महापुरुषा, जें स्वातंत्र्य, जें स्वराज्य तुझ्या डोळयांसमोर होतें तें गोरगरिबांचें होतें. तुला सहा वर्षांची सजा होताच मुंबापुरीचे लाखो कामगार बाहेर पडले. गोळीबार झाले. गरीब ओळखत होते कीं  हा आमची आशा आहे. रायगडच्या उत्सवांत मावळयांना आग्रहानें जेवूं वाढणा-या, शेतकरी, कामगार, दरिद्री श्रमणारी जनता यांच्याविषयीं तुला अपार प्रेम. साबरमतीच्या तुरुंगांत अधिकारी म्हणाला, “ एवढे तम्ही विद्वान् तुरुंगांत भाकर खाणार ?” तुम्ही म्हणालांत “ मला येथें पोटभर भाकर तरी मिळेल. माझ्या कोटयवधि बांधवांना भाकरहि मिळत नाही.” तुमचे ते शब्द हृदयाला स्पर्श करतात. तेल्यातांबोळयांचे पुढारी म्हणून तुला हिणवीत. परंतु तेंच भूषण, तीच तुझी पदवी. मंडालेच्या तुरुंगांतून गीता रहस्य आणलेंत आणि कोणाला अर्पण केलेंत ? - श्रीशाय जनतात्मने !  जनता हा तुमचा परमेश्वर होता. त्याला तो महान् ग्रंथ तुम्ही समर्पिलात.

जनताजनार्दनाची सेवा करणा-या महापुरुषा, तो जनताजनार्दन आमचेहि दैवत बनो. त्याला सुखी, समृध्द करण्यासाठीं, आमची धडपड असो. मिळालेलें स्वराज्य सर्वांना संधी देईल, सर्वांची ददात दूर करील, तेव्हांच तुझा महान् आत्मा शांत होईल.

कर्मयोगाची शिकवण तूं दिलीस. देशसेवा हीच स्नानसंध्या मानलीस. स्वातंत्र्य मिळेपर्यंत अविरत प्रयत्न हवेच होते. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यावर तर उद्योगाची अधिकच जरुरी. आज कोटयवधि हात काम करण्यासाठीं सरसावले पाहिजेत. ही सस्यशामल भूमि, जगाला अन्नवस्त्र पुरवणारी ही अन्नपूर्णा आज अन्नवस्त्रहीन आहे. आम्ही का करंटे ? स्वराज्यांत का आम्ही उपाशी मरणार ? गांवोगांवची सारी जनता उठूं दे. जेथें म्हणून काहीं पिकवता येईल तें पिकवूं दे. इंग्लंडमध्यें आज फरसबी, कोबी, इत्यादि भाज्या अधिक खाऊन लोक जगत आहेत, स्वावलंबी होत आहेत. आम्हांला का तें शक्य होणार नाही ?

तुमच्या कर्मयोगाचा परीस आमच्या हातांत येऊं दे. पुन्हां भारताला सुवर्णभूमि करुं दे. उद्योग, रात्रंदिवस उद्योग !  कामांत चुकारपणा नको.

सरकारजवळून विहिरीसाठीं बैलासाठीं, शेतीसाठीं तगाई  घेतलीत, कर्ज घेतलेंत तर तें प्रामाणिकपणें त्यांत खर्च करा. हिंदी जनते, स्वत:ची नि राष्ट्राची वंचना करुं नकोस. शेतक-या पिकव, अधिक पिकव. कामगारा, अधिक उत्पन्न कर. संपच आला तर निरुपाय. परंतु जोंवर कामगार आहात तोवर प्रामाणिक रहा. अप्रामाणिकपणाची संवय राष्ट्राचा नाश करील. पांढरपेशांनो, तुम्हीहि श्रमा, श्रमजीवनाशीं समरास व्हा. आपण सारे एक. कोणी कचेरींत असा,कोणी कारखान्यांत असा, कोणी शेतींत असा, सारे भारताचे, भारतासाठीं श्रमणारे. आणि धनिकांनो, पैसा चैनीच्या वस्तूंत न दवडता उत्पादनांत ओता. उधळपट्टी नको. अधिका-यांनो, तुम्हीहि गरिबीचा संसार करुन बाकी पैसा राष्ट्राच्या बचतीसाठीं द्या. राष्ट्रभर एक लाट येऊं दे. मोठे अधिकारी, धनिकवर्ग, इंजिनियर, डॉक्टर, पांढरपेशे सारे अत्यंत काटकसरीनें राहायला शिकोत; वांचलेली पैनपै राष्ट्राच्या बचतीसाठी देवोत. राष्ट्राला भांडवल हवें आहे. उत्पादक धंद्यांत घालायला हवें आहे.

पैसा पैसा मिळवून लोकमान्यांनीं कांच कारखाना काढायला प्रेरणा दिली. त्या लोकमान्यांच्या देशांत आम्ही का चैन करणार ? निरुद्योगी राहणार ? उपाशी मरणार ? आपण आपलें कर्तव्य करुं. पुढील पिढी आणखी पुढें जाईल. लोकमान्यांच्या कर्मयोगाची संजीवनी राष्ट्राला तारील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel