अमर पुण्यपूंजि
कस्तुरबा


३० जानेवारीला बापूंचा श्राध्ददिन. २२ फेब्रूवारीला बांचा- कस्तुरबांचा श्राध्ददिन. पंचांगाप्रमाणे शिवरात्रीस त्या देवाघरीं गेल्या. बा आणि बापू ही भारताची मृत्यूंजय अशी मोलाची ठेव आहे. राम-सीता, नल-दमयंती, हरिश्चंद्र-तारामती, सत्यवान्-सावित्री, वसिष्ठ-अरुंधती, अत्रि-अनसूया, तशीं बापू आणि बा नवभारताची उभयतां मायबाप कस्तुरीप्रमाणें बांचे जीवन सुगंधी. तो सुगंध चिरकाल राहील. महात्माजींच्या महान् प्रयोगांत त्या सामील झाल्या. ते आरंभींचे झगडे, ते संघर्ष. परंतु शेवटीं त्यांनीं जाणलें कीं मी ज्याची पत्नी झाले आहे, तो एक नवसंदेश देणारा पुरुष आहे. मी का त्यांच्या मार्गात अडथळा होऊं ? मला त्यांच्या भव्य प्रयोगांत समरस होऊं दे असें त्यांनीं ठरविलें.

“ स्त्रिया यशाची शक्ति
भ्रताराची करिती भक्ति”

असें सावित्रीच्या गाण्यांत आहे. बा छायेप्रमाणें महात्माजींच्या मागोमाग गेल्या. जाणीवपूर्वक गेलीं ६० वर्षें एकत्र जीवन उभयतां जगलीं. किती प्रसंग असतील, किती अमर स्मृति असतील.

आपल्या विश्वविख्यात पतीप्रमाणें ही थोर माऊलीहि दु:खाचे घोट गोड करुन पीत होती. पतीप्रमाणें त्याहि अनेक अग्निदिव्यांतून गेल्या, कसोटीच्या प्रसंगांतून गेल्या. पतीच्या ध्येयवादी जीवनाशीं त्याहि समरस झाल्या. त्यांच्या प्रयोगांत सामील झाल्या. त्यांनी दारिद्रयाचा वसा घेतला, राष्ट्राला मुक्त करण्यासाठीं तुरुंगाला मंदिर मानलें.

सारे मोह सोडले. स्वातंत्र्याच्या लढयांतहि गेल्या. १९३० सालीं महात्माजींना अटक झाली. कस्तुरबा पत्रकें काढीत होत्या. गुजराती नारींना तेजस्वी प्रेरणा दिली. बा निर्भय होत्या. सरकारी कृपेची त्यांनीं कधीं याचना केली नाहीं. महात्माजींना ४२ सालीं अटक झाली. परंतु त्या मागें राहूं इच्छित होत्या लढा लढायला. शिवाजी पार्कवर ती राष्ट्रमाता लाखों जनतेसमोर उभी राहिली. परंतु सरकारनें आगाखान पॅलेसमध्यें नेऊन ठेवलें. आणि बा पुन्हां भारताला दिसायच्या नव्हत्या.

त्यांचा आवडता महादेव अटक होऊन आठवडा होतो न होतो तों गेला. आपल्या पुत्रवत् महादेवाचें स्वर्गप्रयाण कस्तुरबांनीं पाहिलें. आणि महात्माजींचा तो उपवास. नाडी सांपडतनाशी झाली. यांची काय मन:स्थिति असेल ? परंतु महात्माजी वांचले. बाच त्यांच्या आधी जायच्या होत्या. महात्माजींच्या मांडीवर त्यांना मरण आलें. “ मी आहे तुझ्याजवळ, मी जाणार नाहीं दूर ” महात्माजी म्हणायचे. चितेजवळ राष्ट्रपिता शेवटपर्यंत उन्हांत उभा. दोन अश्रू त्या कारुण्यमय दृष्टींतून घळघळले !

माते, तुझें ते बंदिखान्यांतील मरण आम्ही कसें विसरुं ? पुण्याची ती समाधि म्हणजे भारताचें तीर्थक्षेत्र आहे. महादेवला तेथें तुमची चिर सोबत आहे. पुत्रवत् महादेवला कसें सोडून जायचें असें कां तुम्हाला वाटलें ?

बा, कस्तुरबास्मारक निधीच्या रुपानें तुम्हीं गांवोगांव जाल. त्यांतून सेविका काम करायला अधिकाधिक येतील. तुमचा संदेश सेवेनें देतील. भारताचें सतीत्व तुमच्या रुपानें प्रकट झालें. मृत्यूशी गंभीरपणें बोलणा-या सावित्रीची वृत्ति तुमच्याजवळ होती. सीतेची दिव्य करण्याची वृत्ति होती. भारतीय पावित्र्य, पतिव्रत्य, धीरता, सेवा, सहानुभूति, प्रेम, मांगल्य, यांची तुम्ही मूर्ति होतां, हें राष्ट्र तुमचें चिर ऋणी आहे. केवढा उदात्त आदर्श ठेवून तुम्ही गेलांत ! बा आणि बापू !  या दोन नांवांत केवढी अद्भुत जादू, केवढी अमृतमय किमया ! तुमचे आत्मे भारताला तारित राहतील. बा, भक्तिप्रेमाचा कृतज्ञतेचा तुमच्या स्मृतीला प्रणाम ! तुमचें जीवन म्हणजे राष्ट्राची अमर पुण्यपूंजि. तें जीवन आम्हाला सत्प्रेरणा देवो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel