पुण्यश्लोक
श्री शिवराय
वैशाख शुध्द द्वितीयेस पुण्यश्लोक श्री शिवरायांचा जन्मदिवस. त्यांचे नांव स्फूर्तीचा अखंड झरा आहे. महाराष्ट्रांत संतांनी त्यागाचें, समतेचे एक वातावरण निर्माण केलें होतें. शिवछत्रपतींनी हे गुण राष्ट्राच्या कामीं लावून स्वराज्याची स्थापना केली. इतिहासनिर्मितींत अनेक शक्ति काम करीत असतात. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय नाना शक्तींच्या क्रिया प्रतिक्रिया होत असतात. त्यांतील एखाद्या शक्तीलाच प्रधान मानणे चूक ठरेल. शिवाजी महाराजांनीं हें सर्व ओळखलें होतें हा त्यांचा मोठेपणा.
हिंदुस्थानांत नाना धर्म. परंतु जोंवर कोणी कोणावर जुलूम करीत नसतो तोंवर प्रश्न नसतो. अरब व ख्रिश्चन लोक मलबार किना-यावर कधींपासून येऊन राहिलें होते; व्यापार करीत होते. भारतीयांनीं त्यांना राहूं दिलें. परंतु पुढें मुसलमानी धर्म राजसत्ता घेऊन आला. आणि देशभर लढाया सुरु झाल्या. हिंदुंचीं मंदिरें उद्ध्वस्त करणें, बाटवाबाटवी असे प्रकार होऊं लागले. याला आळा घालणें जरुर होतें. परंतु मुसलमानी धर्म केवळ तलवारीनें थोपवता आला नसता. त्यांतील समता तुम्ही न घ्याल तर मराल. हिंदुस्थानातील कोटयवधि मुसलमान केवळ बाटवाबाटवीनें झालेले नाहीत. जातीच्या जाती, ज्यांना आपण तुच्छ मानीत असूं त्या मुसलमानी धर्मांत गेल्या. पूर्व बंगालमध्यें हरिजनांच्या नावेंत स्पृश्य हिंदु परवांपरवांपर्यंत बसत नसत. तोच मुसलमान झाला तर त्याच्या नावेंत हे स्पृश्य बसत. आपणच आपल्या बांधवांना दूर लोटलें. समर्थांनीं अकराशे मठ स्थापून लोकजागृतीचें काम केलें असेल. परंतु ते पुन्हां वर्णधर्मांतील श्रेष्ठाश्रेष्ठता राखूं इच्छित होते. चातुर्वर्ण्याच्या चौकटीच्या बाहेर ते जाऊं इच्छित नव्हते. म्हणून तर मराठयांचें राज्य गेले. आम्ही एकीकडे हिंदुस्थानभर दौडत होतो आणि आंतून जातिभेदांनीं पोखरले जात होतो. पानपतच्या लढायीच्या वेळेस मराठयांच्या छावणींतला सर्वत्र पसरलेला धूर पाहून अहमदशहा अबदाली म्हणाला, “ मराठयांच्या छावणींत का आग लागली ?” कोणी सांगितलें, “ अलग अलग भाक-या भाजण्याचे हे चुले आहेत.” अबदाली म्हणाला, ‘ तर विजय आपला आहे ! ”
शिवाजी महाराजांच्या वेळेस संतांनी निर्माण केलेली समता जिवंत होती. परंतु हा समतेचा घोष उत्कटत्वानें पुढें कोणी घोषविला ? अभंग ओंठावर राहिले. समता वाळवंटांतून पुढें मंदिरांत नेली नाहीं, घरींदारीं, विहिरीवर नेली नाही. कशाला टिकतील राज्यें ?
शिवाजी महाराजांनीं धर्मावर होणारें मुस्लीम आक्रमण थांबविलें. परंतु हिंदुधर्मातीलच एकमेकांवर होणारें आक्रमण थांबविणारा कोणी झाला नाहीं. शिवाजी महाराजांचा संदेश, संतांचा संदेश कोणी पुढें नेला नाहीं.