भारताची पुण्याई
सेनापती बापट


महर्षि सेनापति बापटांचा मला थोडा फार सहवास मिळाला त्यामुळें मी कृतार्थ झालों आहे. विनोबाजी व सेनापति हे माझे दोन हृदयदेव. मी त्यांच्यापासून दूर दूर असलों तरी एकांतांत त्यांच्याजवळ मुकेपणानें बोलतों. त्यांची थोडीफार कृपादृष्टि अनधिकारी असूनहि मला लाभते ही प्रभूची कृपा. सेनापति म्हणजे मूर्तिमंत त्याग व सेवा. स्वत:ची विशिष्ट मतें असली तरी सर्व पक्षांविषयीं आदर. कोणी कुठें सेवा करो. त्याचें कौतुक करतील. कोणी बोलावलें तर जातील. आपला जेवढा उपयोग होईल तेवढा होऊं द्यावा हें व्रत. वृध्दपण त्यांना माहित नाहीं. ते चिरयुवा आहेत. चिरवर्धमान आहेत. खरोखरच ते श्रीहरीचे आहेत. भलें जीवन जगणें हा त्यांचा धर्म.

आपल्या चैतन्यगाथा या कविता संग्रहांतील अखेरच्या कवितेंत ते म्हणतात, “प्रभूच्या बागेंतील मी बुलबुल आहे. भलाई हें माझे वतन आहे.”

ते महाराष्ट्राची, भारताची पुण्याई आहेत. त्यांच्या पुण्यपावन मूर्तीला भक्तिमय प्रणाम.

त्यांचा जन्म १८८० च्या नोव्हेंबरच्या १२ तारखेस नगर जिल्हयांत पारनेरला झाला. तो दिवस कार्तिक शुध्द एकादशीचा. म्हणून पांडुरंग नांव.

सेनापतींच्या ज्या कांहीं गोड आठवणी मजजवळ आहे त्या सांगतो. डेक्कन कॉलेजांत शिकत असतांना त्यांनीं एक दिवशीं तलवार हातीं घेऊन देशाच्या स्वातंत्र्यार्थ देह पडेपर्यंत धडपडण्याची शपथ घेतली. त्यांनी त्या दिवसाला मंगल दिवस असें म्हटलें आहे. कार्लाईलनें म्हटलें आहे, “ ज्याला जीवनाचें ध्येय गवसलें तो धन्य होय.”

विलायतेंत चार वर्षें शिकायला होते. त्यांना स्वातंत्र्याचा ध्यास लागला होता. तेथें हद्दपार रशियन देशभक्तांजवळ बॉम्ब करण्याची विद्या शिकलें. लष्करी शिक्षणासाठीं एडिंबरोच्या रायफल तुकडींतहि नांव नोंदविते झाले. तेथील तरुणांचे म्होरके स्वातंत्र्यवीर सावरकर. सेनापति म्हणत, “ सावरकर सुंदर बोलत. स्फूर्ति देत.” सेनापति मातृभूमीला परत आले. कलकत्त्याला हिंदी क्रांतिकारकांच्या सूत्रधारांस भेटले. गो-या अधिका-यांचे खून पाडण्याचें धोरण ठरलें होतें. सेनापति म्हणाले, “ हा मार्ग नव्हे. जनतेंत जागृति करुन योग्य वेळी बंड करुं.”

सेनापतींवर पकड वॉरंट निघाले. ते चार वर्षे अज्ञातवासांत गेले. शेवटीं अटक झाली. मुंबईच्या लॉकअपमध्यें आणलें. पोलीस अधिकारी व्हिन्सेंटसाहेबांवर सेनापतींच्या स्वच्छ व स्पष्ट वागण्याचा अपार परिणाम झाला. “ तुम्हाला सोडलें तर काय कराल ?” या प्रश्नाला सेनापति म्हणाले, “ वेळ आली तर सशस्त्र बंडहि करावें लागेल.”

पुढे सुटले. आपल्या पत्नीला अज्ञातवासांत एक करुण पत्र लिहिले, “ मी अज्ञातवासांत एक प्रकारें नष्टवत्, मृतवत्. शास्त्राची अशा परिस्थितींत पुन्हां पति करायला संमति आहे. तूं पुनर्विवाह कर.” त्यांनीं आपल्या मित्रालाहि, “ माझ्या पत्नीशीं विवाह लाव ” म्हणून पत्र लिहिलें. मनाचा असा मोठेपणा कोठें पाहावयास मिळेल ?

सेनापतींच्या घरी मी गेलों कीं मला लेनिन-मिक्श्चर मिळायचें. रशियन क्रांतीचा पहिला वाढदिवस होता. मराठा पत्राच्या कचेरींत काम करीत होते. म्हणाले, “ आपण हा मंगल दिवस येथें साजरा करुं.”  डाळमुरमुरे आणले. म्हणाले, “ घ्या हें लेनिन-मिक्श्चर.”

१९२०-२१ च्या मुळाशी सत्याग्रहाचें नेतृत्व त्यांच्याकडे आलें, सेनापति हें नांव तेव्हांपासून त्यांना मिळालें. त्यांना शिक्षा झाली. पुढें सुटले. पुन्हां सत्याग्रह. अखेर त्यांनी १९२४ साली शस्त्र-सत्याग्रहहि केला. कोणाला ठार न करतां शुध्दबुध्दीनें शस्त्र घेऊनहि सत्याग्रह करता येतो हा सिध्दांत त्यांना मांडायचा होता. सात वर्षांची शिक्षा झाली. पुन्हा ३१ साली खुनाला उत्तेजन देणारें भाषण केलें म्हणून सात वर्षांची शिक्षा.

काँग्रेस मंत्रीमंडळ आले तेव्हां सुटलें १९३७ मध्यें. नगरला भेटले तेव्हां म्हणाले, “ तुरुंगांत तुमची पत्री वाचली, श्यामची आई वाचली. आवडलीं पुस्तकें.” मला अपार आनंद झाला. मी एक धडपडणारा वेडावांकडा जीव. मी त्याच्या चरणांकडे बघत होतों.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel