“तुम्हीं आम्हाला शिक्षा करा. परंतु आम्ही कोण ? आम्हा दोन क्षुद्र घटकांचा नाश केल्यानें राष्ट्राचा नाश नाही होणार. बॅस्टिलीच्या तुरुंगांत क्रांतिकारक कोंडल्यानें फ्रेंच क्रांतिकुंड विझलें नाही. फांशी दिल्यानें क्रांति थांबत नाही. क्रांतीला कोण रोखूं शकेल ? आणि क्रांति म्हणजे हिंसा नव्हे. क्रांति म्हणजे समाजव्यवस्थेत बदल. आजची समाजरचना अन्यायावर उभारलेली आहे. श्रमाचीं फळें पूंजिपति हिरावून नेतात. प्राथमिक हक्कहि आज श्रमणा-यांना नाहींत. आम्हाला अशी समाजरचना हवी आहे जिचा पाया डळमळीत नसेल. शाश्वत पायावर म्हणजेच सत्याच्या नि न्यायाच्या पायावर समाजाची रचना आम्हीं करु इच्छितो. हें आमचें ध्येय. क्रांतियज्ञाच्या वेदीवर आम्ही आपलें जीवन धूपाप्रमाणें ठेवींत आहोंत; जें ध्येय आमच्यासमोर आहे त्याच्यासाठी केवढाहि त्याग केला तरीं अपुराच आहे.”
हें निवेदन देशी व विदेशी १४ पत्रांतून एकदमच प्रसिध्द झालें ! असें हें धीरोदात्त निवेदन सरदार भगतसिंगांनीं केलें. त्या दोघांना दहा दहा वर्षांची सक्त मजुरी देण्यांत आली. एका दूरच्या ओसाड तुरुंगांत त्यांना ठेवण्यांत आले. याच सुमारास साँडर्स कटाच्या बाबतींतहि काहीं धरपकड चालू होती. श्री. जतिंद्रनाथ वगैरेंना अटक करण्यात आली होती. लाहोरच्या तुरुंगात ते होते. राजकीय कैद्यांना निराळया रीतीने वागवावे म्हणून अन्नसत्याग्रह सुरु झाला. जतिंद्रनाथ एनिमाहि घेत ना. त्यांची स्थिति चिंताजनक झाली. मोठमोठया पुढा-यांनीहि सांगितलें. परंतु व्यर्थ. “ भगतसिंगांनी सांगितलें तर ते ऐकतील, ” कोणी म्हणाले. सरदार भगतसिंगांना लाहोरला आणण्यांत आले. भगतसिंगानीं त्यांना एनिमा घ्यायला लावलें. सुपरिंटेंडेंट खानसाहेब खरीददीन जतीद्रनाथांना म्हणाले, “तुम्ही थोरामोठयांचें ऐकलें नाही. याचेंच कां ?” जतींद्र म्हणाला “शूर भगतसिंगांची योग्यता केवढी आहे तें तुम्हांस माहीत नाही. अशा थोर पुरुषाच्या शब्दाचा अपमान करणें मला शक्य नाही.” जतीद्रनाथांना मुक्त करा म्हणून भगतसिंगांनी राजकीय कैद्यांच्या चौंकशी समितीला सांगितलें. परंतु सरकारनें नाकारलें. जतींद्र उपवास करुन देवाघरीं गेला.
आणि साँडर्सच्या खुनाचा खटला सुरु झाला. भगतसिंग, राजगुरु, सुकदेव हे मुख्य आरोपी सिध्द झाले. हे क्रांतिकारक कोर्टात जयघोष करीत, कोर्टांत प्रार्थना करीत, बाहेरच्यास संदेश पाठवीत. १९२९ डिसेंबरमध्यें काँग्रेस भरली लाहोरला. त्यावेळेस पंडित मोतीलाल नेहरु त्यांना भेटून आलें. ते म्हणाले, “एका असामान्य व्यक्तीला भेटलो. त्यांची विचारसरणी ऐकून माझ्याहून हे किती श्रेष्ठ असे वाटलें. एका ‘पुरुषा ची भेट’ झाली; म्हणून फार आनंद झाला.” इकडे मिठाचा सत्याग्रह सुरु होता. तिकडे हा खटला चालला होता. राजगुरुंची आई कोर्टांत यायची. प्रेमळ भगतसिंग धांवत जाऊन त्या मातेचे दोन्ही हात आपल्या हातांत प्रेमानें घेऊन म्हणत, “ मारो मत ! राजगुरु जीता रहेगा, खाली भगतसिंग मर जायगा.” परंतु ७ ऑक्टोबर १९३० रोजी तिघांना फांशीची शिक्षासुनविण्यांत आली.
फांशीच्या आधीं भगतसिंगांच्या आईला भेटहि देण्यांत आली नाही. फक्त राजगुरुंच्या आईला भेटायची परवानगी मिळाली. परंतु भगतसिंगांच्या आईस परवानगी नसेल तर मलाहि नको असें ती महाराष्ट्रीय माता म्हणाली !
महात्माजींनी असें फांशी देऊं नका लिहिलें. यंग इंडियांत त्यांनीं गौरवपर लेख लिहिला. “माझा मार्ग निराळा असला तरी भगतसिंगाचें शौर्य, निष्कलंक चारित्र्य, त्याग याबद्दल मला अपार आदर आहे.” परंतु सरकारनें ऐकले नाही. २३ मार्चला सायंकाळीं ७ वाजतां तिघांना वधस्तंभाकडे नेलें. तिघांनी एकमेकांस शेवटचें भेटून घेतलें. भगतसिंग गो-या मॅजिस्ट्रेटला म्हणाले, “अत्त्युच्च ध्येयासाठीं हिंदी क्रांतिकारक मृत्यूला आनंदानें कशी मिठी मारतात तें पाहण्याचें भाग्य तुम्हाला मिळालें, अच्छा ! ” ७ वाजून ३३ मिनिटांनी त्यांच्या गळयाला फांस लागला. तिघे अमर झाले. शतश: प्रणाम !
भगतसिंग गोरे गोरे दिसत. ५ फूट १० इंच उंची. गोड आवाज. एकदां तुरुंगात बॅ. असफअल्ली त्यांना भेटायला जात होते. तर बेडयांच्या झणत्कारावर ते गाणे गात होते. ते एका पत्रांत लिहितात, “क्रांतिकारक असीम प्रेमळ असतो.” एकदा एका सहका-याला देवी आल्या. त्यांनी त्याची शुश्रूषा केली. तुरुंगांतून आपल्या धाकटया भावाला त्यांनी शेवटचें पत्र लिहिलें. त्यांत ते लिहितात, “तो उष:काल होत आहे. भारताच्या भविष्याला कोण विरोध करु शकेल ? सारें जग आमच्या विरुध्द उभे ठाकलें तरी काय ? माझ्या आयुष्याचें दिवस संपत आले आहेत. सकाळच्या संधिप्रकाशांत पेटणा-या मेणबत्तीची ज्वाला निष्प्रभ होत जाते. त्याप्रमाणे मी निष्प्रभ होऊन जाणार. पण आमची श्रध्दा, आमचे विचार हे विजेप्रमाणे जगभर खळबळ उडवतील. या देहाची चिमूटभर माती त्यासाठीं नष्ट झालीं तरी काय पर्वा ?”