ज्ञानमहर्षि डॉ. केतकर

डॉ. केतकर यांची महाराष्ट्रीयांस आठवण आहे का ? केवढी विद्वत्ता, केवढें धैर्य !  त्यांच्या स्मृतीस प्रणाम करुं या. त्यांनी अनेक प्रवर्तक कादंब-या लिहिल्या. विद्यासेवक मासिक चालविलें. समाजशास्त्रावर लेख लिहिले. साहित्यपरीक्षणात्मक ग्रंथ लिहिला. काव्येंहि लिहिलीं. नि:शस्त्रांचें राजकारण पुस्तक लिहिलें. परंतु ज्ञानकोश, त्याचे पांच प्रस्तावना खंड आणि अपूर्ण असा महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास ही त्यांची सर्वांत थोर कामगिरी होय. प्रणाम त्या थोर ज्ञानर्षीला ! 

ज्ञानकोश संपादून महाराष्ट्राला अशीं कामें करता येतात ही श्रध्दा त्यांनी दिली. शब्दकोश, चरित्रकोश, धर्मकोश, व्यायामकोश असें विविध कोशवाङमय मराठीत निर्माण झालें, होत आहे, याची स्फूर्ति ज्ञानकोशकारांनीं दिली. ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर त्यांच्या थोर स्मृतीला पूज्यभावानें प्रणाम करणें हें महाराष्ट्रीयांचे कर्तव्य आहे. ज्ञानकोशकार केतकरांनीं मराठींत एक नवीन युग निर्मिलें. अमेरिकेंत हिंदुधर्मांतील जाति या विषयावर निबंध लिहून त्यांनी डॉक्टर पदवी मिळविली. ते हिंदुस्थानांत आले. त्यांच्या डोळयासमोर मराठी ज्ञानकोशाची भव्य कल्पना उभी राहिली. शंभर शंभर रुपयांचे भांडवल त्यांनी उभारले. शंभर रुपये भरणारास ज्ञानकोशाचे सर्व भाग मिळणार होते. या शंभरांची किंमत पुढें अर्थात वाढली. प्रथम नागपूरला हें मंडळ काम करुं लागलें. पुढें पुण्यास आलें. आणि तेथेंच हें भगीरथ कार्य त्यांनी अनेकांच्या सहकार्यानें पुरें केलें. त्या कार्यात त्यांना अनेक अडचणी आल्या. सरकारनेंहि पाठिंबा दिला नव्हता. डॉक्टर केतकरांच्या निष्ठेनें हें काम पार पाडलें.

ज्ञानकोशाचे पहिले पांच प्रस्तावना खंड अपूर्व आहेत. तसाच हिंदुस्थानच्या इतिहासाचा शेवटचा एक खास भागहि महत्वाचा आहे. ज्ञानकोशाचे प्रस्तावना खंड बाहेर पडूं लागले. त्यांचा महाराष्ट्रांत अभ्यास व्हावा अशी डॉक्टरांची इच्छा. त्यांनीं त्या भागांची परीक्षा ठेवली. मी पहिल्या भागाच्या परीक्षेसाठी बसलों होतों. निम्में बक्षीस मिळालें. तें घ्यावयास मी त्यांच्याकडे गेलों होतों. मी तें बक्षीस
ज्ञानकोश घेण्यासाठी खर्च करायचें ठरविलें. डॉक्टर मला म्हणाले, “ तुम्ही ज्ञानकोशाचे महाराष्ट्रांत प्रचारक व्हा.” 
मी म्हटलें, “मी मुखदुर्बळ मनुष्य. कोणाला आग्रहानें सांगणे जमत नाहीं.”  ते म्हणाले “ अमेरिकेंत जाण्यापूर्वी मी असाच होतों. परंतु आतां संकोच सारा गेला. भीड गेली.”  त्या वेळची त्यांची मुद्रा अजून डोळयांसमोर आहे. ते अपार काम करीत. ज्ञानकोशाचे खण्ड गडयाच्या डोक्यावर देऊन दादर वगैरे भागांत जाऊन ते खपविण्यासाठी खटपट करीत. ते नेहमीं म्हणायचे  “ भरपूर पगार घ्या. भरपूर काम करा. आमचे प्राध्यापक कमी पगार घेऊन त्याग दाखवूं बघतात. परंतु ज्ञानाच्या सीमा वाढवतील तर शपथ.”

मी त्यांना पुण्यांत खाली सूटबूट तर वर पगडी असें पाहिलें आहे. कधी हरदासी अंगरखा घातलेले पाहिलें आहे. एखाद्या हॉटेलमध्यें जातील. चिवडा, शंकरपाळे खातील. लकडी पुलाजवळ करवंदे खात उभे असलेले मी त्यांना पाहिलें आहे. औपचारिकपणा, फाजील शिष्टाचार त्यांना आवडत नसावा.

त्यांच्या कादंब-या त्यांच्या विशाल अनुभवातून जन्मलेल्या आहेत. नाना धर्मांचें, नाना जातिजमातीचें, नाना देशांचें, नाना प्रान्तांचें त्यांचे मार्मिक परीक्षण. तें सारें अनुभवधन त्यांनी कादंब-यांतून ओतले. ब्राम्हणकन्या या कादंबरींतील शेवटची ‘नवीन स्मृति’ नवदृष्टी देणारी आहे. डॉक्टर केतकर हे विचारांना धक्के देणारे होते. त्यांची प्रज्ञा खोल नि व्यापक होती. समाजाचा त्यांचा अभ्यास गाढ होता. लोकमान्य टिळक आणि इतिहास संशोधक राजवाडे यांच्या विषयीं त्यांना अपार भक्ति.

हिंदुधर्मांतील अनेक गोष्टींबद्दल त्यांना आदर होता. त्यांनी जर्मन विदुषीजवळ विवाह केला. परंतु व्रात्यस्तोम यज्ञ करुन त्यांनीं त्यांना हिंदु करुन घेतलें. या विदुषीचें नांव शीलवतीबाई. महर्षि सेनापति बापटांसारखे थोर धर्मज्ञ या विवाहांत पुरोहित होते.  डॉक्टर केतकर प्रस्तावना खंडाच्या पहिल्या भागात म्हणतात, हिंदुधर्मातील  संग्राहता राहिली असती तर महंमद पैगंबर हेहि एक अवतार मानले गेले असते व अनेक पंथाप्रमाणें हा एक महंमदी पंथ हिंदुधर्मात राहिला असता.”  एखादे वेळेस किती उच्च नि उदार विचार ते मांडित. एक कोटि टिळक फंडाचें काय केलेंत असा हिशोब विचारणा-यांना ते म्हणाले  “ असहकार हा एक नवीन शब्द गांधीनीं हिंदी जनतेस शिकविला. एक कोटी रुपयांहून त्याची किंमत अधिक आहे.”

डॉ. केतकर हे महाराष्ट्राचें भूषण आहेत. ज्ञानाची उपासना त्यांनीं शिकविली. सहकारी तत्वावर एकत्र येऊन साहित्य सेवा करायला त्यांनीं शिकविलें. त्यांच्या स्मृतीत कृतज्ञतापूर्वक प्रणाम.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel