श्रीगणेशाय नमः ॥ श्रीराधाकृष्णाय नमः ॥    
जय क्षीराब्धिवासा शेषशयना ॥ लीलाविग्रही रुक्मिणीरमणा ॥ सगुणस्वरूपा भक्तभूषणा ॥ गुणनिधाना श्रीविठ्ठला ॥१॥
जय अनंतअवतार धरितया ॥ चैतन्यरूपा करुणालया ॥ अमरपाळका पंढरीराया ॥ निरसीं माया भक्तांची ॥२॥
जय सर्वव्यापका सर्वातीता ॥ गजेंद्ररक्षका वैकुंठनाथा ॥ निजभक्तांसी सुखदाता ॥ तुजविण सर्वथा असेना ॥३॥
जय जय चित्तचालका चैतन्यघना ॥ भक्तकैवारिया असुरदमना ॥ पुंडलीकवरदा रुक्मिणीरमणा ॥ जगज्जीवना पांडुरंगा ॥४॥
तूं विरिंचीचा निजजनिता ॥ सर्व करूनि होसी अकर्ता ॥ अणुरेणुइतका ठाव रिता ॥ न दिसे सर्वथा तुजविण ॥५॥
मजवरी कृपा करूनि आतां ॥ पुढें वदवीं निजभक्तकथा ॥ तुजविण साह्य जगन्नाथा ॥ आम्हां अनाथां कोण असे ॥६॥
मागील अध्यायीं कथा विशेष ॥ परमानंद जोगा निजदास ॥ त्याचें चरित्र अति सुरस ॥ वर्णियेलें असे पैं ॥७॥
शिवभक्त नरहरि प्रसिद्ध जनीं ॥ तोही लाविला आपुले ध्यानीं ॥ मग नामयासी छळोनि चक्रपाणी ॥ पाहिलें कसोनि मन त्याचें ॥८॥
पुढें पंढरीस एके दिवसीं ॥ यात्रा भरली कार्तिकमासीं ॥ त्यांत एक कुमारी वेगेंसीं ॥ महाद्वारासी पातली ॥९॥
मायबापांसी म्हणे ते अवसरीं ॥ मी येथेंच राहीन निरंतरीं ॥ आतां परतूनि माघारी ॥ नयें मंदिरीं तूमच्या ॥१०॥
ऐकूनि कुमारीचें वचन ॥ आश्चर्य करिती सकळ जन ॥ म्हणती सप्त वरुषांत असोन ॥ कैसें ज्ञान ईस जाहलें ॥११॥
मायबाप होती बहुत कष्टी ॥ परी ते नायकेचि कांहीं गोष्टी ॥ श्रीहरीनें पाहतां कृपादृष्टीं ॥ ममता पोटीं नुपजेचि ॥१२॥
ऐसा निश्चय देखोन ॥ वडिलांसी वाटलें समाधान ॥ कन्येसी महाद्वारीं टाकून ॥ गेले परतोन स्वदेशा ॥१३॥
कुमारी देखोनि दृष्टीसीं ॥ करुणा उपजली नामयासी ॥ म्हणे मायबापांविण परदेशी ॥ एकटी बैसलीस तूं कोण ॥१४॥
तुझिया बापाचा कोण ग्राम ॥ आपुलें सांग नाम ॥ काय वडिलांसी झाला श्रम ॥ म्हणोनि तुजला टाकिलें ॥१५॥
येरी बोले प्रतिवचनीं ॥ माझें नाम म्हणती जनी ॥ मायबाप चक्रपाणी ॥ त्याविण कोणी असेना ॥१६॥
वचन ऐकतां सरसी ॥ दया उपजली नामयासी ॥ हातीं धरूनि लेंकुरासी ॥ निजमंदिरासी पातला ॥१७॥
गोणाईस सांगितलें वर्तमान ॥ हें बाळक चुकलें यात्रेंतून ॥ मायबापांविण दिसतें दीन ॥ इचें संरक्षण करावें ॥१८॥
कृष्णावतारीं कुब्जा दासी ॥ तेचि अवतरली कलियुगासी ॥ मग यात्रेस्सी येऊन पंढरीसी ॥ हरिभजनासी विनटली ॥१९॥
दिवसेंदिवस जाहली थोर ॥ तिजला पुसती नारीनर ॥ तूं कोण आहेस साचार ॥ सांग सत्वर आम्हांसी ॥२०॥
जनी उत्तर देतसे त्यांसी ॥ म्हणे मी नामयाची अनन्यदासी ॥ त्याजविण माय बाप मजसी ॥ आणिक नाहीं सर्वथा ॥२१॥
संसारधंदा करितां जाण ॥ अखंड करी हरिस्मरण ॥ रात्रीं ऐकोनि हरिकीर्तन ॥ तैसेंचि मनन करीतसे ॥२२॥
तों नवल वर्तलें एके दिनीं ॥ नामदेव निजले होते सदनीं ॥ पांच घटिका जायली यामिनी ॥ तों मेघ गगनीं वोळला ॥२३॥
अपार सुटला प्रभंजन ॥ तेणें खोंपट प्रभंजन ॥ तेणें खोंपट गेलें उडोन ॥ ऐसें कळतां रुक्मिणीरमण ॥ सुदर्शन पाठविलें ॥२४॥
म्हणे नामयाचे मंदिरावरी ॥ क्षणभरी जाऊनि करीं तूं फेरी ॥ मीही मागूनि सत्वरी ॥ येतों लवकरी तुजपासीं ॥२५॥
कुटुंबासहित विष्णुभक्त ॥ निजला होता मंदिरांत ॥ तों विष्णुचक्र येऊनि तेथ ॥ फेरे घालीत चपळत्वें ॥२६॥
भोंवता पर्जन्य वर्षला मोठा ॥ परी याजवर न पडे थेंबुटा ॥ दास लागतां निजभक्तिवाटा ॥ निवारी संकटा लवलाहें ॥२७॥
ऐसें करूनि रुक्मिणीपती ॥ मागुती आले सत्वरगती ॥ आपुले हातें रचोनि भिंती ॥ छपरी निगुती शाकारिली ॥२८॥
ऐकोनि श्रोते म्हणती चतुर ॥ निजांगें येऊनि शारंगधर ॥ नामयाचें बांधिलें छप्पर ॥ तरी दिव्य मंदिर कां न केलें ॥२९॥
आपुले दासांसी श्रीपती ॥ पडों नेदीच संसारगुंती ॥ बहुत देतां धनसंपत्ती ॥ तरी उदासवृत्ती मोडेल ॥३०॥
पांडवांसी निर्मिला दुर्योधन ॥ तो अखंड करी त्यांचें छळण ॥ संकट पडतां जगज्जीवन ॥ आपण धांवण करीतसे ॥३१॥
म्हणे यांसी निर्भय ठेविलें जरी ॥ तरी माझा आठव नव्हे अंतरीं ॥ आपुले दासांसी मुरारी ॥ भवसागरीं बुडों नेदी ॥३२॥
भक्तांसी दिधलें उत्तम मंदिर ॥ तरी माझे भजनीं पडेल अंतर ॥ म्हणूनिया सर्वेश्वर ॥ नामया छप्पर देतसे ॥३३॥
अन्न बाधेल बाळकास ॥ म्हणूनि माता थोडेचि घाली ग्रास ॥ तेवीं निजभक्तांसी जगन्निवास ॥ संपत्ति विशेष नेदीच ॥३४॥
कीं वृक्षासी बहुत होतां जीवन ॥ तयासी चढेल पिंगटवर्ण ॥ म्हणोनि माळी त्याजलागून ॥ तितुक्याच पुरतें देतसे ॥३५॥
तेवीं निजभक्तांसी जगन्नाथ ॥ पोटापुरतेंचि अन्नवस्त्र देत ॥ कवण्या उपायें त्यांचें चित्त ॥ उदास ठेवी सर्वदा ॥३६॥
ऐका मागील अनुसंधान ॥ निजांगें येऊनि जगज्जीवन ॥ नामयाचें छप्पर शाकारून ॥ केंबळा गोळा करीतएस ॥३७॥
जागृति येऊनि निजभक्त ॥ बाहेर विलोकूनि जों पाहात ॥ तों दिव्य पीतांबर झळकत ॥ चपळेऐसा निजतेजें ॥३८॥
मग बाहेर येऊनि लवलाहें ॥ सप्रेम तेव्हां धरिले पाये ॥ म्हणे देवा करितोसी काये ॥ एवढे रात्रीं येऊनियां ॥३९॥
यावरी म्हणे जगज्जीवन ॥ अपार सुटला प्रभंजन ॥ तुझें खोंपट गेलें उडोन ॥ तें म्यां येऊन शाकारिलें ॥४०॥
तुवां सांडोनि संसारवृत्ती ॥ माझें भजनीं धरिली प्रीती ॥ यास्तव स्वांगें मी श्रीपती ॥ रचिल्या भिंती तत्काळ ॥४१॥
आलों नसतों जरी त्वरित ॥ तरी मुलांलेंकुरांसी वाजतें शीत ॥ तो गोणाईस राग येता बहुत ॥ बोलती विपरीत मजलागीं ॥४२॥
म्हणोनि मी भक्तराया ॥ रात्रीं आलों धांवूनियां ॥ वचन ऐकूनियां पाया ॥ लागे सत्वर गोणाई ॥४३॥
नामयासी बोलतां गुजगोष्टी ॥ तेथेंचि रमले जगजेठी ॥ जनी येऊनि उठाउठीं ॥ रगडी पाठी देवाची ॥४४॥
म्हणे कृपासागरा मनमोहना ॥ करुणालया जगज्जीवना ॥ निजांगें प्रयत्न करूनि नाना ॥ आम्हांकारणें रक्षिसी ॥४५॥
मग नामयासी म्हणे हृषीकेशी ॥ क्षुधा लागली असे तुजसी ॥ तरी उठीं सत्वर भोजनासी ॥ घेईं आम्हांसी समागमें ॥४६॥
मग षड्रस ताटीं विस्तारूनि अन्न ॥ सत्वर आणिलें गोणाईन ॥ एके ठायीं अवघे जण ॥ करीत भोजन बैसलीं ॥४७॥
गोविंदा विठ्ठल नारायण ॥ चवथा महादेव नामाभिधान ॥ हे नामदेवाचे पुत्र जाण ॥ घेत जगज्जीवन ॥ भोजना ॥४८॥
गोणाई आणि राजाई ॥ नामा बैसवोनि एके ठायीं ॥ निजभक्त घेऊन लवलाहीं ॥ भोजन करीत बैसले ॥४९॥
ऐसें देखोनियां नयनीं ॥ जनीस कष्ट वाटले मनीं ॥ म्हणे दीनदयाळा चक्रपाणी ॥ मज कां निवडून टाकिलें ॥५०॥
सवें घेऊन सकळांसी ॥ भोजन करीत बैसलासी ॥ मी नीच म्हणूनि हृषीकेशी ॥ टाकून परदेशीं दिधलें ॥५१॥
जैसी पाक करितां स्वयंपाकीण ॥ हरळ काढी तांदुळांतून ॥ कीं इक्षुदंडाच्या मुळ्यांतून ॥ निवडोन तृण काढिती ॥५२॥
तेवीं अवकृपा धरूनि पोटीं ॥ मजवरी न करिसी कृपादृष्टी ॥ दासी जनी होतसे कष्टी ॥ करुणा जगजेठी कां नये ॥५३॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ नामयासी म्हणे जगज्जीवन ॥ रुचि नेदीच आजि भोजन ॥ काय कारण कळेना ॥५४॥
येरू म्हणे चक्रपाणी ॥ बाहेर कष्टी होतसे जनी ॥ तिची ग्लानि ऐकूनि कानीं ॥ जाहलेति मनीं विव्हळ ॥५५॥
जैसें अट्टाहासें वत्स हंबरतां ॥ गाईस चारा न रुचे सर्वथा ॥ कीं पाळण्यांत बाळ रडतां ॥ भोजन मातेसी नावडे ॥५६॥
कीं पक्षिणी वनांत वेंचितां कण ॥ तिचें पिलियांपासीं लागलें ध्यान ॥ कीं पाडस न देखतां एक क्षण ॥ हरिणीस चारा रुचेना ॥५७॥
कीं लोभियाचें दूर राहिलें धन ॥ त्यासी न रुचे जेवीं पक्वान्न ॥ तेवीं जनीचें न होतां समाधान ॥ तुजला भोजन रुचेना ॥५८॥
देवें हात आखुडितां ॥ मग अवघीं जणें राहिलीं जेवितां ॥ देखोनि राजाईच्या चित्ता ॥ आश्चर्य वाटलें तेधवां ॥५९॥
हात धुवोनि चक्रपाणी ॥ स्वस्थ बैसले तृणासनीं ॥ गोणाईनें जनीस बोलावूनी ॥ उच्छिष्टपात्र दिधलें ॥६०॥
ब्रह्मादिक प्रसाद इच्छित ॥ त्यांसी कदापि नव्हेचि प्राप्त ॥ तो जनीस लाधला अकस्मात ॥ धरितां संगत नामयाची ॥६१॥
मग आर्ताचिये निजताटीं ॥ झांकूनि ठेविलें उठाउठीं ॥ वाट पाहात आपुले खोपटीं ॥ म्हणे जगजेठी धांव आतां ॥६२॥
तों नामा आणि शारंगधर ॥ निजले एके सेजेवर ॥ निद्रित होतां भक्त चतुर ॥ जगदुद्धार उठिले पै ॥६३॥
हळूंच येऊन जगज्जीवन ॥ जनीस नम्र बोलती वचन ॥ म्हणे क्षुधा लागली मजलागून ॥ म्हणोनि आलों तुजपासीं ॥६४॥
नामयासवें होतों जेवित ॥ परी तुज बोलाविलें नाहीं तेथ ॥ म्हणोनि हात आंखडोनि त्वरित ॥ अन्न तैसेंच टाकिलें ॥६५॥
जनी म्हणे शारंगधरा ॥ कृपासागरा रुक्मिणीवरा ॥ एक शुद्ध भावावेगळें मंदिरा ॥ कांहीं नसे द्यावया ॥६६॥
गोणाईनें उच्छिष्ट आणूनी ॥ दिधलें असे मजलागूनी ॥ तें तुज देतां चक्रपाणी ॥ शंका मनीं वाटतसें ॥६७॥
यावरी बोले रुक्मिणीकांत ॥ तैसेंचि आणून देईं मातें ॥ ज्याचें त्यास वाढितां मनांत ॥ संकोच कांहीं न धरावा ॥६८॥
मघां जेवितांचि राहिलें जाण ॥ त्यांत गुंतलें माझें मन ॥ आतां झडकरी तेंचि अन्न ॥ दे आणोन मजलागीं ॥६९॥
ऐसी सप्रेम ऐकोनि गोष्टी ॥ वायांचि आशंका धराल पोटीं ॥ म्हणाल उच्छिष्टासाठीं जगजेठी ॥ क्षुधित पोटीं कां जाहला ॥७०॥
तरी जनीचा हेत करावा पूर्ण ॥ आणिक तिजपासीं नाहीं अन्न ॥ म्हणोनियां जगज्जीवन ॥ उच्छिष्ट भोजन मागती ॥७१॥
मग नामयाची निजदासी ॥ तिनें बैसवोनि हृषीकेशी ॥ उच्छिष्ट पात्र वेगेंसीं ॥ पुढें आणोनि ठेविलें ॥७२॥
जनीस सांगातें बैसवूनी ॥ भोजन करिती चक्रपाणी ॥ हें ऐकोनि माता रुक्मिणी ॥ विस्मित मनीं होतसे ॥७३॥
जो क्षीरसागरविलासी । गरुडध्वज वैकुंठवासी ॥ तो सवें घेऊनि निजदासांसी ॥ उच्छिष्ट भोजन करीतसे ॥७४॥
श्रुति शास्त्रें अखंड गाती ॥ जयासी ध्यातसे कैलासपती ॥ तो नामयाचें उच्छिष्ट प्रीतीं ॥ बसोनि एकांतीं खातसे ॥७५॥
नाना यज्ञें करितां हवन ॥ तेथें न घेचि जो अवदान ॥ तो जनीस म्हणे जगज्जीवन ॥ तृप्त जाहलों जेवितां ॥७६॥
मग हात धुवोनि लवलाहीं ॥ निद्रा केलीं तये ठायीं ॥ तों बाहेर येऊनि गोणाई ॥ नामदेवासी बोलतसे ॥७७॥
निद्रा लागतां तुजलागून ॥ देव सत्वर गेले उठोन ॥ जनीचे मंदिरासी जाऊन ॥ उच्छिष्ट भक्षिलें निजप्रीतीं ॥७८॥
विष्णुदास म्हणे वो जननी ॥ तो भक्तवत्सल चक्रपाणी ॥ शुद्ध भाव असतांमनीं ॥ येत धांवोनि त्या ठाया ॥७९॥
न विचारीत याति कुळ ॥ न म्हणे कांहीं काळ वेळ ॥ भाव देखोनि दीनदयाळ ॥ जातसे तत्काळ धांवोनि ॥८०॥
फळें तोडूनि उठाउठीं ॥ आधीं चाखूनि पाहे भिल्लटी ॥ आवडी देखोनि जगजेठीं ॥ प्रीतीनें पोटीं धालीतसे ॥८१॥
तो जनीची भक्ति देखोनि पाहें ॥ आपुलें उच्छिष्ट आपणचि खाये ॥ यासी नवल कोणतें माये ॥ सांगों काये तुजलागीं ॥८२॥
हा संवाद ऐकोनि जगज्जीवन ॥ नामयापासीं आले त्वरेन ॥ एकासनीं केलें शयन ॥ निजप्रीतीनें तेधवां ॥८३॥
शेवटील रात्र उरली प्रहर ॥ मागुती आले शारंगधर ॥ बैसोनि जनीचे बाजेवर ॥ म्हणती ऊठ सत्वर लवलाहीं ॥८४॥
उशीर जाहला जनाबाई ॥ उठ लवकर दळण घेईं ॥ जांतें झाडोनि लवलाहीं ॥ वाट तुझी पाहतों मी ॥८५॥
मानेखालीं घालोनि हात ॥ तीस उठवी जगन्नाथ ॥ माथां पदर आपुल्या हातें ॥ रुक्मिणीकांत घालीतसे ॥८६॥
केश सांवरूनि ते अवसरी ॥ जनीस बैसविलें जांत्यावरी ॥ दळणाची पांटी सत्वरी ॥ आणोनि ठेविलीं सन्निध ॥८७॥
मग म्हणे रुक्मिणीकांत ॥ जांतें ओढीन मीच सत्य ॥ तूं निमित्तमात्र लावूनि हात ॥ गाईं गीत निजप्रेमें ॥८८॥
ऐसें बोलतां हृषीकेशी ॥ सावध जाहली जनी दासी ॥ प्रेमभाव अति उल्हासीं ॥ ओंव्या संतांसी गातसे ॥८९॥
निवृत्ति सोपान ज्ञानेश्वर ॥ सोयरे माझे परात्पर ॥ तयांचे प्रसादें शारंगधर ॥ कृपा मजवरी करीतसे ॥९०॥
विष्णुदास माझा पिता ॥ राजाबाई जिवलग माता ॥ गोराकुंभार सखा चुलता ॥ कबीर सांवता बंधु माझे ॥९१॥
यांनीं अघटित केली करणी ॥ काय नवल वानू साजणी ॥ स्वाधीन करूनि चक्रपाणी ॥ स्वानंदजीवनीं तृप्त जाहले ॥९२॥
प्रतिष्ठानीं छळितां द्विजवरें ॥ अघटित केलें ज्ञानेश्वरें ॥ रेडियामुखीं साचारें ॥ श्रुति अपार बोलविल्या ॥९३॥
गोरा कुंभार निजभक्त ॥ ध्यानांत आणूनि रुक्मिणीकांत ॥ बाळक तुडविलें मृत्तिकेंत ॥ परी नाहीं श्रुत तयासी ॥९४॥
विठोबाची मोडिली आण ॥ म्हणोनि हात टाकिले छेदून ॥ नामयाची कथा करिता श्रवण ॥ पावला जगज्जीवन साजणी ॥९५॥
टाळिया वाजवितां फुटले हात ॥ अकस्मात बाळक आलें रांगत ॥ अघटित तयाची मात ॥ नवल वाटतें देखोनि ॥९६॥
निजभक्त सांवता भूमंडळी ॥ त्याचे भेटीस गेले वनमाळी ॥ पोट फोडोनि तत्काळीं ॥ हृदयकमळीं सांठविला ॥९७॥
अनंत ब्रह्मांडें जयाचें उदरीं ॥ तो सांवत्यापोटीं लपटा हरी ॥ नामदेव येऊनि सत्वरीं ॥ तयासी बाहेरी काढिलें ॥९८॥
कबीर बंधु परदेशी ॥ दूर नांदतो वाराणसीं ॥ त्याचे समागमें हृषीकेशी ॥ विणावयासी बैसला ॥९९॥
शिवरात्रीदिवसीं नामयान ॥ नागनाथीं मांडिलें हरिकीर्तन ॥ नव लक्ष पताका स्वर्गींहून ॥ अकस्मात उतरल्या ॥१००॥
प्रसन्न होऊनि कैलासवासी ॥ देवालय फिरविलें पश्चिमेसी ॥ त्याची करणी अद्भुत ऐसी ॥ श्रुतिशास्त्रांसी अगम्य ॥१॥
ऐशापरी ओढितां जांतें ॥ ओंव्या गातसे प्रेमयुक्त ॥ हें ऐकूनि पंढरीनाथ ॥ आनंदें डोलत तेधवां ॥२॥
कर्णीं गीत ऐकोनि त्वरित ॥ गोणाई आली अंगणांत ॥ जनीसी म्हणे दुसरी येथ ॥ कोण आणिली दळावया ॥३॥
मोलकरीण किंवा शेजारीण ॥ कोण आणिली सांग त्वरेन ॥ येरी कांहींच न बोले वचन ॥ धरूनि मौन राहिली ॥४॥
मग गोणाईस क्रोध होऊनि पोटीं ॥ हातीं घेतली वेत्रकाठी ॥ प्रवेशोनि जनीच्या खोपटीं ॥ म्हणे कोणासी गोष्टी बोलतसे ॥५॥
दुबळा संसार न पुरे कण ॥ कोण आणिली मोलकरीण ॥ धान्य घालिसी दळणांतून ॥ आम्हांसी चोरून नित्यकाळीं ॥६॥
काठी मारितांच ते समयीं ॥ देवाचें मस्तकीं लागली पाहीं ॥ म्हणे नाम माझें विठाई ॥ आलें लवलाहीं दळावया ॥७॥
ऐसें वचन ऐकून ॥ नामयासी कळली निजखूण ॥ मातेसी म्हणे तो जगज्जीवन तुजकारण कळेना ॥८॥
वचने ऐकूनियां ऐसीं ॥ लज्जित झाली निजमानसीं ॥ म्हणे मीं ताडिला हृषीकेशी ॥ मग परतोनि आश्रमा पातली ॥९॥
म्हणे जनींचें भाग्य अति अद्भुत ॥ स्वाधीन केला रुक्मिणीकांत ॥ म्यां नेणतां जाऊनि तेथ ॥ केलें विपरीत तें ऐका ॥११०॥
ब्रह्मादिकां न पडे दृष्टीं ॥ त्यासी म्यां निजकरें मारिली काठी ॥ जळोत या संसाराच्या गोष्टी ॥ म्हणोनि कष्टी होतसे ॥११॥
सुकुमार परब्रह्म सांवळें ॥ पाहतांचि निवती मनडोळे ॥ तो रुक्मिणीकांत घननीळ ॥ जनीची कळवळ करितसे ॥१२॥
इकडे भवखुंटियाचे भोंवतें ॥ फिरत होतें वैराग्यजांतें ॥ संचितमातृका वैरण बहुतें ॥ दळिलीं त्यांत निजप्रीतीं ॥१३॥
नामरूपादि जें जें दिसत ॥ तें तें दळियेलें समस्त ॥ अव्यक्तांत मेळवूनि व्यक्त ॥ जनी निश्चिंत बैसली ॥१४॥
मग पीठ भरूनि चक्रपाणी ॥ ठेविते झाले तये क्षणीं ॥ किंचित उरली होती यामिनी ॥ मग सुखशयनीं पहुडले ॥१५॥
जनीसीं बोलतां प्रीतीकरून ॥ निद्रित जाहले जगज्जीवन ॥ तों पूर्वदिशेसी अरुण ॥ उदयासी येतां देखिला ॥१६॥
मग नामयाची येऊनि दासी ॥ म्हणे ऊठ सत्वर हृषीकेशी ॥ पुजारी येतील देउळासी ॥ तेथें न तुम्हांसी न देखती ॥१७॥
कांकडआरतीस नसतां तेथ ॥ बोभाट होईल नगरांत ॥ ऐसें ऐकोनि जगन्नाथ ॥ उठिले त्वरित लगबगां ॥१८॥
सत्वर जातां जगज्जीवन ॥ राहिलें नाहीं देहभान ॥ आपुली सदलाद विसरून ॥ जनीची वांकळ पांघुरला ॥१९॥
आणि दिव्य नवरत्नांचें पदक ॥ एकावळीसी ओंविलें देख ॥ तेथेंचि विसरूनि जगन्नाथक ॥ गेले सत्वर राउळा ॥१२०॥
कवाड उघडितां निजभक्तजन ॥ दर्शना आले पूजा घेऊन ॥ तों वांकळ पांघरूनि जगन्नाथक ॥ गेले सत्वर विटेवरी ॥२१॥
देखोनि आश्चर्य करिती सकळ ॥ म्हणती तमाळनीळें केलें नवल ॥ कोणाची आणिली वांकळ ॥ आम्हांसी न कळे सर्वथा ॥२२॥
एक म्हणती नाटकी मोठा ॥ भक्ताभिमानी अति गाढा ॥ निषेध करूनि कर्मठा ॥ सिद्धांतवाटा लावीतसे ॥२३॥  
एक म्हणती जगज्जीवना ॥ भक्तभूषणा रुक्मिणीरमणा ॥ क्षीराब्धिवासा शेषशयना ॥ वांकळ साजेना तुजलागीं ॥२४॥
एक बोलती तर्क करूनी ॥ मोठी चंचळ दासी जनी ॥ तिनें भुलवोनि चक्रपाणी ॥ घातली मोहिनी निश्चित ॥२५॥
एक म्हणती कुब्जा दासी ॥ श्रीभागवतीं वर्णिली जैसी ॥ जनीची करणीं तिजऐसी ॥ तुम्हां सर्वांसी कळों द्या ॥२६॥
एक म्हणती नामयासी सांगा जाऊनी ॥ आवरीं आपुली दासी जनी ॥ तिनें घालूनियां मोहिनी ॥ शारंगपाणी भुलविला ॥२७॥
ऐसे नानापरी जन समस्त ॥ तर्क करिती निजमनांत ॥ पुजारी सन्निध जाऊनि त्वरित ॥ वांकळ पाहती काढूनि ॥२८॥
तों पदक आणि एकावळी ॥ न दिसे त्याचें हृदयकमळीं ॥ म्हणती उदारा वनमाळी ॥ धणी दिधली कोणासी ॥२९॥
ऐसें विनोदें बोलती वचन ॥ जनीनें केलें शहाणपण ॥ वांकळ वाहोनि देवाकारण ॥ पदकमाळा घेतली ॥१३०॥
ताकाचा नैवेद्य दाखवूनी ॥ प्रसाद मागोनि घेतलें लोणी ॥ रांजणींचें उदक देऊनी ॥ अमृत सदनीं आणिलें ॥३१॥
जोहरियासी देऊनि गारा ॥ त्याचे पालट घेतला हिरा ॥ कृष्णांबर वाहूनि रुक्मिणीवरा ॥ पीतांबर घरा नेला कीं ॥३२॥
कीं अर्कीचे दोडे वाहूनि निश्चितीं ॥ प्रसन्न केला जैसा मारुती ॥ अमृतफळें मागूनि प्रीतीं ॥ तयापासूनि घेतलीं कीं ॥३३॥
तेवीं वांकळ वाहूनि ये काळीं ॥ तोषविला वनमाळी ॥ नेलें पदक एकावळी ॥ नवविध रत्नें जडलीं जया ॥३४॥
पुजारी म्हणती करावें काय ॥ कोणासी बोलावया नाहीं ठाव ॥ कुलुपें असतां पंढरीराय ॥ जातो कैसा कळेना ॥३५॥
म्हणती नामयाचें सदनीं ॥ सत्वर जावें येचि क्षणीं ॥ बोलावूनियां दासी जनी ॥ तिजलागोनि पुसावें ॥३६॥
ऐसा विचार करूनि चित्तीं ॥ धांवत आले सत्वरगती ॥ जनीस म्हणती रुक्मिणीपती ॥ तुझे संगती लागला ॥३७॥
नेणों कैसें घातलेंस मोहन ॥ आमुचें नावडे पूजा अर्चन ॥ कांहीं तरी कवटाळ करून ॥ जगज्जीवन भुलविला ॥३८॥
तुजसीं रतला घननीळ ॥ आमचें सत्कर्म बुडालें सकळ ॥ आजचे रात्रीस दीनदयाळ ॥ आले होते तुजपासीं ॥३९॥
तुवां पदक एकावळी ॥ घेऊनि वाकळ त्यासी दिधली ॥ ती आणोनि देईं ये वेळीं ॥ नातरी शिक्षा तुज करूं ॥१४०॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ येरी तत्काळ वाहे आण ॥ म्यां पदक घेतलें असेल जाण ॥ तरी जावोत फुटोन नेत्र माझे ॥४१॥
झाडा घेतांच ते वेळीं ॥ वस्त्रांत सांपडली एकावळी ॥ म्हणती लोहदंडाचे शूळीं ॥ ईस तत्काळीं घालावें ॥४२॥
साक्षात् परब्रह्म गरुडध्वज ॥ त्याचे अळंकार चोरिले आज ॥ म्हणोनि शिक्षा बोलिली सहज ॥ सकळ द्विज बोलती ॥४३॥
मग जनीस धरून उठाउठीं ॥ नेली चंद्रभागेचे काठीं ॥ तिणें ध्यानांत आणूनि जगजेठी ॥ करुणा पोटीं भाकीतसे ॥४४॥
म्हणे पतितपावना शारंगधरा ॥ अनाथनाथा रुक्मिणीवरा ॥ भक्तवत्सला कृपासागरा ॥ दीनोद्धारा जगदीशा ॥४५॥
मी परदेशी अनाथ दीन ॥ कोण करील माझें धांवण ॥ ऐकोनि जनीचें करुणावचन ॥ जगज्जीवन पावले ॥४६॥
लोहशूळ रोंविला होता धरणीं ॥ त्याचें तत्क्षणीं जाहलें पाणी ॥ ऐसें कौतुक देखतां जनीं ॥ आश्चर्य जाहलें सकळांसी ॥४७॥
पूजारे विस्मित जाहले चित्तीं ॥ म्हणती धन्य जनीची भक्ती ॥ स्मरण करितांच रुक्मिणीपती ॥ इजसी आकांतीं पावला ॥४८॥
मिळोनि सर्व भक्तमंडळी ॥ जयजयकारें पिटली टाळी ॥ म्हणती संकट पडातांचि तत्काळीं ॥ पावे वनमाळी निजदासां ॥४९॥
असो नवल वर्तलें एके दिनीं ॥ मंदिरीं बसोनि दासी जनी ॥ कवित्व रचोनि आपलें मनीं ॥ चक्रपाणी आठवितसे ॥१५०॥
मग हातीं घेऊनि दऊत लेखणी ॥ काय शब्द पडतो श्रवणीं ॥ देउळीं बैसले चक्रपाणी ॥ हे आशंका मनीं वाटे ॥५२॥
तरी विश्वव्यापक जगज्जीवन ॥ अंतरसाक्ष चैतन्यघन ॥ निजभक्ताम्चे मनींची खूण ॥ जाणता सर्वज्ञ तो एक ॥५३॥
द्रौपदीस छळितां दुःशासन ॥ हस्तनापुरीं केलें चिंतन ॥ तें द्वारकेसी जाहलें कैसें श्रवण ॥ केलें धांवण तत्काळ ॥५४॥
कीं गजेंद्रें करुणा भाकिली पोटीं ॥ तैं कैसें ऐकिलें वैकुंठीं ॥ तेवीं जनीचे शब्द ज्ञानदृष्टीं ॥ जाणे जगजेठीं तत्काळ ॥५५॥
निजभक्तांचें मनोगत ॥ जाणता एक पंढरीनाथ ॥ म्हण०ओनि श्रोतीं आशंकित ॥ सर्वथा चित्त न करावें ॥५६॥
मनांत म्हणे रुक्मिणीपती ॥ जनीची पदें मज आवडती ॥ म्हणोनि लेखणी घेऊन हातीं ॥ बैसोन लिहिती निजांगें ॥५७॥
तों अकस्मात ज्ञानेश्वर ॥ करावया आले नमस्कार ॥ तयांसी देखोनि शारंगधर ॥ चित्तीं विचार आठविला ॥५८॥
मग दऊत लेखणी कागद ॥ लपवूनि ठेवी गोविंद ॥ सच्चिदानंद आनंदकंद ॥ लीला अगाध दाखवी ॥५९॥
ज्ञानदेवें येऊनि ते वेळीं ॥ मस्तक ठेविला चरणकमळीं ॥ म्हणती एकांतीं बैसोनि वनमाळी ॥ काय लेखन करीतसां ॥१६०॥
ऐकोनि म्हणती पांडुरंग ॥ मी जनीचे लिहितों अभंग ॥ ऐसें बोलतांचि श्रीरंग ॥ ज्ञानदेव मग हांसले ॥६१॥
म्हणती जयजयाजी रुक्मिणीपती ॥ जनीनें मांडिली तुमची स्तुती ॥ ते आपुले हातीं लिहितां ग्रंथीं ॥ नवल मजप्रती वाटतें ॥६२॥
तीर्थे व्रतें दानें तपें सत्य ॥ आपुले हातें लिहिलीं जरी बहुत ॥ स्वमुखें सांगावया उचित ॥ नसे जाण सज्ञाना ॥६३॥
आणखीं आपुले प्रताप वनमाळी ॥ उदंड असतील भूमंडळीं ॥ तरी आपण पत्रीं कदाकाळीं ॥ लिहूं नयेचि सर्वथा ॥६४॥
तुमचीं चरित्रें रुक्मिणीपती ॥ निजांगें लिहीत सरस्वती ॥ श्रुतिशास्त्रें गुण वर्णिती ॥ पुराणें गाती पवाडे ॥६५॥
व्यास वाल्मीकादि महाकवी ॥ तुज वर्णूनि पावले पदवी ॥ आणि जनीचीं पदें त्वां लिहावीं ॥ हांसती कवि या बोला ॥६६॥
ऐसें ऐकोनि तये वेळे ॥ घननीळ काय बोलिलें ॥ जनीचे शब्द प्रेमळ भले ॥ वाटती रसाळ मजलागीं ॥६७॥
ते श्रवणीं पडतांचि सत्य ॥ लिहीत बैसलों होतों येथ ॥ तुज देखतांचि अकस्मात ॥ आशंका मनांत वाटली ॥६८॥
मग लगबग अति तांतड केली ॥ कागद दऊत लेखणी लपविली ॥ परी निजखूण तुज कैसी कळली ॥ हें मज नकळेचि सर्वथा ॥६९॥
ज्ञानदेव म्हणे जगज्जीवना ॥ तुझे अंतरींच्या निजखुणा ॥ आम्हांवांचूनि भक्तभूषणा ॥ आणिखा कोणा न कळती ॥१७०॥
जेवीं पतीचिया मनोगता ॥ जाणतसे एक पतिव्रता ॥ कीं मायेची ममता ॥ जाणत एक बाळक ॥७१॥
कीं कवीचें रसाळ बोलणें ॥ ओळखिती जैसे विचक्षण ॥ कीं अध्यात्मग्रंथींचें ज्ञान ॥ जाणती सज्ञान अनुभवीं ॥७२॥
कीं रोहिणीपतीच्या पूर्ण कळा ॥ चकोरासी कळती घननीळा ॥ कीं ज्ञानेंद्रियांचा विषयसोहळा ॥ मनचि गोपाळा जाणतसे ॥७३॥
तेवीं तुमचे जीवींचें निजगुज ॥ आम्हां अखंड कळे सहज ॥ ऐसें बोलतां ज्ञानराज ॥ अधोक्षज हांसिन्नले ॥७४॥
मग ज्ञानदेव म्हणे जगजेठी ॥ चला जाऊं नामयाचे भेटी ॥ तुम्हांसी जनीची प्रीति मोठी ॥ हे सांगेन गोष्टी त्यापासीं ॥७५॥
अवश्य म्हणोनि रुक्मिणीपती ॥ म्हणे हेंचि आहे आमुचें चित्तीं ॥ एकमेकांसी धरूनि हातीं ॥ सत्वरगती चालिले ॥७६॥
ज्ञानदेव आणि चक्रपाणी ॥ विष्णुदासाच्या आले सदनीं ॥ मग क्षेमालिंगन देऊनी ॥ सुखासनीं बैसले ॥७७॥
घरासी येतां वनमाळी ॥ तों तेथें आधींचि मिळाली संतमंडळी ॥ जेवीं नृपवर बैसतां सभास्थळीं ॥ सैन्य सकळी ये तेथें ॥७८॥
कीं बैसला ऐकोनि शचीरमण ॥ तयासी वेष्टिती सुरगण ॥ कीं शंकराभोंवते तापसी जाण ॥ बैसती येऊन निजप्रीतीं ॥७९॥
नातरी इंदिरा बैसे जेथ ॥ सकळ सिद्धि वोळंगती तेथ ॥ कीं कीर्तनरंगीं प्रेमळ भक्त ॥ धांवूनि येत आवडीं ॥१८०॥
कीं अमूल्य रत्न असे जेथ ॥ सकळ परीक्षक मिळती तेथ ॥ कीं कमळिणीचे पुष्पाभोंवत ॥ मिलिंद येत धांवूनि ॥८१॥
कीं दाता देखोनि नेत्रकमळीं ॥ भोंवती मिळे याचकमंडळी ॥ कीं शर्करेचे राशीजवळी ॥ पिपीलिका येती धांवोनि ॥८२॥
तेवीं नामदेवाचें मंदिरांत ॥ बैसले देखोनि जगन्नाथ ॥ तेथेंच मिळाले सकळ संत ॥ आनंदयुक्त तेधवां ॥८३॥
देऊनि सकळां आलिंगन ॥ नामयासी म्हणे जगज्जीवन ॥ जनीस आणावें बोलावून ॥ घ्यावया दर्शन संतांचें ॥८४॥
मग गोणाई म्हणे राजाईकारण ॥ जनी बाहेर वळते शेण ॥ तिजला म्हणावे रुक्मिणीरमण ॥ तुजकारण बाहाती  ॥८५॥
निरोप ऐकूनि कानीं ॥ सत्वर सांगे तीस जाऊनी ॥ घरीं आले चक्रपाणी ॥ तुजकारणें बाहाती ॥८६॥
मग हात धुवोनियां त्वरित ॥ जनीं पातली वाडियांत ॥ दृष्टीं देखोनि पंढरीनाथ ॥ साष्टांग दंडवत घातलें ॥८७॥
तेव्हां नामयासी ज्ञानदेव बोलत ॥ आजि नवल देखिलें अति अद्भुत ॥ जनीचीं पदें वैकुंठनाथ ॥ होते लिहित निजांगें ॥८८॥
यावरी बोले भक्तभूषण ॥ जनीचीं पदें केलीं लेखन ॥ येणें आम्हांस लहानपण ॥ नाहीं आलें जाण सर्वथा ॥८९॥
मी आपुली वाहूनि आण ॥ साक्ष ठेवितों तुमचे चरण ॥ कीं जनीचें प्राकृत भाषण ॥ हा स्वानंदरस जाणावा ॥१९०॥
कीं स्वात्मसुखाचा आनंद ॥ कीं ब्रह्मज्ञानाचा निजबोध ॥ शुद्धसत्वाचा घेऊन कागद ॥ लिहितों गोविंद निजप्रीतीं ॥९१॥
जनीचीं बोलणीं वाचील कोणीं ॥ मी तिष्ठेल तयाचें अंगणीं ॥ ऐसें स्वमुखें चक्रपाणी ॥ बोले सदनीं नामयाचें ॥९२॥
जो नित्य गाय जनीचें पदा ॥ त्यांसी संसारीं नव्हे आपदा ॥ अंतीं तया सायुज्यपदा ॥ नेईन मी निश्चयें ॥९३॥
ऐसें बोलत वनमाळी ॥ ज्ञानदेव हांसोन पिटी टाळी ॥ जयजयकार केला सकळीं ॥ तेथें संतमंडळी कोण होती ॥९४॥
वाराणसीहून आला कबीर ॥ आणि चोखामेळा भक्त थोर ॥ तिसरा रोहिदास चांभार ॥ हे वैष्णववीर बैसले ॥९५॥
सज्जन पठाण निजभक्त ॥ बया कसाब अति विरक्त ॥ कमाल फुलारी महासंत ॥ प्रेमयुक्त सर्वदा ॥९६॥
आणि मुकुंदराज झारेकरी ॥ अखंड राहिला महाद्वारीं ॥ गोणाई राजाई सुंदरी ॥ जयजयकारी गर्जिन्नल्या ॥९७॥
आणी नाम अंतरंग निजभक्त ॥ मध्यें बैसला रुक्मिणीकांत ॥ जेवीं सेनेमाजी नृपनाथ ॥ ऐश्वर्यें शोभत आगळा ॥९८॥
मग जनीस पुसती ज्ञानेश्वर ॥ नामदेवें घेतले अवतार चार ॥ प्रल्हाद अंगद उद्धव थोर ॥ शारंगधर वश केला ॥९९॥
आणि तुवां कोणते जन्म घेऊन ॥ केलें देवाचें आराधन ॥ हें सकळ सांग आम्हांलागून ॥ संकोच मनीं न धरितां ॥२००॥
ऐकोनि नामयाची निजदासी ॥ बोलावयास जाहली सरसी ॥ म्हणे हयग्रीव जाहले हृषीकेशी ॥ तैं याचे पायांसी जडलें मी ॥१॥
मग अंबरीषाचे कैवार ॥ घेतले दाहा अवतार ॥ मत्स्य कच्छ वराह थोर ॥ मारावया असुर महाबळी ॥२॥
नरसिंह वामन परशुराम ॥ मग जाहले दशरथि राम ॥ श्रीकृष्ण सर्वांचा विश्राम ॥ आतां बौद्ध होऊनि बैसला ॥३॥
हे नाना अवतार धरिले देवें ॥ तैं मी होतें याचे सवें ॥ वचन ऐकोनि ज्ञानदेवें ॥ आश्चर्य करी अंतरीं ॥४॥
म्हणे धन्य हे जनी दासी ॥ इच्या अपार पुण्यराशी ॥ प्रसन्न केला हृषीकेशी ॥ ब्रह्मादिकांसी दुर्लभ जो ॥५॥
मग संतांसी म्हणे चक्रपाणी ॥ आतां लेखकांची करा वांटणी ॥ जे शब्द निघती मुखांतूनी ॥ ते लिहूनी ठेवावे ॥६॥
ज्ञानेश्वराचीं शब्दरत्न ॥ तीं लिहील सच्चिदानंद ब्राह्मण ॥ निवृत्तीचा लेखक सोपान ॥ जो अवतार पूर्ण विरिंचीचा ॥७॥
आणि मुक्ताबाईचे अभंग ॥ ज्ञानदेवें लिहावे सांग ॥ जोगा परमानंद अंतरंग ॥ त्याचे विसोबा खेचरें लिहावे ॥८॥
सांवता माळी भक्त वैष्णव ॥ त्याचा लेखक काशिबा गुरव ॥ कूर्मदासाचा काईत सुदेव ॥ देवाधिदेवें निर्मिला ॥९॥
अनंतभट्ट ब्राह्मण ॥ तो चोखामेळ्याचें करी लेखन ॥ आणि नामया जनीचे बोलणें जाण ॥ रुक्मिणीरमण लिहीतसे ॥२१०॥
ऐसीं करूनि दिधली वांटणी ॥ मग ज्ञानदेवासी म्हणे चक्रपाणी ॥ आतां जनीचे अभंग ऐकतां कानीं ॥ संकोच मनीं न धरावा ॥११॥
ऐकोनि म्हणती वैष्णववीर ॥ समर्थें केलिया अंगीकार ॥ शब्द ठेवी ऐसा पृथ्वीवर ॥ नाहीं साचार धुंडितां ॥१२॥
अंधासी भास्करें धरिलें हातीं ॥ तरी काय एक न दिसे तयाप्रती ॥ कीं मुक्यासी प्रसन्न सरस्वती ॥ झालिया श्रुति वदेल तो ॥१३॥
तेवीं तुमची कृपा होतांचि जाण ॥ जनीसी दासी म्हणेल कोण ॥ ऐसें ऐकूनि जगज्जीवन ॥ हास्यवदन जाहले ॥१४॥
मग नामयानें उदक आणून ॥ केलें सर्वांचें चरणक्षालन ॥ षोडशोपचारें रुक्मिणीरमण ॥ सप्रेमभावे पूजिला ॥१५॥
विडे देऊनि सकळांप्रती ॥ साष्टांग नमस्कार घातले प्रीतीं ॥ मग गोणाईसी पुसोनि श्रीपती ॥ अति सत्वर चालिले ॥१६॥
सवें घेऊनि भक्तमंडळी ॥ राउळीं प्रवेशले वनमाळी ॥ सकळ वृत्तांत रुक्मिणीजवळी ॥ सांगितला तेधवां ॥१७॥
जो अनाथबंधु करुणाकर ॥ भक्तवत्सल कृपासागर ॥ करुणासिंधु शारंगधर ॥ म्हणवी साचार आपणासी ॥१८॥
तो आपुले दासांचें चरित्र ॥ वक्ता वदविता राजीवनेत्र ॥ महीपति बाहुलें निमित्तमात्र ॥ सज्ञान पवित्र जाणती ॥१९॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ एकविंशाध्याय रसाळ हा ॥२२०॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥    ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीभक्तविजय एकविंशाध्याय समाप्त ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel