विश्वैक्यमूर्ति विवेकानंद

४ जुलै ही स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथि. १९०४ मध्यें स्वामी निजधामास गेले. चाळिसी संपली तोंच हा महापुरुष आपला दिव्य संदेश सांगून पडद्याआड गेला. विवेकानंदांचें मूळचें नांव नरेंद्र. विवेकानंद हें नांव त्यांनी पुढें घेतलें. ते लहानपणापासून विरक्त वृत्तीचे. नवीन धोतर भिका-याला त्यांनीं दिलें. अति बुध्दिमान् नि खेळकर. तालीम करायचे. उत्कृष्ट गाणारे नि वाजविणारे. तरुणांचे पुढारी असायचे. कॉलेजमध्यें सारे ग्रंथ वाचून काढले.

त्या वेळेस केशवचंद्र सेन, रविंद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ वगैरे प्रसिध्द मंडळी होती. त्यांची व्याख्यानें विवेकानंद ऐकत. त्यांनी या दोघांना, “ तुम्ही देव पाहिला आहे का ?”  म्हणून विचारले. दोघांनी नकार दिला आणि याच वेळेस स्वामी रामकृष्ण परमहंसांची नि त्यांची गांठ पडली. नरेंद्राला बघतांच रामकृष्णांची जणूं समाधि लागली. “ तुम्ही देव पाहिला आहे ?” या प्रश्नाला “ हो पाहिला आहे. मी तुझ्याजवळ बोतल आहे त्याहूनहि अधिक आपलेपणानें मी त्याच्याजवळ बोलतो,” असे रामकृष्णांनी उत्तर दिलें. विवेकानंद आरंभी पक्के नास्तिक. “ Let Mr. God come and stand before me  तो राजश्री ईश्वर कोठे असेल तर त्याने यावे माझ्यासमोर, ” असें तें म्हणायचे. परंतु रामकृष्णांनी त्यांच्या जीवनांत क्रांति केली. निराळी साधना सुरु झाली.

पुढें रामकृष्ण परमहंस देवाघरीं गेले. मरावयाच्या आधीं ते विवेकानंदांस म्हणाले, “ माझी खरी साधना मी तुला देत आहे.” महापुरुषानें जणूं मृत्यूपत्र केलें. रामकृष्णांच्या साधनेलां तुलना नाही. देव मिळावा म्हणून त्यांची केवढी धडपड ! अहंकार जावा म्हणून भंगी बनले, स्त्री-पुरुष भेद जावा म्हणून स्त्रीचा पोषाख करुन वावरले. एक दिवस गेला कीं रडत रडत देवाला म्हणायचे, “ गेला एक दिवस नि तू आला नाहीस.” धनाची आसक्ति जावी म्हणून एका हातांत माती नि एका हातांत पैसे घेत नि म्हणत हीहि मातीच आहे आणि गंगेंत फेकीत. अशी ही अद्भूत साधना अनेक वर्षांची. परमेश्वराचा साक्षात्कार सर्व धर्माच्या द्वारा त्यांनी करुन घेतला. मशिदींतहि त्यांना प्रभु भेटला. चर्चमध्येंहि भेटला. सर्वधर्मसमन्वय त्यांनी केला. सर्व धर्म सत्य आहेत, ईश्वराकडे नेणारे आहे तसे त्यांनी अनुभवून सांगितले. स्वामी विवेकानंद रामनवमी, गोकुळअष्टमी या दिवशीं उपवास करीत; त्याप्रमाणे पैगबराची जयंती, पुण्यतिथी यादिवशींहि उपवास करीत. हिंदुधर्म सर्व धर्मांना आदरील. अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेंत ते म्हणाले, “ हिंदुधर्म विश्वधर्म होऊं शकेल. कारण तो माझ्यांतच सत्य असें मानीत नाही. इस्लाम, ख्रिश्चन धर्म, सर्वांमध्यें सत्यता आहे असे तो मानतो. सत्याचे बाहय आविष्कार निराळे. आंतील गाभा एकच. हिंदुधर्म ही गोष्ट ओळखतो.”   “ एकं सत् विप्रा बहुदा वदंति ” हें महान ऐक्यसूत्र हिंदुधर्मानें शिकविलें. जगांत सर्वत्र द्वेषमत्सर. एकीकडे दुनिया जवळ येत आहे, तर हृदयें मात्र दूर जात आहेत. अशावेळेस तुमचा सर्वांचा आत्मा एकच आहे अशी घोषणा करणारा प्रबळ पुरुष हवा होता. ही घोषणा अमेरिकेंत शिकागो येथें स्वामींनी केली. या सर्व धर्म परिषदेंत स्वामींची आधीं दाद लागेना. परंतु एके दिवशी त्यांना संधि मिळाली. भगव्या वस्त्रांतील ती भारतीय मूर्ति उभी राहिली. आणि “ माझ्या बंधु भगिनींनो, ” असे पहिलेच शब्द त्या महापुरुषाने उच्चारले आणि टाळयांचा गजर थांबेना. कां बरें ? त्या दोन शब्दांत कोणती जादू होती ? त्यांच्या आधीं जे जे व्याख्याते बोलून गेले ते सारे “ Ladies and Gentlemen -सभ्य स्त्रीपुरुष हो ” अशा शब्दांनी आरंभ करीत. परंतु ही विश्वैक्याची मूर्ति उभी राहिली. सर्वत्र एकता अनुभवणारे ते डोळे, आपलींच आत्मरुपें पाहणारे ते डोळे. प्रेमसिंधूंत बुचकळून वर आलेले ते शब्द ! त्या दोन शब्दांनीं अमेरिकन हृदय जिंकून घेतलें. आणि मग तें अपूर्व व्याख्यान झालें. स्वामीजी विश्वविख्यात झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel