देशभक्तांचा मुकुटमणि
लाला लजपतराय


भारताच्या स्वातंत्र्ययुध्दांत ज्ञात-अज्ञात अशा लाखोंचे बलिदान आहे. परंतु गंगेचा साराच प्रवाह पुण्यवान् असला तरी हरद्वार; प्रयाग, काशी इत्यादी ठिकाणें जशी अधिक पवित्र वाटतात, किंवा हिमालयाचीं अनंत शिखरें भव्य वाटलीं तरी कांचनगंगा, धवलगिरी, गौरीशंकर, इत्यादी जशी भव्यतम वाटतात, त्याप्रमाणे लोकमान्य, लालाजी, देशबंधु, महात्माजी इत्यादी पुण्यश्लोक नांवे आहेत. १९०७-८ च्या काळांत लाल, बाल आणि पाल हीं तीन नांवें भारतभर दुमदुमत होतीं.

लालाजी शिकले, वकील झाले. त्यांनीं पैसा मिळविला. स्वामी दयानंदांच्या शिकवणीचा त्यांच्यावर परिणाम झाला. ते शैक्षणिक चळवळींत पडले. लाहोरची दयानंद शिक्षणसंस्था म्हणजे लालाजींच्या श्रमांचे फळ. त्यांनी आधीं जवळचे ५० हजार रुपये टेबलावर ठेवले व मग लोकांजवळ मदत मागितली.

परंतु शिक्षणांत पडलेले लोकमान्य राजकारणांत आले. लालाजी कसे दूर राहतील ? ते वंगभंगाचे दिवस. लालजींनी सारा पंजाब जागा केला. पंजाबांत भारत चळवळ सुरु झाली. ‘पगडी सांभाळो’ हें घोषवाक्य होतें. एका सभेंत एक शीख तरुण लालाजींच्या भाषणानें संस्फूर्त झाला म्हणाला, “१ | लाख शीख तुमच्या आज्ञेप्रमाणे वागायला तयार आहेत.” गुप्त पोलिसांचा अहवाल गेला कीं १ | लाख सैन्य उभें करुन लालाजी बंड करणार ! त्यांना मंदालेस स्थानबध्द करुन ठेवण्यांत आले. लालाजींना न सोडतील तर पार्लमेंट उडवावें, मोर्लेसाहेबांवर बाँब टाकावा असे सेनापति बापट त्यावेळेस विलायतेंतील क्रांतिकारकांना म्हणालें.

लालाजी सुटले. परन्तु पुढे लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली. लालाजी अछूत उध्दाराच्या कामाला लागणार होते. परन्तु ते परदेशांत गेले. आणि महायुध्द सुरु झाल्यामुळें अमेरिकेंतच ते अडकले. तिकडे त्यांनी शेंकडों लेख व भाषणें यांनी अमेरिकेला भारताची परिस्थिति निवेदली. डॉ. हर्डीकर त्यांचे चिटणीस होते. लोकमान्यांनीं सुटल्यावर लालाजींना कार्य चालवायला मदत केली.

पुढे लालाजी परत आले. तों जालियनवाला बाग होऊन गेली होती. कलकत्त्यांत त्यांच्या अध्यक्षतेखालीं राष्ट्रसभेचें जादा अधिवेशन भरुन असहकाराचा ठराव मंजूर झाला. मतभेद असूनहि लालाजी गांधीजींच्या बरोबर उभे राहिले. ते दिल्लीच्या विधिमंडळांत गेले. शारदा बिलाच्या वेळेस अत्यंत आजारी असतांनाहि मत द्यायला गेले. सायमन कमिशनच्या बहिष्काराच्या मिरवणुकींत पुढे होते. त्यांच्या छातीवर लाठया बसल्या. ते म्हणाले “प्रत्येक लाठी म्हणजे ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या शवपेटिकेंत ठोकलेला खिळा आहे.”  छातीला सूज आली व हा देशभक्तांचा मुकुटमणि १७-११-१९२८ रोजीं देवाघरीं गेला.
आणि पुढें बरोबर एक वर्षानें लालाजींवर लाठीचा प्रहार करणा-या गो-या सोजिरांचा अधिकारी साँडर्सचा खून झाला. भगतसिंग, राजगुरु, सुकदेव फांशी गेले. लालाजींचें भगतसिंगांवर फार प्रेम. भगतसिंगाला हवें तें पुस्तक ते मागवून देत. लालाजी केवळ चळवळे नव्हते. त्यांनी ‘लोकसेवक संस्था’(Servants of the people) स्थापिली.  ‘पीपल’ हें इंग्रजी साप्ताहिक व ‘वंदेमातरम्’ हें उर्दू पत्र ते चालवीत. दुष्काळ, भूकंप, कोठहि आपत्ति असो लालाजी पुढे असायचेच. त्यांनी उर्दूत अनेक पुस्तकें लिहिली आहेत. इंग्रजींतही त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. ‘मदर इंडिया’ या भारताची नालस्ती करणा-या अमेरिकन पुस्तकाला ‘अनहॅपी’ या नावाचा ग्रंथ लिहून त्यांनी उत्तर दिलें १९१९ च्या त्यांनीं अमेरिकेंत सुरु केलेल्या यंग इंडिया मासिकाच्या सप्टेंबरच्या अंकांत क्रांती संबंधी विचार हा लेख “क्रांतीचा विद्यार्थी” या नावाने लिहिला होता. त्यांत ते म्हणतात, “जें राष्ट्र आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायला तयार नाही, तें त्याला पात्र नाही. बाहय मदतीनें मिळविलेलें स्वातंत्र्य पटकन् जायचाहि संभव असतो. क्रांति यशस्वी व्हायला तिचा पाया नैतिक व मानवी हवा. लोकांचा पाठिंबा हवा. लोकशाहीसाठीं म्हणून ती क्रांति हवी. क्रांतिकारक संस्थांत गुप्तता येणें अपरिहार्य असेल तर नैतिकदृष्टया हितकर ठरेल.”
लालाजी, तुमच्या पुण्यस्मृतीस प्रणाम !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel