत्रीं ॥ अनुताप वाटला सकळ गात्रीं ॥ जैसा कां द्विज अग्निहोत्रीं ॥ यवनमंदिरीं कोंडिला ॥२३॥
कीं व्यघ्र जितचि धरूनि गाय ॥ आपुले जाळींत घेऊनि जाय ॥ ते जैसी लवकर निघों पाहे धरूनि भय मानसीं ॥२४॥
नातरी काननींहूनि आणिलें हरिण ॥ राजमंदिरीं बांधिलें जाण ॥ मग तें मानसीं इच्छीत पूर्ण ॥ जाईन सुटोन कधीं मी ॥२५॥
कीं घृतांत जिवंत धरोनि मासा ॥ घालितां तळमळ करी जैसा ॥ राजाचा भोगउपचार तैसा गणेशनाथासी वाटला ॥२६॥
कीं नूतन रावा पिंजर्‍यांत घातला ॥ मग चारी पाणी न रुचे त्याला ॥ तेवीं तल्पकावरी विरक्त भला ॥ कंटाळला ते रीतीं ॥२७॥
सांगातें घेतले होते कंकर ॥ ते पसरूनि टाकिले पलंगावर ॥ त्याजवरी निजले घटिका चार ॥ तंव उदयासी दिनकरे पातला ॥२८॥
राय दर्शनासी आला झडकरी ॥ तों खडे आंथरले पलंगावरी ॥ विस्मित होऊनि निजअंतरीं ॥ नमस्कार करी साष्टांग ॥२९॥
नाथासी पुसे जोडोनि कर ॥ तंव ते देंती प्रत्युत्तर ॥ शयन करितां पलंगावर ॥ निद्रा अघोर लागेल कीं ॥३०॥
तुझा हेत व्हावया पूर्ण ॥ खडे पसरूनि केलें शयन ॥ जरी सुख दिधलें जीवाकारण ॥ तरी पुढें दुःख भोगणें तितुकेंचि ॥३१॥
जैसी खरूज खाजवितां पाहीं ॥ परम सुख वाटे ते समयीं ॥ मग खाज निघोनि गेल्या देहीं ॥ सौख्य कांहीं पडेना ॥३२॥
नातरी भोजन करितां गोड वाटे ॥ परी वमन करितां जीव कष्टे ॥ तेवें शयनसुख आधीं गोमटें ॥ मग परिणामीं खोटें देहासी ॥३३॥
कां बचनाग आधीं मधुर लागत ॥ परी खाणार प्राणासी मुकत ॥ तेवीं विषय भोगितां भय सत्य ॥ जाण निश्चित नृपनाथा ॥३४॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ अनुताप जाहला रायाकारण ॥ म्हणे आजपासूनि मी पलंगीं शयन ॥ न करीं जाण सर्वथा ॥३५॥
निश्चय करूनि निजमानसीं ॥ तल्पक अर्पिला ब्राह्मणासी ॥ संतसंगाची महिमा ऐसी ॥ ब्रह्मादिकासी अगम्य ॥३६॥
गणेशनाथाची ऐसी स्थित ॥ तीन्ही अवस्था वैराग्यभरित ॥ वस्ती न करीचि ग्रामांत ॥ हिंडे अरण्यांत सर्वदा ॥३७॥
स्वदेशांत कीर्तन होतां जाण ॥ दर्शना येती भाविक जन ॥ नित्य अनुग्रह एकालागून ॥ स्वइच्छेनें देतसे ॥३८॥
मस्तकीं हस्त पडतां जाण ॥ शिष्याचें उडे प्रपंचभान ॥ तो संसारधंदा टाकून रानोरान हिंडतसे ॥३९॥
तो खळ अथवा दुराचार ॥ निंदक अथवा सज्ञान नर ॥ परी नाथाचा शिरीं पडलिया कर ॥ अपार वैराग्य होय तया ॥४०॥
ऐसा एक संवत्सर जंव लोटे ॥ तंव शिष्य जाहले तीनशेंसाठ ॥ लंगोटबंद वैराग्य उद्भट ॥ आत्मज्ञान स्पष्ट पावले ॥४१॥
पुरीं पैठणीं लोक बोलती ॥ जे कां याचा उपदेश घेती ॥ त्यांची तत्काळ उडोनि प्रपंचभ्रांती ॥ मागें हिंडती सद्गुरूचे ॥४२॥
एक म्हणती चेटकी दारुण ॥ एक म्हणती घालितो मोहन ॥ एक म्हणती आत्मज्ञान ॥ ठसावलें संपूर्ण तयासी ॥४३॥
एक म्हणती हा स्वयें पांडुरंग ॥ एक म्हणती हें अत्यंत ढोंग ॥ एक म्हणती त्याचा संग ॥ करितां भवभंग होतसे ॥४४॥
एक म्हणती त्याचे दर्शना ॥ इतःपर जाऊं न द्यावें कोणा ॥ एक म्हणती होणार चुकेना ॥ प्राक्तनीं असेल जें काहीं ॥४५॥
एक म्हणती त्याची भेटीं ॥ घेऊन सांगों चार गोष्टी ॥ कीं बहुतांचें जीवांची करूनि साटी ॥ पडली तुटी संसारा ॥४६॥
ऐसें म्हणोनि एके दिवशीं ॥ आले नाथाचें दर्शनासी ॥ तों हे आम्रवृक्षाचे छायेसी ॥ बैसले होते ध्यानस्थ ॥४७॥
मानसपूजा झालिया त्वरित ॥ गणेशनाथ पाहे भोंवत ॥ कीं शिष्य बोलावूनि येथ ॥ मस्तकीं हस्त ठेवावा ॥४८॥
तंव उभे ठाकूनि ते वेळ ॥ काय बोलती निंदक खळ ॥ तुम्हीं शिष्य करूनि भोळसाळ ॥ आपुल्या मागें लाविले ॥४९॥
बहुतांचे संसारा केली तुटी ॥ म्हणोनि लोक होताती कष्टी ॥ आतां आम्हीं सांगतों एक गोष्टी ॥ तरी त्याचि राहाटीं वर्तावें ॥५०॥
तुम्हीं संत आत्मज्ञानी ॥ दृष्टीसी सारिख्या चारी खाणी ॥ तरी झाडासी उपदेश आजपासोनि ॥ करीत जावा निजकृपें ॥५१॥
अवश्य म्हणोनि तये क्षणीं ॥ तत्काळ कौतुक दाखविलें नयनीं ॥ जें मृत्युलोकीं नानासाधनीं ॥ नये घडोनि सर्वथा ॥५२॥
चूतवृक्ष जुनाट होता तेथ ॥ त्यासी उपदेश देऊनि त्वरित ॥ मस्तकीं ठेवूनियां हस्त ॥ तारक मंत्र सांगितला ॥५३॥
ऐसें दृष्टीस देखोन ॥ काय बोलती ते विचक्षण ॥ मनुष्यांसी अनुग्रह सांगतां जाण ॥ जे प्रपंचभान टाकिती ॥५४॥
हा उपदेश ठसावला वृक्षासी ॥ हें कैसें अनुभवेल आम्हांसी ॥ तरी चमत्कार दाऊनियां निजकृपेसी ॥ संशय निरसीं सकळांचा ॥५५॥
तंव भाकरभाजी याजकारण ॥ नैवेद्यासी आणिली होती कवण ॥ गणेशनाथें ते उचलोन ॥ आपुले करीं घेतली ॥५६॥
उपदेश दीधला ज्या वृक्षाकारण ॥ तयासी काय बोलिला वचन ॥ हा देवाचा प्रसाद मुख पसरून ॥ प्रीतींकरोन भक्षीं कां ॥५७॥
ऐसें बोलतां सद्गुरुनाथ ॥ तंव अद्भुत कौतुक वर्तलें तेथ ॥ झाडाचें खोड अकस्मात ॥ उकललें सर्वांदेखतां ॥५८॥
त्यामाजी भाकर घालितां देख ॥ मिळोनि गेलें पहिल्याचसारिख ॥ देखोनि आश्चर्य करिती लोक ॥ तन्मय सकलिक झाले कीं ॥५९॥
गणेशनाथासी ते वेळ ॥ नमस्कार करिती विचक्षण खळ ॥ म्हणती तुजऐसा भक्त प्रेमळ ॥ सज्ञान निर्मळ नसेचि ॥६०॥
आम्हीं अहंकार धरूनि मना ॥ व्यर्थचि केली तुमची छळणा ॥ ऐशारीतीं बोलोनि वचना ॥ आपुल्या सदना ते गेले ॥६१॥
एके दिवसीं गणेशनाथ ॥ अरण्यामाजी कीर्तन करीत ॥ श्रवणासी आले सज्ञान पंडित ॥ आणि वैष्णवभक्त विवेकी ॥६२॥
वैदिक शात्रज्ञ आणि भाविक ॥ अठरा वर्षांचे मिळाले लोक ॥ कीर्तनप्रेमाचें निजसुख ॥ पहावयासी पावले ॥६३॥
टाळ विणे मृदंग वाजत ॥ नामघोषगजर होत ॥ नादें अंबर भरूनि तेथ ॥ कोंदोनि गेलें तेधवां ॥६४॥
तंव वरते करूनि हात ॥ पताका करवी गणेशनाथ ॥ हें देखोनि सज्ञान पंडित ॥ काय बोलत तें ऐका ॥६५॥
तूं तरी भराडी जातीचा हीन ॥ आम्हीं तों ब्राह्मण उंचवर्ण ॥ कीर्तनीं टाळ्या तुझे वचनेंकरून ॥ न पिटूं जाण सर्वथा ॥६६॥
यावरी गणेशनाथ उत्तर देत ॥ म्हणे ताडाचा वृक्ष उंच बहुत ॥ परी त्याची छाया उपयोगीं निश्चित ॥ नाहीं पडत कोणाचे ॥६७॥
तेवीं अठरा वर्षांमाजी निपुण ॥ विप्र तंव वरिष्ठ पूज्यमान ॥ परी कीर्तनाचे उपयोगीं जाण ॥ तुमचे कर न पडती ॥६८॥
तरी आतां स्वस्थ करूनि मन ॥ उगेम्चि तुम्हीं करावें श्रवण ॥ टाळिया वाजवितील पाषाण ॥ तुमचे कृपेनें स्वामिया ॥६९॥
ऐसें बोलतां वैराग्यशीळ ॥ तो नवल वर्तलें देखती सकळ ॥ दगडगोटे होते माळ्यावर ॥ तो एकाएकीं उठिले पैं ॥७०॥
जैशा करताळिया वाजती देख ॥ तैसे लागती एकासी एक ॥ ऐसें देखोनियां कौतुक ॥ तटस्थ लोक पाहाती ॥७१॥
म्हणती हें कौतुक अभिनव ॥ दगडांसी कैसा आणिला जीव ॥ गणेशनाथाचा अनुपम भाव ॥ न कळे माव इंद्रादिकां ॥७२॥
मग चित्तीं अनुताप धरून ॥ टाळ्य़ा वाजविती सकळ ब्राह्मण ॥ गणेशनाथाचें समाधान ॥ जाहलें इतुकेन तेधवां ॥७३॥
तों माध्यान्हीं आला गभस्ती ॥ मग उजळिली मंगळारती ॥ खिरापत घेऊनि निश्चितीं ॥ सदनाप्रती लोक गेले ॥७४॥
आम्हीं अहंकार धरून व्यर्थ केलें त्याचें छळण ॥ ऐशापरी वचनें बोलून ॥ वाखाणिती गणेशनाथा ॥७५॥
गणेशनाथ प्रेमळ भक्त ॥ त्यासी वर देती पंढरीनाथ ॥ उज्जनी आणि सारशांत ॥ यात्रा भरत अद्यापि ॥७६॥
संत महंत वैष्णव प्रेमळ ॥ चमत्कार जागृत असे तें स्थळ ॥ निजभक्तांची कीर्ति चिरकाळ ॥ दीनदयाळ वाढवितो ॥७७॥
आतां न लिंपेचि जो विषयकर्दमीं ॥ परम भाविक जो केशवस्वामी ॥ तयाचें चरित्र मनोधर्मीं ॥ ऐका तुम्ही भाविक हो ॥७८॥
स्वेच्छें हिंडतां देशावरी ॥ एकदां गेले विजापुरीं ॥ हरिदिनीसी सप्रेमभरीं ॥ कीर्तन मांडिलें चोहटां ॥७९॥
केशवस्वामींची ऐकोनि स्थित ॥ श्रवणासी आले लोक बहुत ॥ वैदिक विप्र आणि पंडित ॥ संतमहंत विरक्तही ॥८०॥
अठरा वर्णांचे नारीनर ॥ जाणते नेणते लहान थोर ॥ दाटी जाहली बहुफार ॥ भरूनि बाजार निघाला ॥८१॥
हिलाल जळती सभोंवते ॥ टाळमृदंगघोष तेथें ॥ केशवस्वामी सप्रेम चित्तें ॥ आनंदें नाचत कीर्तनीं ॥८२॥
तंव शिष्य होता वृद्ध ब्राह्मण ॥ तयाप्रती काय बोलती वचन ॥ आजी एकादशीव्रत गहन ॥ उपोषण सकळांसी ॥८३॥
तरी तूं वाणियाचें गृहासी जाईं ॥ सुंठ साखर घेऊनि येईं ॥ तेचि खिरापत जातेसमयीं ॥ लोकांसी देईं प्रसाद ॥८४॥
आज्ञा ऐसी होतां त्वरित ॥ ब्राह्मण गेला बाजारांत ॥ वाणियाचें दुकानीं जात ॥ तंव तो निद्रित होता कीं ॥८५॥
हांका मारूनि सावध केला ॥ म्हणे सुंठ साखर देईं मजला ॥ अवश्य म्हणोनि वाणी उठिला ॥ तों अंधार पडिला दुकानांत ॥८६॥
सुंठ चांचपोनि जंव पाहात ॥ तंव बचनागाचें लागलें पोत ॥ सात शेर मोजूनि दिधली त्वरित ॥ पडली भ्रांत मानसीं ॥८७॥
साखर तितुकीच देऊन ॥ वाणी तयासी बोले प्रतिवचन ॥ माझा पुत्र हाटा गेला म्हणून ॥ कीर्तनासी येणें न जाहलें ॥८८॥
माणसें मिळाली असतील फार ॥ सुंठ न पुरे एवढी साचार ॥ म्हणूनि आणिक ओंजळभर ॥ अधिक टाकिली तयानें ॥८९॥
जैसें अभय देऊनि घातला दर्प ॥ कीं प्रार्थना म्हणोनि अपशब्द अमूप ॥ कीं पुष्पहार म्हणूनि महासर्प ॥ कंठीं घातला न कळतां ॥९०॥
कीं अनुष्ठान म्हणोनि प्रयोग केला ॥ कीं औषध म्हणोनि रोग दिधला ॥ कीं मेघ म्हणोनि अग्नि लाविला ॥ काननीं जैसा न कळतां ॥९१॥
तैसेंच वाणियानें केलें ॥ सुंठ म्हणोनि विष दिधलें ॥ निद्रालस्यें फार व्यापिलें ॥ समजलें नाहीं तयासी ॥९२॥
घेणारासही न कळे कांहीं ॥ मग बिर्‍हाडासी आला लवलाहीं ॥ आडकित्त्यानें ते समयीं ॥ तुकडे करूनि ठेविले ॥९३॥
हा न कळतां ओढवला आघात ॥ हें जाणोनि पंढरीनाथ ॥ म्हणे श्रोते भक्षितील खिरापत ॥ मग मोठा अनर्थ होईल कीं ॥९४॥
एकादशीचा उपास जाण ॥ बचनाग खातां पावती मरण ॥ मग पुढें माझें कीर्तनश्रवण ॥ कोणी न करितील सर्वथा ॥९५॥
आणि निजभक्ताच्या वचनास ॥ कोणी न धरितील विश्वास ॥ मग मागील कीर्ति माझी सुरस ॥ असत्य जनांस वाटेल कीं ॥९६॥
ऐसें म्हणोनि पंढरीनाथ ॥ म्हणे आजि टाळावा अनर्थ ॥ मग बचनागाचें विष समस्त ॥ शोषून घेतलें तेधवां ॥९७॥
विषाचें अमृत केलें जाण ॥ जें सेवितां सौख्य दासां कारण ॥ जेणें जन्ममरणांचें होय खंडन ॥ तें जगज्जीवन करीतसे ॥९८॥
इकडे कीर्तनामाजी केशव भक्त ॥ प्रेमानंदें गात नाचत ॥ टाळिया पिटोनि हातोहात ॥ गुण वर्णित श्रीहरीचे ॥९९॥
चारी प्रहर झालें कीर्तन ॥ ओंवाळिला रुक्मिणीरमण ॥ बचनागाची खिरापत जाण ॥ सकळांकारण वांटिली ॥१००॥
हरिप्रसाद म्हणोनि निश्चितीं ॥ पदरीं बांधोनि ठेविती ॥ तेथेंच भक्षोनि कित्येक जाती ॥ सदनाप्रति आपुल्या ॥१॥
इकडे उदया येतां वासरमणी ॥ दुकानीं जागा जाहला वाणी ॥ तों बचनागाचें पोतें नयनीं ॥ पुढें अकस्मात देखिलें ॥२॥
म्हणे अनर्थ जाहल थोर ॥ आतां काय करावा विचार ॥ सुंठ म्हणोनि साचार ॥ बचनागचि दिधला ॥३॥
साधुसंत प्रेमळ भक्त ॥ आले असतील कीर्तनांत ॥ ते सकळ पावले असतील मृत्य ॥ मजवरी निमित्त आलें कीं ॥४॥
नगरांत कळतां वर्तमान ॥ कोण रक्षील मजलागून ॥ मृत्यु पावल्यावरी जाण ॥ रौरव भोगणें लागेल कीं ॥५॥
तरी या लोकीं परलोकीं निश्चितीं ॥ मी कानकोंडा जाहलों दुर्मती ॥ मजऐसा पातकी निश्चितीं ॥ नाहीं त्रिजगतीं सर्वथा ॥६॥
चतुष्पदांमाजी निंद्य जनीं ॥ खर सूकर जातीचे दोनी ॥ मी अवगुणी तयांहूनी ॥ यापरी वाणी अनुतापला ॥७॥
तरी आतां कासया वागवावें जिण ॥ विहिरींत घालून द्यावा प्राण ॥ ऐसा मनीं निश्चय करून ॥ दुकान टाकोन निघाला ॥८॥
समाचार घेतां नगरांत ॥ तंव कोणीच नाहीं पावले मृत्य ॥ कान देऊनि उगाचि ऐकत ॥ तों कोणीच रडत दिसेना ॥९॥
परस्परें पुसे लोकांसी ॥ गेले होतेत काय हरिकथेसी ॥ खिरापती असली तुम्हांपासीं ॥ तरी प्रसाद आम्हांसी देइंजे ॥११०॥
ते म्हणती आम्हांसी निराहार ॥ रात्रीस वांटिली सुंठ साखर ॥ तेथेंचि ते भक्षोनि सत्वर ॥ सदनासी आलों आपुलें ॥११॥
यावरी वाणी बोले त्यांसी ॥ कालचें निश्चक्र तुम्हांसी ॥ पोटांत होत असेल कासाविसी ॥ तरी भोजन वेगेंसीं करावें ॥१२॥
ते म्हणती दंडक आम्हांप्रती ॥ तुजऐसे न हों अन्नार्थी ॥ उपवासी राहावया आनिक राती ॥ सामर्थ्य चित्तीं वागवितों ॥१३॥
ऐसें ऐकून उत्तर ॥ परस्परें घेतला समाचार ॥ मग श्मशानभूमीसी सत्वर ॥ जाऊनियां पाहिलें ॥१४॥
तंव एकही प्रेत न दिसे तेथ ॥ मग वाणियासी चमत्कार वाटत ॥ म्हणे अरिष्ट निरसी पंढरीनाथ ॥ चुकविले आघात बहुतांचे ॥१५॥
तों इकडें केशवस्वामी स्नान करूनी ॥ धातुमूर्ति पाहे विलोकूनी ॥ तंव काळिमा देखिला तयालागूनी ॥ मग विस्मय मनीं वाटला ॥१६॥
जैसें चंद्रासी लागतां ग्रहण ॥ तो तत्काळ होय तेजोहीन ॥ तैशा रीतीं रुक्मिणीरमण ॥ नीलवर्ण दिसतों कीं ॥१७॥  
हें देखोनि केशव भक्त ॥ आश्चर्य करीतसे मनांत ॥ म्हणे मूर्ति होती लखलखित ॥ आजि काळिमा अद्भुत जडली कां ॥१८॥
हें नवल ऐकोनि साचार ॥ पाहावयासी आले नारीनर ॥ तों वाणी येऊनि सत्वर ॥ केशव स्वामीसी बोलतसे ॥१९॥
सुंठ पाहातां अंधारांत ॥ बचनागाचें पोतें हातां लागत ॥ सात शेर मोजूनि निश्चित ॥ आपुल्या हातें दिधलें म्यां ॥१२०॥
तें अरिष्ट निरसिलें पंढरीनाथें ॥ वांचविलें सकळ श्रोतयांतें ॥ अपराधाचें प्रायश्चित्त मातें ॥ सांगा त्वरित स्वामिया ॥२१॥
केशवस्वामी ऐकोनि मात ॥ नेत्रीं प्रेमाश्रु लोटले त्वरित ॥ कंठ जाहला सद्गदित ॥ काय बोलत देवासी ॥२२॥
जय जय दीनदयाळे विठ्ठले ॥ आजिचें निमित्त थोर टाळिलें ॥ आपुलें बिरुद सत्य केलें ॥ दासांसी रक्षिलें निजकृपें ॥२३॥
बचनागाचें विष दारुण ॥ तुजलागीं चढलें नीलवर्ण ॥ वांचवूनि बहुतांचे प्राण ॥ आपण श्यामवर्ण जाहलेति ॥२४॥
तुझें नाम जपतां प्रल्हादभक्त ॥ महाविषाचें जाहलें अमृत ॥ आणि बचनागाचें विष किंचित ॥ तें आजि बाधत कैशा रीतीं ॥२५॥
तूं सर्वांवरिष्ठ देवाधिदेव ॥ भजन करितां निवाला शिव ॥ आणि बचनागें आजि केला उपद्रव ॥ हाचि नवलाव श्रीविठ्ठला ॥२६॥
निजांगें तुडविला कालिय सहज ॥ तैं बाधक कांहीं न जाहलें तुज ॥ आणि बजनागें काळिमा आणिली आज ॥ हें नवल चोज श्रीहरे ॥२७॥
महाविषें भरूनि स्तन ॥ पूतनेनें पाजिलें तुजलागून ॥ तयाहूनि बचनाग कठिण ॥ जाहलेति नीलवर्ण यासाठीं ॥२८॥
आजि अमृतासचि आलें मरण ॥ कीं अंधारें ग्रासिलें सूर्यालागून ॥ कीं भागीरथी पापेंकरून ॥ जाहली मलिन सर्वांगीं ॥२९॥
कीं पृथ्वीसी जाहला तृणाचा भार ॥ कीं पर्वतासी भिऊनि पळालें वज्र ॥ कीं धुळीनें मळोनि गेलें अंबर ॥ तैसा विचार घडला कीं ॥१३०॥
नातरी चंद्रमंडलासी जाहला उबारा ॥ कीं क्षुधा लागली क्षीरसागरा ॥ पिशाचबाधा पार्वतीवरा ॥ जाहली ऐसें वाटतसे ॥३१॥
नातरी दरिद्रें पीडिला कुबेर ॥ कीं विधीचें असत्य जाहले उत्तर ॥ कीं तेजें लोपूनि गेलें अंबर ॥ तैसें दिसोनि आलें कीं ॥३२॥
हें इतुकें घडेल गोविंदा ॥ तरी तुज नव्हेचि विषबाधा ॥ परी वाढवावया दासांची मर्यादा ॥ लीला सगुण दाखविली ॥३३॥
तूं अज अजित पंढरीनाथा ॥ कळीकाळाचाही नियंता ॥ तरी कृपा करूनि अनाथनाथा ॥ होईं मागुता सोज्ज्वळ ॥३४॥
ऐसी ऐकूनियां स्तुती ॥ संतोषले रुक्मिणीपती ॥ लखलखित धातूची मूर्ती ॥ दिसों लागली तेधवां ॥३५॥
हें दृष्टीस देखोनि कौतुक ॥ आश्चर्य करिती सकळ लोक ॥ म्हणती कीर्तनापरीस साधन आणिक ॥ नाहीं सर्वथा कलियुगीं ॥३६॥
वाणियासी अनुताप जाहला पूर्ण ॥ सांडिलें सकळ प्रपंचभान ॥ केशवस्वामीचे संगतीनें जाण ॥ करी श्रवण हरिकथा ॥३७॥
आणिक चरित्र रसाळ वाणी ॥ श्रोतीं सादर ऐकावें श्रवणीं ॥ गोमाईआवा विधवा ब्राह्मणी ॥ पंढरपुरासी चालिली ॥३८॥
परम दुर्बळ अति दीन ॥ भक्षावयासी न मिळे अन्न ॥ वस्त्र नेसली फाटकें जीर्ण ॥ मागे कोरान्न घरोघरीं ॥३९॥
गुळसर्‍यापासीं आली सत्वर ॥ चंद्रभागेसी चालिला पूर ॥ मानसीं जाहली चिंतातुर ॥ म्हणे कोण उतार करील मज ॥१४०॥
मग आषाढशुद्ध दशमीसी ॥ यात्रा राहिली उपवासी ॥ गोमाई म्हणे कोळियासी ॥ न्यावें मजला पैलतीरा ॥४१॥
यात्रा मिळाली असे बहुत ॥ थोरथोर लोक भाग्यवंत ॥ उतार्‍यांसी द्रव्य देऊनि त्वरित ॥ जाती नावेंत बैसोनि ॥४२॥
गोमाई जवळ धांवूनि जात ॥ तों लोटोनि उदकांत ॥ वस्त्र भिजतां रडत रडत ॥ मागुती येत बाहेरी ॥४३॥
दीर्घस्वरें करी रुदन ॥ आतां पैलतीरीं नेईल कोण ॥ तारू म्हणती पैसा देऊन ॥ जाईं उतरून म्हातारे ॥४४॥
गोमाई त्यांस देत उत्तर ॥ पीठ देतें ओंजळभर ॥ हें घेऊनियां सत्वर ॥ भिंवरापार करावें ॥४५॥
पैसा न मिळे मजप्रती ॥ ऐसें सांगे नाना रीतीं ॥ परी दया नुपजे तयांचें चित्तीं ॥ कठिण दुर्मति क्षेत्रींचे ॥४६॥
सकळ यात्रा उतरून गेली ॥ गोमाई राहिली ऐलतीरीं ॥ कांहीं उपाय न सुचे अंतरीं ॥ मग रुदन करी एकलीच ॥४७॥
म्हणे मज न भेटे रुक्मिणीवर ॥ व्यर्थचि पडिला येरझार ॥ क्षेत्रवासी लोक कठिण फार ॥ द्रवेना अंतर कोणाचें ॥४८॥
ऐसें जाणोनि पंढरीनाथ ॥ कोळियाचें रूप धरूनि त्वरित ॥ जवळ सांगडी दीननाथ ॥ घेते झाले तेधवां ॥४९॥
गोमाईजवळ जाऊनि श्रीहरी ॥ काय बोलती ते अवसरीं ॥ तुज जाणें असेल पैलतीरीं ॥ तरी ऊठ लवकरी म्हातारे ॥१५०॥
ती म्हणे बापा मी दुर्बळ ॥ द्रव्य द्यावयासी नाहीं जवळ ॥ तरी पीठ घेऊनि ओंजळभर ॥ नेशील तर येईन मी ॥५१॥
यावरी म्हणे शेषशायी ॥ मी कोणापासून घेत नाहीं ॥ रंजल्या गांजल्यास पाहीं ॥ मी लवलाहीं उतरीतएसं ॥५२॥
यासाठींच दिवस बहुत ॥ राहिलों असें पंढरपुरांत ॥ ऐसी ऐकूनियां मात ॥ गोमाई चित्तांत संतोषली ॥५३॥
म्हणे तारुवा वचन ऐक ॥ रात्र झालीसे प्रहर एक ॥ दुसरें वस्त्र नाहीं आणिक ॥ नेसावयासी मजलागीं ॥५४॥
यावरी बोले पंढरीनाथ ॥ भिजोंन देतां हस्तपादसहित ॥ खांद्यावरी बैसवूनि निश्चित ॥ नेतों लवलाही पैलतीरा ॥५५॥
ऐसें म्हणूनि दीनदयाळ ॥ गोमाईसी उचलिलें ते वेळ ॥ लोटलें नसतां एक पळ ॥ नेलें तत्काळ पैलतीरा ॥५६॥
गोमाई तारुवासी काय्बोले तुझें अंग कैसें नहीं भिजलें ॥ मज पैलतीरीं बैसविलें ॥ हें अद्भुत जाहलें नवल कीं ॥५७॥
यावरी म्हणे चक्रपाणी ॥ मी तैसा उतार्‍या नव्हे आडाणी ॥ भवसिंधु दासांलागूनी ॥ कोरडाचि पार पाववितों ॥५८॥
गोमाई म्हणे ते अवसरीं ॥ तुवां उपकार केला माझें शिरीं ॥ तरी पीठ देतें ओंजळभरी ॥ हें घेईं पदरीं आपुल्या ॥५९॥
यावरी देव बोलिले कायी ॥ मी कोणापासूनि घेत नाहीं ॥ याचे पानगे करूनि पाहीं ॥ द्वादशीस घालीं द्विजवरां ॥१६०॥
ऐसें बोलोनि जगज्जीवन ॥ अदृश्य जाहलें न लागतां क्षण ॥ मग गोमाईनें महाद्वारासी जाऊन ॥ घेतलें दर्शन देवाचें ॥६१॥
एकादशीस ऐकोनि कीर्तन ॥ केलें चंद्रभागेचें स्ना ॥ तें पीठ पदरीं बांधून ॥ वाळुवंटांत बैसली ॥६२॥
म्हणे आजि पर्वकाळ द्वादशी ॥ शिधा द्यावा ब्राह्मणासी ॥ तरी डाळ पीठ मजपासीं ॥ द्यावया पदरीं नसे कीं ॥६३॥
कोणी ब्राम्हण पडेल दृष्टी ॥ तयासी मधुर सांगेन गुजगोष्टी ॥ मजवरी करूनि कृपादृष्टी ॥ मूठभर पीठ घ्यावें स्वामिया ॥६४॥
परी कोणीच जवळ न ये ब्राह्मण ॥ म्हणती मुळींचि जाहला अपशकुन ॥ आजि कैसा भेटेल यजमान ॥ झालें दर्शन या विधवेचें ॥६५॥
टाकूनि गूळ तांदूळ घृत ॥ पीठ कोण घेतसे पदरांत ॥ ऐसें बोलोनि विप्र समस्त ॥ जवळी न येत कोणीही ॥६६॥
गोमाई म्हणे पंढरीनाथा ॥ काय उपाय करूं आतां ॥ द्वादशीस विप्र न मिळतां ॥ अन्न सर्वथा न घेईं मी ॥६७॥
ऐसा सदृढ देखोनि भाव ॥ तत्काळ पावला पंढरीराव ॥ वृद्ध ब्राह्मण देवाधिदेव ॥ होऊनि आला ते समयीं ॥६८॥
गोमाईस म्हणे ते वेळ ॥ आजि द्वादशी पर्वकाळ ॥ आणि मी ब्राह्मण अति दुर्बळ ॥ आलों तत्काळ तुजपाशीं ॥६९॥
पानग्याचें पीठ असेल जरी ॥ तरी सद्भावें घालावें माझे पदरीं ॥ ऐसें बोलतांचि श्रीहरी ॥ संतोष अंतरीं वाटला ॥१७०॥
पुढती बोले द्विजवर ॥ मजला कोठेंचि नाहीं थार ॥ देउळीं घेतलें बिढार ॥ क्षुधातुर जाहलों कीं ॥७१॥
जरी पानगे भाजोनि देशील येथ ॥ तरी भोजन करीन संतोषचित्त ॥ ऐसें बोलतां पंढरीनाथ ॥ गोमाई चित्तांत संतोषली ॥७२॥
मग शुभा वेंचोनि निजांगें ॥ स्नान करूनि भाजिणे पानगे ॥ ते आवडीकरूनि पांडुरंगें ॥ भक्षिले लगबगें निजप्रीतीं ॥७३॥
तों इतक्यांत वृद्धरूप धरूनी ॥ जवळी आली माता रुक्मिणी ॥ म्हणे एकलेचि येऊनि चक्रपाणी ॥ बैसलेत भोजनीं न कळतां ॥७४॥
ब्राह्मण म्हणे गोमाईकारण ॥ आतां सुवासिनीसी घालीं भोजन ॥ तुझेंचि भाग्य सफळ जाण ॥ घडलें मेहुण अनायासें ॥७५॥
दोन पानग्यांचें पीठ होतें ॥ परी तयासी आली बरकत ॥ रुक्मिणी आणि पंढरीनाथ ॥ गोमाईसहित जेविलीं ॥७६॥
मुखशुद्धी घेऊनि तुलसीदल ॥ अदृश्य जाले दीनदयाळ ॥ आणिक चरित्र बहु रसाळ ॥ परिसा प्रेमळ भाविक हो ॥७७॥
लतिबशाह मुसलमान ॥ परम भाविक वैषणवजन ॥ गीता भागवत करी श्रवण ॥ श्रीरामभजन अहर्निशीं ॥७८॥
सांडोनि आपुला यवनधर्म ॥ कीर्तनीं लाविलें अद्भुत प्रेम ॥ अर्चन पूजा नित्यनेम ॥ करीत निःसीम आवडी ॥७९॥
मग सकळ यवन मिळून ॥ रायासी सांगते वर्तमान ॥ कीं लतिबशाह श्रीरामभजन ॥ करीतसे अहर्निशीं ॥१८०॥
अविंध राजा अविवेकी बहुत ॥ तेणें छळणासी पाठविले दूत ॥ कीं लतिबशाहाचा आश्रम त्वरित ॥ लुटोनि फस्त करावा ॥८१॥
राजाज्ञा होतांचि देख ॥ तत्काळ धांवले सकळ सेवक ॥ परी तयाचें दर्शनें शांतिसुख ॥ पावले सकळिक ते समयीं ॥८२॥
अनुताप जाहला त्यांचें चित्ता ॥ म्हणती राजसेवा न करावी आतां ॥ श्राण करीत भगवद्गीता ॥ येतेंचि निरंतर असावें ॥८३॥
राजा विस्मित मन करून ॥ म्हणे कोणीचि न येती परतोन ॥ तरी आपणचि निजांगें जाऊन ॥ करूं छळण तयाचें ॥८४॥
बादशाह येतो छळणेलागूनी ॥ हा वृत्तांत कळला त्याचें मनीं ॥ मग भगवताचें पुस्तक काढोनी ॥ वृंदावनीं बैसला ॥८५॥
भोंवते प्रमळ भाविक सज्जन ॥ श्रवण करिती आवडीकरून ॥ तंव इतुक्यांत अविंध राजा त्वरेंकरून ॥ बैसला येऊन त्या ठायीं ॥८६॥
सभोंवतें पाहे ते वेळ ॥ तों सारवूनि केलें स्थळ निर्मळ ॥ भोंवतीं सुगंधपुष्प परिमळ ॥ मध्यें तुळसीवृंदावन ॥८७॥
चुनेगच्ची नितळ केल्या भिंती ॥ त्याजवरी चित्रें लिहिलीं निगुतीं ॥ दशावतारांच्या आकृती ॥ काढिल्या असती तयांवरी ॥८८॥
आणिक तीर्थें क्षेत्रें पुरी ॥ लिहिलीं असती तयांवरी ॥ वैकुंठ कैलास काढोनि कुसरी ॥ रंग करारी दीधला ॥८९॥
ऐसें स्थळ देखोन ॥ अविंध जाहलासे क्रोधायमान ॥ मग छळणाचा उपक्रम ॥ काढिता जाहला तेधवां ॥१९०॥
राधिकाकृष्ण वृंदावनीं ॥ लिहिलीं होतीं चितार्‍य़ांनीं ॥ राधा हातीं विडा घेऊनी ॥ देतसे वदनीं कृष्णाचें ॥९१॥
लतिबशाहासी राजा बोलत ॥ हीं उभयतां लिहिलीं कोण येथ ॥ तें मज सांगावें जी त्वरित ॥ ऐसें बोलत सक्रोध ॥९२॥
लतिबशाह बोले वचन ॥ तीं राधिकाकृष्ण दोघें जण ॥ तिचे हातीं काय म्हणोन ॥ रायें पुसिलें तयासी ॥९३॥
विष्णुभक्त सांगे तयाप्रती ॥ विडा करोनि कृष्णासी देती ॥ ऐसी ऐकोनि वचनोक्ती ॥ अविंध चित्तीं संतापला ॥९४॥
मग म्हणे राधिका विडा देत ॥ तरी तुझा कृष्ण कां नाहीं खात ॥ ऐसी ऐकतांचि मात ॥ प्रेमळ भक्त ऊठिला ॥९५॥
मग दोन्ही कर जोडूनियां जाणा ॥ कृष्णजींस भाकीत करुणा ॥ भक्तकैवारिया जगन्मोहना ॥ ऐकें विज्ञापना एक माझी ॥९६॥
विडा घेऊनि सद्भावेंसीं ॥ राधिका उभी तुम्हांपासीं ॥ तरी कृपा करोनि हृषीकेशी ॥ निजमुखीं घेईं कां ॥९७॥
निजभक्ताचा सप्रेम भाव ॥ देखोनि तुष्टला देवाधिदेव ॥ कौतुक दाखविलें अपूर्व ॥ मायालाघव करोनियां ॥९८॥
कृष्णाचें चित्र होतें लिहिलें ॥ त्यानें तत्काळ मुख पसरिलें ॥ राधिकेनें विडा ते वेळे ॥ मुखीं घातला लवलाहीं ॥९९॥
तेथें साक्ष ठेविली कोणेती ॥ विडा होता राधिकेचे हातीं ॥ तो हिरवा रंग अवचितीं ॥ पुसोनि गेला तेधवां ॥२००॥
ऐसें कौतुक देखोन ॥ लतीबशाहासी केलें नमन ॥ म्हणे धन्य तुझें शब्द भजन ॥ म्यां व्यर्थ छळण केलें कीं ॥१॥
ऐसें म्हणॊनि तया अवसरा ॥ राजा गेला आपुलें घरा ॥ निजभक्ताच्या कैवारा ॥ आले आकारा श्रीपती ॥२॥
अनंत भक्त अनंत चरित्र ॥ अनंत अवतार राजीवनेत्र ॥ महीपती त्याचा शरणागत ॥ गुण वर्णीत कीर्तनीं ॥३॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुषॆल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाइक भक्त ॥ पंचपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥२०४॥
॥ अध्याय ॥ ५५॥    ॥ श्रीकृष्णार्पणमस्त ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel