शिवाजी महाराजांचें चरित्र अनंतरुप आहे. मुसलमानांचें बंड त्यांनीं मोडलें, परंतु ते मुस्लीम द्वेष्टे नव्हते. सूडबुध्दि त्यांच्याजवळ नव्हती. त्यांनीं मशिदी पाडून मंदिरें केलीं नाहीत. मशिदींनाहि इनामें दिलीं. एवढेंच नव्हे तर मुसलमानांसहि नोक-या चाक-या देत. आरमारांत मुसलमान होते. एवढेच नव्हे तर अफजुलखानाच्या भेटीस जातांना छत्रपतीच्याबरोबरच्या शरीर-रक्षकांत एक मुसलमानहि होता. मुसलमान सरदारांची सुंदर पत्नी त्यांच्यासमोर कैद करुन आणण्यांत आली तर त्यांनी तिला माता मानून गौरविलें. मराठयांनी ही वृत्ति पुढेंहि टिकविली होती. अजमेरचाप्रसिध्द दर्गा मोडकळीस आलेला मराठयांनी दुरुस्त करुन दिला. भारताला आज या वृत्तीची गरज आहे.

शिवाजी महाराज म्हणजे केवळ मुस्लीमद्वेष असें समीकरण मांडणा-यांस शिवाजी महाराज मुळींच समजले नाहीत. परंतु केवळ धर्मावर होणा-या आक्रमणासाठीं शिवाजी महाराज उभे असते तर यशस्वी झाले असते असे नाहीं. धर्मरक्षणाबरोबर गरिबांच्या अर्थरक्षणार्थहि ते उभे राहिले. शिवाजी महाराज काळाच्या पुढें होते. युरोपांत प्रॉटेस्टंट व कॅथॉलिक एकमेकांच्या कत्तली करीत होते तेव्हां शिवाजी महाराज स्वधर्माचें रक्षण करीत असतां परधर्माचीहि कदर करीत होते. याबाबतींत ते ज्याप्रमाणें काळाच्या पुढें होते त्याचप्रमाणें आर्थिक धोरणांतहि पुढें होते. जमीनदारांविरुध्द, जहागिरदारांविरुध्द ते उभे राहिले. बखरींत वाक्य आहे कीं, गढीवाला सरदार असे. सारा गांव जणूं त्याचा गुलाम. त्याचे घोडे वाटेल तेथें चरायचे. तो वाटेल त्याच्या झाडावरचीं फळें तोडून आणील. परंतु शिवाजी महाराजांच्या आज्ञा पत्रांत पुढील अर्थाचें वाक्य आहे, “ रयतेच्या काडीला स्पर्श करतां कामा नये. रयतेंनें पोटच्या पोरांप्रमाणें वाढविलेलीं झाडें, त्यांचीं फळें नेता कामा नये.”  असा शिवाजीमहाराजांचा दंडक होता. लंगोटया मावळयांसाठीं ते उभे होते. सरदारजहागिरदारांनीं जनतेला निस्त्राण केलें होतें. यांचें बंड कोणी मोडायचें ? शिवाजीमहाराजांची ही दृष्टी पुढील लोकांजवळ राहिली नाहीं.

भारताला सर्वधर्मसहिष्णुतेची व आर्थिक समतेची अशी ही शिवछत्रपतींची दुहेरी दृष्टी आज हवी आहे. छत्रपतींची ही द्विविध दृष्टि ज्याला कळली नाही त्यानें त्या थोर पुरुषांचें नामोच्चरण करणें व्यर्थ होय. देशभर हा द्विविध संदेश आज घुमवायला हवा आहे. भारतांत कोणत्याहि धर्माचे असा. गुण्यागोविंदानें नांदा. हा सर्व धर्मसमभाव आज उत्कटतेनें पुकारणें सर्वांचें कर्तव्य आहे. त्याचप्रमाणें भारतांतील जमीनदारीचेंहि उच्चाटन व्हायला हवे आहे. सर्वधर्मसमभावाची प्रचंड लाट उठवून जात्यंधांची द्वेषाळ आग आपण विझविली पाहिजे व जमीनदारी नष्ट करुन कम्युनिस्टांची नांगी ढिली केली पाहिजे. हें जो करील तो शिवाजीमहाराजांचा वारसदार !

शिवाजी महाराजांचें भव्य जीवन डोळयांसमोर आलें म्हणजे शतविचार स्फुरतात. परंतु आजच्या भारतीय परिस्थितींत त्यांच्या चरित्रांतील सर्वधर्मसहिष्णुता व गरिबांची आर्थिक स्थिती सुधारण्याची तळमळ या दोन गोष्टी सूर्यप्रकाशाप्रमाणे डोळयांसमोर उभ्या राहतात. हीं दोन ध्येयें नव-भारताच्या पुरोगामी तरुणांस हांका मारीत आहेत. जे ऐकतील, ते स्वत: तरुन राष्ट्रास तारतील; जे ऐकणार नाहींत व आंधळेपणानें वेडेवांकडें करीत बसतील ते स्वत: माणुसकीस मुकतीलच परंतु या महान राष्ट्रालाहि विनाशाच्या गर्तेत लोटतील. म्हणून सावधान !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel